आदिवासींच्या आयुष्याला नवे वळण देणारा लोक बिरादरी प्रकल्प

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

अनिकेत आमटे

भामरागड हे महाराष्ट्रातील शेवटचे टोक. पुढे रस्ता नाही. इंद्रावती, पामुलगौतमी आणि पर्लकोटा नावाच्या तीन नद्यांचा सुरेख संगम तिथे आहे. इंद्रावती नदीच्या पलीकडील राज्य हे छत्तीसगड आहे. रस्त्याने किंवा नदीवर पूल नसल्याने जाणे येणे छोट्या नावेने केले जाते. अखंड मोठ्या वृक्षाचे डोंगे किंवा नाव आदिवासी बांधव बनवितात आणि त्याचा उपयोग नद्या पार करून छत्तीसगड मध्ये जाण्यासाठी केला जातो. जाळे टाकून नदीतील मासेमारी सुद्धा या डोंग्याने किंवा नावेने केली जाते. महाराष्ट्रात गडचिरोली मधील आदिवासी बांधवांना माडिया आणि छत्तीसगड मधील आदिवासी बांधवांना मुरीया संबोधले जाते. दोन्ही राज्यातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधव हे एकच आहेत. त्यांची संस्कृति, चाली रीती, भाषा आणि गावे सारखी आहेत.

00000000000000000000000000000

            महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात हेमलकसा गावात बाबा व साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समिती, या ट्रस्टद्वारे चालविण्यात येणारा ‘लोकबिरादरी प्रकल्प’ हा गेल्या 48 वर्षांपासून डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे व इतर अनेक कार्यकर्त्यांची कर्मभूमी बनला आहे. त्या भागातील अतिमागास आणि अतिअसुरक्षित अशा माडिया व गोंड आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अविरत कार्यरत आहे.

            लोक बिरादरी प्रकल्पाची सुरुवात 23 डिसेंबर 1973 रोजी झाली. 1973 ते 1985 ही पहिली 12 वर्ष आलापल्ली ते भामरागड या 70 किलोमीटरमध्ये रस्ता नव्हता. बैलगाडी जाईल, असा मातीचा रस्ता होता. नद्या-नाले, ओढे भरपूर. कशावरही पूल नव्हता. शासनाने दिलेल्या 50 एकर जागेवर जंगलात प्रकल्पाची सुरुवात झाली. बाबा आमटे, प्रकाश आमटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाकूड, बांबू आणि माती वापरून झोपड्या उभारल्या. सुरुवातीची काही वर्षे डॉ. विकास आमटे सर्व प्रकारचे साहित्य आनंदवन येथून ट्रकने पाठवीत. औषधी आणि किराणा सामान स्टोअर करायला गोदामाचे बांधकाम सर्वात आधी करण्यात आले. पावसाळ्यात 6 महिने कुठेही जाणे अशक्य होते. 6 महिन्यांचे सर्व साहित्य गोदामात साठवून ठेवावे लागायचे. प्रकाश आणि मंदाकिनी दोघेही डॉक्टर असल्याने सुरुवातीला झोपडीत दवाखाना सुरू करण्यात आला. बाबा आमटे यांनी प्रकल्पाला कार्यकर्ते हवेत, असे आवाहन केले होते. त्या काळी बरेच कार्यकर्ते प्रकल्पाला मिळाले. सर्व ध्येयाने प्रेरित होते. कालांतराने काही कार्यकर्ते प्रकल्प सोडून गेले. काही कायमचे प्रकल्पाचे झाले. विलास व रेणुका मनोहर, गोपाळ व प्रभा फडणीस, जगन्नाथ व मुक्ता मचकले, मनोहर व संध्या येमपलवार, गोविंद व बबन पांचाळ, शरद दास, गोविंद जाधव, भाऊजी मडावी ही त्यातील काही कार्यकर्त्यांची नावे. जिथे कमी तिथे आम्ही या वृत्तीने सगळेजण झोकून देऊन काम करत होतो. त्यामुळे कोणालाही कुठल्याही कामाची लाज वाटत नव्हती.

            प्रकल्पापासून नदी 2 किलोमीटर लांब आहे. पिण्याचे पाणी आणायला नदीवर जावे लागत असे. नदीवर अंघोळ करायची आणि भरलेला गुंड डोक्यावर घेऊन चालत घरी यायचे. सुरुवातीची दोन वर्षे सर्वांनाच हे करावे लागले. त्यानंतर विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम आनंदवनातील महारोगमुक्त झालेल्या बांधवांनी केले. पुढे हळूहळू दवाखाना बांधकाम, कार्यकर्ते निवासाची उभारणी स्थानिक साहित्य वापरून करण्यात आली. भाषेची अडचण होती, भाषा शिकून आदिवासींचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते. माडिया ही बोलीभाषा आहे. मराठी, हिंदीपेक्षा संपूर्ण वेगळी. ती शिकल्याशिवाय आदिवासी बांधवांशी संवाद शक्य नव्हता. आदिवासी बांधवांमधील एक-दोघांना मोडकी तोडकी हिंदी येत होती. त्यांच्या मदतीने आईने माडिया – मराठी डिक्शनरी बनवून घेतली. सर्वांना त्याचा फायदा झाला. प्रकल्पाच्या कामावर आणि कार्यकर्त्यांवर विश्वास बसल्यावर हळूहळू दवाखान्यात विविध व्याधीग्रस्त रुग्ण येऊ लागले. कुपोषणामुळे होणारे आजार, मलेरिया, सर्पदंश, जंगली श्वापदांचे हल्ले, टीबी, कॅन्सर, जलोदर यासारखे अनेक दुर्धर आजार या भागात आहेत. 1986 पासून नागपूर मधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम दरवर्षी एकदा लोकबिरादरी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया शिबिर घ्यायला लागली. त्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना फायदा झाला. सर्दी, ताप, खोकला, छोट्या जखमा इत्यादी छोट्या आजारासाठी आदिवासी त्यावेळी 50-60 किलोमीटरचा प्रवास पायी करीत. हा त्रास कमी व्हावा, म्हणून लोकबिरादरी प्रकल्पाने 8 गावांमध्ये हेल्थ सेंटर सुरू केले. प्रकल्पाच्या दवाखान्यात कार्यकर्त्यांना प्राथमिक उपचाराचे शिक्षण दिले. त्यांना गावात गावकर्‍यांनीच राहायला झोपडी दिली. तिथेच आरोग्यकेंद्र सुरू झाले. जवळपास 25 वर्ष ही केंद्र प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी उत्तम सांभाळली. आता आदिवासी बांधव शिकले आहेत. त्यातील काही बांधवांना दवाखान्यात प्राथमिक ट्रेनिंग देऊन नवीन गावांमध्ये हेल्थ सेंटर उत्तम सुरू आहेत.

            महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड या तालुक्यात किंवा जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही रस्ते, पूल, आरोग्य सुविधा, शिक्षण, वीज अशा मूलभूत सुविधा आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत, तशीच किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर परिस्थिती समोरच असलेल्या छत्तीसगड सीमेवर दिसून येते. छत्तीसगडमधून अनेक रुग्ण नद्या पार करून लोक बिरादरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी नियमित येत असतात. तसेच, गडचिरोली जिल्ह्याच्या दुसर्‍या बाजूला तेलंगणा राज्य आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या बर्‍याच गावातील रुग्णसुद्धा प्रकल्पातील दवाखान्याचा लाभ घेतात.

            2014 हे बाबा आमटे यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. लोकबिरादरी दवाखान्याची इमारत 1978 साली बांधण्यात आली होती. मातीमध्ये बांधकाम आणि लाकडाचा वापर असल्याने वाळवीने दवाखान्याची इमारत पोखरून टाकली होती. 2002 पासून डॉ. दिगंत आमटे यांनी प्रकल्पातील दवाखान्यात काम करण्यास सुरुवात केली. आई-बाबा नंतर 30 वर्षांनी दिगंतच्या रूपाने दवाखान्याला नवीन डॉक्टर मिळाला. गेली अनेक वर्ष डॉ. दिगंत आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनघा दिगंत आमटे ही दोघं इतरांच्या सहकार्याने दवाखान्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळीत आहेत. जग आधुनिक होत असताना आपला दवाखाना पण चांगला असावा आणि अधिक चांगल्या आधुनिक सुविधा आदिवासी बांधवांना देता याव्यात, म्हणून बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षात दवाखान्याची चांगली इमारत प्रकल्पात उभारण्यात आली. अनेक हितचिंतकांचे हातभार ही हॉस्पिटलची इमारत उभी करण्यास लागले. आता हे हॉस्पिटल 100 बेडचे झाले आहे. दवाखान्यात एक्स-रे, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब, दंतचिकित्सा, डोळ्यांचा विभाग, आयसीयू विभाग, कमी वजनाच्या लहान बाळांसाठी वॉर्मर, डिलिव्हरी रूम, 3 मेजर ऑपरेशन कक्ष, डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्ष, तसेच सॅनिटरी पॅड बनविण्याचा स्वतंत्र कक्ष आहे. सुमारे 150 किलोमीटर परिघातून 1200 खेड्यातील जनता दवाखान्यात उपचारासाठी येते. दरवर्षी साधारण 35 हजार ते 45 हजार रुग्ण या दवाखान्याचा लाभ घेतात. दरवर्षी 500 च्या जवळपास शस्त्रक्रिया केल्या जातात. अनेक महिलांच्या प्रसूती दवाखान्यात होतात. सिजेरियनची आवश्यकता भासल्यास तीसुद्धा शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये होते. 1973 पासून सुरू झालेला हा दवाखाना आजपर्यंत एकही दिवस बंद ठेवला नाही.

       सुरुवातीच्या काळात काम करताना कार्यकर्त्यांना असे लक्षात आले की, या भागातील आदिवासी बांधव अशिक्षित आणि भोळे आहेत. बाहेरील शिक्षित जनता विविध मार्गाने यांची लूट करीत होती. म्हणून सर्वांनी मिळून लोकबिरादरी प्रकल्पात आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य या शाळेने उज्ज्वल केले आहे. हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रमशाळेमुळे अनेक आदिवासी बांधव विविध क्षेत्रात पुढे जात आहेत. 1976 साली सुरू झालेल्या या शाळेच्या पहिल्या तुकडीत प्रवेश घेणारा कांदोडी गावचा पहिला विद्यार्थी कन्ना डोबी मडावी हा एम.बी.बी.एस. आणि नंतर स्त्रीरोग तज्ज्ञ झाला. माडिया समाजातील पहिला डॉक्टर. स्वतः खूप मेहेनत करून, घरी कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना या शाळेतील बरेच विद्यार्थी/विद्यार्थिनी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक, पोलिस, फॉरेस्ट गार्ड, तलाठी, नर्स, MSW अशा विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन आज मुख्य प्रवाहात आले आहेत. मुख्य प्रवाहात आले असले, तरीही त्यांची नाळ त्यांच्या जमिनीशी, गावाशी आणि समाजाशी जुळलेली आहे, ही जमेची बाजू आहे. त्यांना त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. अनेक शिकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समाजाला पुढे नेण्यासाठी गावातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले आहेत. शाळेतील विद्यार्थ्याना आणि गावातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व माडिया भाषेत पटवून देण्याचे काम सुद्धा ते करीत असतात. गरजू विद्यार्थ्याला उच्च शिक्षणास आर्थिक साहाय्य हे सुशिक्षित विद्यार्थी मिळवून देतात. मोजके अपवाद वगळता सर्वांची आदिवासी समाजाप्रति संवेदनशीलता टिकून आहे. ज्या भागात जायला आजही रस्ता नाही, शिक्षण तिथे पोहोचले नाही, अशा गावातील विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत प्रवेश घ्यावा, म्हणून आमची धडपड असते. आज लोकबिरादरी आश्रमशाळेत 650 विद्यार्थी 1 ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्गासाठी वेगळी खोली आहे. प्रयोगशाळा उपलब्ध आहे. मुलामुलींसाठी सर्व सोयींनी सुसज्ज वसतिगृह आहे. पोटभर चांगले जेवण देणारी मेस आहे. 40 कॉम्प्युटरची इंटरनेटने जोडलेली लॅब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहे. 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आणि मोठे क्रीडा मैदान आहे. शिवाय जिम सुद्धा उपलब्ध आहे. शिक्षकांची निवासस्थाने प्रकल्पाच्या आवारातच आहेत.

            हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाने जसे शाळेच्या माध्यमातून उच्चशिक्षित विद्यार्थी घडवलेत, तसेच क्रीडा क्षेत्रात सुद्धा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत. अनेक वर्षांपासून लोक बिरादरी आश्रमशाळेचे विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर गडचिरोली जिल्ह्याचे, तसेच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात. वैयक्तिक क्रीडा प्रकारात हे विद्यार्थी तरबेज आहेत. लांब उडी, उंच उडी, धावण्याच्या सर्व शर्यती, भालाफेक, गोळाफेक इत्यादी खेळात अनेक पदके त्यांनी प्राप्त केली आहेत. आमचा आणि क्रीडा शिक्षकांचा कायम खेळाडूंना संपूर्ण पाठिंबा असतो.

            2015 मध्ये लोकाग्रहास्तव लोकबिरादरी प्रकल्पापासून साधारण 27 किलोमीटर लांब असलेल्या नेलगुंडा या अतिदुर्गम भागात मी, समीक्षा आणि नवीन कार्यकर्त्यांनी मिळून साधना विद्यालय नावाची इंग्रजी माध्यमाची बालवाडी ते पाचवीपर्यंतची अनिवासी शाळा सुरू केली. मातीचे कच्चे रस्ते आणि ओढे, नाले. त्यावर पूल नाही. पावसाळ्यात या भागात जाणे अशक्य असते. म्हणून या शाळेचे वेळापत्रक थोडे वेगळे ठेवले आहे. या शाळेला पावसाळी सुट्टी देतो आम्ही. संपूर्ण उन्हाळा शाळा सुरू असते. साधारण 1 जुलै ते 5 सप्टेंबर शाळेला सुट्टी असते. या शाळेत 6-7 किलोमीटरच्या परिसरातील 11 – 12 गावातील 150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील शिक्षक हे आजूबाजूच्या गावातीलच आहेत. त्यांना कसे शिकवायचे याचे ट्रेनिंग दिले गेले आहे. समीक्षा आणि अमित कोहली सर या शिक्षकांवर मेहेनत घेत असतात. सकाळी 8 वाजता विद्यार्थी शाळेत येतात. त्यांना सकाळचा नास्ता आणि दुपारचे पोटभर जेवण दिले जाते. दुपारी 3 वाजता शाळा सुटते. रोज 95 टक्के हजेरी असते. काही विद्यार्थ्याना रोज 10-12 कि.मी. अंतर तुडवत शाळेत यावे लागते, तेही घनदाट अरण्यातून. सायकली दिल्या आहेत, पण रस्तेच नीट नाहीत. म्हणून सायकली लवकर खराब होतात. कुठलेही शासकीय अनुदान या शाळेला नाही. सध्या या शाळेचा दैनंदिन खर्च ‘एचबीएस’ फाऊंडेशन, मुंबई करीत आहे.

           2019 मध्ये जिंजगाव या गावात आम्ही अजून एक साधना विद्यालय या नावाने शाळा सुरू केली. सध्या 3 वर्ग सुरू आहेत. 70 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा सुद्धा नेलगुंडा येथील शाळेप्रमाणेच चालविली जाते. तलाव निर्मिती व खोलीकरणाची कामे 2016 पासून सुरू केली. लोकाग्रहास्तव आपण हे कार्य हाती घेतले आहे. 2016 ते 2021 पर्यंत एकूण 27 तळी केली आहेत. काही भामरागड तालुक्यात आहेत आणि काही अहेरी तालुक्यात केली आहेत. गावातील मुक्या पाळीव जनावरांसाठी 12 महिने पाणी उपलब्ध असावे, गावकर्‍यांनी हिवाळ्यात तलावातील पाण्याचा उपयोग करून भाजीपाला पिकवावा, मत्स्यशेती करून गावाचा आर्थिक विकास व्हावा, हा उद्देश आहे. प्रत्येक गावाचा तलावाच्या कार्यात 10 ते 15 टक्के आर्थिक सहभाग असतो. बाकी सर्व खर्च आपण संस्थेला तलावासाठी मिळालेल्या देणगीमधून करत असतो. काही गावांनी गेल्या काही वर्षात उत्तम मत्स्य व्यवसाय करून 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न घेतले. तलावाची निर्मिती करण्यापूर्वी गावातील सर्वांशी चर्चा केली जाते. दारूबंदी असावी, तंटामुक्त गाव असावे, जंगलतोड बंद करावी, अशा काही अटी आम्ही त्यांना घालत असतो. त्या मान्य केल्या, तरच त्या गावात काम करतो. लोकबिरादरी प्रकल्पात गाई आणि म्हशी आम्ही पाळल्या आहेत. येथे राहणार्‍या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला दूध उपलब्ध व्हावे, म्हणून आपण प्रकल्पाच्या सुरुवातीच्या वर्षांपासून गोशाळा चालवतो. 20-25 गाई म्हशी सध्या प्रकल्पात आहेत. शाळेतील 5 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही दूध दिले जाते. तसेच, सार्वजनिक मेसमध्ये दह्याची कढी आणि ताक सातत्याने बनवणे सुरू असते.

            लोकबिरादरी प्रकल्पातील वन्यप्राणी अनाथालय हे येणार्‍या पाहुण्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. पूर्वी प्राण्यांची शिकार आदिवासी बांधव करीत असत. अनेक प्राणी अन्न म्हणून खात असत. कंदमूळ, जंगली फळे आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीवरच आदिवासी बांधवांची उपजीविका चालायची. त्यामुळे अनेक प्राण्यांची पिले अनाथ व्हायची. निदान त्या निरागस पिलांचे प्राण वाचावे, म्हणून आम्ही वन्यप्राणी अनाथालयाची सुरुवात केली. हजारो प्राणी त्यानिमित्ताने आम्ही वाचवू शकलो. मुक्या प्राण्यांचीही सेवा करण्याचे भाग्य आम्हास लाभले. शिक्षण घेतल्यावर आदिवासी बांधवांना नोकर्‍या मिळाल्या. प्रकल्पाच्या सुरुवातीला शेतीचे प्रात्यक्षिक प्रकल्पातील कार्यकर्त्यांमार्फत आदिवासींच्या शेतावरच करून दाखविण्यात आले. विविध प्रकारच्या बियाण्यांचे वाटप अनेक वर्ष संस्थेमार्फत करण्यात आले. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणामुळे प्राण्यांचे आणि निसर्गाचे महत्त्व कळू लागले आहे. आता शिकारीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. वन्यप्राणी आणि डॉ. प्रकाश आमटे यांची मैत्री अनेकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. विलास मनोहर यांनी प्रकल्पातील प्राण्यांच्या जीवनावर ‘नेगल’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे दोन भाग आहेत, ते ग्रंथाली प्रकाशन मुंबईने प्रकाशित केले आहे. तसेच डॉ. प्रकाश आमटे यांनी ‘रानमित्र’ नावाचे पुस्तक त्यांच्या वन्यप्राण्यांसोबतच्या अनुभवांवर लिहिले आहे. पुण्याच्या समकालीन प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे.

            महाराष्ट्र शासनाने 1988 मध्ये ‘आदिवासी सेवक’ पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा सन्मान केला. 1995 मध्ये दूरदर्शनवर गाजत असलेल्या ‘सुरभी’ या मालिकेत लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्य दाखविण्यात आले. 1995 मध्ये ‘मोनॅको’ या युरोपमधील छोट्याशा देशाने डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या गौरवार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. 2002 मध्ये डॉ. प्रकाश आमटे यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. पुढे 2008 मध्ये रेमन मॅगसेसे पुरस्काराने डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांना सन्मानित करण्यात आले. दुबईमधील शेख हमदान पुरस्कार दोघांनाही प्राप्त झाला आहे. ‘प्रकाशवाटा’ या प्रकाश आमटे यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन 2014 मध्ये समृद्धी पोरे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे ः द रिअल हीरो’ हा मराठी व्यावसायिक चित्रपट सर्व महाराष्ट्रात पडद्यावर प्रदर्शित झाला. अनेक पुरस्कार हेमलकसापर्यंत येऊन पोहोचले. त्या निमित्ताने प्रकल्पाचे कार्य जगभर पोहोचले. अनेक व्यक्ती प्रकल्पाबरोबर जोडल्या गेलीत.1973 ते 2000 सालापर्यंत प्रकल्पात ज्या इमारती होत्या, त्या जवळपास सर्व माती आणि लाकडाने बांधलेल्या होत्या. वरती कौलारू छप्पर होते. कालांतराने वाळवी लागून त्या खराब झाल्या. त्यातील काही अगदीच खराब आणि जीर्ण झालेल्या इमारती पाडून त्या ठिकाणी पुढील 60-70 वर्षे टिकतील अशा स्लॅबच्या इमारती उभ्या केल्या. विविध देणगीदारांनी त्यासाठी खूप मदत केली. शाळेची इमारत, मुला-मुलींचे वसतिगृह, कार्यकर्ता मेस, शाळेची मेस, कार्यकर्ता निवास, शिक्षक निवास, पाण्याची टाकी, वॉटर फिल्टर प्लांट अशा सर्व सोयी प्रकल्पात आता उपलब्ध आहेत.

1995 साली प्रकल्पात वीज आली. तोपर्यंत रॉकेलवर चालणारे कंदील आम्ही सर्वजण वापरत असू. आता आधुनिक दवाखान्यात 24 तास वीज आवश्यक असल्याने जनरेटरची सुविधा आहे. शाळेत सोलर इन्व्हर्टर, सोलर वॉटर हीटर बसविले आहे. 24 तास गरम पाणी उपलब्ध आहे. सोलरवर चालणारी कॉम्प्युटर लॅब आहे. दिवे नसले, तरीही लॅब बंद नसते. आदिवासी बांधवांना शिक्षण देऊन सक्षम करण्याचे कार्य शिक्षक आणि प्रकल्पामार्फत होत आहे. शैक्षणिक सहल आणि इंटरनेटच्या माध्यमातून आधुनिक जग त्यांना सतत दाखविले जाते. उच्चशिक्षण घ्यायला जेव्हा ते भामरागड भागातून पुणे-मुंबई-नागपूरसारख्या ठिकाणी जातील, तेव्हा त्यांना शहरातील कशाचीही भीती वाटू नये, हा आमचा प्रयत्न आहे. स्पर्धेच्या युगात ते सहज बाजी मारू शकतील, हा विश्वास आहे. हे कार्य अजून पुढे वाढेल, यात आम्हाला शंका नाही. विविध नवीन प्रकल्प सुरू होतील. जनतेच्या आशीर्वादाने आणि विश्वासाने हा प्रकल्प अजून चांगले कार्य करेल. आमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास नवीन पिढीतील अनेक कार्यकर्ते प्रकल्पाच्या विविध कार्यात सहभागी झाले आहेत. प्रकल्पात अनेक आदिवासी बांधव सुद्धा कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत.

——————————

(लेखक लोक बिरादरी प्रकल्पाचे समन्वयक आहेत.

9423208802/7588772860

Previous articleचालत राहा… स्वप्नाच्या नकाशातील रस्त्यावरून !
Next articleप्रशांत किशोर: भारतीय राजकीय पटलावरचा प्रभावशाली जादूगर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.