सौजन्य – दैनिक लोकमत
– सुरेश द्वादशीवार
(संपादक, नागपूर)
‘स्वत:ला पत्रकार म्हणविणारे आपण, शहाण्या-सुरत्या वेश्याच (इंटेलेक्च्युअल प्रॉस्टिट्यूट्स) केवळ आहोत’ हे उद्गार आहेत न्यूयॉर्क टाइम्स या जगविख्यात दैनिकाच्या संचालन विभागाचे प्रमुख स्वोमिंग यांचे.
एका पत्रकारदिनानिमित्त भाषण करताना तेथे जमलेल्या अनेक मान्यवर संपादकांना व पत्रकारांना उद्देशून ते बोलत होते. ‘आपल्यातले काहीजण सरकारांचे गुलाम तर काही विरोधी पक्षांना विकले गेलेले. सगळी बडी वृत्तपत्रे व दूरचित्रवाहिन्या उद्योगपतींनी ताब्यात घेतलेल्या. ते सांगतील तसे आपण वागायचे, त्यांच्या निर्देशानुसार धोरणे आखायची, तशाच बातम्या द्यायच्या, चर्चाही तशाच आणि मंचावर बोलवायची माणसेही त्यांनीच ठरविलेली. त्यांच्यातल्या कोणाला बोलताना अडवायचे आणि कोणाला वाटेल तेवढा वेळ बोलू द्यायचे यावरही त्या मालकांचेच नियंत्रण. आपण फक्त हसायचे किंवा हसल्यासारखे दाखवायचे. तेही समोर चालले आहे ते आपल्याला आवडणारे आहे हे मालकांना दिसावे म्हणून. जोवर मालक खूष तोवर आपल्या नोकºया शाबूत आणि आपली उपजीविका चालणारी. मालक नाखूष झाला की आपल्याला घरची वाट दाखविली जाणार. संपादक आणि पत्रकारच नाही तर वृत्तपत्रांचे व वाहिन्यांचे इतर व्यवस्थापकही सध्या याच गुलामगिरीत भरडले जाणारे… पत्रकारांच्या भूमिका त्यांच्या नाहीत, संपादकांचे भाष्य त्यांचे नाही, बातमीदारांच्या बातम्या त्यांच्या नाहीत आणि त्यांची धोरणेही त्यांची नाहीत… मालकांचे हितसंबंध असतात. ते त्यांना जपायचे असतात. ते जपण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र व त्यातले संपादक आणि पत्रकारांचा वर्ग हाताशी धरला असतो. तो त्यांच्या मर्जीबरहुकूमच काम करतो. त्यामुळे पत्रकार स्वतंत्र नाहीत. त्यांची लेखणी मोकळी नाही. त्यांच्या मानगुटीवर मालकांची, सरकारांची व उद्योगपतींची भुते बसली आहेत.’
स्वोमिंग यांच्या या परखड मांडणीनंतर बोलायला उभे राहण्याची इच्छा फारशी दुसºया कुण्या पत्रकारात राहिली नाही. ही घटना अमेरिकेतली. त्या देशात तेवढे बोलण्या-लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ते मिळविण्यासाठी स्वोमिंगसारखी माणसे आपल्या उपजीविकेवर पाणी सोडायला तयार आहेत. भारतातली स्थिती वेगळी आहे. येथे सत्ताधारी पक्षाची वृत्तपत्रे आहेत. विरोधकांची आहेत. त्या दोन्ही बाजूंना जवळ असणाºया उद्योगपतींची आहेत आणि काही पक्षांनी व उद्योगपतींनी वृत्तपत्रांना सांभाळायला येथे दलालही नेमले आहेत. कोणती बातमी ठळकपणे येणार आणि कोणती येणारच नाही हे या दलालांना आगाऊ कळत असते. ते संपादक व पत्रकारांशी सहसा बोलत नाहीत. मालकांशी संबंध ठेवतात आणि हे संबंध साध्या फोनवरूनही राखता येतात. या स्थितीचा फायदा घ्यायला मग काही हुशार पत्रकारही पुढे होतात. ते स्वत:च मालकांच्या धनवंत स्नेह्यांशी संबंध जुळवितात आणि स्वत:ची बेगणी परस्पर होईल अशी व्यवस्थाही करून घेतात. ज्यांना हे जमत नाही ते पगारावर जगतात. तेही जमले नाही तर काढले जातात. त्यांना अन्यत्र नोकरी वा काम मिळणार नाही असा बंदोबस्त केला जातो आणि प्रसंगी त्यातल्या काहींचे खूनही पाडले जातात… गौरी लंकेश अशीच मारली गेली. असे मारले जाण्याहून मिंधे होऊन राहणे मग शहाणपणाचे ठरते. या शहाणपणालाच स्वोमिंग ‘वेश्यावृत्ती’ म्हणतात.
‘या वृत्तपत्रात तुम्ही समाधानी आहात की नाही’ असा प्रश्न एका मालकाने आपल्या संपादकीय सहकाºयाला विचारला. तेव्हा त्यातल्या काहींनी त्यांची नाराजी सभ्य शब्दात सांगितली. मालक म्हणाले ‘मग तुम्ही ही नोकरी सोडून जायला हरकत नाही’. दुसºया एका मालकाने आपल्या वर्षानुवर्षांचा अनुभव असणाºया संपादक व ज्येष्ठ पत्रकारांची बैठक बोलवून त्यांना एक भाषण ऐकवले. ते म्हणाले ‘वृत्तपत्रे जाहिरातींसाठी प्रसिद्ध केली जातात. तुमच्या बातम्या, स्तंभ आणि अग्रलेख या साºयांचा हेतू त्या जाहिरातींभोवती एक सन्माननीय सजावट उभी करावी एवढाच असतो. जाहिरातींसाठी तुमचा मजकूर कमी होईल. तुमच्या मजकुरासाठी जाहिराती कमी केल्या जाणार नाहीत.’ तेथे जमलेली अनुभवी संपादक माणसे अवघ्या २६ वर्षे वयाच्या त्या मालक-पोराचा उपदेश ऐकून गप्प राहिली आणि पुढचे दोन दिवस ती मग शहाणी माणसे एकमेकांना टाळत राहिली. दूरचित्रवाहिन्यांवरच्या चर्चा ऐकायच्या नसतात, त्यामध्ये बोलायला येणारे पक्षांचे प्रवक्ते त्यांच्या पक्षाची जगजाहीर बाजू तेवढी सांगतात. सांगताना जरा आवाज वाढवतात एवढेच. एका वाहिनीने सरकारवर टीका केली त्याच्या दुसºयाच दिवशी त्या वाहिनीच्या कार्यालयावर सरकारी छापे पडले. विरोधी नेत्यांविरुद्ध यासाठी खटले दाखल होतात. ते पत्रकारांविरुद्ध होते. यात जगायचे तर स्वोमिंग म्हणतात तसे शहाण्या वेश्यांसारखे जगायचे. तसे नटायचे, तसेच हसायचे आणि मालकांच्या खुषीतच आपली खुषी आहे असे त्यांना भासवायचे… यातून लोकशाही जागवायची. जनतेची बाजू घ्यायची, लोकलढ्यांना साथ द्यायची, न्यायाची बूज राखायची आणि आपण जनतेच्या बाजूने आहोत असा अचाट देखावा करायचा. ते ज्यांना जमते त्यांचे कौतुक, जे त्यातही आपले स्वातंत्र्य खरोखरीच जपतात त्यांना नमस्कार.
सौजन्य – दैनिक लोकमत