भाजपच्या डोळ्यांतलं  घराणेशाहीचं मुसळ !

प्रवीण बर्दापूरकर

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ‘घराणेशाहीपासून मुक्ती’ हा प्रकाशित झालेला लेख ‘दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण , स्वत:च्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही ’ , ही म्हण सार्थ ठरवणारा आहे. केशव उपाध्ये जुने मित्र आहेत  ते , गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू म्हणून . पण , आता त्यांचं दैवत नरेंद्र मोदी झालेले आहेत , असं या लेखातून दिसतंय . एखाद्या भक्तानं मनोभावे आरती ओवाळत दैवताची पूजा बांधावी तशीच पूजा , हा लेख लिहितांना केशव उपाध्ये यांनी बांधल्यानं त्यांच्या सर्व निष्ठा त्यांचे स्वामी नरेंद्र मोदी यांच्या चरणी रुजू झालेल्या आहेत , यात काही शंकाच नाही . या लेखात नरेंद्र मोदी यांना ‘कोट’ करण्यात आलेलं आहे आणि शेवटी शिवसेनेलाही चिमटे काढण्यात आले आहेत . केशव उपाध्ये म्हणतात, ‘लोकशाही समोरील सर्वांत मोठा धोका असलेल्या घराणेशाहीपासून ती वाचवणे, हे पंतप्रधान मोदी यांचे पहिले ध्येय आहे . ( ‘लोकशाही घराणेशाहीच्या धोक्यापासून वाचवणे, हे मोदी यांचे पहिले ध्येय आहे’ , असं हे वाक्य सुटसुटीत लिहिता आलं असतं पण , ते असो ! ) लोकशाही घराणेशाहीच्या कचाट्यातून मुक्त झाली तर सामान्य जनताही या प्रयत्नांना दुवा देईल…’ नरेंद्र मोदी यांनी हे म्हटलं आहे आणि पक्षाचा प्रवक्ता तो पुन्हा सांगतो आहे . याचा अर्थ तो कार्यकर्त्यांना दिलेला संदेशच आहे पण , हा संदेश ‘स्वत:चं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ असा प्रकार आहे .

घराणेशाही हे आपल्या देशातील राजकारणाचं सर्वपक्षीय व्यवच्छेदक लक्षणं आहे तरी प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षातल्या घराणेशाहीवर मानभावीपणे टीका करत असतात . भाजप सध्या राज्यात ज्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आहे त्या माजी मुख्य आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव महाराष्ट्र विधान परिषद सदस्य होते . देवेंद्र यांच्या काकू शोभाताई फडणवीस प्रदीर्घ काळ आमदार आणि १९९५मधे राज्यात सत्तारुढ झालेल्या सरकारात मंत्रीही होत्या . भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात ज्यांनी खोलवर रुजवला असं समजलं जातं त्यात गोपीनाथ मुंडे यांचं नाव अग्रस्थानी आहे . त्याच मुंडे यांचीही घराणेशाही भारतीय जनता पक्षात आहे . पक्षाच्या राष्ट्रीय सचिव , पक्षाचा मध्यप्रदेशचा कार्यभार असलेल्या , ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ आहोत असा दावा केलेल्या , गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आमदार होत्या आणि राज्यातील भाजपाच्या सरकारात एक प्रभावी मंत्रीही होत्या . त्यांची बहीण डॉ . प्रीतम सलग दुसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार म्हणून विजयी झालेल्या आहेत .

भाजपचे एकेकाळचे दिग्गज एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत गेले असले तरी एकनाथराव भाजप-सेना मंत्रिमंडळात दोन्ही वेळा मंत्री होते ; विधानसभेत ते विरोधी पक्ष म्हणून वावरले तेव्हाही भाजपतच होते . ते भाजपत असतांनाच त्यांच्या सूनबाई रक्षा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्या   लोकसभा  निवडणुकीत  विजयी झाल्या . भाजपनं एकनाथ खडसे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली  ( त्यामुळे तर ते पक्षावर जास्तच नाराज झाले ) पण , त्यांच्या कन्येला पक्षानं उमेदवारी दिली . ‘दाजी’ या नावानं ओळखले जाणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही त्यांच्या पुत्राला राजकारणात आणून पक्षांतर्गत विरोधकांच्या नाकावर टिच्चून विधानसभेची उमेदवारी मिळवून दिली आणि विजयी करुन दाखवलेलं आहे . भारतीय जनता पक्षातील राष्ट्रीय  स्तरावरील  ‘हेवी वेट’ प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यावर त्यांची कन्या पूनम महाजन-राव यांना उमेदवारी देणं ही राजकीय घराणेशाहीच आहे . त्या  उत्तर- मध्य मुंबई मतदार संघातून सलग दुसऱ्यांदा लोकसभेवर विजयी झाल्या आहेत . पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या शाखांवरही त्यांनी काम केलेलं आहे . विद्यमान कॅबिनेट मंत्री विजय गावित यांची कन्या हिना (नंदुरबार) आणि भाऊ राजेंद्र (पालघर ) हे दोघेही भाजपचे  खासदार आहेत . पक्षाची तिजोरी प्रदीर्घ काळ सांभाळलेले वेदप्रकाश गोयल आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र पियुष गोयल हे दोघेही भाजपचे खासदार म्हणून वावरले . पियूष गोयल तर २०१४ पासून केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत .

‘येन केन’ मार्गानं अन्य पक्षातून लोकांना  ओढून पक्ष बळकट करण्यात भाजप माहीर आहे . ( अन्य पक्षातून भाजपत आलेल्या अशा लोकांना मी परोपजीवी जंतू -Ectoparasite म्हणतो ! ) शिवसेना ते भाजप मार्गे काँग्रेस असा प्रवास झालेले  नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यांचे पुत्र नीतेश आमदार आहेत . काँग्रेस-राष्ट्रवादी-काँग्रेस असं तळ्यात मळ्यात करुन दत्ता मेघे भाजपत आल्यावर त्यांचे पुत्र सागर आणि समीर या दोघांनाही भाजपनं उदार हस्ते आमदारकी बहाल केली . कॉँग्रेस-शिवसेना-कॉँग्रेस असं प्रवास करुन भाजपवासी झालेले राधाकृष्ण पाटील राज्यात नुकतेच कॅबिनेट मंत्री झाले आहेत तर त्यांचे पुत्र डॉ . सुजय  लोकसभेचे सदस्य आहेत . अशा अनेक ‘परोपजीवीं’ची  घराणेशाही आता भाजपत विलीन आणि पावन झाली आहे !

भाजपतील घराणेशाही केवळ महाराष्ट्रातच घडलेली आहे असं नाही . उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महंत अवैद्यनाथ यांचे वारसदार आहेत . देशाचे विद्यमान संरक्षण मंत्री आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह सलग दुसऱ्यांदा आमदार आणि मंत्री आहेत . छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक, हिमाचलचे माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे पुत्र अनुराग ठाकूर सलग तिसऱ्यांदा खासदार आणि दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र पर्वेश खासदार आहेत . याशिवाय कर्नाटकात बी. एस. एडियुरप्पा आणि बी. वाय. राघवेंद्र , मनेका गांधी आणि वरुण गांधी, सी. लाल गोयल आणि विजय गोयल, व्ही. के. मल्होत्रा आणि ए. के मल्होत्रा ,  सुंदरलाल पटवा आणि त्यांचे बंधू , के. विजयवर्गीय आणि ए. विजयवर्गीय अशी कितीतरी भाजपतील घराणेशाहीची उदाहरणे देता येतील .

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना आणि उभारणीत राजमाता या नावाने ओळखल्या गेलेल्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या वसुंधराराजे राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या . वसुंधराराजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह खासदार होते . वसुंधराराजे यांची बहीण यशोधरा राजे याही मंत्री होत्या . विजयाराजे शिंदे यांच्याच कुटुंबातील ( काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र ) ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसचा त्याग करुन आणि मध्यप्रदेशात काँग्रेसला खिंडार पाडून नुसतेच भाजपत आलेले नाहीत तर काँग्रेसचं मध्यप्रदेशातलं सरकार घालवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली . ज्योतिरादित्य सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत .

वर दिलेली सर्व उदाहरणे घराणेशाहीची आणि भारतीय जनता पक्षातीलच आहेत. ती जर घराणेशाही नाही असं कुणाला ( म्हणजे भाजप समर्थक )  वाटतं असेलच तर ते सर्व ‘भाजपत घराणेशाही नाही’ या गोडगैरसमजाच्या ढगात आत्ममश्गुल विहार करत आहेत असंच म्हणायला हवं  !

एका अहवालानुसार उत्तरप्रदेशमधले भाजपचे ७१ पैकी १२ , बिहारमधले  २२ पैकी ५ , गुजरात आणि राजस्थानमधले प्रत्येकी ३ खासदार राजकीय घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करतात. केंद्रीय मंत्रिमंडळातही १५ मंत्री राजकीय घराणेशाहीचे वारसदार आहेत.

वरील सर्व माहिती आणखी वाढवता येईल कारण प्रत्येक राज्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य मतदार संघातील भाजपच्या राजकीय घराणेशाहीचे तपशील मिळवणं शक्य झालेलं नाही . ही सर्व माहिती लक्षात घेता अन्य पक्षांतल्या घराणेशाहीमुले लोकशाहीला धोका आहे आणि भाजपतील घराणेशाही मात्र लोकशाहीला पोषक आहे , अशी टीका करणं  हा शुद्ध ढोंगीपणा आहे . आपल्याच पक्षातील या घराणेशाहीची माहिती नसणाऱ्या आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते पद भूषवणाऱ्या केशव उपाध्ये यांना एक तर विस्मृतीचा रोग झाला असावा किंवा ती माहिती त्यांना नाही , असं सोंग तरी ते वठवत असावे . पक्षाच्या प्रवक्त्यानं पक्षाची भूमिका (अंध)आवेश आणि हिरिरीनं मांडावी यात गैर काही नाही पण , अपूर्ण माहितीच्या आधारे बोलू नये , याचा विसर काँग्रेस पक्षाच्या घराणेशाहीवर टीका करताना केशव उपाध्ये आणि त्यांच्या ‘स्वामीं’ना पडला आहे  .

राजकीय पक्षांमधील घराणेशाहीला कितीही विरोध असला तरी राजकारणाचा बदलेला बाज लक्षात घेता आणि देशाच्या राजकारणात जी काही सर्व पक्षीय घराणी आता स्थिरावलेली आहेत ती , अचानक कुणाच्या तरी मनात आलं म्हणून उखडून टाकता येणार नाहीत . घराणेशाहीची लागण सर्वपक्षीय आणि राष्ट्रीय आहे हे लक्षात घेऊन आपल्याही  डोळ्यांत घराणेशाहीचं मुसळ आहे याचा विसर भाजपनं पडू देता कामा नये .

( चित्र – विवेक रानडे )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleआभाळाच्या उंचीचा माणूस : आचार्य अत्रे
Next articleअळीमिळी गुपचिळी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here