कोरेगाव आणि वृत्तवाहिन्यांची ‘गुरु’दक्षिणा

 सौजन्य अक्षरनामा-

‘कळ’फलक – संजय पवार

भीमा कोरेगावची घटना, त्यानंतरचा बंद, तक्रारी, गुन्हे दाखल होणं, कलमं लागणं, त्यानंतरच्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमांवर कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली बंदी घालणं हे घडूनही आता आठ दिवस होत आलेत. पण अजूनही मुख्य आरोपी, संशयित, फरार यांपैकी एकालाही अटक झालेली नाही.

मात्र एक तारखेला घडलेल्या घटनेचं अजिबात वृत्त न देणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्यांनी आपली सर्व भक्ती संभाजी भिडे गुरुजी नामक व्यक्तीच्या पायी ठेवण्याची जणू स्पर्धाच सुरू केली.

या सर्वच वाहिन्यांनी ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झालेल्या, अॅट्रॉसिटीसारखा संवेदनशील गुन्हा ज्यांच्यावर नोंदला आहे, त्या संभाजी भिडे गुरुजींना जणू जनतेच्या न्यायालयात आणून, जनतेच्या नावानं अलिखित न्याय देण्याचा जो आगाऊपणा केलाय, त्यातून या सर्व वाहिन्यांचं सामाजिक-राजकीय भान, त्यांचं आकलन यातलं तोकडेपण तर दिसून आलंच, पण आपली तटस्थता बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं गुरुजी बचाव मोहीम चालवली गेली, त्यातून या वाहिन्यांचाही छुपा अजेंडा समोर आलाय. पण त्यांचं अनेक गोष्टींतलं अज्ञान, अगोचरपणा आणि नंतर उडालेली भंबेरीही दिसून आलीय.

अगदी घटनाक्रमाच्या अनुषंगानं पाहात गेलो तर एक तारखेला भीमा कोरेगावला दंगल घडली. त्याचे पडसाद पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी तर मुंबईत काही पॉकेटसमध्ये उमटले. पण चोवीस तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या या सर्व वाहिन्या त्या दिवशी कोमात गेल्या होत्या. नंतर एका वाहिनीनं याचं स्पष्टीकरण देताना म्हटलं की, समाजात अजून अशांतता, तेढ पसरू नये म्हणून खबरदारीचा व जबाबदारीचा उपाय म्हणून त्या दिवशी बातमी दाखवली नाही! इतका विनोदी खुलासा एखाद्या वृत्तवाहिनीनं करावा हा शतकातला मोठा विनोद ठरावा. कारण मग याच न्यायानं दुसऱ्या दिवशी बंद दरम्यान ज्या काही हिंसक घटना घडल्या तेव्हा मात्र याच वाहिनीचे पत्रकार तोडफोड झालेल्या गाड्यांची जणू गणनाच करत होते. विमा कंपनी व पोलिसही इतक्या तपशिलात पंचनामे करत नसतील, तेवढी तत्परता या आदल्या दिवशी भान बाळगणाऱ्या वाहिनीनं केली.

एक तारखेला भीमा कोरेगावला शहिद स्मृतिस्तंभाजवळ वंदन करायला देशभरातून आलेल्या आंबेडकरी, दलित, बहुजन लोकांवर हल्ले करण्यात आले, त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. आजतागायत त्यातल्या एकाचाही बाईट मिळवून दाखवू न शकणाऱ्या वाहिन्या त्याऐवजी दिवस-रात्र भिडे गुरुजी आख्यान लावून बसल्या. जणू काही संभाजी भिडे नामक कुणा एका सालस, सेवाव्रती, पूज्य माणसावर हे कसलं बालंट आणलंय आणि या वृद्ध नेत्याला काय ही पीडा भोगावी लागतेय!

प्रकाश आंबेडकरांनी या वाहिनीला सवाल केला की, तुम्ही प्रत्यक्ष भीमा कोरेगाव व त्या दरम्यानच्या रस्त्यावर ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांची बाजू एक तारखेला मांडली नाहीच, पण अजूनही तुम्ही त्या लोकांची बाजू, म्हणणं दाखवत नाही आहात. यावर वाहिनीची अभ्यासू सूत्रसंचालिका उतरली की, पण दोन तारखेला बंदमध्ये जो हिंसाचार, जाळपोळ झाली त्याची नुकसान भरपाई कोण देणार?

सूत्रसंचालिकेचा हा प्रश्न फक्त बालिश नव्हता तर अज्ञानमूलक आणि प्रस्थापित कायद्यांचा अभ्यास न करताच विचारलेला होता. ज्या संघटनेनं बंद पुकारला असेल, त्या संघटनेकडून तो वसूल करावा असा अलिकडचा कायदा सांगतो. त्यामुळे सूत्रसंचालिकेनं हा प्रश्न बंदीची हाक देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांना न विचारता, राज्याचे गृहमंत्री जे की, मुख्यमंत्री आहेत, त्यांना विचारायला हवा होता. पण या वाहिन्यांचा एकूण रोख असा होता की, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद करून इतका हिंसाचार व मालमत्ता नुकसान केलंय की, महाराष्ट्र पंधरा-वीस वर्षं मागे गेलाय! ज्या घटनांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांच्या नुकसानीचे कोटींचे आकडे वाहिन्या जाहीर करून मोकळ्या झाल्या.

याच वाहिनीवरच्या याच सूत्रसंचालिकेनं आदल्या रात्री मुंबईतला ‘छात्रभारती’चा कार्यक्रम बंद केला गेला आणि जिग्नेश मेवानीविरोधात पुणे पोलिसात जी तक्रार दाखल केली गेली, त्यावर विशेष कार्यक्रम केला.

या विशेष कार्यक्रमाला हरकत असण्याचं कारण नाही. तो त्यांचा विशेषाधिकार. यात पुन्हा सूत्रसंचालिका छात्रभारतीचा पूर्वनियोजित कार्यक्रम, पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारून बंद केला, विद्यार्थ्यांना अटक केली याबाबत फार न बोलता, कुणा एका युवकानं पुण्याच्या पोलिस स्टेशनमध्ये ३१ तारखेच्या जिग्नेश मेवानीच्या भाषणाविरोधात ते प्रक्षोभक म्हणून तक्रार नोंदवतो, त्याला चर्चेत घेत चर्चा सुरू ठेवली. बातम्यांचा क्रम पाहिला तर भीमा कोरेगाव प्रकरणी सर्वांत आधी गुन्हा दाखल झाला तो मिलिंद एकबोटे व भिडे गुरुजींवर. ही तक्रार नाही तर एफआयआर होता. तोही पोलिसांनी दाखल केलेला. त्यातही अॅट्रॉसिटीसारखं कलम लावलेलं. ही बातमी प्रसृत झाल्यावर काही तासांनी एक तरुण, पुण्याच्या पोलिस ठाण्यात जिग्नेश मेवानी विरोधात तक्रार नोंदवतो, त्या तक्रारीची दखल घेत नंतर गुन्हा दाखल होतो, त्याचं कलम कोणतं तेही माहीत नाही, पण त्यावर विशेष चर्चा. आणि फरार एकबोटे व कलमासकट गुन्हा दाखल झालेले भिडे गुरुजी यावर चर्चा नाही!

सूत्रसंचालिका एवढ्यावर थांबत नाही. ती न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून आयोजकांनाच प्रश्न विचारते की, ‘प्रक्षोभक भाषणाबद्दल ज्यांचा पूर्वेतिहास आहे, त्यांना मुळात निमंत्रित करायचं कारण काय?’ हाच न्याय लावायचा ठरवला तर भूतकाळात बाळासाहेब ठाकरेंना कुठेच बोलवता आलं नसतं किंवा बोलता आलं नसतं. आणि वर्तमानात याच वाहिन्या राज ठाकरेंच्या ज्या सभा LIVE दाखवतात, त्यात प्रक्षोभक विधानं नसतात? मग या वाहिन्या ते का दाखवतात? अनेकदा भाजपचे खासदार मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी वाट्टेल ते बोलतात, ते मग या वाहिन्या का दाखवतात? भीमा कोरेगावची दंगल दाखवली नाही, कारण समाजभान ठेवलं म्हणणारी वाहिनी ‘लव जिहाद’ खाली माणूस मारून, जाळणाऱ्याचा व्हिडिओ किती वेळा दाखवला, त्याची आकडेवारी देईल?

दरम्यान चर्चेत सहभागी झालेला तरुण मेवानींच्या भाषणानं आंबेडकरी समाज प्रक्षुब्ध झाला असं म्हणाला, त्यावर ‘मग त्यानं भीमा कोरेगावला मार कसा खाल्ला?’ या पत्रकार समर खडस यांच्या प्रश्नावर तक्रारदाराचं ततपप होऊ लागलं. दरम्यान तक्रारदार म्हणाला- ‘ते रस्त्यावर उतरूची भाषा करत होते.’ यावर काँग्रेसचे वाघमारे म्हणाले- ‘रस्त्यावर उतरण्यात काय प्रक्षोभकता?’ आता तक्रारदार नॉन प्लस होत चालला, तसा सूत्रसंचालिकेला एकदम एक आगळावेगळा साक्षात्कार झाला. त्या म्हणाल्या- ‘कदाचित असं झालं असेल का, की मेवानींच्या भाषणानं विरोधी (दलितविरोधी) प्रक्षुब्ध झाले असतील?’ हे म्हणजे पूर्वी बाळासाहेब म्हणायचे हे लांडे, पाकडे, हिरवी पिळावळ ठेचून काढा. तर हे ऐकून हिंदू पेटून उठण्याऐवजी मुलमानांनी पेटून उठावं असं झालं. या अजब तर्कानं सूत्रसंचालिकेला विद्वत्तेचा कुठला पुरस्कार द्यावा असा प्रश्न पडला.

ही चर्चा कमी पडली म्हणून दुसऱ्या दिवशी वाहिनीचा पत्रकार थेट सांगलीत भिडे गुरुजींच्या घरी हजर! त्यांची मुलाखत, पुन्हा तेच शब्द, तेच दळण आणि सोबत भिडेंचे पाठीराखे हे सर्व ऐकायला! या पत्रकाराला भीमा कोरेगाव किंवा वढूला जावंसं वाटलं नाही!

दुसऱ्या एका वाहिनीवर नुकतेच स्थलांतरित होऊन आलेल्या संपादकांनीही गुरुवाणी लावली! पहिला प्रश्न संभाजी भिडे व मनोहर भिडे या दोन नावाचं रहस्य काय? पार्श्वभूमी काय? गुरुजी उतरले, ‘माझ्या मात्या-पित्यांनी पाळण्यातच माझं नाव संभाजी ठेवलं!’ पण यावर मग मनोहर भिडेंचा इतिहास काय? स्पष्टीकरण काय? हे विचारलं जात नाही. आणि तासभर तुम्ही असे, तुम्ही तसे किंवा ‘असा मी, असा मी’चा एकपात्री प्रयोग रंगतो. तीच भाषा, तीच वचनं, तोच स्वर, तेच गाऱ्हाणं, तीच टोलवाटोलवी आणि अत्यंत तीक्ष्ण प्रतिमासंवर्धन!

यानंतर आणखी एक वाहिनी पुढे सरसावते. या वाहिनीवर नेहमी एक तरुण स्त्रीसंपादक सर्व चर्चा, मुलाखती संचलित करत असते. पण आपल्याच वाहिनीवर प्रथमच थेट लाईव्ह गुरुजी! (तोवर दोन वाहिन्यांवर बघून झालेले असावे) असं म्हणत एक तरुण सूत्रसंचालक अवतरतो. तो जणू गुरुभक्त असल्यासारखा प्रश्न विचारतो, सहकारीही प्रश्न विचारतात, एका अडचणीच्या प्रश्नाला गुरुजी माईक काढतात. मुलाखत बंद!

हा सगळा ‘गुरु महात्म्या’चा उत्सव पाहिला आणि यू-ट्यूबवर या गुरुजींच्या भाषणांचे काही व्हिडिओ पाहिले. त्यात गांडूपासून लेंडूकसारख्या अत्यंत प्रासादिक शब्दांची रेलचेल होती. बाळासाहेब ठाकरेही मवाळ वाटावेत असा मुस्लीमविरोधी विखार!

अशा माणसाला प्रकाश आंबेडकर ३०२ लावा म्हणताच वाहिन्यांना आठवले उदयनराजे महाराज! एरवी याच वाहिन्या उदयनराजेंची विधानं ही ‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’ म्हणून दाखवतात. पण महाराजांनी भिडे गुरुजींची पाठराखण केल्यावर त्यांचा बाईट दिवसातून चार वेळा दाखवला!

या वाहिन्यांना बंद यशस्वी झाला हे पचलं नाही की, कुणा भिडे गुरुजींना अॅट्रॉसिटी लावल्याचं दु:ख झालं? भिडेपुराण लावणाऱ्या वाहिन्यांनी फरार एकबोटेवर अवाक्षर काढलं नाही. एरव्ही कुणी यादव, जो मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय, फरार घोषित, पण इथंतिथं दिसतो, तरी पोलिस का पकडत नाहीत म्हणून घसा फोडणारे वाहिन्यावाले एकबोटेंबर बोलायला तयार नाहीत. ही कसली पत्रकारिता? हा कसला व्यवहार? ही कुठली नीती?

नंतर पश्चात बुद्धीनं सुधीर ढवळे आणि दत्तप्रसाद दाभोलकरांच्या मुलाखती दाखवल्या. त्यातल्या दत्तप्रसादांच्या मुलाखतीनं तर पत्रकाराचा चेहरा उजळूनच गेला. कारण भिडे गुरुजींचे प्रश्न त्यानं दाभोलकरांना विचारले आणि दाभोलकरांच्या उत्तरांनी पत्रकार गारद!

अशा प्रकारे सतत तीन-चार दिवस भिडे गुरुजी नामक एका गंभीर गुन्हे दाखल झालेल्या गृहस्थांप्रति वाहिन्यांनी त्यांना जे फुटेज देऊन गुरुदक्षिणा दिली, त्यांना याचा विसर पडला की, हे गृहस्थ ज्या आरोपांखाली संशयित आहेत, ज्याची न्यायालयीन चौकशी जाहीर झालीय, त्यांना अशा प्रकारे बाजू मांडायला देऊन आपण चौकशीचे प्राथमिक संकेतच मोडतोय…

हे भिडे पुराण चालू असतानाच एका वाहिनीवर ‘शोधपत्रकारितेवर सरकारी वरवंटा फिरणार का?’ अशी विशेष चर्चा झाली. ती आधार जोडणीसंदर्भात होती.

मात्र शोधपत्रकारितेच्या, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवाज उठवू इच्छिणाऱ्या या वाहिनीसह ‘गुरुग्रस्त’ वाहिन्यांना आमची एक सूचना अथवा गृहपाठ, स्वाध्याय अथवा आव्हान.

त्यांनी शोध पत्रकारितेचा वसा घेऊन खालील गोष्टींची शोध घ्यावा.

१) संभाजी भिडे आणि मनोहर भिडे या दोन व्यक्ती की एकच?

२) गणपत महार, गणोजी शिर्के यांपैकी संभाजी महाराजांचा अंत्यसंस्कार नेमका कोणी केला?

३) शिर्के आडनावच पुढे शिवले कधीपासून झालं?

४) संभाजी महाराज समाधीप्रमाणे गणपत महार यांची समाधी केव्हापासून होती?

५) गणपत महार यांच्या समाधीजवळ असा कुठला फलक लावला, ज्यामुळे ग्रामस्थ संतापले.

६) गणपत महार याने अंत्यसंस्कार केले नाहीत, तर संभाजी महाराजांच्या समाधीची देखभाल केली, म्हणून त्यांचीही समाधी बांधली गेली, हे तरी खरं आहे?

७) भिडे गुरुजींचे यू-ट्युबवरचे व्हिडिओ पाहून त्यांची ती प्रासादिक वाणी, तशीच्या तशी वाहिन्यांवरून प्रक्षेपित करावी. एकबोटे कुठे असतील, हा प्रश्न कुणाला तरी विचारावा.

गुरुजी समर्थक वाहिन्या हे आव्हान स्वीकारतील?

 सौजन्य अक्षरनामा-

‘कळ’फलक – संजय पवार

Previous articleइंटेलेक्च्युअल प्रॉस्टिट्यूट्स
Next articleसमज वाढवा ! वैर संपवा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.