जय भीम : अत्याचारांच्या विरोधातील लढाईची अत्यंत प्रभावी कहाणी

नीलांबरी जोशी

पोलिस व्हॅनमधून उतरलेल्या लोकांना तो पोलिस अधिकारी त्यांची जात विचारतो.. “इरुला” असं जे सांगतात त्यांना बाजूला काढतो. त्यांच्यावर चोरीचा ठपका ठेवायला त्यांना वेगळं काढलेलं असतं. पण “त्यांच्या संख्येपेक्षा चोरीचे गुन्हे जरा जास्त आहेत असं” सहाय्यक पोलिस सांगतो तेव्हा तो अधिकारी बिनदिक्कतपणे म्हणतो, “त्यांनी एकापेक्षा जास्त गुन्हे केल्याचे आरोप ठेवू..” चोरी कुठेही घडली तरी चोरीचा आळ इरुलांवर घ्यायचा असं व्यवस्थेचं(!) ठरलेलं(च) असतं..!

“जय भीम” हा चित्रपट सुरु झाल्यावर या दृश्यामुळे पुढचं भयाण पण वास्तव चित्र दिसायला लागतं. “इरुल” या तामिळ शब्दाचा अर्थ आहे “काळा”. “इरुलर” म्हणजे काळा माणूस. यावरुन “इरुला” ही भाषा बोलणा-या “इरुलर” या भटक्या जमातीलाच ते नाव मिळालं आहे. संख्येनं सुमारे दोन लाख आणि देशातल्या सर्वात प्राचीन जमातीच्या इरुलांकडे नागरिकत्वाची कागदपत्रं नाहीत.

चित्रपटातल्या एका प्रसंगात यांना कागदपत्रं मिळावीत म्हणून प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला स्थानिक नेता म्हणतो, “खालच्या जातीच्या लोकांना आम्ही मतं मागायला जातो हे पुरेसं नाही का? आता काय या लोकांच्या घरी जाऊनही मतं मागू?”

*****

चित्रपटातल्या पुढच्या एका प्रसंगात पोलिसांनी चोरीचा काय प्रकारे तपास केला याचं उत्तर म्हणून एक जण सांगतो, “मी पोलिसांना केवळ ओळख दाखवली” यावरुन त्यांनी मला अटक केली.. एकाला केवळ तो पोलिसाला घाबरुन दूर सरकला म्हणून अटक केलेली असते. दुसऱ्या एकावर पोलिस चोरीचा आळ घेतात.. अमानुष छळ करुनही तो गुन्हा(!) कबूल करत नाही.. तेव्हा बायकोला कोठडीत आणून तिच्यावर अत्याचार करुन त्याला गुन्हा मान्य करायला लावतात. एका लहान मुलाला तर त्याचे वडिल सापडत नाहीत म्हणून पकडून नेतात. त्यानंतर साधं खोडरबर हरवलं तरी वर्गातल्या मुलांच्या संशयाची सुई त्याच्याकडे वळते असं तो सांगतो..!

**********

तीन जणांवर असाच चोरीचा आळ घेतला जातो. नंतर ते तिघं गायब होतात. त्यातला एकजण रजकन्नू.. त्याची बायको सेनगानी. या दोघांभोवती चित्रपट सुरु होतो. नंतर त्यांच्यावरच्या अत्याचारांच्या विरोधात चंद्रू या वकिलानं कोर्टात दिलेला लढा यावर चित्रपट आधारित आहे.

सूरिया या अभिनेत्यानं साकारलेल्या चंद्रू वकिलाची चित्रपट सुरु झाल्यावर सुमारे अर्ध्या तासानंतर शांतपणे एंट्री होते. त्याचा सच्चेपणा आणि तळमळ अनेक प्रसंगांमधून मनात झिरपत जाते. लिजोमोल होसे हिनं सेनगानी या नायिकेचं काम अप्रतिम केलं आहे. खरं तर हे सर्व गावातलेच इरुला जमातीचे लोक वाटतात.

*********

वृद्दाचलममधल्या १९९३ साली घडलेल्या एका सत्यघटनेवर हा चित्रपट आधारित आहे. प्रत्यक्षातल्या चंद्रू या चेन्नाईस्थित वकिलानं आजपर्यंत अशा ९६००० केसेसमध्ये पिडितांना न्याय मिळवून दिला आहे. आता निवृत्त झालेल्या या न्यायाधीशानं एकेकाळी दिवसाला ७५ केसेसची सुनावणी ऐकली आहे. TJ Gnanavel या दिग्दर्शकानंच या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे.

शॉन रोनाल्डचं संगीत असलेली गाणी ऐकताना आपण वेगळ्या भाषेतली गाणी ऐकतो आहे असं वाटत नाही. पक्कं विटांचं घर असावं ही महत्वाकांक्षा बाळगणारा रजकन्नू, सेनगानीच्या कानात इवलाली फुलं माळणारा रजकन्नू आणि त्याची वाताहत.. त्या दोघांमधलं अविरत वहाणारं प्रेम या गाण्यांमधून व्यक्त होत रहातं. गाणी नेहमीप्रमाणे चित्रपटात मध्येच येऊन लुडबूड करत नाहीत. मुख्य म्हणजे, चित्रपटातला भटक्या जमाती, पोलिसांचे अत्याचार आणि कोर्टातली दृश्यं यांच्यावरचा फोकस गाण्यांमुळे अजिबात हलत नाही. मनावर वेगवेगळ्या प्रकारे आघात करत जाणाऱ्या फ्रेम्सच्या मागे गाणी रुणझुणत रहातात. जगात सगळ्यांना समजणारी संगीत ही एकमेव भाषा आहे हे तंतोतंत पटत जातं.

*******

“तणकट” ही राजन गवस यांची कादंबरी आणि त्यांच्या काही कथा “जय भीम” पहाताना खूप आठवतात. जातीपातीचं राजकारण या मुद्द्यामुळे “तणकट” आठवते हे नक्कीच. पण “तणकट”मधल्या प्रसंगांमुळे जसे आपण सतत हादरुन जातो, तसेच धक्के “जय भीम” देतो. चित्रपट पहाताना, पाहून झाल्यावर मनाची एक बधीर अवस्था होते. “तणकट”मधला थळू आज्जा कबीरला म्हणतो, “लेकरा, हाळूहाळू गावात बी फरोक झालाय.. तुझ्यासारख्या पोराला मांडीला मांडी लवून घेतात. पोरा, नशीबवान हाईसा..आमाला बेलट्याशिवाय थारा नव्हता. आता त्ये गेलं का न्हाई. तसं जाईल सगळं हळहळू.. बाबासाबाची पुण्याई… दुसरं काय?”

चित्रपटाच्या शेवटी प्रत्यक्षातला चंद्रू वकिलही म्हणतो “सतत अत्याचारांच्या विरोधात लढताना माझ्यासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते..” त्यावरुन चित्रपटाचं नाव आहे “जय भीम..!”

संदर्भ :

चित्रपटाच्या निमित्तानं चंद्रू या वकिलांची हिंदूमध्ये आलेली ही मुलाखत वाचनीय आहे..

https://www.thehindu.com/…/watched…/article37321197.ece

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

…………………………

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Jai Bhim – Official Tamil Trailer

Previous articleउद्धवजी , काही मराठी शब्दांचे अर्थच बदला की !
Next articleअंगावर चिखल उडवून घ्यायचाच कशाला ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here