कळे न हा चेहरा कुणाचा ?

‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२१

नीलांबरी जोशी

आज जगात 21 कोटी लोकांना इंटरनेटचं व्यसन आहे. कोरोना साथीच्या काळात इंटरनेटवर वेळ घालवण्याचं प्रमाण 60 टक्क्यांनी वाढलं आहे. 10 पैकी आठ नेत्रतज्ञ स्क्रीनचा निळा रंग केवळ डोळेच नव्हे तर सर्वसाधारणपणे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची हानी करतो आहे, हे मान्य करतात. 77 टक्के नोकरदार आपल्यावर स्क्रीन टाईममुळे होणार्या परिणामांबद्दल कंपनीकडे नुकसानभरपाई मागत आहेत. स्क्रीन टाईमचा वेळ कमी केला तर झोपेत सुधारणा होणं, मूड चांगला रहाणं, डोळे आणि दृष्टी यांच्या आरोग्यात सुधारणा होणं असे अनेक सकारात्मक बदल प्रयोगांमध्ये दिसून आले आहेत. पण मुळात स्क्रीन टाईम वाढल्यानं झोप येणं हे का चालू होतं?

00000000000000

     तुम्हाला ते चित्र आठवतंय? काळ्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या रंगाच्या फुलदाणीचं. त्यात तुम्हाला फुलदाणी दिसते का तिच्या भोवतीचे दोन चेहरे दिसतात? असा प्रश्न विचारला जातो. मधल्या भागातली फुलदाणी ही फिगर आणि दोन चेहरे हे ग्राऊंड, असा विचार करुन या प्रकाराला ‘फिगर अँड ग्राऊंड’ असं म्हटलं जातं.

     या संकल्पनेचा जनक होता डॅनिश मानसशास्त्रज्ञ एडगर रुबेन. मेंदू समोरचं चित्र कशा प्रकारे ओळखतो, नंतर ते स्मृतीतून कशा प्रकारे आठवतो, हे जाणून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ आता ‘फिगर अँड ग्राऊंड’ या संकल्पनेचा उपयोग करतात. या संकल्पनेतली गंमत म्हणजे, समोरच्या प्रतिमेत एखाद्या माणसाला काय दिसेल, ते परिस्थितीनुसार, संस्कृतीनुसार बदलतं.

     उदाहरणार्थ,कुरणात चरणारी मेंढी असं चित्र दाखवलं, तर पाश्विमात्य लोकांना त्यात मेंढी प्रथम दिसते, तर पौर्वात्य लोकांना चित्रातलं कुरण आधी दिसतं, असं संशोधन सांगतं. ज्यांना आधी मेंढी म्हणजे फिगर दिसते, त्यांना मागच्या कुरणाच्या रंगात, गवताच्या दाटपणात- ग्राऊंडमध्ये काही फरक झाला, तरीही लक्षात येत नाही.

     ज्यांना आधी कुरण – ग्राऊंड दिसतं, त्यांना कोणता प्राणी चरत होता – म्हणजे फिगर काय होती, तेदेखील पटकन लक्षात येत नाही.

   एकूण काय, तर तुम्हाला समोरच्या प्रतिमेत आधी काय दिसतं, ते चांगलं का वाईट, चूक का बरोबर असा प्रश्न नसतोच. याचा मथितार्थ एकच असतो, ते म्हणजे तुमच्या जाणिवेत काहीतरी अपूर्ण राहिलं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या खेळाडूला फक्त आपण स्वत: दिसत असू, तर त्याला/तिला टीमचं महत्त्व लक्षात येत नाही. यात तो खेळाडू म्हणजे फिगर आणि टीम म्हणजे ग्राऊंड.

     एखाद्या कंपनीतला अधिकारी जर प्रत्येक माणसाकडे कंपनी चालवणारा एक कामगार म्हणून पाहात असेल, तर त्या माणसाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, त्याचे गुण या गोष्टींना तो महत्त्व देत नाही. इथे फक्त ग्राऊंडला महत्त्व दिलं जातंय… फिगरला नाही. चक दे इंडियामध्ये शाहरुख खान ‘आय अ‍ॅम फ्रॉम इंडिया,’ असं त्याच्या खेळाडूंनी म्हणण्याला का महत्त्व देतो, ते इथे लक्षात येईल.

     थोडक्यात फिगर आणि ग्राऊंड दोन्ही लक्षात घेण्याची गरज असते. इंटरनेटच्या जमान्यात फिगर आणि ग्राऊंड याबाबत आपल्या सर्वांचीच गल्लत झाली आहे. आज जग इंटरनेटनं जोडलं गेलं आहे. आज वास्तव जगाप्रमाणेच आभासी जगातही माणसं आनंद व्यक्त करतात, वाद घालतात, बुद्धिमान चर्चा करतात, आर्थिक व्यवहार करतात, माहितीची देवाणघेवाण करतात, एकमेकांना भावनिक मदत करतात, योजना आखतात, एखाद्या संकल्पनेवर ब्रेनस्टॉर्मिंग करतात, गॉसिप करतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात, मित्र मिळवतात आणि गमावतात, गेम्स खेळतात, फ्लर्ट करतात, काहीजण कलानिर्मिती करतात. वास्तव जगातल्या जवळपास सर्वच गोष्टी या जगात घडतात.

     या सर्व गोष्टी करताना इंटरनेटवरच्या समाजमाध्यमांमुळे त्याआधीच्या माध्यमांमधून लोप पावत चाललेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत आलं आहे, असा भास काही वर्षं नक्कीच होत होता. पण यथावकाश, इतर माध्यमांप्रमाणेच समाजमाध्यमांवरचं विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य संपत गेलं. माणसं एकत्र येऊन विधायक काम करण्याऐवजी त्यांच्यात अभूतपूर्व फूट पडायला लागली. विशेष म्हणजे, माणसं एकाकी होत गेली.

     थोडक्यात, जगभरातल्या माणसांना एकत्र आणणं, हा हेतू असलेल्या इंटरनेट, डिजिटल/सोशल मीडियानं आज माणसाला कमालीचं एकाकी, बेचैन करून टाकलं आहे. हीच ती फिगर आणि ग्राऊंड यांची गल्लत.

     हे कसं होत गेलं? याचा विचार केला, तर नवनवीन शोध आपल्याला एकमेकांपासून आणि निसर्गापासून दूर नेत गेले. अग्नीच्या शोधानं थंडीपासून संरक्षण मिळालं. तेव्हा शेकोटीभोवती रात्री जागं राहाण्याचा वेळ मर्यादित होता. विजेचा दिवा एडिसननं शोधला त्याचे फायदे आपल्याला नक्कीच झाले. पण, आपली झोपेची वेळ त्यानंतर ठरावीक राहिली नाही. याचा गंभीर परिणाम म्हणजे, आज आपण स्क्रीन टाईमच्या व्यसनात अडकलो आहोत.

   आज जगात 21 कोटी लोकांना इंटरनेटचं व्यसन आहे. कोरोना साथीच्या काळात इंटरनेटवर वेळ घालवण्याचं प्रमाण 60 टक्क्यांनी वाढलं आहे. 10 पैकी आठ नेत्रतज्ज्ञ स्क्रीनचा निळा रंग केवळ डोळेच नव्हे, तर सर्वसाधारणपणे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची हानी करतो आहे, हे मान्य करतात. 77 टक्के नोकरदार आपल्यावर स्क्रीन टाईममुळे होणार्‍या परिणामांबद्दल कंपनीकडे नुकसानभरपाई मागत आहेत. स्क्रीन टाईमचा वेळ कमी केला, तर झोपेत सुधारणा होणं, मूड चांगला राहाणं, डोळे आणि दृष्टी यांच्या आरोग्यात सुधारणा होणं, असे अनेक सकारात्मक बदल प्रयोगांमध्ये दिसून आले आहेत.

     पण, मुळात स्क्रीन टाईम वाढल्यानं झोप न येणं, हे का चालू होतं? तर, मेलॅटोनिन हे नैसर्गिक हॉर्मोन. दिवसभरात हे हॉर्मोन स्रवत नाही. सूर्य मावळल्यानंतर अंधार पडल्यावर हे हॉर्मोन स्त्रवायला सुरुवात होते. ते रक्तात मिसळतं. साधारणपणे हे रात्री चक्र 9 ला सुरू होतं. मेलॅटोनिनची पातळी त्यानंतर वाढते. तुमच्या हालचाली मंदावतात. प्रतिसादही धिमे होत जातात. तुम्हाला झोप यायला लागते. मेलॅटोनिनची ही जास्त पातळी रक्तात 12 तासांपुरती वाढलेली असते.

     पण, स्मार्टफोन किंवा कोणत्याही स्क्रीनच्या प्रखर प्रकाशात मेलॅटोनिनचं स्त्रवणंच बंद होतं. मंद प्रकाश किंवा काळोखं वातावरण झाल्याशिवाय ते स्त्रवणं सुरूच होत नाही. कोणत्याही स्क्रीनचा निळा प्रकाश मेलॅटोनिन स्त्रवण्यासाठी प्रतिबंध करतो. याचं उदाहरण म्हणजे, छापील पुस्तक वाचून झाल्यावर दिवा मालवला, तर लगेच झोप येऊ शकते. पण, किंडलवर पुस्तक वाचणार्‍यांना छापील पुस्तक वाचणार्‍यांपेक्षा दोन तास उशीरा झोप येते, असं संशोधन सांगतं.

     मजेचा भाग म्हणजे, आधी कोंबडी का आधी अंडं यासारखं तुम्ही स्क्रीन टाईम जास्त वापरता म्हणून तुम्हाला झोप येत नाही, का झोप येत नाही म्हणून तुम्ही स्क्रीन टाईम जास्त वापरता, हे लक्षातच येत नाही. तुम्ही जितके जास्त जागे राहात, तितकी काहीतरी ब्राऊज करायची इच्छा वाढत जाते. झोप अपुरी असेल, तर आपल्याला सोशल मीडियावर रात्री अ‍ॅक्टिव्ह राहाण्याचा मोह जास्त होतो. हे कॅलिफोर्निया विद्यापीठानं 71 विद्यार्थ्यांवर केलेल्या एका सर्वेक्षणातूनही सिद्ध झालं आहे. या विद्यार्थ्यांवर काही संशोधकांनी एक आठवडाभर लक्ष ठेवलं होतं. या सर्व विद्यार्थ्यांची 8 तासाच्या तुलनेत जितके तास झोप अपुरी होत होती, तितका जास्त वेळ ते सोशल मीडियावर घालवत होते.

     पण, केवळ रात्री झोपायच्या आधी सोशल मीडिया वापरल्यानंच झोपेचं चक्र बिघडतं, असंही नाही. यासाठी पिटस्बर्ग विद्यापीठातल्या मानसशास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. 19 ते 32 वयोगटाल्या 1788 जणांचं त्यांनी दोन आठवडे निरीक्षण केलं. त्यापैकी निम्म्या लोकांना फक्त दिवसा सोशल मीडिया वापरायला परवानगी होती. त्यांच्या झोपेचं चक्र सोशल मीडिया अजिबात न वापरणार्‍यांच्या तुलनेत तिप्पट जास्त प्रमाणात बिघडत गेल्याचं लक्षात आलं. म्हणजे, दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळेस सोशल मीडियाचा अतिवापर झोपेच्या विकारांना आमंत्रण देतो.

     विजेचा शोध आणि स्क्रीन टाईम हे फिगर अँड ग्राऊंड यांच्या गफलतीचं एक उदाहरण झालं. पण, तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत मूळ हेतू मागे पडला, असं कायमच होतं. कामाच्या ठिकाणी पोचायचं असेल, तर वाहन हवं. तो प्रवास सुखकारक होण्यासाठी मोटारगाडी हवी, असं आता दृढ झालं आहे. पण, कामाच्या ठिकाणी पोचणं हा मूळ उद्देश बाजूला पडून यथावकाश महागडी, अलिशान गाडी, हा स्टेटस सिंबॉल तयार झाला. कामाचं ठिकाण आणि घर यातलं अंतर वाढत गेलं. कुटुंबासोबत आनंदात घालवायचा वेळ आपण बंपर टू बंपर ट्रॅफिकमध्ये हताशपणे घालवायला लागलो. राहणीमान आणि आयुष्यमान सुधारावं यासाठी तयार झालेल्या मोटारगाड्या ट्रॅफिक जाममध्ये चालवायला लागल्यानं येणारं नैराश्य, हे शहरी माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं.

     एकूण काय, तर मोटारगाड्यांमुळे पायी चालण्यातला आनंद, सायकल चालवणं हे संपत गेलं. पर्यावरणाचा नाश आणि चालण्याची सवय सुटल्यानं लठ्ठपणासारखे आजार वाढणं हे ऑटोमोबाईल उद्योगानं मोटारगाड्या खपवण्यासाठी केलेल्या युक्त्या प्रयुक्त्यांमुळे झालेलं ‘कोलॅटरल डॅमेज’ म्हणता येईल.

     ऑनलाईन शिक्षण हे शाप का वरदान, असाही अजून एक प्रश्न सध्या उभा ठाकला आहे. उदाहरणार्थ, एका गावातल्या लहान मुलाला कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलवर डेटा पॅक घ्यायला पैसे नसल्यानं व्यथित असलेला बाप एका मराठी शॉर्टफिल्ममध्ये दिसतो.

     कोरोना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा प्रसार वेगात झाला. त्याआधीही ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध होतेच. कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाच्या ऑनलाईन कोर्ससमुळे आपल्या सोयीनुसार हव्या त्या वेळेत शिकता येतं, हा फायदा आहे. तसंच, ऑनलाईन कोर्सेसमुळे शाळेच्या इमारतीचा खर्च वाचतो. ठरावीक पाठ्यक्रम व्हिडिओद्वारे दाखवता येतात. आधी तयार केलेले व्हिडिओज दाखवताना शिक्षकांनी ऑनलाईन हजर असण्याचीही गरज राहात नाही. कॉम्प्युटर चाचण्याही घेऊ शकतो.

     पण, असे कोर्स तयार करणारे, मानवांचा प्रत्यक्ष एकमेकांशी होणारा संवाद, शिक्षकांचं समोर असणं किती महत्त्वाचं असतं, ते विसरतात. माणूस शिकत असताना दुसर्‍यानं त्याचं निरीक्षण करणं, त्याच्याशी मैत्री करणं शिकण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचं आहे. गुरुशिष्य परंपरेइतकं ते प्राचीन आहे.

     ऑनलाईन कोर्सेसमधून यंत्रदुरुस्ती किंवा डेटा एंट्रीची कौशल्यं प्राप्त करून घेता येऊ शकतील. पण, सृजनशीलतेची गरज असलेले कलाशाखेतले कोर्सेस किंवा एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याची क्षमता यातून जोपासणं अशक्य आहे. कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकताना देखील याच कारणानं अनेकजण ऑनलाईन कोर्स सोडून प्रत्यक्ष शिकवणार्‍या शिक्षकांकडे जाणं पसंत करतात.

     कॉम्प्युटरवरून ऑनलाईन शिकणार्‍यांना नावीन्यपूर्ण शोध लावायला प्रोत्साहन मिळत नाही. एकच काम एकाच पद्धतीनं करण्याचं तंत्र त्यांना दिलं जातं. ऑनलाईन कोर्सेसमध्ये शिक्षकांना थेट प्रश्न विचारता येत नाहीत. विचारांना चालना मिळू शकत नाही. ऑनलाईन शिक्षण हा प्रकार वाढेल, तसतशी खोलवर विचार करण्याची माणसाची क्षमताच कमी होत जाईल, असंही विचारवंत मानतात.

     इंटरनेटचा सुरुवातीचा हेतू आपल्या बौद्धिक जाणिवा उंचावणं हा असेलही. पण, आता आपलं लक्ष वेधून आपल्याला वस्तू / सेवा विकणं आणि त्यासाठी आपण करत असलेल्या गोष्टी ट्रॅक करणं, हा हेतू झाला आहे. यामुळेच शिक्षणविषयक विचारांचा प्रसार करण्यासाठी लोकांना इंटरनेटवर एक सर्च इंजिन द्यावं या हेतूनं सुरू झालेली कंपनी आज जगातली सर्वात मोठी जाहिरात कंपनी झाली आहे.

     तंत्रज्ञानाच्या बाबतीत इंटरनेटचा वापर ते गैरवापर, हे आज होतंय. पण, सुरुवातीपासूनच हा प्रकार होताच. याचं एक गंमतीदार उदाहरण पाहू. आपल्याकडे जेवायला आलेल्या पाहुण्यांबरोबर चाललेल्या महत्त्वाच्या चर्चेत खंड पडू नये असं त्याला वाटायचं. पाहुण्यांच्या शेजारी त्यासाठी एक ‘डंबवेटर’ असायचा. जेवताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे पदार्थ लागतील ते त्यात ठेवलेले असायचे. यातला तो म्हणजे, अमेरिकेचा तिसरा राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन. धुरंधर राजकारणी म्हणून गाजलेल्या जेफरसननं काही कामं सोपी करण्यासाठी रंजक शोध लावले होते. त्यातलाच ‘डंबवेटर’ हा एक प्रकार होता. जेफरसनच्या घरात स्वयंपाकघरातून जेवणाच्या टेबलावर वेटरनं खाद्यपदार्थ आणून द्यायच्याऐवजी नोकर एका लिफ्टमध्ये ते खाद्यपदार्थ ठेवायचे. दोरानं ओढून ती लिफ्ट पोचायची. अन्न जादूसारखं पाहुण्यांच्या समोर यायचं. वाईनच्या बाबतीतही हेच घडायचं. यालाच तो डंबवेटर म्हणायचा.

     पण, यामागे नोकरांचे कष्ट वाचवणं, हा जेफरसनचा उद्देश नव्हता. त्याच्याकडे आफ्रिकन-अमेरिकन गुलाम अन्न तयार करायचे. उदारमतवादी समजल्या जाणार्‍या जेफरसनला आपल्याकडे गुलाम आहेत, हे पाहुण्यांना कळू नये, हा त्याचा डंबवेटरमागचा खरा हेतू होता. इथे तंत्रज्ञानाचा गैरवापर दिसून येतो.

     पाहायला गेलं, तर औद्योगिक क्रांतीनं ही सुविधा (!) त्याला दिली होती. एकूणच औद्योगिक युगानं माणसाला जास्त कार्यक्षम बनवण्याऐवजी माणसाचं मानवी कौशल्य या प्रकाराला कमी लेखायला सुरुवात केली, असं म्हणता येईल. एखादा माणूस इतक्या तासात, इतकं उत्पादन करेल, असा विचार करत माणसाला यंत्रासारखं वागवलं जायला लागलं. फ्रेडरिक टेलरसारख्या नावाजलेल्या लोकांनी कामगारांचं तासाला होणारं उत्पादन आणि त्यावर अवलंबून असलेला त्यांचा पगार, अशा व्यवस्था सुरू केल्या. कामगारांना कमीत कमी पगार द्यायला लागावा, हा त्यात हेतू होता.

     नंतर आलेल्या असेंब्ली लाईन्सवर काम करणार्‍या माणसांना एकाच प्रकारचं काम दिलं गेलं. चार्ली चॅप्लीनच्या ‘मॉडर्न टाईम्स’ या चित्रपटामध्ये दाखवल्याप्रमाणे ठरावीक यंत्रावरचा ठरावीक स्क्रू पिळण्याचं काम कामगारांना दिलं जायला लागलं. एक तर या कामाचं प्रशिक्षण देणं सोपं होतं. कामगारांनी तक्रार केली, तर त्यांना बदलणं चुटकीसरशी होऊ शकत होतं.

     यात माणसाचं काम सोपं करणं, हा यंत्रांचा मूळ हेतू मागे पडून, माणसाचा हात कामाला न लागणं, अशी अमानुष संस्कृती पुढे यायला लागली. औद्योगिक क्रांतीनंतर ग्राहकांना यंत्रानं परिपूर्ण पद्धतीत शिवलेले कपडे, बूट आकर्षित करत होते. त्यात मानवी स्पर्श त्यांना अजिबात नको होता. याचाच परिपाक म्हणजे, आज चिनी कामगार स्मार्टफोन्सवर बोटांचे ठसे राहू नयेत, यासाठी स्मार्टफोन तयार झाल्यावर एका घातक रसायनानं पुसून घेतात. विरोधाभास म्हणजे, या रसायनामुळे त्या कामगारांचं आयुष्यमान कमी होतं. ग्राहकांना आपल्या हातातला मोबाईल पूर्णपणे यंत्रातून(च) बाहेर पडला आहे, हे जाणवू देण्यासाठी इतकी दक्षता घेतली जाते. मानवी स्पर्शाचा यात सहभाग नाही, हे माणसाचं आयुष्य (त्या घातक रसायनामुळे) संपवून पटवलं जातं.

     माणसानं हातानं तयार केलेला वडापाव अस्वच्छ असेल, असं समजून टपरीवरची भजी सोडून मॅकडोनाल्डचा बर्गर खाण्यामागे अनेकांची तीच मानसिकता असते.

     इंटरनेटच्या बाबतीतही तसंच होत गेलं. इंटरनेटच्या सुरुवातीला ज्या लोकांनी प्रत्यक्षात एकमेकांना कधी पाहिलं नाही, ते एकमेकांशी संवाद साधू शकत होते. कॅलिफोर्नियातले शास्त्रज्ञ, हॉलंडमधले हॅकर्स, युरोपमधले तत्त्वज्ञ, जपानमधले अ‍ॅनिमेटर्स आणि भारतातले लेखक यांच्यातलं अंतर इंटरनेटनं मिटवून टाकलं.

     सुरुवातीला फक्त ई-मेल हेच कम्युनिकेशनचं माध्यम असल्यामुळे टेलिफोन किंवा टीव्हीसारखे रिअल टाईम संवाद नव्हते. लोक ई-मेल पाठवायचे, उतरवून घ्यायचे, हवं तेव्हा सावकाश वाचायचे आणि विचार करून ई-मेलला उत्तर लिहायचे. परत नेटला कनेक्ट होऊन ते ई-मेल पाठवायचे. फोरम्सबाबतही असंच होतं. एखाद्या विशिष्ट विषयावरच्या फोरमवर आपलं मत मांडलं जायचं. आपल्या त्या मतावर इतरांना आपल्या काय म्हणायचं आहे, ते मत मांडणार्‍याला परत कनेक्ट झाल्यावर सावकाश कळायचं. त्यावर विचार करून उत्तर लिहिणं, ही प्रक्रिया होती. त्यामुळे माणसांचे उत्कृष्ट, विचारपूर्वक केलेले संवाद इंटरनेट फोरम्सवर व्हायचे. लोकांना आपल्यातलं छुपं कौशल्य, विचार व्यक्त करायला हे उत्तम माध्यम सापडलं होतं.

     मात्र, आता विचारपूर्वक मत व्यक्त करणं हे संपत गेलं आहे. फेसबुकवर एखादी पोस्ट टाकल्यानंतर 10 सेकंदांच्या आत कॉमेंटस्/लाईक्स आले नाहीत, तर पोस्टकर्त्याचा जीव घाबरा होतो.

इंटरनेटच्या बाबतीतला हा बदल सहज झाला, असं आपल्याला वाटत असेल, तर ते सर्वस्वी चूक आहे. आपण इंटरनेटच्या अधीन होऊन विचार करणंच थांबवावं, यामागे एक प्रचंड यंत्रणा काम करत असते. त्याचाच एक प्रकार म्हणजे ‘पर्सुएजिव्ह टेक्नॉलॉजी. आपल्याला दिवसभरात जितक्या वेळा एसएमएस, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अ‍ॅप्सवरून स्मार्टफोनवर पिंग येतात, तितकं आपलं लक्ष विचलित होत जातं. प्रत्यक्ष जगाशी आपला संबंध तितके क्षण तुटलेला असतो. अशा प्रकारे सतत कोणतं ना कोणतं तंत्रज्ञान आपलं लक्ष वेधून घेत असतं. या संकल्पनेला ‘पर्सुएजिव्ह टेक्नॉलॉजी’ हेच नाव आहे.

     जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये युजर्सचं लक्ष कशा प्रकारे असं सतत वेधून घेता येईल, हे शिकवलं जातं. हे तंत्र शिकलेले विद्यार्थी ई-कॉमर्स साईट्स, सोशल नेटवर्किंग साईट्स आणि मनगटावरच्या ई-उपकरणांमधून ते तंत्र जास्तीत जास्त अमलात कसं आणायचं, त्यावर विचार करत असतात. माणसाच्या वागण्यात बदल घडवणं आणि त्याला या गोष्टींची सवय लावणं, हा त्यांचा हेतू असतो. जास्तीत जास्त वेळा माणसानं आपली वेबसाईट, आपलं अ‍ॅप, आपण केलेली जाहिरात, व्हिडिओ, पॉडकास्ट – काही ना काही पाहावं, याची त्याला जास्तीत जास्त वेळा सवय लागावी, म्हणजे हॅबिट फॉर्मेशन होऊन त्याच्या वागण्यात बदल ‘बिहेविअरल चेंज’ व्हावा हा ‘पर्सुएजिव्ह टेक्नॉलॉजी’चा हेतू आहे.

     आपण डिजिटल जगात जे काही पाहातो, त्यामागे आपल्यासारख्या युजर्सकडून काय प्रतिसाद यावा, त्याला किती व्ह्यूज मिळतील, ती वस्तू कितीजण खरेदी करतील किंवा त्या वस्तूचं जास्तीत जास्त किती व्यसन लागेल, याच्या खोलवर केलेल्या चाचण्या असतात. याचा परिणाम म्हणजे, आपण ऑनलाईन असावं का नसावं, हा पर्यायच आता उरलेला नाही. तिथे आपण कायमच असतो. स्मार्टफोन्स आणि वेअरेबल उपकरणांमुळे नेट आता आपल्या शरीराला जखडलं आहे. चटपटीत बातम्या, क्रीडास्पर्धांचे निकाल, सोशल मीडियामधले मेसेजेस आणि निरुपयोगी कॉमेंट्स यांचे पिंग आणि व्हायब्रेटर्स आपला जीव खातात.

     इमर्जन्सी सेवा पुरवणारे जसे सतत कोणत्याही क्षणी अ‍ॅलर्ट मोडवर असतात, तसे आपण 24 बाय 7 अ‍ॅलर्ट मोडवर असतो आणि सतत अशी अस्वस्थता आपल्यात जोपासण्याचे पैसेही आपणच भरतो!

     गणपतीउत्सवात रंगीबेरंगी रोषणाई दिसल्यावर, गाडी चालवतानाही आपलं आपोआप लक्ष जातं. तसंच, ‘पर्सुएजिव्ह टेक्नॉलॉजी’ वापरून अ‍ॅप्स करत असतात. अ‍ॅप्स वापरत असलेलं अ‍ॅनिमेशन आणि ध्वनी आपल्याकडून भावनिक प्रतिसाद निर्माण करतात. नवीन ई-मेल आली आहे जे सांगणारा ध्वनी आनंदी असतो. मात्र, ‘देअर इज नो न्यू मेल’ हे दु:खद आवाजात सांगितलं जातं. कॅसिनो किंवा शॉपिंग मॉल्समध्ये जसं रंगीबेरंगी रोषणाई, विशिष्ट रंग, गाणी वापरुन मानसिक पिळवणूक केली जाते, तोच हा प्रकार आहे.

     दुसरं उदाहरण म्हणजे, आपल्याभोवतीच्या सामाजिक वर्तुळात काय चाललेलं असतं, त्यात आपल्याला खूप रस असतो. याचा विचार करून नवीन नोटिफिकेशन आल्यावर अ‍ॅपवर लाल रंगाचा ठिपका दिसेल, अशी व्यवस्था ‘पर्सुएजिव्ह टेक्नॉलॉजी’नं केली. नवीन नोटिफिकेशन येऊन पडलेलं आहे आणि आपण ते पाहिलं नाही, याची अस्वस्थता तो लाल ठिपका आपल्यात निर्माण करतो. मग आजूबाजूचे लोक काहीतरी महत्त्वाचं बोलत आहेत, कॉमेंट करत आहेत आणि आपल्याला मात्र ते अजून कळलं नाही (फिअर आॉफ मिसिंग आऊट-फोमो) हे कुतूहल आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आपण त्या रेड डॉटवर चटकन क्लिक करतोच. हे अनंत काळ चालू राहील, अशी व्यवस्था बॉटमलेस फीड्स करत असतात. आपण फेसबुकवर कितीही स्क्रोल केलं, तरी त्याला तळ नसतो. आपण सतत स्वाईप डाऊन करत राहातो. लेख, पोस्ट्स, मेसेजेस, सतत पाहाणं चालू असतं. दिसत असलेलं मेंदूपर्यंत पोचलं नाही, तरी स्क्रोल करणं अपरिहार्य झालेलं असतं.  त्याला ‘बॉटमलेस फीड्स’ म्हणलं जातं.

     इंटरनेट हे नवीन प्रकारचं धूम्रपान आहे, असं कॅल न्यूपोर्ट हा ‘डिजिटल मिनिमलिझम’सारख्या पुस्तकांचा लेखक उगीचच म्हणत नाही!

     इंटरनेटचं व्यसन लावताना माणसाला काहीतरी बक्षीस मिळालेलं आवडतं, या वृत्तीचा बारकाईनं विचार केला जातो. प्रत्येक माणूस आपल्या वागण्या-बोलण्यातून आपल्याला कसं रिवॉर्ड मिळेल, याचा विचार प्रतिक्षिप्तपणे करत असतो. मार्केटिंगच्या दुनियेत काम करणार्‍या मानसशास्त्रज्ञांच्या 1950 मध्ये हे लक्षात आलं. पण, याची मुळं उत्क्रांतीच्या काळापासून दिसतात. मासा पाण्यात कशा हालचाली करतो, ते जाणून तो गळाला कसा लागेल, याचा विचार आदिमानव करत होता. त्यातून मग अमुकतमुक वेळानंतर मासा गळाला लागतो वगैरे पॅटर्न शोधणं सुरू झालं. जुगाराच्या यंत्रात हेच तंत्र माणसाला व्यसन लावण्यासाठी वापरलं जातं.

     आपण नाणं टाकल्यावर कधीतरी पैसे येतात, हे एकदा जुगार खेळणार्‍या माणसाला कळतं. मग तो तीन वेळा नाणं टाकल्यावर पैसे मिळतात, का पाच वेळा नाणं टाकावं लागतं, असा पॅटर्न शोधायला लागतो. रिवॉर्ड मिळावं, याची मनाला लालसा असतेच. कॉन्शस मनाला ते जुगाराचं यंत्र कोणत्याही पॅटर्ननं पैसे देत नाही, उलट आपले पैसे गिळतं, हे कळत असतं. पण, सबकॉन्शस माईंडमध्ये यंत्रात नाणं घातल्यानंतर कधी भरपूर पैसे मिळतील, याचा शोध घेणं चालू असतं. त्या शोधाच्या विचारातून आपण पैसे गमावत राहातो. दहा वेळा नाणं टाकल्यावर पैसे येतात का? पाच का सात का परत पाच, असा पॅटर्नचा शोध चालू असतो. या जुगाराच्या स्लॉट मशीनच्या अनुभवावरून बोध (!) घेऊन युजर्सना ई-मेल चेक करायचं व्यसन कसं लागू शकेल, याचा मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास केला. युजर एक्सपिरिअन्स अशा विभागातल्या लोकांनी दहा निरुपयोगी ई-मेल्स पाठवल्यावर एक उपयोगाची, म्हणजे रिवॉर्ड देणारी इमेल पाठवावी, असं स्पॅम इमेल्सचं डिझाईन तयार केलं.

     फेसबुकवर लाईक्सच्या बाबतीत हेच घडतं. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणल्यानंतर आपला इगो सुखावतो. हे रिवॉर्ड आपल्याला हवंहवंसं वाटतं. खरं तर, त्या लाईक्सवरून आपल्यावर कोणाचं खरं प्रेम आहे का, ते कळत नाही. फक्त अनेकजण आपल्याला लाईक करतात एवढंच कळत जातं. पण, तरीही आपण कायम लाईक्सना भुकेलेले असतो.

     फेसबुक लाईकचं बटन शोधणारा जस्टिन रोझेंटाईन, सध्या स्वत:च तयार केलेल्या या लाईकच्या बटणावर टीका करतो. स्वत: कमीतकमी ऑनलाईन असावं, याबाबत तो दक्ष आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ऑनलाईन दुनियेत सुरुवातीला जाहिराती नव्हत्या. व्यावसायिक पातळीवर इंटरनेटचा वापर करायचा असेल, तर डिजिटल अ‍ॅग्रीमेंट मान्य करावं लागायचं. जाहिरातींना कायद्यानं नसली, तरी नैतिक पातळीवर बंदी होती. जाहिरातींच्या विरुद्ध असणारा गुगलचा संचालक एरिक श्मिड्ट ऑनलाईन जाहिरातींच्या विरोधात होता. पण, गुगल आता सर्वाधिक ऑनलाईन जाहिरातींना चालना आणि प्रोत्साहन देतं.

     या सगळ्याचा परिणाम म्हणजे, बौद्धिक, सांस्कृतिक गरजा भागवणं, हा इंटरनेटचा वापर मागे पडला. गुंतवणूकदारांना अपील करणं याला महत्त्व आलं. आज प्रत्येक वेबसाईट आपलं अटेंशन वेधून घेते. इतकं काहीतरी समोर सतत पाहिल्यानंतर आपल्याकडे विचार करायला वेळच उरत नाही. आपण एका टॅबमध्ये फेसबुक, दुसर्‍यात यू-ट्यूब, तिसर्‍यात अर्धवट वाचलेला लेख आणि एकात बातम्या, असं पाहात असतो. एका साईटवरून दुसरीकडे गेल्यावर लगेच नवीन जाहिराती समोर येतात. त्या आपल्याला उत्पादनं खपवतात किंवा आपला डेटा गोळा करतात. साधारणपणे आपण दिवसाला ऑनलाईन 6000 ते 10,000 जाहिराती पाहातो. इंटरनेटचा वापर, यातून आनंद मिळणं वगैरे कधीच मागे पडून आता आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्याची किंमत मोजून आपण ते वापरतो आहोत. ‘फिगर अँड ग्राऊंड’ यांची ही गल्लत चालूच राहाते आहे, एवढं लक्षात घेणं हा त्यातून बाहेर पडायचा पहिला टप्पा असू शकतो..! अजून वेळ गेलेली नाही.

(नीलांबरी जोशी या नामवंत लेखिका मराठी संगणकतज्ज्ञ आहेत.)

9922445456

Previous articleमॅरेथॉन…लंगोटी यार आणि गोवा
Next articleमान्सून आणि भारतीय समाज-संस्कृती
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here