
माझ्या पिढीने १९८०च्या दशकाच्या अगदी सुरुवातीला म्हणजे ८०-८१ साली माझ्या पिढीनं पत्रकारितेला सुरुवात केली . तेव्हा पत्रकारितेला फारसं काही सांस्कृतिक भान नव्हतं . सांस्कृतिक कार्यक्रमाचे वृत्तसंकलन म्हणजे फार फार तर पुस्तक प्रकाशनाच्या बातम्या आणि धनवटे नाट्य मंदिरात ( त्या जागेवर विदर्भ साहित्य संघाची नवी अर्धवट वास्तू आता उभी आहे ) सादर होणाऱ्या राज्य नाट्यस्पर्धेत सादर होणाऱ्या प्रयोगाचे परीक्षण ; असा समज दृढ आणि सार्वत्रिक होता . सांस्कृतिकता म्हणजे यापेक्षा इतर काही कला असतात आणि त्या कशासोबत खायच्या असतात याबद्दल पत्रकार जमात फारशी काही जागरुक नव्हती . शिवाय मीडिया म्हणजे केवळ आकाशवाणी व मुद्रीत माध्यमे , म्हणजे वृत्तपत्रे होती . त्यात बातम्या , राजकीय लेख , पुस्तक समीक्षण , कथा-कविता यांना अग्रहक्काचं तसंच प्रभावशाली स्थान होते . त्यात मुद्रीत माध्यम रंगीत नव्हते त्यामुळे रंगभान असणं मुळीच गरजेचे नव्हते . विजय फणशीकर , वामन तेलंग असा एखाद-दुसरा पत्रकार वगळता कला वृत्तसंकलन हे स्पेशलायझेशन आहे हे माहिती नव्हते . अन्य कला हे कलाविषयक नियतकालिकांचे आणि त्यांच्या मर्यादित वाचकांपुरते हे उपक्रम आहेत , समज तेव्हा होता .