कालानुरूप ईश्वरात झालेले बदल

(साभार: ‘कर्तव्य साधना’- चार्वाक लेखमाला  भाग – 7)

– सुरेश द्वादशीवार

वरुणाची जागा इंद्राने घेणे व देवतांचा सर्वोच्च नेता वा राजा होणे ही वैदिक कथा दैवते कशी तयार होतात, काही काळ ती कमालीची पूजनीय व लोकश्रद्धेचा भाग कशी होतात व कालांतराने ती विस्मरणातही कशी जातात हे सांगू शकणारी आहे. अगदी 30-35 वर्षांपूर्वी भारतात संतोषी माता ही देवता कमालीची लोकप्रिय झाली. तिचे चित्रपट कमालीचा पैसा मिळवणारे ठरले. त्या चित्रपटातल्या उपवासादी विधींचा अनेक घरांनी स्वीकार केला. तिच्या नावाखाली महिलांची मंडळे निघाली. त्यांनी मिरवणुका काढल्या आणि तिचा पुरेपूर प्रचंड खर्चही केला. आज सारे जण तिला विसरले आहेत. संतोषी माता आज फारशी कुणाला आठवतही नाही…

नंतरच्या काळात साऱ्या देशातले मातीचे गणपती एकाएकी दूध पिऊ लागल्याची अफवा पसरली. लोक घरोघरी आपल्या मूर्तींना दूध पाजू लागले. मातीची मूर्ती दूध शोषून घेत होती. तिचा करडा पृष्ठभाग ते करत होता हे नंतर विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले तेव्हा ती दुधाची नासाडी थांबली. (प्रस्तुत लेखकाच्या एका विनोदी मित्राने त्या काळात गणपतीला मद्यही पाजले.)  दैवते अशी येतात अन्‌ लोप पावतात. धर्मांचे जन्मकाळ सांगता येतात तसे ईश्वरांचे जन्मकाळही अनुमानाने सांगता येतात.

तसाही ऋग्वेद हा ग्रंथ कित्येक शतके लिहिला जात होता. या ग्रंथाच्या आरंभकाळात किंवा त्याच्याही अगोदर वैदिकांच्या पूर्वजांनी, वरुणाच्या वा इंद्राच्या नेतृत्वात जी युद्धे केली व जे पराक्रम केले त्यांच्या कथा उत्तरकालीनांनी या ग्रंथात लिहिल्या आहेत. एका अर्थाने तो पूर्ववैदिकांचा इतिहास आहे. कोणा व्यक्तीसाठी, जमिनीसाठी वा गायी मिळवण्यासाठी ही युद्धे झाल्याच्या या कहाण्या आहेत. त्यात त्यांनी ज्यांचा विनाश केला ती पुरे (शहरे) व त्या तटबंद्या या सिंधू संस्कृतीतील लोकांनी उभारलेल्या होत्या असे आता इतिहास सांगतो.

या सिंधूजनांचा उल्लेखच ऋग्वेदात आर्यशत्रू, दस्यू वा दास असा आला आहे. मॅक्समुल्लरच्या मते आर्यांच्या भारतातील आगमनाचा व वेदांच्या रचनेचा काळ एकच आहे. आता मात्र त्याचे हे मत कुणी मान्य करत नाही. वैदिकांनी सिंधू संस्कृतीचा पाडाव केल्यानंतर व स्वतःला शास्ते म्हणून प्रस्थापित केल्यानंतर, कित्येक (सुमारे 200) वर्षांनी त्यांनी भारताच्या भूमीतच ऋग्वेदाची रचना केली.

आजच्या हिंदू संस्कृतीचा मूळ पाया ही सिंधू संस्कृती आहे. तिच्यावर वैदिकांनी त्यांच्या संस्कृतीचा व जीवनपद्धतीचा संस्कार करून तिला तिचे नंतरचे रूप दिले आहे. पाश्चात्त्य विद्वानांनी ऋग्वेदाचे अर्थ अनेकदा चुकीचे लावले आहेत. सिंधू संस्कृती व वैदिकांची जीवनपद्धती एकत्र येऊनच हिंदूंचा नंतरचा इतिहास असा झाला ही गोष्ट त्यांतील अनेकांनी याच समजुतीने लिहिली आहे. शारदीपुर:चे इंद्राने भंजन केले तेव्हा त्याचा अर्थ या विद्वानांनी इंद्राने शरद ऋतूतील किल्ल्यांचे म्हणजे मेघांचे भंजन केले असा लावला. मात्र शरद संवत्सर वर्षभर सुरक्षित करता येईल अशा तटबंद्यांनी सुरक्षित केलेल्या शहरांचा इंद्राने पाडाव केला असा त्याचा अर्थ सायणाचार्यांनी लावला व तो आता सर्वमान्य आहे. गृध्रवाच:  या शब्दाचा अर्थ पाश्चात्त्यांनी ‘ज्यांची वाणी तुटक आहे असे’ असा केला. सिंधू संस्कृतीत जिव्हा दुभंग करण्याचा एक संस्कार होता… शिवाय वैदिकांच्या शत्रूंना द्विजिव्हा म्हणून त्यांची नागांशी तुलना वैदिकांनी केली. इंद्राचा शत्रू वृत्र याचा उल्लेखही अही (वृषशिप्र) असा ऋगेवेदात चाळीस वेळा आला आहे.

ऋग्वेदाच्या पहिल्या दहा मंडलांत पूर्ववैदिकांनी केलेल्या पराक्रमाच्या कथा आहेत. त्यांचे नेतृत्व इंद्र या नेत्याने केले आहे. विध्वश्व:, दिवोदास, पितावन, सुदास, दाशराज्ञ युद्धातला विजय, पुरूंची वंशावळ त्यांत आहे. पुरू कुळातील अनेक जण दाशराज्ञ युद्धात मारले गेल्याचाही उल्लेख त्यात आहे. पुरूंच्या पाच व भरताच्या चार पिढ्‌यांच्या कहाण्या त्यात आहेत. दाशराज्ञ युद्ध पुरुष्णी नदीच्या किनाऱ्यावर सुदासाने पाच आर्य व पाच अनार्य जातींशी केले. याच युद्धात पुरूवसु हा पुरूकुलोत्पन्न नेता मारला गेला.

दिवोदासाने पणींच्या (म्हणजे सिंधू संस्कृतीतील व्यापाऱ्यांच्या वा धनवंतांच्या)  तावडीतून सरस्वतीची सुटका केली असे वर्णन ऋग्वेदातच आहे. ऋग्वेदातील सरस्वतीला गंगा वा सिंधू यांहून अधिक महत्त्व होते. (संशोधकांच्या मते राजस्थानातील सुकलेली धग्गर हीच ती सरस्वती आहे.) ऋग्वेदातील दस्यूंचे हरयुपिया (हडप्पा) पावध (पाक्थून) व शिवालिक शिव या जमातींचे वैदिकांनी केलेले पराभवही त्यात आहेत. वेदातील अनेक ऋचा वसिष्ठ विश्वामित्रादी ऋषींनी लिहिल्या. त्यांच्यातही वाद होते.

वसिष्ठ व तुत्सू हे भरत वंशाचे पुरोहित होते. त्याच वंशातील सुदासाचे वसिष्ठाशी वितुष्ट येऊन त्याने विश्वामित्राला पुरोहित नेमले. या विश्वामित्राने सुदासासाठी अश्वमेध यज्ञ केला. त्याने वसिष्ठाला दिलेल्या शिव्याशापाच्या तीन ऋचाही वेदात आहेत. त्या वसिष्ठांनी गाळल्यामुळे त्याचा वेद तीन ऋचांनी लहानही झाला आहे. ऋग्वेदाचे पाचवे मंडल अत्रेयाचे आहे. ते पुरू, यदू व तुर्वसू या भरत वंशाच्या शत्रूंसाठी लिहिले आहे.

वैदिकांच्या हल्ल्यांनी सिंधू संस्कृती नाश पावली. त्यातल्या स्त्रीपुरुषांच्या निर्घृण कत्तली झाल्या. आपल्या जीवनाच्या बचावासाठी हे दस्यू व पणी हिमालयाच्या पायथ्याशी, मगधाच्या उत्तरेला जाऊन वसले. या लोकांनी त्या भागात 16 गणराज्ये स्थापन केली. त्यांचे वेदपूर्व गणांशी असणारे साम्य हे सत्य स्पष्ट करणारे होते. याच गणराज्यातून नंतर बुद्ध व महावीर पुढे आले आहेत.

दस्यू द्राविडिअन वंशाचे होते. ते सुमेरिअन नव्हते. डोक्याला शिंगे बांधणे, वृषभपूजा करणे व खापराच्या मुद्रा वापरणे यांबाबत त्यांच्यात साम्य दिसत असले तरी जॉन मार्शल या अधिकारी अभ्यासकाने ते एक नव्हेत हे स्पष्ट केले आहे. सिंधू संस्कृती ही प्रगत शहरांची श्रेष्ठ जीवनपद्धती होती. वैदिकांनी ती बुडवण्याचे केलेले सगळे प्रयत्न अखेर फसले. स्त्रियांनी व सामान्य वर्गांनी ती संस्कृती जागवली. वैदिकांनी आपला धर्म त्यांच्यापासून वेगळा राखला. परिणामी तो ब्राह्मण व क्षत्रियांपुरताच मर्यादित झाला… मात्र नंतरच्या काळात वैदिकांनीही त्या संस्कृतीतील अनेक गोष्टी आत्मसात केल्या. परिणामी, आजच्या पूजापद्धतीत व तंत्र संप्रदायातही त्या आल्या. आजच्या संमिश्र जीवनपद्धतीचा उगम या वेदपूर्व काळात आहे.

इंद्र, अग्नी, वरुण, उषस्‌, पृषत्‌व अश्विनो ही दैवते नंतरच्या काळात मागे पडली. त्यांच्या जागी शिवलिंग, काली, दुर्गा, भवानी ही दैवते आली. आरती, धूप, फुले व हार याही बाबी आल्या. आर्यपूर्वांच्या (वेदपूर्वांच्या) दैवतांचा वैदिकांनी स्वीकार केल्याचे पुरावे ऋग्वेदातही आहेत. लिंगपूजा, लिंगपूजकांचे दैवत असलेला त्वस्टा, त्याचा पुत्र, विश्वरू हे सारे वैदिकांनी स्वीकारले. त्यांच्यावर स्तुतिपर ऋचा लिहिल्या. त्यांचे तांत्रिक महत्त्वही कायम ठेवले. विष्णू ही त्वष्ट्याचीच नवी आवृत्ती आहे.

महामहोपाध्याय काणे यांनी सिंधू संस्कृती ही आर्यांचीच होती असे म्हटले आहे. त्यांच्या मते ती पुराच्या पाण्याने नाहीशी झाली एवढेच. हरियुपिया (हरप्पा) धनावत, दुर्योण ही शहरे सिंधमध्ये होती. या शहरांचे क्षेत्रफळ चार मैलांहून अधिक मोठे होते. सिंधूप्रजा वर्णाने काळी, बसक्या नाकाची व त्यातली काही कापलेल्या जिभांची होती. उत्खननात मिळालेल्या 26 प्रेतांपैकी, 3 प्रेते ऑस्ट्रोलॉईड, एक मंगोलिअन आणि 21 द्रविडिअन वंशाची निघाली. (भारतात सात वंशांचे लोक आहेत. निग्रेटो, कोलोराईड, प्रोटो ऑस्ट्रोलॉईड, मेडिटेरिअन (द्रविड), मंगोलाईड, अल्पाईन व नॉर्डीक. यांतील पहिल्या दोन व नॉर्डीक वंशांची प्रेते सिंधू संस्कृतीच्या उत्खननात आढळली नाहीत. ही गोष्ट काणे यांच्या संशोधनाला बाधा आणते.)

गायी, घोडे, पशुधन, धान्याची कोठारे, सोने, मौल्यवान दगड व वस्तू आणि सुपीक शेते ही सिंधू संस्कृतीची संपत्ती होती. तीत व्यापार, न्यायव्यवस्था, बांधकाम, सुतारकाम, शस्त्रे तयार करणे, धातूकाम, दागिने घडवणे व वस्त्रे तयार करणे, पुतळे व मूर्ती यांची कला होती. मातीची भांडी, नौकानयन व समुद्रमार्गे ते व्यापार करणारेही होते. पणींनी इराणिअन राजा तस्युदास याला अनेक विधी शिकवल्याचा पुरावा सापडतो. झरतृष्ट्रापूर्वी अनेक वर्षे हे झाल्याचेही इतिहास सांगतो.

अहमदाबाद जिल्ह्यात भोगवो नदीचा काठ तीन मीटर उंचीपर्यंत बांधलेला आढळतो. लाटा अडवणारे धक्केही त्या किनाऱ्यावर आढळणारे आहेत. एका संशोधनानुसार वैदिकांचा भारतातला प्रवेश इसवीसनपूर्व 3300 वर्षांआधी झाला. ब्रह्मवर्ताची स्थापना  इसवीसनपूर्व 1101मध्ये झाली. सिंधू संस्कृतीचा विनाश इसवीसनपूर्व 2750 तर वैदिक ऋचांची निर्मिती इसवीसनपूर्व 2350नंतरची आहे. हे सारे एवढ्या विस्ताराने मांडण्याचे कारण वेद व त्यांतील ऋचा ईश्वरनिर्मित वा साक्षात्कारातून प्राप्त झाल्या नसून मानवनिर्मित आहेत हे सांगणे आहे. त्यात मानवाचा इतिहास व त्याच्या जन्मकथा आल्या आहेत. त्यात ईश्वर नाही, देव नाही, कोणतेही ब्रह्मतत्त्व नाही. सारे मानवी व मानवनिर्मित आहे हे स्पष्ट करणे हा या लेखनाचा हेतू आहे.

साऱ्या महाराष्ट्रात सध्या सत्यनारायण ही साऱ्यांच्या श्रद्धेची देवता आहे. त्याची नुसती पूजाच नाही तर महापूजा होते व तीत सामान्य माणसांसोबत राजकीय नेतेही सहभागी होतात. पंधरावीस वर्षांपूर्वीचा तो उत्सव आता जरा मावळला आहे… पण घरोघरच्या त्याच्या पूजा चालूच राहिल्या आहेत. या सत्तानारायणाचा जन्म अडीच ते पावणेतीनशे वर्षांपूर्वीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सत्यनारायण केला नाही. त्यांच्या समकालीनांनी वा पूर्वीच्या पिढ्यांनीही त्यांची पूजा केली नाही. मग हे दैवत आले कुठून?

बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात एका श्रद्धेय पिराची कबर होती. त्याला लोक एकपीर म्हणत. त्याची पूजा करणाऱ्यांत व त्याला नवस बोलणाऱ्यांत मुसलामानांसोबत हिंदूही सहभागी होत. कालांतराने त्यांतले हिंदू त्या एकपिराला सत्यपीर म्हणू लागले. पुढे काही काळातच त्या सत्यपिराचा सत्यनारायण झाला. (हिंदूंची कोणतीही दैवते त्यांचा प्रसाद खाल्ला नाही म्हणून आपल्या श्रद्धावानांचा व्यापार बुडवत नाहीत. त्यांची जहाजे नष्ट करत नाहीत वा त्यांचे घर आणि संसार उद्‌ध्वस्त करत नाहीत. सत्यनारायण हे सारे करतो. त्याचे हे सूडदायीपण त्याच्या पुजाऱ्यांच्या व यजमानांच्याही कधी लक्षात आले नाही वा त्यांना ते दुरुस्त करावेसेही वाटले नाही. याचेही कारण अंधश्रद्धाच. त्यात विचार नाही, विवेक नाही आणि म्हणूनच माणसांचा सर्वोच्च गुण नाही.)

दैवतांना माणसांनीच घडवले असल्याने व ईश्वर कल्पना माणसांच्या मनातील भीतीने वा श्रद्धेने जन्माला घातली असल्याने ती माणसांहून अधिक शक्तिशाली कधी होत नाही. नरहर कुरूंदकरांनी लिहिले, ‘भवानी माता शिवाजीराजांवर प्रसन्न झाली तरी ती त्याला भवानी तलवार देते. विमाने वा रणगाडे देत नाही… कारण शिवकाळात त्या गोष्टी अस्तित्वातच आल्या नव्हत्या. रामायणातील विमान हेही काल्पनिकच. तशी महाभारतातील शस्त्रेही साधी शस्त्रेच. त्या विमानांना उडवून दाखवण्याचा आणि त्या शस्त्रांना अण्वस्त्रे ठरवण्याचा मूर्ख प्रयत्न काही बावळट संशोधकांनी गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय संमेलनात प्रबंध वाचून केला व स्वतःएवढेच या देशाचेही हसे करून घेतले.

अशाच एका भ्रामक गोष्टीची नोंदणी इथे केली पाहिजे. महाभारत म्हणते कुरूक्षेत्रावर झालेल्या कौरव पांडवांच्या युद्धात 18 अक्षौहिणी सैनिक लढले. 18 अक्षौहिणीचा आजच्या भाषेतला अर्थ चोपन्न लक्ष असा होतो. भारताची आजची लोकसंख्या एकशे पस्तीस कोटी आहे. ती चौदाव्या शतकात बारा कोटी होती. इसवीसनाच्या आरंभी ती फारतर तीनचार कोटी असावी. भारतीय युद्ध त्याआधी 2300 वर्षे झाले. तेव्हा देशाची लोकसंख्याच पन्नास ते साठ लाखांएवढी असणार.

महाभारतकार जेव्हा 18 अक्षौहिणी म्हणतात तेव्हा त्याचा खरा अर्थ सारा देशच या युद्धात गुंतला होता. (त्यात 212 राजांनी भाग घेतला होता.) असा होतो. युद्धाची भव्यता सांगण्याचा व्यासांचा तो प्रतिभाविलास होता. त्याखेरीज काही नव्हते. तो आधुनिक विद्यार्थ्यांना व शिक्षितांना समजावा असाही आहे. श्रद्धावानांची गोष्ट अर्थातच वेगळी आहे.

देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी त्यांच्या लोकायत या ग्रंथात गणपतीचीही अशीच कथा तिच्या अनेक प्रमाणांसह सांगितली आहे. गणपती हे सर्व भारतीयांचे आद्यदैवत आहे. प्रत्येकच पूजेचा आरंभ गणेशपूजनाने करण्याचा आपल्या रिवाज आहे. हे दैवत झाले कसे, आले कसे आणि कुठून? आणि त्याला पहिल्या पूजेचा मान मिळाला तोही कसा?  ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इतरही दैवतांबाबतचे हे कोडे आहे. जगातल्या काही देवतांसमोरही अशीच प्रश्नचिन्हे आहेत.

पाणिनी म्हणतो समाज व जग यांच्या कल्याणाची कामे करणारी व त्यांचा उद्धार करणारी माणसेच पुढे समाजाची दैवते होतात. रोमन साम्राज्यात तर सम्राटाच्या जीवनात वा त्याच्या मृत्यूनंतर त्याला ईश्वराचा दर्जा द्यायचा की नाही हे तेथील सिनेट बहुमताने ठरवत असे. आपल्याकडे महापुरुषांचे पुतळे (मूर्ती) उभारण्याची प्रक्रिया याहून फारशी वेगळी नाही हेही इथे सांगण्याजोगे आहे.

भारतात आदिवासींच्या अनेक जमाती आहेत. 1951च्या जनगणनेनुसार तेव्हा त्यांची देशातील लोकसंख्या दोन कोटींच्या आसपास होती. त्यांची आर्थिक व सामाजिक व्यवस्था व स्थितीही परस्परांहून वेगळी होती. पशुपालनाच्या व कृषीच्या अवस्थेत काही जमाती तर जंगलांतून उपजीविका मिळवत होत्या. बिठोर, कोक, बडा माडिया या जमाती शिप्टिंग कल्टिव्हेशन करायच्या तर बैगा, पावरी, भुरीया, जुआंग आणि कुट्टी कुरिया या साधी शेती करत होत्या.

मुंडा, संथाल या जमातींना नांगर गवसला होता तर नागांनी डोंगर उतरणीवर शेती करून त्यात पाण्याची व्यवस्था शोधली होती. सामाजिक बाबतीत गारो, खासी या जमाती मातृसत्ताक, मातृवंशी… तर मुंडा आणि संथाल पितृसत्ताक होत्या. या जमातींच्या काळातच देशाच्या विविध भागांत प्रथम छोटी गणराज्ये व पुढे महासत्ता उभ्या राहिल्या.

महाभारतात 212 राजांनी युद्धात भाग घेतल्याचा उल्लेख आहे. याच काळात हस्तिनापूर व मगध यांसारखी साम्राज्येही उभी राहिली. या शक्तिशाली सम्राटांनी गणराज्यात राहणाऱ्या जमातींवर आपला ताबा मिळवला व त्यांच्या जमिनी आपल्या साम्राज्याला जोडल्या. यांतील काही जमाती या राजांना शांतपणे शरण गेल्या. काहींनी त्यांच्या जमिनी व अधिकार राज्यात विलीन केले तर काहींनी या राजांशी लढती दिल्या.

पांडवांनी कृष्णाच्या मदतीने खांडव वन कसे जाळून ताब्यात घेतले व नागांना थेट पूर्व भारतापर्यंत कसे देशोधडीला लावले याची कथा महाभारतात आहे… तर उत्तरेकडील राजांनी त्यांना दक्षिणकडे व दक्षिणेकडील राजांनी त्यांना उत्तरेकडे ढकलून त्यांना त्यांचे वास्तव्य सह्याद्रीपासून नागलँडपर्यंतच्या देशाच्या मधल्या अरुंद पट्ट्यात कसे करायला लावले ही गोष्ट इतिहास सांगतो.

जमातींना ताब्यात घेताना व त्यांना आपल्यात सामील करून घेताना (किंवा त्यांच्याशी युद्धे करतानाही)  राज्यातील स्थानिक वरिष्ठ जनांनी व प्रजेने त्यांच्या अनेक चालीरिती, रुढी, प्रथा, परंपरा व दैवतेही स्वीकारली व आत्मसात केली. प्रजेची सरमिसळ होत जाण्याने ही प्रक्रिया सहजपणे दीर्घ काळ घडत राहिली. आजही समाजात नागपूजा, बैलांची पूजा, गायींची दैवते अस्तित्वात आहेत. पशुपक्ष्यांची दैवते करणे, आदिवासींच्या दैवतांचा स्वीकार करणे याही गोष्टी यातल्याच.

भारतीय समाजाने आपली किती दैवते आदिम जमातींकडून घेतली याचा अभ्यास मनोरंजक व ज्ञानवर्धक ठरावा असा आहे. या जमाती त्यांच्या कुलचिन्हांवरून ओळखल्या जायच्या. नागांचे कुलचिन्ह साप, हनुमंताच्या जमातीचे वानर, मकरध्वजांच्या जमातीचे मगर अशी कुलचिन्हे (टॉटेम्स) फार प्राचीन आहेत. आजच्या आदिवासी जमातींचीही वाघ, हरीण, अस्वल, हत्ती इत्यादींसारखी कुलचिन्हे आहेत. त्यांची पूजा होते व प्रसंगी ती खाल्लीही जातात.

1950पर्यंत मुलांची शाळांमधील नावे त्यांच्या आडनावांसह लिहिली जात नसत. त्यांच्या नावापुढे त्यांची जात लिहिली जात असे. तसेच या जमातीमधील माणसे, स्त्रिया व मुले सामूहिकरित्या (त्यांची व्यक्तिगत नावे असतानाही) या कुलचिन्हांवरून ओळखली जात. या जमातींना गण असेही म्हटले जात असे. स्वाभाविकच त्यांचे प्रमुख गणपती या आदरार्थी नावाने ओळखले जात. या गणपतीचाही स्वीकार जमातींच्या इतर दैवतांप्रमाणे प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या प्राचीन समाजाने केला.

एकदा एकाला दैवत ठरवले गेले की मग त्याच्या पूजा, आरत्या व पोथ्या तयार होतात. लाभापोटी खऱ्याखोट्या कथा रचल्या जातात. गणेशपुराणे अशीच लिहिली आहेत. त्यात या गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा आहेत. काही चांगल्या तर काही अतिशय वाईट. एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची. मूळ वेदांमध्ये असलेला गणपती मानवदेहधारी आहे. त्याला हत्तीचे तोंड वा सोंड नाही. सोंडेचा गणपती पुढे महाभारतात येतो. गणपतीचे बदलणारे हे रूपही प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. गणपतीच्या पोथ्यांमध्ये आलेल्या त्याच्या जन्मकथाही या संदर्भात ज्ञानवर्धक व मनोरंजक आहेत.

त्यांतली एक सर्वतोमुखी असलेली कथा अशी – एक दिवस पार्वती गुहेच्या आडोशाने न्हात होती व तिने गणपती या आपल्या दुसऱ्या मुलाला गुहेच्या तोंडाशी उभे केले. आत कुणालाही येऊ न देण्याचा आदेश तिने त्याला दिला. नेमका त्या वेळी कामातुर झालेला शंकर पार्वतीकडे आला. गणपतीने त्याला अडवले. तेव्हा संतापलेल्या शंकराने आपल्या त्रिशुळाने गणपतीचे मुंडके उडवले. ते कुठेतरी लांब जाऊन पडले.

पुढे सारा अनर्थ लक्षात आल्यानंतर गणपतीला जीवदान देण्याची विनंती पार्वतीने शंकराला केली. त्या वेळी शंकराने आपल्या त्रिशुळाला जो प्रथम दिसेल त्याचे मुंडके आणण्याची आज्ञा केली व त्याला आकाशात फेकले. या त्रिशुळाला एक हत्तीच प्रथम दिसला. शंकराच्या आज्ञेबरहुकूम त्याने त्याचे मुंडके उडवले व शंकराला आणून दिले. तेच गणपतीच्या शिरावर बसवल्याने आजचा सोंडेचा गणपती तयार झाला.

दुसऱ्या एका कथेत पार्वतीने आपल्या देहाच्या मळालाच गणपतीचा आकार देऊन त्याच्यात प्राण फुंकला. या व अशा दंतकथांचे फसवे स्वरूप कोणाच्याही लक्षात येणारे आहे… त्यामुळे गणपतीचा शोध वैज्ञानिक तंत्रानेच घ्यावा लागतो. त्याचे महत्त्वही त्याचमुळे लक्षात येते. हा शोध घेताना संशोधकांनी मानवंशशास्त्राचा आधार घेतला. इतर देशांतील व धर्मांतील दैवते व श्रद्धास्थाने कशी निर्माण झाली याचा वेध घेतला. त्यांना त्यांच्या या संशोधनात इजिप्तची दैवते व श्रद्धास्थाने उपयोगी ठरली. बहिरी ससाणा किंवा बाज हा पक्षी इजिप्तचे राष्ट्रीय चिन्ह आहे. (भारताचे राजचिन्ह तीन सिंह आहे तसे.)  मग हा पक्षी इजिप्तचे मानचिन्ह कसा ठरला हा शोध इतिहास, परंपरा व शास्त्र यांच्या मार्गाने घेतला असता हे संशोधक या निष्कर्षाप्रत आले की, जी जमात इतर जमातींना पराभूत करून आपल्या वर्चस्वाखाली आणते तिचे कुलचिन्ह पराभूत जमातींसाठी दैवत होते. जित्यांच्या जमातींसोबत जेतेही त्याची पूजा करू लागतात. त्यांची पूजा जित्यांच्या मनातील त्यांचे स्थान आणखी उंचावणारी ठरते. इजिप्तच्या प्राचीन इतिहासात ज्या जमातीचे कुलचिन्ह बाज पक्षी होते त्या जमातीने आपल्या सभोवतीच्या इतर सर्व जमातींचा पराभव केला. परिणामी, जेत्यांचे कुलचिन्ह बाज हे जित्यांसाठी नम्र होण्याचे व पूजा करण्याचे स्थान झाले. बाज पक्षी इजिप्तच्या राजचिन्हांच्या जागी असा आला.

हेच सूत्र आपल्याकडे वापरून भारतीय मानववंशशास्त्रज्ञांनी गणपतीचा शोध घेतला. ज्या गणाचे कुलचिन्ह हत्ती होते त्या गणाने इतरांचा पराभव करून त्यांना आपल्या ताब्यात आणले. जेत्यांचे कुलचिन्ह मग जित्यांसाठी पूजाकेंद्र झाले. एकदा पूजा सुरू झाली की त्यामध्ये दैवतांच्या कथा, श्रद्धा जागवणाऱ्या गोष्टीही सुरू झाल्या. हत्ती या गणाने ज्या गणांचा पहिला पराभव केला त्यांचे कुलचिन्ह उंदीर होते… त्याचमुळे उंदीर हा गणपतीचे वाहन झाला. कालांतराने दैवताला प्राण्याचा देह कसा जोडायाचा हा विचार प्रबळ होऊन हत्तीच्या मस्तकाला माणसाचे शरीर जोडले गेले. सोंडेचा गणपती मग असा तयार झाला. त्याला न शोभणारा उंदीर हे चिमुकले वाहनही त्यातूनच सिद्ध झाले.

या घटना सामान्यपणे खारवेल राजाच्या काळात बंगालात घडल्या आहेत. तिथे हत्ती या कुलचिन्हाला मान आहे व त्याची पूजा अजूनही तेथील अनेक जमातींप्रमाणेच प्रस्थापित वर्गांतही होते. या जमातीने ज्या इतर जमातींना पराभूत करून गुलाम केले त्यांच्या मनातला सूडही कधी पूर्णपणे संपला नाही. बंगालसह देशाच्या इतर अनेक भागांत काली ही देवता शंकराला किंवा गणपतीला पायाखाली तुडवत त्याच्या अंगावर नाचत असते हे दाखवणाऱ्या अनेक मूर्ती त्या भागातील संशोधकांना सापडल्या आहेत. काही जागी त्या मंदिरातही आढळतात. तसेच तशी त्यांची प्राचीन स्वरूपाची चित्रेही सापडली आहेत. काही आधुनिक चित्रकारांनीही ती रंगवून बाजारात आणली आहेत.

दैवते व त्यांचे जन्म यांच्यापर्यंत वास्तवाचा, इतिहासाचा व मानववंशास्त्राचा आधार घेऊन असे जाता येते. पशुपालकांच्या जमातींची दैवते पुरुष का असतात आणि कृषिकर्त्या जमातींना स्त्रीदैवतांचीच पूजा का भावते याची उत्तरेही याच मार्गाने सापडतात. आदिम जमातींमध्ये निर्मितीची व निर्मितीच्या स्थानांची पूजा महत्त्वाची समजली जात असे. स्त्री मुलांना जन्म देते, तशी भूमी पिकांना जन्म देते म्हणून स्त्रीची वा तिच्या प्रतीकांची पूजा महत्त्वाची. भूमिपूजन, नांगरांचे फाळ व शेतजमिनी यांची पूजाही त्यातूनच येते.

या साऱ्यांची चिन्हे वा प्रतीके तयार केली की ती पूजेला सोयीची होतात… म्हणून मग स्त्रीपूजेऐवजी कलशांची पूजा येते. (कलश हे स्त्रीच्या गर्भाशयाचे प्रतीक आहे.) या कलशात ठेवलेले पाणी व वर लावलेली पाने हे स्त्रीच्या सर्जन शक्तीचे व निर्मितीचे प्रतीक होते. भूमिपूजनाची प्रतीकेही अशीच असतात. गणपती हे नाव एकदा गणांचा अधिपती म्हणूनही स्थिर झाले. तेच समाजानेही मग पुढे चालवले. कलशपूजेला समाजाने गौरीपूजनाचे नाव दिले. दैवते अशी जन्माला येतात.

प्रतिष्ठित व उच्चवर्णीय समाजात विकसित झालेल्या गणपती किंवा गौरी यांसारख्या दैवतांचा विचार अडाणी वा निरक्षर जमातींच्या समजुतींच्या बरोबरीने करणे ही देवीप्रसाद चट्टोपाध्यायांसारख्या विद्वान माणसाने केलेली चूक आहे. बळी दिल्याने आरोग्य सुधारते, पिकात वाढ होते, युद्धात विजय मिळतो वा आपल्या समजुतीनुसार निर्माण केलेल्या ग्राम व कनिष्ठ देवता प्रसन्न होतात ही या वर्गाची समजूत. हेसुद्धा काही प्रमाणात उच्चवर्णीयांनी स्वीकारली. हे यापूर्वी आपण पाहिले आहे.

अगामेमनॉन हा राजा ट्रायवरील स्वारीपूर्वी आपल्या मुलीचा बळी कसा देतो किवा ट्रायचा राजा आपली सर्वांत मोठी मुलगी देवदासी म्हणून का सोडून देतो, यज्ञात बळी का दिले जाते किंवा अजूनही रावणाचा बळी म्हणून तांदळाचा रावण करून तो कसा मारला जातो हे आपण पाहतो. बहुतेक सगळ्या पूजाअर्चा किंवा देवतांना प्रसन्न करण्याचे प्रतिष्ठित विधीसुद्धा अंधश्रद्धांवरच उभे असतात.

चार्वाक हे विज्ञानवादी असल्याने व विचार आणि तर्क ही प्रमाणे मानणारे असल्याने त्यांना या अंधश्रद्धा चिकटवून त्यांना पूर्वमीमांसेजवळ किंवा इतर अंधश्रद्धांजवळ आणणे ही मूळातच मोठी चूक आहे. दुर्दैवाने ती अनेक बड्या विचारवंतांनी केली असल्याने चार्वाकांच्या वैज्ञानिक भूमिकेकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले… मात्र सामाजिक श्रद्धांचे जबरपण व त्यांची समाजमनावरील दहशत एवढी की, यातले सारे समजूनही समाज त्या दैवतांची पूजा श्रद्धाभावाने करतच राहिला.

धर्माने तत्त्वज्ञाने मारली हे वास्तव अशा वेळी ध्यानात घ्यावे लागते. तत्त्वज्ञान ही विचारांनी व तर्काने जन्माला आलेली ज्ञानशाखा आहे. एकवार सगळा विचार वेदानुकूलच झाला पाहिजे, त्याला छेद देणारा वा विरोधी ठरणारा विचार नाकारला पाहिजे म्हटले की विचार संपतो, तर्क मरतो आणि तत्त्वज्ञाने निकालात निघतात. वेदांनी भारतीय तत्त्वज्ञानेच नाहीत; तर गणित, खगोलशास्त्र व विज्ञान याही विषयांचा नायनाट केला. बुद्धांच्या व शंकराचार्यांच्या पश्चात फक्त श्रद्धा राहिल्या. वेदांचा जयजयकार राहिला. दैवतांची पूजा व यात्रा राहिल्या. मग भारतात मार्क्स जन्माला आला नाही, फ्रॉईड नाही की कोणताही संशोधक नाही. झाले ते फक्त संत, महात्मे, सुधारक आणि समाजाचे (वा जातींचे) स्थितिवादी पुढारीच.

हीच गोष्ट ख्रिश्चन धर्माने युरोपात केली. बायबलविरोधी विचार पाखंड ठरवला. मग सॉक्रेटीस, प्लेटो, ॲरिस्टॉटल संपले व फक्त येशू व होली घोस्टच कायम झाले. इस्लामने अल्लाला ईश्वर ठरवले. सारे ज्ञान कुराणातच असल्याने सगळी ग्रंथालये जाळून टाकण्याचा फतवा काढला. परिणामी, अरबांमध्ये अल्‌किंदीसारखे तत्त्वज्ञ व त्यांच्या परंपरा संपल्या आणि धर्मगुरूंच्या आंधळ्या शिकवणीनुसार समाज कुराणाच्या एकाच मार्गाने चालू लागला. श्रद्धा खचल्या असल्या, त्या निराधार असल्या तरी त्यांची सामाजिक, राजकीय व धार्मिक दहशत केवळ मोठी असते हे सांगणारा हा इतिहास आहे.

आपल्याकडे चार्वाकांना जाळले गेले, त्यांची सारी ग्रंथसंपदा नाहीशी केली गेली, कॉन्स्टॅन्टिनोपलच्या पोपने चौथ्या शतकात स्वतंत्र विचार हे पाखंड ठरवले. तसा विचार करणारी स्त्री चेटकीण आहे व प्रत्येक चेटकीण ही वध्य आहे अशी आज्ञा काढली. परिणामी, पुढल्या तेराव्या-चौदाव्या शतकात युरोपात पन्नास लाखांवर स्त्रिया जाळल्या गेल्या. गॅलिलिओला त्याचे संशोधन पुढे करायला मज्जाव केला. पंधराव्या शतकापर्यंत तिथेही तत्त्वज्ञान जन्माला आले नाही. इस्लामने तर ते विसाव्या शतकापर्यंत येऊ न देण्याचीच खबरदारी घेतली.

संस्कार, परंपरा, रुढी व चालीरिती हेच ज्ञान ठरले व प्राचीन ऋषी मुनींनी तर नंतरच्या संतांनी, मुल्ला मौलवींनी,  पोपनी व पाद्र्यांनी कथानके हेच ज्ञान ठरवले. विचार संपवणेले, कार्य मारणे व श्रद्धा जागवणे हेच समाजाला स्थिर ठेवण्याचे व त्यायोगे राजसत्ता मजबूत करण्याचे साधन झाले. सारे मध्ययुग मग अंधाराने भारून टाकले. त्याला प्रकाशाची पहाट पाहायला पंधरावे शतक यावे लागले. प्रकाश वाढत राहिला… मात्र मागे सरतानाही अंधाराने आपली सावली तशीच कायम ठेवली. जाता जाता एक आठवण इथे नोंदवावी अशी आहे.

खूप वर्षांआधी तेव्हा जगन्नाथराव जोशी या जनसंघाच्या खासदाराने ती सांगितली. संसदेचे एक शिष्टमंडळ रशियाच्या भेटीला निघाले होते. त्यांना नेणाऱ्या विमानात जोशींच्या शेजारी ज्येष्ठ संसदपटू व ख्यातनाम कम्युनिस्ट नेते कॉ. भूपेश गुप्ता बसले होते. प्रवासादरम्यान भूपेशजी मनातल्या मनात काही पुटपुटत वा स्मरण करत आहेत हे लक्षात घेऊन जोशींनी त्यांना त्याविषयी विचारले. त्यावर गुप्ता म्हणाले, विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करीत होतो. त्याचे आश्चर्य वाटून जोशींनी विचारले, तुम्ही कम्युनिस्ट असून ईश्वरनामाचा उच्चार करता? त्यावर गुप्ता हसून म्हणाले, ‘कुछ नही जरा अच्छा लगता है.’

(चार्वाक लेखमालेतील अगोदरचे भाग ‘मीडिया वॉच’ वर उपलब्ध आहेत . )

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि लेखक आहेत.)
98224 71646

Previous articleसुखप्राप्तीचा विचार आणि चार्वाक
Next articleतंत्र आणि चार्वाक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here