सुरुवातीच्या काळात काम करताना कार्यकर्त्यांना असे लक्षात आले की, या भागातील आदिवासी बांधव अशिक्षित आणि भोळे आहेत. बाहेरील शिक्षित जनता विविध मार्गाने यांची लूट करीत होती. म्हणून सर्वांनी मिळून लोकबिरादरी प्रकल्पात आश्रमशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य या शाळेने उज्ज्वल केले आहे. हेमलकसा येथील लोकबिरादरी आश्रमशाळेमुळे अनेक आदिवासी बांधव विविध क्षेत्रात पुढे जात आहेत. 1976 साली सुरू झालेल्या या शाळेच्या पहिल्या तुकडीत प्रवेश घेणारा कांदोडी गावचा पहिला विद्यार्थी कन्ना डोबी मडावी हा एम.बी.बी.एस. आणि नंतर स्त्रीरोग तज्ज्ञ झाला. माडिया समाजातील पहिला डॉक्टर. स्वतः खूप मेहेनत करून, घरी कुठलीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना या शाळेतील बरेच विद्यार्थी/विद्यार्थिनी डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक, पोलिस, फॉरेस्ट गार्ड, तलाठी, नर्स, MSW अशा विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन आज मुख्य प्रवाहात आले आहेत. मुख्य प्रवाहात आले असले, तरीही त्यांची नाळ त्यांच्या जमिनीशी, गावाशी आणि समाजाशी जुळलेली आहे, ही जमेची बाजू आहे. त्यांना त्यांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. अनेक शिकलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समाजाला पुढे नेण्यासाठी गावातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले आहेत. शाळेतील विद्यार्थ्याना आणि गावातील पालकांना शिक्षणाचे महत्त्व माडिया भाषेत पटवून देण्याचे काम सुद्धा ते करीत असतात. गरजू विद्यार्थ्याला उच्च शिक्षणास आर्थिक साहाय्य हे सुशिक्षित विद्यार्थी मिळवून देतात. मोजके अपवाद वगळता सर्वांची आदिवासी समाजाप्रति संवेदनशीलता टिकून आहे. ज्या भागात जायला आजही रस्ता नाही, शिक्षण तिथे पोहोचले नाही, अशा गावातील विद्यार्थ्यांनी आमच्या शाळेत प्रवेश घ्यावा, म्हणून आमची धडपड असते. आज लोकबिरादरी आश्रमशाळेत 650 विद्यार्थी 1 ली ते 12 वी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्गासाठी वेगळी खोली आहे. प्रयोगशाळा उपलब्ध आहे. मुलामुलींसाठी सर्व सोयींनी सुसज्ज वसतिगृह आहे. पोटभर चांगले जेवण देणारी मेस आहे. 40 कॉम्प्युटरची इंटरनेटने जोडलेली लॅब विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध आहे. 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आणि मोठे क्रीडा मैदान आहे. शिवाय जिम सुद्धा उपलब्ध आहे. शिक्षकांची निवासस्थाने प्रकल्पाच्या आवारातच आहेत.