आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलाखतींची ‘धर्मारेषा ओलांडताना’ ही मालिका प्रत्येक महिन्यातील दुसर्या आणि चौथ्या रविवारी कर्तव्यवरून प्रसिद्ध केली जाणार आहे. आजच्या द्वेष आणि भीतीच्या वातावरणात तरूणांना आश्वस्त वाटावं, त्यांना कमी अधिक प्रमाणात का होईना प्रेम-सहजीवनाविषयी मार्गदर्शन मिळावं आणि आपल्या माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित व्हाव्यात हा या मुलाखतींचा उद्देश आहे.-संपादक , ‘कर्तव्य साधना’
श्रुती पानसे आणि इब्राहीम खान. कॉलेजजीवनात दोघांची मैत्री झाली. प्रेमाची रीतसर कबुली देण्याची तशी कुठली विशिष्ट घटिका न येता दोघांना कळून चुकलं की, आपल्याला जीवनसाथी म्हणून हीच व्यक्ती हवीय… इतकं अलगद सगळं घडलं.
1986मध्ये सुरू झालेल्या मैत्रीच्या पायवाटेचं तब्बल बारा वर्षांच्या सहवासातून प्रेमाच्या मार्गात रूपांतरण झालं होतं. एवढ्या प्रदीर्घ सोबतीनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तोवर त्यांच्या प्रेमाची कुणकुण कुटंबीयांना लागली होतीच. प्रेमात पडले तरी लग्नाबाबत काही ते सिरिअस नसणार असाच त्यांचा कयास होता… त्यामुळं दोन्ही कुटुंबीयांनी फार काही आढेवेढे घेतले नव्हते… पण जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन्ही कुटुंबांत अगदी ‘ड्रामा’ झाला नसला तरी हे प्रकरण टळेल कसं याचा प्रयत्न झालाच… मात्र त्यांना सुनीती सू. र., अन्वर राजन, रझिया पटेल अशा काही खास दोस्तमंडळींचं मार्गदर्शन लाभलं आणि 14 एप्रिल 1998 रोजी ते दोघं स्पेशल मॅरेज अॅक्टखाली विवाहबद्ध झाले. विरोधक असणार्या आपल्या कुटुंबीयांच्या उपस्थितीतच त्यांनी विवाहानंतर स्नेहभोजनाचा आनंदही लुटला.
पुण्यात गणेश पेठ परिसरात श्रुती यांचं बालपण गेलं. आईवडील आणि दोघी बहिणी असं त्यांचं सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंब. आजी-आजोबांवरच्या गांधीवादी विचारांचा पगडा संपूर्ण कुटुंबावर होता. अहिल्यादेवी शाळेतून श्रुतींनी शालेय शिक्षण घेतलं. गरवारे महाविद्यालयात प्रवेश घेतला. गरवारे कॉलेज मधून बी.ए., फर्ग्युसनमधून एम. ए. मराठी केलं. त्यानंतर 17 वर्षांनी त्यांनी मेंदूआधारित शिक्षण (ब्रेनबेस्ड लर्निंग) या विषयावर एसएनडीटी महिला विद्यापीठातून पीएच.डी. केली.
शिक्षणतज्ज्ञ, वक्ता, संशोधक, समुपदेशक अशा विविध भूमिकांत त्या कार्यरत आहेत. वेगवेगळ्या एनजीओज्, सरकारी संस्था, शालेय समित्या आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये धोरणात्मक स्तरावर त्या कार्यरत आहेत. त्यांनी लहान मुलं व पालकत्व हे विषय केंद्रभूत ठेवून ‘अशी का वागतात मुलं?’, ‘पहिली आठ वर्षं – सहज शिकण्याची’, ‘डोक्यात डोकवा’, ‘मुलांचे ताण पालकांची जबाबदारी’ अशी आत्तापर्यंत 20 पुस्तकं लिहिली आहेत. त्यात एक ऑडिओबुकदेखील आहे.
तर इब्राहीम हेसुद्धा पुण्याचेच. गंजपेठ परिसरात त्यांचं बालपण गेलं. आईवडील व दोघं भाऊ असं त्यांचंही चौकोनी कुटुंब होतं. वडील ट्रक ड्रायव्हर आणि आई गृहिणी. घरच्या बेताच्या परिस्थितीतही मुलांनी शिक्षण घ्यावं यासाठी वडलांचा आग्रह. इब्राहीम यांचं शालेय शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल इथून झालं तर गरवारे महाविद्यालयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. एका कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायजरचं काम सुरू केलं. पुढे त्यांनी बांधकामाशी निगडीत व्यवसाय सुरू केला. सध्या ते रेनवॉटर हार्वेस्टिंगचा व्यवसाय ते करत आहेत.
लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांना स्वतःतल्या कार्यकर्त्याची ओळख झाली. 2002मध्ये अपघातानंच झालेली ही ओळख आज त्यांची मुख्य ओळख झाली आहे. 2002मध्ये पुण्यातल्या लोहियानगर भागात भीषण आग लागली होती. स्थानिक परिसराचा परिचय आहे म्हणून सुनीती सू. र. यांनी इब्राहीमना त्या भागाचं सर्वेक्षण करायला सांगितलं. त्या वेळी स्थानिक आमदारांशी टोकाचा संघर्ष झाला. त्यातून वेगवेगळ्या मार्गांनी खूप दडपण आलं आणि प्रचंड मनस्ताप सोसावा लागला… मात्र त्याच वेळी स्वतःतल्या धाडसी स्वभावाची ओळखही पटली. तो संघर्षही पेलला. तिथून पुढं ते सामाजिक कार्याशी जोडले गेले.
जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय या संघटनेशी ते जोडले गेले. नर्मदा बचाव आंदोलन, लवासा पुनर्वसन, धरणग्रस्त, शहरी गरिबांचे प्रश्न यांसारख्या आंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. नागरी प्रश्न सोडवण्यासाठी लढा द्यायला ते कायमच तत्पर असतात. अलीकडेच सीएए, एनआरसी यांच्या विरोधात दिल्लीत झालेल्या शाहीनबागेच्या निषेध आंदोलनांप्रमाणे पुण्यातही कोंढवा व मोमीनपुरा इथं शाहीनबाग आकाराला आल्या होत्या. मोमीनपुरा इथं त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता.
गरवारे महाविद्यालयातच श्रुती आणि इब्राहीम यांच्या मैत्रीनं आणि प्रेमानं आकार घेतला. सहजीवनाची बावीस वर्षं आणि त्याआधीची बारा वर्षं असा दीर्घ काळ ते एकत्र आहेत. या दोघांच्या प्रेमाच्या या संसारात त्यांना तन्वी नावाची एक गोड मुलगी आहे. सहजीवनाचा अजून दीर्घ पल्ला गाठायचा आहे असं म्हणणार्या आणि मानणार्या या जोडप्याशी केलेला हा संवाद…!
प्रश्न : गरवारे महाविद्यालयात तुम्हा दोघांची भेट झाली. दोघंही पुण्यातल्या मध्यवस्तीतले. तरीही तुम्हा दोघांच्याही कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरचं बालपण वेगळं असणार… त्याविषयी सांगाल?
इब्राहीम :मी पुण्यात गंजपेठेत वाढलो आहे. माझ्या आईचं माहेरही भवानी पेठेतच होतं. आईचे वडील खरंतर कर्नाटकातल्या बिजापूर जिल्ह्यातले… पण ते त्यांच्या तरुणपणी पुण्यात येऊन स्थायिक झाले ते झालेच. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता. वडलांकडची परिस्थितीही बेताची होती. माझे वडील लहान असतानाच त्यांचे वडील वारले होते. त्यामुळं खूप लहानपणीच माझ्या वडलांवरही घरची जबाबदारी आली होती. त्यांनी सुरुवातीला स्टोव्ह रिपेअरिंगचा व्यवसाय केला. पूर्वी दारोदारी फिरून स्टोव्ह रिपेअर केले जात असत. त्यानंतर ते एका ट्रकवर क्लिनर म्हणून जाऊ लागले. तिथंच त्यांनी ड्रायव्हिंग शिकून घेतलं आणि मग ते ट्रक डायव्हर झाले. शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळत होतं. मी आणि माझ्या भावानं नेमकं काय शिक्षण घेतलं पाहिजे हे त्यांना सांगता येत नव्हतं… तरी आम्ही शिकायला पाहिजे असं त्यांना वाटायचं. घरातलं वातावरण पारंपरिक मुस्लीम वळणाचं होतं. आमचा परिसर मिश्र वस्तीचा होता. मात्र वाडा संस्कृती असल्यानं आमच्या वाड्यात मुस्लीम कुटुंबंच होती. अशा वातावरणात मी वाढलो.
हे सुद्धा नक्की वाचा -समीना पठाण आणि प्रशांत जाधव: विचारी, विज्ञाननिष्ठ जोडपं- https://bit.ly/3sACons
श्रुती : गणेशपेठेत माझं लहानपण गेलं. पण माझ्या आजीआजोबांवर गांधी विचारांचा प्रचंड प्रभाव होता. ते दोघंही मूळचे सातारा जिल्ह्यातले होते. पण लग्नानंतर ते कायमच वर्ध्याला सेवाग्रामला आणि गोपुरीला राहिले. त्यांचं आयुष्य एकदम वेगळंच होतं. ते खादी विक्रीचा व्यवसाय करत असत. एकोणीसशे बेचाळीसच्या उठावानंतर इंग्रज धरपकड करत होते. त्या वेळी आजीआजोबा चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल या गावी होते. आईबाबांना पकडून नेलं की मागं त्यांची मुलं वाट पाहत राहायची. आजी अशा आसपासच्या घरात मागं उरलेल्या सगळ्या मुलांना गोळा करून त्यांचा सांभाळ करायची… त्यांचे आईबाप परत येईपर्यंत. मग ती कुठल्याही जातिधर्माची असली तरी आजीकडं सुखरूप राहत. विचारांचा वारसा असा त्यांच्यापासूनच होता. आजीआजोबा अगदी पंचाहत्तरीला पोहोचेपर्यंत वर्ध्यातच होते. आम्ही सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडे जायचो. तशा अर्थानं घरातलं वातावरण मोकळं, सामाजिक स्वरूपाचंच होतं. सामाजिक कार्यकर्ती सुनीती सू. र. ही माझी आतेबहीण. ती समता संस्कार शिबिर घ्यायची. आईवडलांच्या जगण्यावागण्याचा प्रभाव असला तरी आपल्या कळत्या वयात बाहेरून जेव्हा काही गोष्टी कळतात तेव्हा त्यांना अधिक नेमकी दिशा मिळते. मी त्या शिबिरांमध्ये भाग घ्यायचे. चर्चा व्हायच्या. अर्थात या विचारांचा आणि प्रेमाचा तसा काहीही संबंध नाही. प्रेम जसं कुणालाही होतं तसंच ते झालं होतं.
प्रश्न : पुढं गरवारे महाविद्यालयात तुमची भेट झाली. मैत्री झाली. मग प्रेमाची जाणीव कधी झाली?
श्रुती, इब्राहीम :माहीत नाही…
प्रश्न : म्हणजे एकमेकांमधली कुठली गोष्ट आवडली… किंवा असं काही घडलं का… की, ज्यामुळं तुम्हाला एकमेकांची ओढ वाटली?
श्रुती, इब्राहीम(दोघंही विचारात पडले) : असा विचारच केला नाही कधी. अगदी आत्तापर्यंतही आम्ही तसा काही विचार केला नाही… म्हणजे विशिष्ट प्रसंग, विशिष्ट घटना असं काही घडलं आणि मग आम्ही प्रेमात पडलो असं काहीच घडलं नाही. आम्हाला एकमेकांमधलं एकच एक काहीतरी आवडलं असं झालं नसणार.
इब्राहीम : कदाचित आम्हा दोघांमध्ये कुठलीतरी इनसिक्युरिटी असेल ज्यातून बाहेर येण्याचा आधार एकमेकांकडं मिळत असेल. कॉलेजात असताना आमचा आठदहा जणांचा ग्रुप होता. तीनेक मुली, बाकीची मुलं असा. आम्ही खूप एकत्र असायचो. मराठी मंडळ, गॅदरिंग, वेगवेगळे कार्यक्रम अशा सगळ्यांत आम्ही बराच काळ एकत्र असायचो. त्या काळी मी तर इलेक्शनही लढवली होती. अशा विविध अॅक्टिव्हीटीज्मुळे आमचा सहवास प्रचंड वाढलेला होता. आम्हाला आमच्या सहवासाची ओढ वाटायची हेही खरं. सुनीतीताई वेगवेगळ्या गावी समता संस्कार शिबिरं घ्यायची. त्या शिबिरांनाही मी फक्त श्रुतीसाठी जायचो. त्या वेळीही चळवळी, सामाजिक काम, कार्यकर्तेपण अशा कशाचाही मला गंध नव्हता. अनेकदा तर आम्ही तिच्या वडलांच्या ऑफिसबाहेरच्या कट्टयावर बसून गप्पा मारायचो. तिचे वडीलही आमच्यासाठी चहा पाठवायचे. अर्थात तेव्हा त्यांना आमच्या प्रेमाविषयी काही अंदाज नव्हता. सहवासामुळं, आदरपूर्वक मैत्रीचा बेस असल्यानं आम्ही एकमेकांत गुंतलो असणार… पण त्याची कुणी अशी स्पष्ट कबुली दिली किंवा द्यावी असं काहीही घडलं नाही. आमच्यात आत्ताही भांडणं होत नाहीत. तेव्हाही होत नव्हती. तू असंच बोलली, तसंच केलंस… तू आलाच नाही अशा कुठल्या कारणांवरून आमच्यात खटके उडाले नाहीत. त्या काळी तर मोबाईलही नव्हता. श्रुतीच्या घरी फोन होता पण माझ्या घरी फोन नव्हता… शिवाय फोन करायचंच ठरवलं तरी किती करणार? महिनोन्महिने भेटलो नाही तरी आम्हाला तसा काही फरक पडायचा नाही. प्रेम आहे याची जाणीव होतीच.
श्रुती : होऽ म्हणजे मी इब्राहीमला सुरुवातीच्या दिवसांत भेटले तेव्हा असंच वाटायचं की, याला मी खूप आधीपासूनच ओळखते. हा नवा नाहीच. आपण खूप वर्षांपासून याला ओळखतच आहोत अशीच भावना होती. मागे आमच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की, तुम्हा दोघांची प्रकृती फार सारखी आहे. कदाचित सारखी म्हणजे पूरकही असेल… म्हणूनच आम्हाला असं एकच कुठलं काही सांगता येत नाही. पुढं एम.ए. करताना तर आमची कॉलेजेसही वेगळी झाली… पण तरी आमचा संपर्क कायम राहिला आणि सोबतही….
प्रश्न : प्रेमात असताना भिन्न धर्मांची जाणीव झाली होती?
श्रुती :अजिबात नाही. प्रेमातल्या धर्माची जाणीव तर थेट लग्न करायचा निर्णय घेतल्यावर झाली. घरच्यांना आमच्या प्रेमाची कुणकुण असणारच… पण आधी त्याबाबत कुणीच वाच्यता केली नाही. कदाचित त्यांना वाटलं असावं की, तरुण आहेत… तारुण्यात जसं आकर्षण प्रेम वाटतं तसंच हे असणार… ह्यांच्या प्रेमाची गाडी काय लग्नापर्यंत जाणार नाही… त्यामुळं त्यांना कळत असूनही त्यांनी थोडी ढिलाईच ठेवली.
इब्राहीम : हो. आमच्या तर डोक्यात तोवर काहीही नव्हतं. आम्हीही आमच्याच धुंदीत होतो. त्यातही घडलं असं होतं की, सुरुवातीच्या काळात प्रेमाच्या, भावनेच्या भरात श्रुती म्हणाली होती की, ‘हांऽ ठीकये करेल धर्मांतर.’ ती आपल्या घरात येऊन आपल्या घरात मिसळणार आहे म्हटल्यावर काही अडचण वाटली नाही. त्या वेळी धर्मांतराच्या बाबतीत आमचा वैचारिकदृष्ट्या कुठलाही दृष्टीकोन तयार नव्हता. अगदीच रॉ होतो आम्ही. प्रेमात वाहवत जाणं आणि मग त्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार असणं, असतं तसंच होतं ते… पण पुढं जसं शिक्षण, अभ्यास, विचार वाढले तशा धर्मांतरातल्या गोमा कळायला लागल्या. त्या खाचाखोचा लक्षात आल्यावर तिनं धर्मांतराला ठाम नकार दिला. तिचं ते उत्तर ऐकून मीही धास्तावलो. आता आली का पंचाईत? कारण आमच्या लग्नात अडसर ठरू शकणारा मुद्दा फक्त हाच होता.
प्रश्न : धर्माचा अडसर लक्षात आल्यानंतरही घरी तर सांगावाच लागलं असणार… त्यांच्या प्रतिक्रिया काय आल्या?
इब्राहीम : लग्नानंतर श्रुती धर्मांतर करणार नाही असं मी घरी सांगितल्याबरोबर वडलांनी ठाम विरोध केला. मग तिच्याशी लग्न करू नको… आपण आपल्यातली मुलगी पाहू असं त्यांचं उत्तर आलं. मला फार अक्कल होती असं नाही… पण त्या वेळी इतकं कळत होतं की, धर्मासाठी मी तिला नाही म्हणू शकत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे असं मी घरी सांगून मोकळा झालो. लग्नच करायचं की नाही… हेही मग मला ठरवावं लागेल हेही सांगून टाकलं. वास्ताविक श्रुती अन्य मित्रमैत्रिणींसह माझ्या घरी अनेकदा आलेली होती. अवघ्या दहाबारा वर्षांच्या मैत्रीची गोष्ट होती. आईला ती आवडतही होती. तिचा मुद्दा फक्त इतकाच होता की, श्रुतीनं लग्नानंतर मुस्लीम व्हावं.
त्यात मी माझ्या आईला लग्नाच्या बारा वर्षांनी झालो होतो… त्यामुळं तिचा जीव माझ्यात गुंतलेला. मी लग्नालाच साफ नकार द्यायला लागलो तेव्हा काळजीनं तिची तब्येत ढासळायला लागली. सर्वसामान्य बाईला तिच्या मुलाविषयी आणि त्याच्या प्रेमाविषयी इतकं वाटणं हे स्वाभाविक होतं… पण मग धर्मांतरच करायचं नाही ठरलं तेव्हा मात्र दोघांकडून नाराजी आली. त्या काळात खूप जास्त मानसिक त्रास झाला. दरम्यान मग लहान भावासाठी वडलांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं. वडलांनी विचारलं, ‘तू करशील तेव्हा करशील… आत्ता लहान्याचं लग्न करू.’ मी म्हटलं ‘आनंदानं करा.’ मग त्याचंही लग्न झालं. त्याला एक मूलही झालं तरी आमचं अजून भिजत घोंगडंच होतं. बाकी कुणाहीपेक्षा घरच्यांना मनवण्याचं दिव्य काम मला करावं लागलं.
आमच्या मुस्लीम वस्तीतल्या बुजुर्ग लोकांकडूनही खूप त्रास झाला. त्यांचं म्हणणं होतं की, मी निकाह करावा. निकाह झाल्याशिवाय लग्न कसं असं त्यांना वाटायचं. माझी वैयक्तिक भावना ही त्या वेळेस तशीच होती. तोवर माझी कुठलीही सामाजिक-वैचारिक समज नव्हती… त्यामुळं मी टिपिकल मुस्लीम घरातल्या मुलासारखाच होतो. माझी मानसिकता मुस्लीम धर्माच्या चालीरितींनुसार जावं अशीच होती… पण म्हणून इतक्या वर्षांचं तुमचं प्रेमाचं-मैत्रीचं नातं हे केवळ धर्मासाठी सोडू शकत नाही हेही कळत होतं.
इकडं श्रुतीच्या घरातही माझा वावर होताच… त्यामुळं त्यांनाही मी चांगलाच माहीत असलो तरी त्यांना माझं ‘मुस्लीम’ असणं ही बाब खटकत होतीच. श्रुतीच्या बाबांनी कालांतरानं सांगितलं की, त्यांच्या मनात मुस्लीम लोकांविषयी, त्यांच्या आर्थिकतेविषयी, राहनीमानाविषयी काही समज होते. त्यांत आपल्या मुलीला ढकलायचं हे बापाचं मन म्हणून त्यांना मानवणार नव्हतं… त्यामुळं दोन्ही कुटुंबांकडून आकांडतांडव झाला नाही तरी ताण राहिला.
श्रुती : प्रेमापर्यंत ठीक… पण लग्नाचा निर्णय घेतोय म्हटल्यावर माझ्याही घरच्यांना धक्का बसला. तरीही त्यांनी कुठली हार्श प्रतिक्रिया दिली नाही. ते मला समजावण्याचा प्रयत्न करायला लागले… पण त्या समजावण्याच्या सुरातही असा एखादा वावगा शब्द जाऊन मी दुखावू नये याची पुरेपूर काळजी ती घेत होती. अगदी गोडगोड भाषेत माझी समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. मग मुस्लीम समाजात तीन तलाक होतात, नवरा चार लग्नं करतो… अशा प्रकारची भीती घालण्यात यायला लागली. अर्थात त्या वेळी त्यांनाही तीच माहिती होती… त्यामुळं ते भीती ‘घालत’ नव्हते. तर ते त्यांना तसं खरंच वाटत होतं.
आमच्या दोघांच्याही पालकांवर त्यांच्या दृष्टीनं पाहता हे ‘संकट’च कोसळलेलं होतं. हे संकट टळावं म्हणून आमच्या दोघांचे वडील बाहेर एका हॉटेलातही भेटले. कसं परोपरीनं समजावून हे लग्न टाळता येईल यावर दोघांनी डोकं लावण्याचा प्रयत्न केला. आज विचार केल्यावर लक्षात येतं की, तेव्हा त्यांनी भलेही आमचं लग्न होऊ नये याच कारणासाठी पण भेटण्याची तयारी तरी दाखवली. समजूतदारपणे भेटून, चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. एवढं करायला आजही पालक मागंपुढं करतील… पण त्यांनी तो सुज्ञपणा दाखवला होता. तेव्हा तर आम्ही आमच्या प्रेमात आणि एकूणच सगळ्यांना मनवण्याच्या याच मानसिकतेत अडकलेलो होतो… मात्र असं मनाविरुद्ध होणारं मुलांचं लग्न निभावून नेण्याचं काम त्यांनीच केलं होतं. मागे एकदा कथाकार राजन खान यांचा एक लेख मी वाचला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की आपल्याकडे जात-धर्म व्यवस्था इतकी घट्ट आहे की कोणाचं तरी तेच अस्तित्व असतं. पालकांना वाटलं तरी समाजाविरुद्ध जाण्याचं धाडस करणं हे त्यांच्यादृष्टीनं भयंकर अवघड असतं. हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे, असं मला वाटतं.
प्रश्न : मन वळवण्याचे प्रयत्न झाल्यानंतरही मग तुम्ही लग्नाबाबत पुढचा मार्ग कोणता निवडला?
श्रुती :मला इब्राहीमशी लग्न करायचंय हे मी सुनीतीताईला (सुनीती सू. र. हिला) आधी सांगितलं होतं.. आंतरधर्मीय लग्न तोवर घरात कुणाचंही झालेलं नसल्यानं मग तिनंच माहिती घ्यायला सुरुवात केली. प्रत्यक्ष लग्न करताना धर्म आडवा येत नाही… पण सवयी आड येतात. तुम्ही विशिष्ट पद्धतीनं जगत आलेला असतात. तुमच्या राहण्याखाण्याच्या काहीएक सवयी असतात. राहणीमान भिन्न असतं आणि पुढं चालून त्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सुनीतीताईचा त्याअनुषंगानं खूप कन्सर्न होता. या सगळ्यावर थेट गदा न येताही सहअस्तित्व कसं निर्माण करता येईल याचा ती विचार करायला लागली. सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, रजिया पटेल यांना तिनं माझ्या बहिणीला असंअसं लग्न करायचं आहे तर काय करता येईल हे विचारलं. त्यांच्याकडूनच आम्हाला स्पेशल मॅरेज अॅक्टविषयी कळलं. या अॅक्टअंतर्गत लग्न करून आम्ही एकत्र राहून बघावं असं सुनीतीताईला वाटू लागलं… तेव्हा लिव्ह इन हा शब्द माहीत नव्हता… नाहीतर तिनं तेही सुचवलं असतं. मग त्या अॅक्टविषयीचा अभ्यासही तिनंच केला. 6 मार्च 1998 रोजी आम्ही रजिस्टर ऑफिसकडं नोंदणी केली. त्या वेळेस सोबत विनयदादा होता जेणेकरून आम्हाला कुणी काही प्रश्न केलाच तर एक मोठी व्यक्ती आमच्यासोबत असावी. महिन्याभरानं 14 एप्रिल 1998 रोजी आम्ही विवाहबद्ध झालो. डॉ.बाबासाहेब आंबडेकरांच्या जयंतीच्या दिवशी लग्न करण्याची कल्पनाही सुनीतीताईचीच.
इब्राहीम : लग्न करण्याआधी आम्ही दोन निर्णय घेतले. एक तर कुणीही धर्म बदलणार नाही. श्रुती मुस्लीम होणार नाही. आम्ही वेगळं घर करून राहणार म्हणजे दोन्ही घरच्यांच्या लुडबुडी नकोत. अर्थात मी घर सोडणार म्हटल्यावर आई पुन्हा खचली. मग तिला म्हणालो, ‘घर सोडत नाही तर फक्त वेगळं राहत आहे.’ सुनीतीताईनंच तिचीही समजूत काढली. मीही तिला म्हटलं, ‘मी वेळ मिळेल तसा तुझ्याकडे येत राहणार. आजही मी माझं ते वचन पाळतो. वेळ मिळताच तिच्याकडं जातो. कामाचं स्वरूप धंद्याचं आणि मग कार्यकर्त्याचं असल्यानं अनेकदा दुपारचं जेवण तिच्यासोबत करतो. हांऽ तर मग आम्ही लग्नाआधीच कात्रजला भाड्यानं एक घर घेतलं.
स्पेशल मॅरेज अॅक्टखाली लग्न करायचं ठरवल्यावरही नातलगांनी निकाहपण कर म्हणून तगादा लावला. शेवटी मी काही मौलानांशी चर्चाच केली. केवळ लग्नासाठी मुस्लीम झाल्यानं जन्नत वगैरे मिळते का? आणि त्याला खरंच मुस्लीम म्हणायचं का? एखाद्यानं स्वखुशीनं धर्माचा स्वीकार केला तर गोष्ट निराळी पण हे असं लादून केल्याचा खरंच काही फायदा आहे का? अशा वेळी तिनं इमान आणलं असं म्हणता येईल का ?खासगीत सगळ्याच मौलानांनी निवळ लग्नासाठी मुस्लीम होणं यात अर्थ नसल्याची कबुली दिली. तुम्ही मनापासून धर्माचा स्वीकार केला पाहिजे आणि दुसरा मुद्दा होता की, हिंदू-मुस्लीम यांचा निकाह होऊ शकत नाही. निकाहाच्या संदर्भातला मुद्दाच निकाली निघाला. आम्ही व्यवस्थित स्पेशल मॅरेज अॅक्टखाली लग्न करून आमच्या कात्रजच्या घरी आलो. आमचे दोन्ही कुटुंबीय आणि आमची काही दोस्तमंडळी असे पन्नासएक जण तिथं जमले आणि आम्ही छान स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
प्रश्न : स्नेहभोजनाला कुटुंबीय उपस्थित होते म्हणजे त्यांचा विरोध पूर्णतः मावळला होता…
इब्राहीम :श्रुतीच्या घरून फारसा काही त्रास झाला नाही, थेट माझ्याही घरून… पण किंचित नाराजीचा सूर राहिलाच. आईचं एकच म्हणणं होतं की, श्रुती मुस्लीम का होत नाही? तिची ही खंत अजूनही ती अधूनमधून बोलून दाखवते. श्रुतीचे लेख तिला आवडतात. तिची पुस्तकंही तिनं वाचलीत. तिचा कुठं काही लेख आल्याचं मी सांगितलं की आवर्जून ती ते माझ्याकडून मागून वाचणार, चांगलं लिहिते म्हणणार… पण मग मध्येच म्हणणार, ती तुझं नाव का नाही लावत? पूर्वी असा काही प्रसंग यायचा तेव्हा खूप एन्क्झायटी वाढायची. आता गमतीत तिला म्हणतो, ‘श्रुती खानपेक्षा श्रुती पानसे छान वाटतं’ म्हणून. पूर्वी आम्ही आमच्या मोहल्ल्यात गेलं की तिकडं आसपासच्या लोकांकडून विचारणा व्हायची. मुस्लीम झाली का? निकाह केला का? आणि मग ती इथंच का राहत नाही? इत्यादी… या प्रश्नांना सामोरं जायचं म्हणजे खूप जास्त त्रास व्हायचा… पण लग्नानंतर 2002मध्ये मीही चळवळीकडं वळलो. संविधान समजायला लागलं. थोडी समज वाढली. वैचारिकता आली. त्यानंतर अशा प्रसंगाचं भलंबुरं वाटणं संपून गेलं.
श्रुती :सुरुवातीला तोही परिचितांच्या वस्तीतून जायला नको, अमक्या गल्लीतून नको, तमक्या गल्लीतून जाऊ असं म्हणायचा. कुणाचेही टोमणे सहन करण्याची नैतिक ताकद तेव्हा नव्हती. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रियांसाठी तयार नव्हतो. वैचारिकही घडण नव्हती. हांऽ जर मी मुस्लीम झाले असते तर काहीच प्रश्न उद्भवला नसता पण आम्ही प्रॉब्लेम अंगावर ओढवून घेतल्यानं त्रास झाला. अर्थात इब्राहीमला अधिक. इब्राहीम कायमच पहाडासारखा माझ्या पुढं उभा राहिला. त्याला कितीही त्रास झाला तरी त्यानं मला कुठल्याच प्रथा-परंपरांसाठी भरीस पाडलं नाही. कुणाला पाडूही दिलं नाही. अनेकदा तर त्याला होत असलेला मानसिक त्रासही माझ्यापर्यंत पोहोचू दिला नाही.
लग्नानंतर अगदी सुरुवातीला मी घरी गेले होते. माझ्या डोक्यावर पदर नाही म्हणून घरात जमलेल्या बायका विचारणा करू लागल्या. तोवर मीही डोक्यावरून पदर घेतलेल्या बायकांना पाहिलेलं नव्हतं. त्या मला पदर का घेत नाहीस म्हणून सारखंसारखं विचारायला लागल्या. कुणीतरी आपल्याला असं विचारतंय यानं अस्वस्थ झाले. माझ्या माहेरीही तोवर मी अगदी आजीलाही डोक्यावर पदर घेतलेलं पाहिलेलं नव्हतं. लग्नासाठी किंवा कुठल्या कर्मकांडासाठीही नाही. पण मला असं कुणी विचारतंय याचा तेव्हा मनस्ताप झाला. इब्राहीमनं सावरलं. अशा रितीरिवाजांसाठी जर माझ्यावर दडपण आलं असतं तर कदाचित मग आमचं लग्न फार काळ टिकलं नसतं.
प्रश्न : आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तर वेगळं राहणं महत्त्वाचं आहे असं वाटतं का?
श्रुती : आंतरधर्मीयच नव्हे तर कुणीही सुरुवातीचा काही काळ तरी वेगळं राहायला हवं. लग्नाची जबाबदारी काय हे त्याशिवाय कळणार नाही. आजकाल तर एकटंदुकटं अपत्य असतं. पालक मुलांमध्ये गुंतलेले असतात. मुलंही पालकांशी अति शेअर करत असतात. त्यांतून खटके उडतात. वेगळं राहिल्यानं मुलंही जरा शेलमधून बाहेर पडतात.
प्रश्न : अगदीच… मग तुमच्या सहजीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जबाबदार्या पडल्यावर तुम्हाला काही तडजोडी कराव्या लागल्या का? भिन्न संस्कृतींतून आल्यामुळं काही अलिखित असे नियम बनले का?
श्रुती : नियम असे काहीच झाले नाहीत. आमच्या बॅगा घेऊन आम्ही त्या घरात गेलो होतो. काही मोजकी भांडी खरेदी केली होती. कुलूप, केरभरणी आणि कचरा डबा या तीन गोष्टींची सर्वात आधी खरेदी केली होती. आम्हाला दोघांनाही एकेकटं राहण्याची सवय नव्हती. माणसांमध्ये रहायची आम्हाला सवय. दिवस सुरू झाला की आपापल्या ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी मग कुणाच्या ना कुणाच्या भेटीगाठी करत रात्री उशिरा घरी यायचं असं बरेच महिने चाललं. मी नॉनव्हेज खात नाही तर त्याबाबतही कुठला दबाव टाकण्यात आला नाही. उलट इब्राहीमच्या घरी गेलो तर आई जातीनं सगळं वेगळ्या भांड्यांत व्हेज जेवण करतात. पुढं तन्वीचा जन्म झाला. मग हळूहळू आमचं आमचं एक रुटीन सेट होतं गेलं. मग तिच्या वेळांनुसार कामाची रचना केली… पण आमच्यासोबत असं कधीच घडलं नाही की, आमचा आंतरधर्मीय विवाह आहे म्हणून आम्हाला राहायला कुणी घरच दिलं नाही, जॉबच मिळाला नाही, सोसायटीतल्या लोकांनी आम्हाला अॅक्सेप्टच केलं नाही किंवा कुठं डे-केअरला जागाच मिळाली नाही. सुदैवानं आम्हाला सगळी फारच चांगली माणसं लाभली. अलीकडंच अशा पद्धतीच्या नकारघंटांची उदाहरणं कानांवर पडत राहतात.
प्रश्न : पण तन्वीला कधी काही प्रश्न पडले नाहीत…
श्रुती :आम्ही ज्या-ज्या भागात राहिलो तिथं सुदैवानं चांगली माणसं असल्यानं तिला कधी वेगळेपणाची कुणी जाणीव होऊ दिली नसणार… त्यामुळं तिच्याकडून फारशी काही विचारणा झाली नाही आणि आम्ही वाढवतानाही तिला आमचं सहजीवन काही वेगळं आहे असं न मानताच वाढवलं. कुठल्याही सर्वसामान्य मुलाप्रमाणे ते जसं वाढत जातं तसंच तिला वाढू दिलं. दोन्ही घरांतल्या प्रथा-परंपरा भिन्न आहेत हे तिला लहानपणीच लक्षात आलं असणार… पण मुलं आहे ते स्वीकारून पुढं चालतात. आता कधीतरी वाटतं की, आम्ही आमचं सर्वसामान्यांपेक्षा वेगळं सहजीवन आहे हे ओळखून थोडं तसं वाढवायला हवं होतं का… अर्थात यात नकारात्मक भाव किंवा खंत नाही… पण तसा विचार केल्यानं तिला प्रश्न पडले असतील तर आम्ही अधिक सजग राहिलो असतो… इतकंच. बाकी आता माझ्या घरी तर अशा पद्धतीचे विवाह अगदीच नॉर्मल आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची लग्नं ती पाहत आली आहे. तिला आम्ही कुठलंही धार्मिक शिक्षण दिलेलं नाही. आम्ही ईदही साजरी करतो आणि दिवाळीही. हे दोन्ही सण संपूर्ण देशातच साजरे होतात.
इब्राहीम :तिला एकच सांगितलंय… दादीच्या घरी येशील तेव्हा कुणी दिसलं की सलाम करून मोकळं व्हायचं. सलाम केला की पुढं कुणी काहीही विचारत नाही. मी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा वडलांना या धर्मावरूनच खूप त्रास झाला होता. तू आता धर्मच सोडणार का… आमची समाजात नाचक्कीच करणार का… आम्ही लोकांना काय तोंड दाखवायचं असं त्यांनी बोलूनही दाखवलं होतं. समाजाला ते बिचकून होते. म्हटलं माझ्यावर धर्माचे संस्कार झालेत… शिवाय मला माझ्या आईवडलांकडून धर्माची देण मिळालीये. ते संस्कार मलाही सहजी सुटणार नाहीत… त्यामुळं तुम्ही काळजी करू नका… पण तन्वीच्याबाबत ते मला असं विचारू शकत नाहीत. ती माझी मुलगी आहे. विचारलं तरी माझं उत्तर असतं, माझा जितका अधिकार आहे तितका श्रुतीचाही आहे… त्यामुळं ती तिचं ठरवेल. अठरा वर्षानंतर संविधानाकडूनच तिला तसा अधिकार मिळालाही आहे.
प्रश्न : तन्वीला शाळेत टाकताना काही अडचण…
श्रुती, इब्राहीम : काहीच नाही. जाणीवपूर्वकच आम्ही अक्षरनंदन या शाळेची निवड केली आणि तिला तिथं प्रवेश मिळालाही. तिथं फॉर्मवरसुद्धा धर्म वगैरे अशी काही विचारणा होत नाही. आज ती मानसशास्त्र विषयात एस.वाय. करत आहे.
प्रश्न : वेगळ्या सहजीवनामुळं तिच्या भविष्याविषयी चिंता वाटते?
श्रुती : मुळीच नाही. कुठल्याही सर्वसामान्य पालकांना वाटते तशी मात्र चिंता वाटतेच.
प्रश्न : आपल्याकडची पुरुषसत्ताक व्यवस्था पाहता… लग्नानंतरचं घरकाम आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची पूरक वाटणी सगळ्याच विवाहांत अपेक्षित आहे… मात्र त्याच्या पूर्ततेबाबत प्रेमविवाहांत अधिक जागरूकता असणार असा एक सकारात्मक भाव अंतर्भूत आहे. तुमच्या घरात काय परिस्थिती?
इब्राहीम :पूर्वी मी अजिबात घरात मदत करायचो नाही. आता मात्र जाणीवपूर्वक करतो. प्रेमविवाह असला तरी माझ्यावर टिपिकल पुरुषी व्यवस्थेचे संस्कार असल्यानं मलाही पूर्वी त्यात काही वावगं वाटलं नाही… पण आता मी माझ्यात प्रयत्नपूर्वक बदल करत आहे.
श्रुती : अलीकडे इब्राहीम मदत करतो. इब्राहीममध्ये पूर्वीपेक्षा खूप बदल झाला आहे. नवर्याकडून घरकामं करवून घ्यावीत, त्याला तसं मोल्ड करावं याचंही एक स्कील असतं. तेही कदाचित माझ्याकडं नव्हतं… त्यामुळं मीच ते करत राहिले… पण आता त्याचा सहभाग असतो. आर्थिक जबाबदार्यांच्या बाबतही आम्ही एकमेकांना नीट समजून घेतो.
प्रश्न : अगदी प्रामाणिक उत्तरं दिलीत दोघांनी. मॅम, तलाक, चार विवाह होतात… अशी भीती तुम्हाला घातली होती… पण लग्नानंतर मुस्लीम समाजाशी जोडलं गेल्यावर तुम्हाला अशी उदाहरणं दिसली का? काही बदल जाणवलेत का?
श्रुती :नाहीऽ मला तरी अशी काही उदाहरणं दिसली नाहीत. पूर्वी मी कुठल्याही कौटुंबिक सोहळ्यासाठी गेले तर माझी भाषेची थोडी अडचण व्हायची. मला भराभर हिंदी बोलता येत नाही… त्यामुळं आपण बोलूच नये असं वाटायचं. दडपण यायचं. आत्ताही थोडं तसंच होतं… पण आता बायकांना शिक्षणाविषयी काहीतरी विचारायचं असतं. बदल म्हणशील तर अलीकडच्या काळात मुली उच्च शिक्षण घेताना दिसतात. नोकरी, करिअर करताना दिसतात. त्यांना पालकांचाही खूप सपोर्ट आहे. लग्नासाठी भलेही आपल्याच समाजातला मुलगा निवडत असतील… पण पसंतीच्या मुलाशी लग्नाचा निर्णय घेताना दिसतात. हे सकारात्मक बदल आहेत… पण दुसरीकडं बुरखापद्धतीसुद्धा वाढताना दिसते. शैक्षणिक पातळ्यांवर सुधारणा झाली तरी रितीरिवाजांना, प्रथापरंपरांना अजून फाटा दिल्याचं फारसं दिसत नाही.
प्रश्न : अशा प्रकारच्या आंतरधर्मीय विवाहांची किती गरज वाटते?
श्रुती : अर्थातच खूप गरज आहे. मानसशास्त्रीयदृष्ट्या याचा विचार केला तर आंतरधर्मीय विवाहितांचे आईवडील आणि मुलं यांना विनाकारणच जरा जास्त भोगावं – सहन करावं लागतं. आईवडलांना मनाविरुद्ध चौकटी मोडाव्या लागतात आणि मुलांना इतर सर्वसामान्य कुटुंबापेक्षा वेगळं काही वाट्याला आहे याचा अनुभव घ्यावा लागतो. अर्थात हे भोगणं कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
इब्राहीम : आंतरधर्मीय विवाह म्हणजे भारतीय समाजातल्या विसाव्याच्या जागा… शंभर टक्के अशी लग्नं व्हायला हवीत. सांविधानिक मूल्यांवर सहअस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी समाजाला अशा विवाहांची नितांत गरज आहेच… अर्थात धर्मांतर वगैरे टाळून. आता आमच्या काही हिंदु-मुस्लीम मित्रांचीही लग्नं झाली… पण तिथं धर्मांतरं झाली. कधीतरी भांडणात बायको म्हणतेच ‘तुझ्यासाठी धर्माचासुद्धा त्याग केला.’ प्रेमविवाह करूनही अशी अढी मनात राहणं हे बरोबर नाहीच. आम्ही तेव्हा आमच्या आयडेंटिटींना राखून लग्न केल्याचं चांगलं झालं हे आता अगदीच पटतं. (मिश्किलपणे) किमान श्रुती मला टोमणे तर मारू शकत नाही. आता तरुण मुलं जेव्हा असं लग्न करण्यासाठी मदत मागतात… तेव्हाही त्यांना हाच सल्ला देतो. स्पेशल मॅरेज अॅक्टविषयी सांगतो. वेगळं राहण्याचाही सल्ला असतोच.
प्रश्न : शेवटचा प्रश्न… तुमच्या या प्रदीर्घ, आनंदी सहजीवनाची भिस्त कशावर आहे असं वाटतं?
इब्राहीम : अजून तर पुढं तीसपस्तीस वर्षं जायचीत…! आम्ही एकमेकांची स्पेस जपतो. तिचं आणि माझं काम वेगळं आहे. आम्ही त्यातही रमतो. आमच्यातली मैत्री अजून टिकून आहे. तोच बेस असणार.
श्रुती :आम्ही फारसं बोलत नाही हेही असेल… याचा अगदीच चांगला अर्थ आहे. आम्ही सारखेच एकमेकांत गुंतून पडलेलो नसतो. आमच्यात नवरा-बायकोटाईप कुठलीच भांडणं होत नाहीत. झाली तरी वैचारिक… सामाजिक प्रश्नांवर, भूमिकांवरच होतात. अपेक्षाविरहित संसार असल्यामुळंही आम्ही सुखी आहोत.