अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – सांस्कृतिक चळवळीची १० वर्षे 

– नम्रता फलके 

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट मोह्त्सवाचं आयोजन दिनांक १५ ते १९ जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजी नगर इथं करण्यात आलं आहे. यंदा हा चित्रपट महोत्सव आपल्या दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात सांस्कृतिक, सामाजिक जाणिवेचे संवेदनशील प्रेक्षक, निर्माते आणि कलाकार निर्माण व्हावे या उद्देशातून सुरू झालेली ही चित्रपट चळवळ आपल्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीत देशभरात एक महत्वाची सांस्कृतिक चळवळ म्हणून उदयास आली आहे. जगभरात पाहिले जात असलेले,  नावारूपास येत असलेले, आणि दिग्गज कलाकारांनी नटलेले उत्तम चित्रपट एकाच वेळी संभाजी नगरसारख्या छोट्या शहरात पहायला मिळत आहेत. यावर्षी देखील या चित्रपट महोत्सवात राज्य, राष्ट्र आणि जागतिक स्तरावरील एकूण ६५ चित्रपटांची मेजवानी असणार आहे.  यात ‘भारतीय सिनेमा’ स्पर्धे अंतर्गत नऊ चित्रपट दाखवले जाणार आहेत. अलीकडे भारतीय सिनेमा जगभरातील महत्वाच्या चित्रपट मोहत्सवांतून आपल्या उत्तम कथा, मांडणी आणि दिग्दर्शनाची छाप सोडत आहे.

व्हिलेज रॉकस्टार हा असामी भाषेतील चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार त्याला मिळाले होते. या चित्रपटाची कथा पुढे नेणारा दुसरा भाग यंदा अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे जानेवारीत असलेल्या या महोत्सवानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये ७५ व्या बर्लिन जागतिक चित्रपट महात्सवात सुद्धा तो दाखवला जाणार आहे. म्हणजेच सिनेमाच्या जागतिक धाग्याशी आपण जोडले जात आहोत. जागतिक स्तरावर ज्या सिनेमांची दखल घेतली जात आहे ते चित्रपट त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर सारख्या छोट्या शहरात उपलब्ध करून देण्यात या चित्रपट महोत्सवाचा फार मोठा वाटा आहे.  याशिवाय  ‘सेकंड चान्स’ हा हिंदी सिनेमा, ‘अंगमल’ हा तमिळ सिनेमा आणि ‘खेरवाल’ हा संथाली सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. एक नॉर्वेजीयन अभ्यासक एका संथाली गावात मरण पावतो. आपल्याला इथेच गाडलं जावं अशी त्याची शेवटची इच्छा असते. मात्र त्याच्या मुलाला नॉर्वे या देशात आपलं नशीब आजमावायचं असतं, अशी मुख्य धारा असलेला खेरवाल हा चित्रपट संथाली लोकांची भाषा, त्यांचं जगणं, त्यांची संस्कृती, त्यांचे सामाजिक नातेसंबंध या सर्वांवर प्रकाश  टाकतो.

अंगमल हा सिनेमा त्याच्या कथा सांगण्याच्या आणि विषयाच्या खोलात उतरण्याच्या वैविध्यपूर्ण कलेमुळे मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये गाजला होता. ९० च्या दशकात जेव्हा भारत खुल्या बाजार व्यवस्थेकडे पदार्पण करत होता त्यावेळी भारताच्या खेड्यात काय परिस्थिती होती? शहर आणि खेड्यांतील संस्कृतीमध्ये झालेले छुपे युद्ध, त्याचा खेड्यांच्या एकूण मनोवस्थेवर झालेला परिणाम यावर एका कौटुंबिक कलहाच्या माध्यमातून हा सिनेमा भाष्य करू पाहतो. व्यक्ती स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक ओळख यांच्यातल्या क्लिष्टतेवर भाष्य करणारा हा सिनेमा तामिळनाडूतील एका छोट्याशा गावातील आधुनिक तरुण आणि कथित ‘मागास’ कुटुंबातील कलहाची कथा सांगतो.

२०१० मध्ये आलेला पिपली लाईव्ह हा सिनेमा सरकारकडून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आत्महत्या करू पाहणाऱ्या नाथा नावाच्या शेतकऱ्याची कथा आहे. चित्रपटाच्या शेवटी हा नाथा शहरात एका इमारतीच्या बांधकामावर खडी फोडताना दिसतो. या शेवटाच्या अगदी विपरीत असा चित्रपट म्हणजे ‘इन द बेली ऑफ अ टायगर’ हा चित्रपट. शहरात काम नाही म्हणून खेड्यात परतलेल्या एका कुटुंबाची ही कथा. मात्र खेड्यात सुद्धा दयनीय अवस्था असल्याने कुटुंबाच्या उपजीविकेसाठी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकार देत असलेली नुकसान भरपाई मिळविण्यासाठी ‘शिकार’ होण्यासाठी तयार झालेला पुरुष, त्याची घालमेल, तो दिवस जवळ येत असताना त्याला येणारे विचित्र अनुभव यांचं उत्तम चित्रण करणारा हा सिनेमा आहे.

याशिवाय शांती निकेतन(हिंदी), स्वाहा (मागही) छबिला आणि खडमोड (मराठी) हे चित्रपट यावर्षी अजंता वेरूळ चित्रपटांत दाखविले जाणार आहेत. ऑक्टोपस सारखी वाढणारी शहरं आणि विकासा अभावी कोरडी पडत जाणारी शहरं, खेड्यांतील संसाधनाची, निसर्गाची होणारी लूट, तेथील सामान्य माणसाचं जगणं या सर्वांवर अत्यंत कलात्मक पद्धतीने भाष्य करणारे हे सिनेमे आहेत.

चित्रपट महोत्सवातील चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाहीत तर त्यांना समाजाच्या विविध पैलूंची ओळख करून देतात. जगभरातील विविध संस्कृती, त्यांचं जगणं, त्यांचा संघर्ष आदींची ओळख करून देणारी ती एक चळवळ असते. ही चळवळ माणसांच्या उत्क्रांतीचा महत्वपूर्ण भाग आहे. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव मागील ९ वर्षांपासून सातत्याने ‘हे विश्वची माझे घर’ या ब्रीदाला अनुसरून छत्रपती संभाजीनगर या शहराला जगाच्या मुख्य सांस्कृतिक चळवळींशी सिनेमाद्वारे जोडण्यात यशस्वी झाली आहे, हे निश्चितपणे सांगता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here