–नीलांबरी जोशी
“स्वत:ची ओळख करुन द्या..” असं जेव्हा एखाद्या ग्रुपमध्ये सांगितलं जातं तेव्हा बरेचजण कावरेबावरे होतात. “काय सांगायचं स्वत:बद्दल” असा काही जणांना प्रश्न पडतो. काहीजणांना मात्र “स्वत:बद्दल किती सांगू आणि किती नको” असं होऊन जातं. साधारण चौथीतल्या स्कॉलरशिपपासून सुरुवात होते.
पण मुळात अशी स्वत:ची ओळख करुन देण्याचे प्रसंग सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोशल मीडियाच्या आधी कितीवेळा येत होते?
***********
सोशल मीडियावर मात्र प्रत्येकक्षणी आपली काहीतरी ओळख दाखवून द्यावी लागते. याचा पगडा हातात मोबाईल घेऊनच जन्माला आलेल्या टीनएजर्सवर सर्वात जास्त असतो. पोस्टस, फोटो, व्हिडिओ, इतरांच्या पोस्टला कॉमेंट असं काही ना काही सोशल मिडियावर २४x७ टाकलं नाही तर मित्रमैत्रिणी आपल्याला विसरतील अशी त्यांना भीती वाटते. मित्रांनी टाकले तसे, आपापल्या आयुष्यातल्या सगळ्या क्षणांचे फोटो टाकल्याशिवाय आपलं अस्तित्व सिध्द होणार नाही असं त्यांना ठाम वाटतं. सोशल मीडियावरच्या ग्रुप्सवर ते peer pressure मुळे सक्रिय रहायला लागतात.
सतत आरडाओरडा करुन, रंगीबेरंगी कपड्यात, तारस्वरात, असभ्य भाषा वापरत आपलं अस्तित्व सोशल मीडियावर जे लोक जास्तीत जास्त मांडू शकतात ते भराभर फॉलोअर्स मिळवतात. सोशल मीडियावरच्या मेजर influencers ना ज्या जाहिरात कंपन्या approach होतात त्यांची लोकप्रियता (आणि पॅकेज..) फॉलोअर्सच्या संख्येवर ठरते. (Social media influencers चे प्रकार आणि मार्केटिंग हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.) आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्यामोठ्या घटनांचं जास्तीत जास्त उघडंवाघडं प्रदर्शन आणि भांडवल करणाऱ्या लोकांचे फॉलोअर्स भराभर वाढायला लागलेले टीनएजर्सना दिसत असतात. असं करणारे लोक रोल मॉडेल्स म्हणून टीनएजर्ससाठी आदर्श ठरायला लागतात.
“हिंदुस्तानी भाऊ” प्रकरण हा अशा रोल मॉडेलचा एक प्रकार आहे.
असे लोक टीनएजर्सना रोल मॉडेल का वाटायला लागले?
***************
खरं तर सेलिब्रिटी किंवा इतर कोणाला रोल मॉडेल मानणं, त्यांचे आदर्श बाळगणं ही संकल्पना मानवजातीला नवीन खचितच नाही. धूसर संकल्पना, गुंतागुंतीच्या थिअरीज समजून घेण्यासाठी आपण आपल्या आदर्शांकडे कायम आशेनं पहात आलो आहोतच. जगातल्या जवळपास प्रत्येक संस्कृतींमध्ये, धर्मांमध्ये आदर्श देवीदेवता, संत आहेत. त्यांची भक्तीही केली जाते.
रेडिओ आणि चित्रपट या माध्यमांनंतर मास कल्चर निर्माण झालं आणि सेलिब्रिटींची भक्ती हा प्रकार सुरु झाला. पडद्यावरच्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडणं सहजी समाजात रुजलं. एरवी सामान्य माणूस असणारे सेलिब्रिटी यशाची प्रतीकं बनले आणि सामान्य माणसाला दुरावले. या सेलिब्रिटींबद्दल जितकी बरीवाईट माहिती कळत जाते तितके त्यांचे भक्त वाढत जातात हा ट्रेंड होताच.
पण एका अनोळखी व्यक्तीच्या आयुष्याबद्दल इतकी माहिती आपण का गोळा करतो? का साठवतो ? याचं उत्तर फिलीप कुशमॅन या मानसशास्त्रज्ञानं empty self या संकल्पनेतून दिलं आहे. भोवतालच्या समाजापासून एकटं पडल्याची जाणीव, त्यातून वाढलेला एकाकीपणा आणि एकाकीपणामुळे खालावलेला आत्मविश्वास अशा टप्प्यांमधून माणूस विसाव्या शतकात झपाट्यानं प्रवास करायला लागला. हा एकाकीपणा शब्दांत मांडता येत नव्हता, पण पोकळी वाढत होती. ती पोकळी सेलिब्रिटींबरोबर आभासी नातं जोडायच्या प्रयत्नानं भरुन काढायच्या मागे आपण लागलो.
*********
दुसरं कारण म्हणजे, आपलं या क्षणी असलेलं व्यक्तिमत्व आणि आपण आयुष्यात काय बनू शकतो त्याचं एक भासमान व्यक्तिमत्व अशी दोन व्यक्तिमत्वं आपल्या मनात कायम असतात. “आपण काय बनू शकतो” यातले विचार सहसा आदर्शवादी असतात. तसं होऊ शकत नाही हे आपल्याला कुठेतरी पक्कं ठाऊक असतं.
सोशल मीडियानं आपल्याला अशा आदर्श “स्व”ला कवटाळण्याची मुभा दिली. एकही डाग नसलेलं, स्वच्छ , चकचकीत असं आपलं व्यक्तिमत्व लोकांसमोर मांडायला आपण आता सतत तयार असतो. याचा परिणाम म्हणून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करावी तसं आपण स्वत:ला देखणं, आदर्श असं सोशल मीडियावर सादर करतो. आता आपण प्रत्येकजण आपापल्या आयुष्याचे सेलिब्रिटी झालो आहोत. थोडक्यात, आयुष्य चव्हाट्यावर मांडत रहाणं आणि कायम सोशल मीडियावर पडीक रहाणं हे न्यू नॉर्मल झालं आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष जगातले रोल मॉडेल्स म्हणजे काय हे टीनएजर्सना आता ठाऊकच नाही. त्यांचे रोल मॉडेल्स आॉनलाईन दुनिेयेतलेच आहेत. सगळ्याच टीनएजर्ससाठी जो कोणी आदर्श असेल तो जवळपास परिपूर्ण असतो. त्याच्यात कमीत कमी सुपरमॅनचे गुणधर्म असतात. मग टीनएजर्स त्यांच्या पावलावर पाऊल टाकून स्वत:ही रोल मॉडेल बनू पहातात.
*******
आत्ता पन्नाशीला असलेल्या पिढीच्या काळात स्पर्धा घरातल्या काही भावंडांबरोबर आणि फारतर वर्गातल्या विद्यार्थ्यांबरोबर असायची.
आज जगाची लोकसंख्या सुमारे ७०० कोटी आहे. त्यापैकी ४५ टक्के म्हणजे ३४० कोटी लोक सोशल मीडियावर आहेत. आत्ताच्या पिढीला स्वत:ला प्रूव्ह करायचं असेल तर त्यांच्यासाठी फक्त व्हर्च्युअल जगच खरं आहे. ते सायबरदुनियेचे रहिवासी आहेत. त्या जगात समोर न दिसणारे पण सोशल मीडियावरचे ३४० कोटी लोक आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करुन स्वत:चं अस्तित्व २४ x 7 x ३६५ सिध्द करत रहाण्याचा त्यांना किती ताण येत असेल याचा आपण विचारही करु शकत नाही…!
(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)
[email protected]
………………………………………………………………………………………….
वास्तववादी लेख.