तो नुसता राजकारणी राहिला असता , चळवळ्या राहिला असता तर फारसं काही बिघडलं नसतं . तेव्हाचं ते मध्यमवर्गीय वातावरण होतं पण , तो बहुपेडी होत गेला .तो तेव्हा वैद्यकशास्त्रात शिक्षण घेत होता. डॉ. प्रदीप मुळे आणि डॉ. मिलिंद देशपांडे यांच्यासोबत मला बघितल्यामुळे ; विशेषत: डॉ. प्रदीप मुळेसोबत बघितल्यावर त्याचं माझ्याविषयी बरं मत झालं असावं . कारण तेव्हा मी जास्त आक्रमक होतो . तेव्हाही अंबाजोगाई वगैरे ठिकाणी मी त्याच्याशी वादही घातलेले होते . भालचंद्र कांगोची ती जी जडणघडण आहे ती मी फार लांबूनही नाही आणि फार जवळूनही नाही पण , बघितली हे नक्की. मी त्याचा कौटुंबिकही मित्र नाहीआणि दूरचाही मित्र नाही . १९७७ साली मी पत्रकारिता करण्यासाठी औरंगाबाद सोडल्यानंतर मुंबई , नागपूर , दिल्लीत , मराठवाड्यातला जो कोणी माझ्या नियमित संपर्कात होता त्याच्यापैकी भालचंद्र कांगो होता . या सत्काराच्या निमित्ताने जेव्हा बोलण्याचं मला सांगण्यात आलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की , तेव्हाच्या भालचंद्रचं एक विशाल झाड झालंय . तो वक्ता तर उत्कृष्ट आहेच . तेव्हाच त्याच्या सभेला दोन दोन, चार चार हजार लोकं आलेले मी पाहिलेले आहेत . आताची जी ‘स्टार’शिप आली आहे , ती तेव्हा तो आणि विजय गव्हाने यांच्या वाट्याला होती . भालचंद्र संपादक आहे , राजकारणी आहे , समाजकारणी आहे , तो डॉक्टर आहे , तो कामगार नेता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं सगळं कॉम्बिनेशन असलेला एक सुसंसकृत माणूस आहे . कधी भालचंद्र कांगोसाठी लिहिलं , कधी पत्रकार म्हणून भालचंद्र कांगोच्या पत्रकार परिषदेसाठी साठी गेलो . मी राजकीय वृत्त संकलनात होतो . डावी चळवळ कधी हा माझा कव्हरेजचा विषय नव्हता पण आमच्या ओझरत्या का असेना भेटी होत होत्या .