जैन हिल्स- शेतीतील क्रांतिकारी प्रयोगांची भूमी

-संतोष अरसोड

कॉर्पोरेट कंपनीचे सामाजिक भान जिवंत असले की खचलेल्या मनांना उभारी देता येते. भिऊ नका आम्ही प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहोत, असा कृतिशील संदेश देणारी जैन इरिगेशन ही कंपनी. २,२०० एकराचा डोंगराळ भाग आज दुर्दम्य इच्छाशक्तीने शेती क्षेत्रातील नव्या क्रांतीच्या दिशेने आगेकूच करीत आहे. विविध क्रांतिकारी प्रयोग या भूमीत साकारले आहे. भवरलाल जैन नावाच्या कृषी क्षेत्रातील ऋषीची ही किमया आहे. भवरलाल जैन यांनी शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी स्वप्न बघितले अन् त्यांच्याच हयातीत ते साकारही केले. जैन हिल्सवर शेती क्षेत्रात सुरू असलेले विविध क्रांतिकारी प्रयोग भवरलाल जैन यांच्या स्वप्नातील कृषी प्रधान भारताचे अनोखे मॉडेल आहे. भूमिपुत्रांच्या समस्या ह्या माझ्याच समस्या आहेत या भावनेतून ही निर्मिती झाली आहे.

शेती ही सृजनाचे प्रतीक आहे.इथेच खऱ्या अर्थाने निर्मितीचा आनंद मिळत असतो. ग्रामीण भागातील मोडकळीस आलेली कृषी व्यवस्था पुन्हा नव्या जोमाने उभी राहावी म्हणून जैन एरिगेशन ने एक नवा क्रांतिकारी प्रयोग जैन हिल्स वर सुरू केला आहे. ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार ‘ नावानं १४ डिसेंबर ते १४ जानेवारी असा एक महिना कृषी महोत्सव साजरा करण्यात आला. भवरलाल जैन यांच्या संजीवन दिनाचे औचित्य साधून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.शेतकऱ्यांना नव संजीवनी द्यावी हा त्यामागचा शुद्ध उद्देश.

नुकताच आम्ही हा महोत्सव अनुभवून आलोत. जैन ग्रुपचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी, त्यांचे सहकारी किशोर कुलकर्णी, देवेंद्र पाटील यांनी ही संधी उपलब्ध करून दिली. सोबत ‘मीडिया वॉच’ चे संपादक अविनाश दुधे, ई टीव्ही चे शशांक लावरे, पुण्यनगरी यवतमाळ चे प्रवीण पाटमासे होते . आमचा अख्खा दिवस उर्जादायी गेला. शेतकऱ्यांच्या हुंदक्यांचे रूपांतर हुंकारात करणारा हा कृषी महोत्सव नव्या क्रांतीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून रोज दोन हजार शेतकरी या महोत्सवात हजेरी लावत होते. त्यात तरुण शेतकऱ्यांचा भरणा अधिक होता.शिकलेले तरुण शेतीकडे वळले तर नवी क्रांती होवू शकते याची चुणूक या तरुण शेतकऱ्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.

राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ असे दूरवरून एका नव्या आशेने शेतकऱ्यांची पावलं जैन हिल्सकडे वळत होती. या शेतकऱ्यांची सर्व व्यवस्था जैन हिल्सचे सहकारी करीत होते.एखाद्या कॉर्पोरेट कंपनीतील कर्मचारी ती कंपनी माझा प्राण आहे या भावनेतून जेव्हा काम करतात तेव्हा हा ओलावा तयार होत असतो. कर्मचाऱ्यांच्या मनातील ओलाव्याचे हे अनोखे सिंचन प्रत्येकाला चिंब करून जाते. शेतकऱ्याचे जगणे समृध्द करण्यासाठीची त्यांची ही धडपड खचलेल्या शेतकऱ्यांना निश्चितच आधार देणारी आहे.

हा कृषी महोत्सव अनोखा आहे.तो इतर कृषी प्रदर्शनासारखा नाही.इथे कोणते स्टॉल नाही.स्टॉल नाही त्यामुळे कुण्या वस्तूंची विक्री नाही.विक्री नाही म्हणून व्यापारीकरण नाही.व्यापारीकरण नाही म्हणून इथे शेतकरी जगला पाहिजे हा शुद्ध भाव आहे. भविष्यातील शेती कशी असेल याचा वेध घेवून हा महोत्सव इथे आयोजित केला होता. पन्नास हजार चे वर शेतकऱ्यांनी नव्या तंत्रज्ञानाची शिदोरी या महोत्सवातून नेली. येताना खचलेला शेतकरी जाताना एक नवी आशा डोळ्यात घेवून गेला असेल हे नक्की.जवळपास ८० तंत्रज्ञ दिवसभर शेतकऱ्याच्या मनात नव्या आशेची पेरणी करीत होते. स्टॉल उभा करण्यापेक्षा सरळ लाईव्ह डेमो च दाखवला त्यांनी शेतीचा. जवळपास ५५ पिकांचं लाईव्ह प्रात्यक्षिक. सारं काही भन्नाट. २२ प्रकारची हळद, १५ प्रकारचा कांदा,१० प्रकारचा लसूण, ६ प्रकारची केळी, ड्रिप वर ऊस, तांदूळ, विना तार काठीचे टोमॅटो पीक, कांदा पिकात केळी चे आंतरपीक हा भन्नाट प्रयोग इथे पहायला मिळतो.यात कांद्यास खत दिले की त्याचा फायदा केळीस होतो. अशी ही जोरदार कल्पना.

हायड्रोफोनिक चारा लागवड तंत्रज्ञान कसे असते याचे इथे मॉडेल आहे. एरिफोनिक बटाटा लागवड हे मॉडेल भविष्यातील शेती कशी असेल याचे सूचक आहे.प्रोटेक्टेड फार्मींगची चूणुक इथे पहावयास मिळते.नेट हाऊसमध्ये संत्री, केळी चे पीक घेता येवू शकते हे इथे प्रयोगातून सिद्ध केले आहे. नेट हाऊसमध्ये ६ बाय ५ फुटावर केळी लागवड करून रोगराई, तापमान,थंडी, करपा, CMV व्हायरस याचा बंदोबस्त करन्यात आला आहे.नेट हाऊसमध्ये केळीचा प्रयोग हा अत्यंत क्रांतिकारी प्रयोग आहे.हा प्रयोग पहिल्यांदाच इथे पाहता आला.बाहेर केळीचा प्लॉट टाकला तर उत्पादन हाती यायला अकरा महिने लागतात तर नेट हाऊस मध्ये हेच पीक नऊ महिन्यात हाती येते. जवळपास २५ किलोचा एक घड पिकविता येतो.

या ठिकाणी चिकू, आंबा, पेरू, सीताफळ, लिंबू, मोसंबी यांच्या ज्या बागा फुलवल्या आहेत तो सुद्धा एक नवीन प्रयोग आहे.दहा बाय सहा फुटावर या झाडांची लागवड करण्यात आली आहे. अतीसघन पद्धतीने ही लागवड करण्यात आली असून एका एकरवर जवळपास ७०० झाडे लावण्यात आली आहे.झाडांची उंची दहा फुटाचे वर जाऊ देत नसल्याने फळ तोडणी, फवारणी आदी बाबी सोप्या होतात.तिसऱ्याच वर्षी उत्पादन हाती यायला सुरुवात होते. शेतकऱ्यांनी हा प्रयोग त्यांच्या शेतीत केला पाहिजे यासाठी येथील तंत्रज्ञ जीव तोडून मार्गदर्शन करीत असतात.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य हे आहे की प्रत्यक्ष फील्डवर तुम्हाला आंतर राष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतात.डॉ.के.बी.पाटील केळीच्या क्षेत्रातील बाप माणूस आहे.संत्रा बागायतदार आणि केळी बागायतदार यांची तीस वर्षांपूर्वी आर्थिक स्थिती समान होती.आज संत्रा बागायतदार बरबाद तर केळी बागायतदार आर्थिकदृष्ट्या सधन झाला आहे. नवे बदल समजून घेत जोपर्यंत आपण नवे तंत्रज्ञान वापरत नाही तोपर्यंत शेतीत यश मिळणार नाही, असे आग्रही प्रतिपादन डॉ. के.बी पाटील करीत होते.विदर्भातील शेतकऱ्यांनी केळी पिकाकडे वळले पाहिजे .सध्या विदर्भात अंजनगाव,अकोट, परतवाडा, चांदूरबाजार, वरूड, मोर्शी, संग्रामपूर,जळगाव जामोद, पवनार,आष्टी, शेलू, नागपूर, पुसद या भागात केळी लागवड सुरू झाली आहे.संत्रा पिकात विविध अडचणी येत आहेत.सोयाबीन,तुर,कापूस आदी पिके पाणी असूनही परवडत नाहीत. विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडून केळी लागवड कडे वळले पाहिजे.विदर्भातील खारपाण पट्ट्यातील जमिनीसाठी जैन हिल्सवर सब सर्फेस ड्रेनेज सिस्टीमचे प्रात्यक्षिक सादर केले आहे.यातून खारपाण पट्ट्यातील जमिनीत नवी क्रांती होवू शकते.ज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिक यातून एक नवी दिशा शेतकऱ्यांना देणारा हा कृषी महोत्सव आहे.डॉ.के.बी.पाटील असे भरभरून बोलत होते.

डॉ.बी. डी. जाडे नावाचे अनुभवी शास्त्रज्ञ दिवसभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात .ते सांगत होते की,शेतकऱ्यांचं काय चुकते हे शोधले पाहिजे.जमिनी विषयीचे अज्ञान दूर होणे आवश्यक आहे. Treat your farming as a business हा मूलमंत्र त्यांनी सांगितला.कोणत्या जमिनीत कोणते पीक येवू शकते याचे ज्ञान आवश्यक आहे. वडीलोपार्जित जमीन कसणे अन् स्वतः विकत घेवून कसणे यात फरक आहे.स्वतः जमीन विकत घेवून शेती केली तेव्हाच माणूस धडपड करतो हे सूत्र डॉ.जाडे यांनी सांगितले.विदर्भातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून मका पीक जर घेतले तर आर्थिक स्थिती उन्नत होईल असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.

या ठिकाणी एकाच छताखाली वेगवेगळ्या क्रांतिकारी प्रयोगांची मांडणी केली आहे. हायटेक शेतीचे मॉडेल उभे केले आहेत.तीस दिवस आधुनिक तंत्रज्ञान आणि चैतन्य याठिकाणी सळसळत होते.प्रवेश केला की पाइपने बनवलेली बैल गाडी लक्ष वेधून घेते.जैन इरिेगेशनची नाळ पाण्याच्या थेंबाशी अधिक जुळलेली आहे. इथे पाण्याचा प्रत्येक थेंब उपयोगात आणला आहे. ‘पाणी थेंबानं पीक जोमानं’ हे सूत्र त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.अत्यंत मजबूत अशा पाइपची त्यांनी निर्मिती केली आहे.वीस एम एम ते २५०० एम एम चा पाइप बनविणारी जैन ही आशिया खंडातील एकमेव कंपनी आहे.शंभर वर्षांची गॅरंटी असलेला २५०० एम एम ची पाइप लाईन चेन्नई मधील समुद्रात वापरण्यात आला आहे.समुद्राचे पाणी रिसायकल करण्यासाठी हा विशाल पाइप वापरण्यात आला आहे.

डोंगरावरून पाणी आणणे, ड्रेनेज पाइप, गॅस पाइप यासह शेतात सिंचनासाठी अनेक सुविधा त्यांनी दिल्या आहेत. सिंचनासाठी वेगवेगळे मॉडेल उभे केले आहेत.फॉगर सिस्टीम, रेनगन , ठिबक, स्प्रिंकलर यासह Sand filter , शेवाळ, मातीपासून मुक्त पाणी मिळावे यासाठीचे टेकनिक त्यांनी विकसित केले आहे.पोल्ट्री, गाईचा गोठा यासाठीचे फॉगर तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नाही. रात्रीचा वीज पुरवठा शेतकऱ्यांना देण्यात येतो.हा जीवघेणा प्रकार थांबला पाहिजे म्हणून सौर ऊर्जेवर सिंचन ही कल्पना या ठिकाणी प्रत्यक्षात उतरली आहे.अर्धा एचपी ते पाच एच पी ची मोटर सौर ऊर्जेवर चालवून ओलित व्यवस्थापन करता येते याचे मॉडेल त्यांनी विकसित केले आहे. २१०आणि ३०० फूट भागात सिंचन करता येईल अशी रेन गन याठिकाणी आहे.सिंचन, सौर ऊर्जा यासह विविध यंत्र सामुग्री विकसित करण्यात आल्या आहेत.ज्यामुळे शेतीवरील मजुरांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

अद्रक,हळद लागवड यंत्र, कोळपणी यंत्र, ऊस डोळा काढणी यंत्र, ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र, बटाटा काढणी यंत्र, मलचींग गाडणी यंत्र, खत मशीन, कांदा काढणी यंत्र यासह शेतात न जाताही घरून सिंचन पद्धतीचा अवलंब असे क्रांतिकारी प्रयोग जैन हिल्सवर आहेत.शेतकऱ्यांना एक नवी दिशा देणारी ही धडपड आहे. जैन हिल्सवर तीस दिवस चाललेला हा कृषी महोत्सव महोत्सव देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांच्या मनात चैतन्याचे झरे निर्माण करणारा होता.इथल्या मातीच्या प्रत्येक कणाकणात नवनिर्माणाची ओढ वसलेली आहे.इथे उभ्या असलेल्या पिकांच्या डोळ्यात शेतकरी जगला पाहिजे हे स्वप्न आहे.तंत्रज्ञान अन् आत्मविश्वास हातात हात घालून शेतीत राबू लागले तर शेतीतच सृजनाचा उत्सव साजरा करता येईल हा संदेश जैन हिल्स वरील कृषी महोत्सव देत होता . शेतीवरील विविध आक्रमणे परतवून लावण्यासाठी जैन हिल्स सज्ज झाली आहे. त्यासाठी विविध क्रांतिकारी प्रयोगांना त्यांनी जन्म दिला आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा हा जागर शेतीव्यवस्था बळकट करणारा आहे.

(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक आणि वेब पोर्टलचे कार्यकारी संपादक आहेत)

9623191923

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here