अळीमिळी गुपचिळी

-डॉ. मुकुंद कुळे

एका विद्यार्थिनीला मासिक पाळीत वृक्षारोपणास मनाई करण्यात आल्याची नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घटना काही दिवसांपूर्वी भलतीच गाजली होती. संपूर्ण राज्यभरातून या घटनेच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेची चौकशी करून संबंधित शिक्षकावर त्वरित कारवाई करण्याचे सरकारी आदेशही निघाले. परंतु प्रत्यक्ष चौकशीत असं काही घडलंच नसल्याचं कळलं. वर्गात सतत गैरहजर राहिल्यामुळे शिक्षक ओरडतील आणि आपल्याला शिक्षा करतील, या भीतीतून त्या मुलीनेच शिक्षकाच्या विरोधात कुभांड रचल्याचं समोर आलं. परिणामी या प्रकरणातील हवाच निघून गेली आणि सर्व स्तरावर सगळं काही शांत शांत झालं. जणू काही मासिक पाळी आणि त्या काळात महिलांना देण्यात येणारी निंदनीय वागणूक हा आपल्याकडे कधी वादाचा-चर्चेचा विषयच नव्हता. प्रत्यक्षात स्त्रियांची मासिक पाळी हा आजही अनेकांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही अतिशय घृणेचा विषय आहे. समाजाच्या मानसिकतेत मासिक पाळीच्या संदर्भात जर सकारात्मक बदल झालेला असता, तर कदाचित त्या आदिवासी मुलीने खोटंनाटं का होईना मासिक पाळीचं कारण सांगितलंच नसतं. मात्र तसं न करता ज्याअर्थी तिने बिनदिक्कत- ‘ज्या मुलींना मासिक पाळी असेल, त्यांनी वृक्षारोपण करू नका. त्यांनी लावलेलं झाड जगणार नाही,’ अशी सूचना शिक्षकांनी केल्याचं खोटंच सांगितलं, त्याअर्थी महिलांच्या मासिक पाळीकडे आजही आपला समाज मोकळेपणाने बघत नाही, हे तिला पुरतं ठाऊक होतं. म्हणूनच तिने मासिक पाळीचं भांडवल केलं आणि खरंतर तोच चिंतेचा विषय आहे; शिक्षकांनी तशी सूचना खरोखरच केली होती किंवा नाही, हा नाही!

खरं तर मासिक पाळी हा स्त्रियांचा निसर्गधर्म आहे आणि दर महिन्याला येणारा तो सर्जनाचा उत्सवही आहे. अर्थात हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक महिन्याला स्त्रीला तना-मनाचा स्वाहाकार करावा लागतो हे खरंच. तिची इच्छा असो वा नसो, निसर्गाचा हा नेम काही चुकत नाही. जेव्हा तिच्या शरीरातून या चार दिवसांत लाल-काळा-निळा स्राव वाहून जातो, तेव्हाच तिच्या ओटीपोटात सर्जनाची लाख फुलं उमलतात. फळधारणेसाठी आसुसतात. याचाच अर्थ स्त्रियांचा ऋतुस्राव म्हणजे काही स्त्रीला अस्पर्श्य-अपवित्र करणारा घटक नाही. उलट पुरामुळे नदी जशी अंतर्बाह्य घुसळून निघते, तिचं पाणी गढूळ होतं; मात्र कालांतराने तेच पाणी निवळल्यावर नदी आरस्पानी जीवनदायिनी होते. ऋतुस्रावही तसाच जीवजन्माचं दान देणारा आणि म्हणूनच पवित्र नि सर्जनशील!

…तरीही अगदी आदिमकाळापासूनच मानवाला या ऋतुस्रावाचं भय वाटत आलेलं आहे. निसर्गाची कोडी न सुटलेल्या त्या आदिम काळात, स्त्रीच्या जांघेतून अचानक वाहू लागणाऱ्या या लाल-काळ्या-निळ्या स्रावाचं त्यालादेखील सर्वप्रथम भयच वाटलं. केवळ स्रावाचंच नाही, तर हा स्राव आणि तो स्राव धारण करणाऱ्या स्त्रीविषयीदेखील तो भयकंपित झाला. काही तरी अद्भुत निसर्गतत्त्व या स्रावाच्या ठिकाणी आहे हे त्याने जाणलं आणि म्हणूनच आदिम काळातील अनेक यात्वात्मक (जादूटोण्यासदृश्य) क्रियांमध्ये स्त्रियांच्या मासिकधर्मातील स्रावाचा समावेश आहे. त्यांच्यासाठी स्त्रीदेहातून वाहणारा हा लाल-काळा-निळा स्राव म्हणजे एकाच वेळी तारक आणि मारक अशा दोन्ही शक्ती असलेला चैतन्यतत्त्व होता. यामुळेच तर आदिमानवकालीन पुरुष स्त्रीपुढे कायम दबलेलाच राहिला.

नंतरच्या मानवी विकसनाच्या प्रक्रियेत मात्र मानवाला निसर्गाची कोडी सुटत गेली. त्यातही पुरुषाला निसर्गतः आपल्या ठायी असलेल्या शक्तीची जाणीव झाली आणि मुख्य म्हणजे त्याने अनुभवाने बीज-क्षेत्र न्याय प्रस्थापित केला. म्हणजेच स्त्रीचं गर्भाशय हे क्षेत्र म्हणजे जमीन असून जर आपण त्यात आपलं (पुरुषाचं) बीज पेरलं नाही, तर त्यातून काही उगवणारच नाही याची त्याला जाणीव झाली आणि एकप्रकारे तो स्त्रीला दुय्यम लेखू लागला; केवळ स्त्रीलाच नाही तर ज्यामुळे गर्भधारणेसाठी आवश्यक अशी भूमी तयार होते, त्या ऋतुस्रावालादेखील. विशेष म्हणजे केवळ दुय्यमत्व देऊन तो थांबला नाही. तर त्याने हा ऋतुस्राव म्हणजे नरकातली (आता तो नरक कुणी पाहिलाय कोण जाणे) घाण मानली. सर्जनशील असलेल्या स्रावाला तो विटाळ मानू लागला आणि त्या मासिकधर्माच्या काळातील स्त्रीला त्याने अस्पर्श्य-अपवित्र ठरवली. केवळ पुरुषांनीच लिहिलेल्या आपल्या धर्मग्रंथांनीही तेच प्रमाण मानलं आणि सांगितलंही. परिणामी तेच परंपरेचं जोखड आपण अद्याप आपल्या खांद्यावर वागवत आहोत.

हे जोखड आपल्या खांद्यावरून आपण आता तरी उतरवलंय का? तर याचं उत्तर शंभर टक्के हो कधीच येणार नाही. कारण कसलाही आगापिछा ठाऊक नसलेला परंपरेचा गाडा जसाच्या तसा खांद्यावर वागवायला आपल्याला आवडत असतं. आजही देशभरातील विविध मंदिरांत स्त्रियांना मासिकधर्माच्या काळात प्रवेश दिला जात नाही. शुभकार्यप्रसंगी त्यांचा वावर निषिद्ध मानला जातो. अगदी एखाद्या बहरलेल्या झाडाला स्पर्श करायलाही त्यांना मासिक पाळीच्या काळात बंदी घातली जाते. मग शनी शिंगणापूरच्या शनीच्या ओट्यावर चढण्यास स्त्रियांना बंदी, म्हणून स्त्रियांनाच आंदोलन करावं लागतं. एवढंच कशाला दिवंगत कवयित्री-लेखिका शांताबाई शेळके आळंदीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या, तेव्हा आळंदीतील प्रसिद्ध अजानवृक्षाच्या ओट्यावर पुरुषांप्रमाणेच बसून पोथी वाचायला मिळावी म्हणून महिलांना आंदोलन करावं लागलं होतं. तेव्हा कुठे महिलांना त्या ओट्यावर चढण्याची आणि तिथे पोथी वाचण्याची संधी मिळाली होती. महिलांना ती मुभा अजून आहे की नाही ठाऊक नाही. कारण एखाद्या चुकीच्या प्रथेच्या विरोधात आवाज उठवला, आंदोलन केलं की अनेकदा तेवढ्यापुरती मुभा दिली जाते. मात्र आंदोलनाचा आवाज शांत झाला, आंदोलनकर्त्यांची पाठ फिरली की पुन्हा जैसे थे सुरू राहतं.

भारतीयांची एक गंमत बघा, एकीकडे मुलीला मासिक पाळी सुरू झाली की ती स्त्री झाली, वयात आली म्हणून सोहळे-उत्सव केले जातात. मुलीला सजवून, झोपाळ्यावर बसवून अगदी तिची साग्रसंगीत ओटी भरली जाते. कुणाला ते पूर्वीचे मुलगी ऋतुमती झाल्याचे सोहळे पाहून किंवा तेव्हाची वर्णनं वाचून वाटावं, की किती तो स्त्रीचा आणि तिच्या मातृत्वशक्तीचा सन्मान. पण प्रत्यक्षात तो सन्मान असतो तिच्या प्रसवा होण्याचा; ती आता मूल जन्माला घालू शकणार याचा. तिच्या स्त्रीत्वाचा, मातृत्वाचा वा सर्जनशीलतेचा नाही! अन्यथा याच समाजाने स्त्रीच्या मासिक पाळीचा आणि ऋतुस्रावाचा सन्मान नसता का केला?

हा सन्मान स्त्रीच्या आणि तिच्या मासिक पाळीच्या वाट्याला अजून आलेला नाही. आता काळाच्या ओघात स्त्रिया शिकल्यात, वेगवेगळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजवतायत, प्रसंगी पुरुषालाही मागे टाकून पुढे धावतायत. परिणामी त्यांचं त्यांनीच आपल्या मासिक पाळीचा बाऊ करणं आता सोडून दिलंय. म्हणजे त्या चार दिवसांत त्यांना दुखतं-खुपतंच. त्या काळात जरा निवांतपणा मिळाला तर त्यांना तो हवाही असतो. पण म्हणून त्या काही घरी बसत नाहीत. तसंही पूर्वी ज्या कष्टकरी महिला होत्या, त्या कधीच मासिक पाळीच्या दिवसांत घरी थांबलेल्या-बसलेल्या नव्हत्या. हातावर पोट म्हटलं की त्यांना त्या मासिकधर्माच्या काळातही शेतात-रानावनात जावंच लागायचं. कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नसतानाच्या त्या काळात या महिला या मासिक शरीरधर्माला कशा सामोऱ्या गेल्या असतील कोण जाणे!

आता काळ बदललाय खरं, पण मासिक पाळीबद्दलची समाजाची मानसिकता बदललीय का? ती जर खरोखरच बदलली असती तर, खोटं म्हणून का होईना पण मासिक पाळीचं कारण पुढे करण्याची पाळी त्या मुलीवर कदाचित आलीच नसती. म्हणजेच अजूनही पाळीबद्दल अळीमिळी गुपचिळीच आहे!

(साभार : दैनिक पुण्यनगरी)

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleभाजपच्या डोळ्यांतलं  घराणेशाहीचं मुसळ !
Next articleसुन सायबा सुन
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.