चालत राहा… स्वप्नाच्या नकाशातील रस्त्यावरून !

– डॉ. रवींद्र कानडजे 

बांधाबांधानी  जोडलाय  गावाचा नकाशा

पण राज्याच्या नकाशावर गावाचं नाव नाही,

गाव अलीकडे आलंय हमरस्त्यावर

किंवा महानगराकडे घेऊन जाणारा रस्ता आलाय गावात.

गावातला एकटा-दुखटाच जातो या महामार्गानं,

बाकी फिरतात गल्ली बोळानं.

गाव तसंच आहे पहिल्यासारखं रस्त्यावर डबकं साचणारं. 

किंवा हिरव्या डबक्यात सुस्त पडलेल्या शेवाळी म्हशीसारखं.

 

गावाच्या पाठीमागून गेलेली बारमाही नदी

उरलीय आठमाही पांदणवाट,

 खाचरं करडांसाठी शेतशिवाराला जोडणारी. 

 

कधीकाळी गावातून पाऊलवाटा जात

आठवडी बाजाराला, 

पोटाच्या चुलीसाठी गाठोड्यात मिठमिरची,

भातकं म्हणून दाळं रेवडी.

किंवा माहेरच्या ओढीने उसळत पाय, 

ओढत भराभर पायवाटा खात खस्ता.

कधीकधी सायकलींच्या किलकिल्या

 डोळ्यांनी धावत असे हा रस्ता. 

 

कधीकाळी या रस्त्यांभोवती झुळझुळ झरे नाचायचे,

नात्यातले तुंबलेपण कडाक्याचा स्वर लावायचे,

अलीकडे महानगरातल्या रस्त्यांची गटारे घुसलीत गावात. डुकरा-डुकरांच्या जथ्थ्यांनी.

हाच रस्ता ओततोय आता महानगरातला संकलित केरकचरा टनांनी. 

गावशिवारातील माणुसकी कुजतेय डम्पिंग ग्राऊंडच्या कणाकणांत.

 

मोरांच्या केका, राव्यांचे हिरवे थवे, हरणांच्या टापा

कोठे दूर निघून गेलेत, विचातोय हा रस्ता.

गाड्यांची सैरभर ढमढम ऐकत.

या नकाशातील  रस्त्यांच्या रेषा

होत्या जीवनदायिनी कधीकाळी,

विकासाचा वारु वायुवेगासम धावायचा याच रस्त्यावरून.

याच रस्त्यांने पाहिले रंकाचे राव आणि रावाचे रंक घडताना.

याच रस्त्याने सोसला मंत्र्यांचा भलामोठ्ठा ताफा,

याच रस्त्याने हराभरा झालेला शेतकऱ्याचा वाफा,

याचेच बोट धरून शाळा शिकली छोकरी

यावरून धावली गावाचा संसार ओढत काळीपिवळी, लालपरी. 

 

सरडा सरकतो किटकुलाकडे,

तसे अलीकडे घरे सरकताहेत रस्त्यांकडे.

नकाशातील रेषा हलविण्यासाठी मागेपुढे,

आता होताहेत अर्ज फाटे,भांडणतंटे,

उपोषणे व आंदोलने.

पिलांनी तोडावे विंचीणीला तसे

रस्त्याकडंची घरे तोडताहेत रस्त्याला,

अन खेकड्यांसारखे ओढताहेत एकमेकांना

ठाण्यात, कचेरीत आणि कोर्टात याच रस्त्यावरून.

 

हा रस्ता येतो स्वप्नात अजस्त्र विकारी अजगरासारखा

माहित नाही त्याच्या शेपटीचे शेवटचे जहरी टोक,

गिळत चाललाय स्वतःच स्वतःला गावासगट

अनंत काळापर्यंत.

 

याच रस्त्याने चाललेले वाडवडील सांगत आले, 

रस्ता संपण्याआधीच मळलेला गुळगुळीत रस्ता धरावा.

किंवा खाणाखुणा लक्षात ठेवाव्या रस्त्याच्या पक्कया.

अडकू नये कोणत्याही रानभुलीत,

नाहीतर मागे लागतो चकवा.

 

जेव्हा माहीत नसते आपल्याला 

हा रस्ता कोठे जातो ? अज्ञात भविष्यासारखा

खाचखळगे सोसत चालणे कठीण तेव्हा,

कडेकपारीत वाढणाऱ्या झाडासारखं मुळं घट्ट रोवून

आत्मभानाच्या रमलखुणा न्याहाळत 

तर्कसंगत विवेकाचे बोट धरून चालत राहा  

स्वप्नाच्या नकाशातील रस्त्यावरून !

 

(लेखक राळेगाव , जिल्हा यवतमाळ येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत)

 7350688852

Previous articleममतांची मुंगेरीलालगिरी !
Next articleआदिवासींच्या आयुष्याला नवे वळण देणारा लोक बिरादरी प्रकल्प
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.