(साभार : दैनिक ‘महाराष्ट्र दिनमान’)
-मिथिला सुभाष
*****
1951मध्ये जेव्हा ‘आवारा’ आला तेव्हा राज सत्तावीस वर्षांचा होता. चोविसाव्या वर्षीच तो निर्माता-दिग्दर्शक बनला होता. ‘आवारा’ हा त्याच्या बॅनरचा तिसरा सिनेमा. ख़्वाजा अहमद अब्बास आपली ही कथा घेऊन खरं तर मेहबूब खानकडे गेले होते. जज रघुनाथच्या भूमिकेत अशोक कुमार आणि नायकाच्या भूमिकेत दिलीप कुमार अशी पात्रयोजनाही झाली होती. पण कुठे तरी माशी शिंकली आणि केए अब्बास यांनी आपलं चोपडं तिथून उचललं आणि आरके स्टुडियोचा रस्ता धरला. मग राज-रीता ही रोमँटिक जोडी अर्थातच राज-नर्गिसच्या वाट्याला आली. जज रघुनाथ ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका पापा पृथ्वीराजना मिळाली आणि राजचे बालपण साकारले गोबऱ्या, गुंदुश्श शशी कपूरने. अशा रीतीने घरातल्या घरात भूमिकांची वाटणी झाली. इतर कलाकारात रडकी लीला चिटणीस आणि कुर्रेबाज केएन सिंग महत्त्वाचे.