उद्धवजी , काही मराठी शब्दांचे अर्थच बदला की !

-प्रवीण बर्दापूरकर 

एका क्रुझवर अंमली पदार्थांचे ( ड्रग्ज ) सेवन करताना म्हणा की , ते बाळगताना म्हणा , हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित काही जणांना अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून ( एनसीबी ) झालेली अटक सध्या गाजते आहे ; थयथयाट , तळतळाट , बदला घेण्याची भाषा ऐकू येते आहे . त्यात महाराष्ट्राच्या ‘हर्बल वनस्पती’ फेम एका मंत्र्यानेही पुढे येऊन त्याच्या जावयाला अशाच प्रकरणात झालेली अटक कशी बेकायदेशीर आणि आकसपूर्ण होती असा सूर आळवला आहे . या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत सर्व भान विसरुन बरीच राळ उडवली गेली असून प्रसार माध्यमांनीही हे प्रकरण जिवंत ठेवण्याचे प्रयत्न नेहमीप्रमाणे  कसोशीने चालवलेले आहेत . नेमकं कोण खरं आणि कोण खोटं , याबाबत संभ्रम निर्माण व्हावा असे दावे आणि प्रतिदावे दररोज समोर येत आहेत . कथित संशयित आरोपींच्या सोबतच एनसीबीच्या मुख्य तपास अधिकाऱ्यालासुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आरोपीशी संबंधित असणाऱ्यांना यश आलेलं आहे . हे असंच सुरु राहिलं तर , ड्रग्ज आणि काळ्या पैशाने हिंदी चित्रपटसृष्टीला विळखा घातल्याचा आणि त्यातील तथ्य , हा मुख्य मुद्दा कधीच तडीला लागणार नाही . तरी या धुरळ्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे , अशी जी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्याच पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे , ती कितपत गंभीरपणे घ्यावयाची असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला आहे .

हिंदी चित्रपटसृष्टीचं मुख्यालय मुंबई आहे . मुख्यमंत्रीही मुंबईत जन्माला आलेल्या आणि नंतर महाराष्ट्रात पसरलेल्या शिवसेनेचे आधी प्रमुख आहेत . नंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत . हिंदी चित्रपटसृष्टीशी शिवसेना आणि व्यक्तीश: ठाकरे कुटुंबियांचा अतिशय निकटचा संबंध आहे . हिंदी आणि मराठीही  चित्रपटसृष्टीचा ‘कारभार’ कसा चालतो याचं अतिशय स्क्षूम ज्ञान ठाकरे कुटुंबियांना आहे . हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेते , दिग्दर्शक , निर्माते , फायनान्सर  ठाकरे कुटुंबियांचे आश्रित असल्याचा अनुभव यापूर्वी महाराष्ट्राने अनेकदा घेतला आहे . पत्रकारिता करतांना संजय राऊत यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या अनेक बातम्या दिल्या आहेत . अंडरवर्ल्डचे अनेक ‘डार्क’ पैलू त्यांच्या ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकातील त्यांच्या स्तंभातून वाचकांसमोर मांडले गेले होते . एक्सप्रेस वृत्तपत्र समूहातील एकेकाळी आमचे सहकारी असलेले संजय राऊत यांनी मुंबई पोलीस दलाबद्दलही बरंच लेखन केलं आहे . त्यामुळे हिंदी , मराठी  चित्रपटसृष्टीत कुणाचा किती वैध-अवैध पैसा गुंतलेला आहे आणि अंमली पदार्थांचा मुंबईच्या चित्रपटसृष्टीला कसं विळखा पडलेला आहे  हे उद्धव ठाकरे , संजय राऊत आणि शिवसेनेच्या मुंबईतील लहान-मोठ्या नेत्यांना चांगलं  ठाऊक नाही , असं जर कुणी म्हटलं तर त्यावर कुणाचा विश्वास बसणारच नाही .

त्यामुळे तर कुणाला तरी शाब्दिक  का असेना दिलासा देण्यासाठी तर महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचं मत व्यक्त करुन या प्रकरणात अंमली पदार्थ विरोधी पथकातील कुणाला तरी उद्धव ठाकरे लक्ष्य तर करत नाहीयेत  ना ? अशी शंका घ्यायला जागा आहे . ड्रग्जच्या आहारी गेलेली , गांजेडी आणि अंडरवर्ल्डचं धन वापरुन फोफावलेल्या चित्रपटसृष्टीशी संबंधित कुणाची चौकशी होणं , हा महाराष्ट्राच्या बदनामीचा कट असेल तर या आधी यापेक्षाही घडलेल्या गंभीर घटना महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या होत्या का , याचं उत्तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी द्यायला हवं . मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री फरार आहेत , पोलिसांकडून शंभर कोटींची खंडणी मागितल्याचा याच गृहमंत्र्यावर आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्तही गायब आहेत ; त्यांना फरारी ( Fugitive ) म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया न्यायालयाने सुरु केली आहे , अशा बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत . माजी गृहमंत्री आणि मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांवर अशी वेळ येणं हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा गौरव जर समजत असतील तर महाविकास आघाडीच्या सरकारनं बदनामी , अवमान , गौरव , अभिनंदन , सन्मान , उज्ज्वल परंपरा अशा अनेक मराठी शब्दचे अर्थच  बदलून टाकायला हवेत .

अलीकडच्या काही दशकात अशा अनेक घटना घडल्या की , ज्यामुळे राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राची केवळ बदनामीच नाही तर छी-थू झाली पण , त्या घटना घडल्याबद्दल महाराष्ट्राची मान खाली गेली , अशी काही प्रतिक्रिया या आणि या आधीच्या सरकारांनी व्यक्त केलेली नाही म्हणून त्या घटनांचं गांभीर्य कमी झालं , त्यात बळी गेलेल्या जिवांचा मोल माती ठरलं आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन चार ड्रग्सवाले पकडले तर महाराष्ट्राची बदनामी झाली , महाराष्ट्रावर प्रचंड आघात झाला असं जर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुचवत असतील तर मग एकूणच कठीण आहे . या गंजिड्या , गर्दूल्या , ड्रगिस्ट लोकांसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्याऐवजी अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या आणि ज्यांच्या डोळ्यातले अश्रूही सुकून गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांना  जास्त मदत मिळावी म्हणून केंद्राला साकडं घालतो असं जर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे म्हणाले असते तर जनतेला त्यांच्याप्रती जास्त प्रेम वाटलं असतं !

अलीकडच्या चार दशकात , ११४ निष्पाप गोवारी किड्या-मुंग्यासारखे चिरडले गेले , कुपोषणामुळे हजारो बालमृत्यू होतात हे जेव्हा उघडकीला आलं तेव्हा महाराष्ट्राच्या सरकार आणि प्रशासनाला शरम वाटली नाही , इथंपासून या अशा अनेक महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या घटनांची सुरुवात होते . खैरलांजी  आणि कोपर्डीचे मानवतेला काळीमा  फासणारे बलात्कार काय महाराष्ट्राची शान उंचावणारे होते का ? हे अजूनही थांबलेलं  नाही , गेल्या आठवड्यात औरंगाबाद आणि नसिकला आशा नृशंस घटनांची पुनरावृत्ती झाली आहे .  कर्जामुळे भिकेला लागलेल्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या , नापिकीमुळे अनेक शेतकऱ्यांनी नाईलाजाने प्राणत्याग केला , मावळच्या पोलिस गोळीबारात शेतकरी नाहक ठार झाले  , शेतकऱ्यांच्या आंदोलनात झालेल्या गोळीबारात आजवर २७ शेतकरी ठार झाले , कोरोनाच्या काळात ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण तडफडून मेले , भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत कोवळे जीव भाजून मेले…अशा किती घटना सांगाव्यात की , ज्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाला असंख्य वेळा लाज वाटायला हवी होती . पण , वर उल्लेख केलेल्या एकाही घटनेत नेमका गुन्हेगार असलेल्या एकालाही शिक्षा झाली नाही . हा काय महाराष्ट्राचा गौरव समजायचा का ? भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेत तर चौकशी अहवालात वीज पुरवठा यंत्रणेतील दोषामुळे आग लागल्याचं म्हटलं आहे पण , प्रशासनानं  परिचारिकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले . हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असं झालं तरीही साकार आणि प्रशासन निगरगट्ट आहे  . या सर्व घटना गांजेड्या आणि नशिल्या चित्रपटसृष्टीतील आरोपींना झालेल्या त्रासापुढे यत्किंचित आहेत  , असाच मुख्यमंत्र्यांचा म्हणण्याचा अर्थ झाला .

गेल्या सरकारमध्ये सहभागी असताना आणि त्याआधी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे म्हणून उद्धव ठाकरे ओळखले जात होते . ते सुसंस्कृत आहेत असाही समज प्रस्तुत पत्रकारासकट अनेकांचा होता . मात्र , अमंली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या बचावार्थ पुढे येऊन या प्रतिमेला उद्धव ठाकरे यांनी तडा दिला आहे . ‘हीरक महोत्सव–अमृत महोत्सव’ अशी गल्लत उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली आणि त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपमानास्पद शब्द वापरले म्हणून महाआघाडीचे सरकार चवताळून उठले . नारायण राणेंना अटक करण्यात महाविकास आघाडीच्या सरकारने पुरुषार्थ मानला  . मात्र , उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळातील एक मंत्री तपास यंत्रणेतील एका अधिकाऱ्याच्या जाती-धर्माचा उल्लेख करुन त्याला अटक करण्याची भाषा करतो , त्याच्या घरातील स्त्रियांचे अनुचित उल्लेख करतो हे सुसंस्कृतपणाचं  लक्षण समजावं  का ? हा मंत्री  गांजाला हर्बल वनस्पती म्हणतो ,  त्याची कोणतीही शहानिशा करण्याचं औदार्य मुख्यमंत्री दाखवत नाहीत यातून त्या मंत्र्याला मिळणारं संरक्षणच स्पष्ट दिसतं .

‘कर नसते त्याला डर नसते’ आणि तो कोणत्याही चौकशीला घाबरत नसतो हे साफ विसरुन काय खरं काय खोटं ते सिद्ध व्हायच्या आतच महाराष्ट्राची बदनामी  झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री व्यक्त करतात . याचा अर्थ बदनामी , अवमान , गौरव , अभिनंदन , सन्मान अशा अनेक शब्दांचे अर्थ बदलण्याची वेळ आता महाविकास आघाडीच्या सरकारने आणलेली आहे असं समजायला हरकत नाही . त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मर्जीतील तज्ज्ञांची समिती स्थापन करुन पुढाकार घ्यावा आणि हो , हर्बल गर्द , हर्बल ड्रग्ज , हर्बल मद्याची निर्मिती करण्यासाठी उत्तेजन द्यावं , तेवढंच आता शिल्लक उरलं आहे !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

…………………………………………………………………………………………

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.