अल्बर्ट टूर आणि ट्रेव्हल्स कंपनी १९५७ ते १९७३ या काळात ‘लंडन-कलकत्ता-लंडन’ अशी बससेवा चालवत असे . या बसच्या पहिल्या प्रवासाला १५ एप्रिल १९५७ ला लंडनहून सुरुवात झाली. इंग्लंड –बेल्जियम- पश्चिम जर्मनी-युगोस्लाव्हिया-बल्गेरिया- तुर्कस्थान-इराण- पाकिस्तान- भारत असा दहा देशांचा प्रवास करून ही बस ५ जूनला कोलकातात पोहचली. भारतात प्रवेश केल्यानंतर अमृतसर- दिल्ली- अलाहाबाद- वाराणसी-कलकत्ता असा या बसचा मार्ग होता. पहिल्या फेरीत लंडनहून कलकत्त्यासाठी एकूण २० प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांनी याच बसचे परतीचे लंडन तिकीट घेतले होते . काही दिवस घालविल्यानंतर बस ज्या मार्गाने आली, त्याच मार्गाने २ ऑगस्टला लंडनला पोहोचली. या बसचे लंडन- कलकत्ता तिकीट हे ८५ पाउंड म्हणजे आजच्या दरानुसार अंदाजे ८,००० रुपयांच्या आसपास होते. या तिकीट खर्चात हॉटेलमधील निवास खर्च , दोन्ही वेळचे जेवण , अल्पोपहाराचा समावेश होता. बसमध्ये प्रत्येकाला झोपण्यासाठी वेगळे कम्पार्टमेंट, फॅन, हीटर, रेडिओची स्वतंत्र व्यवस्था होती. प्रवासादरम्यान वाटेत येणाऱ्या वेगवेगळ्या देशातील प्रेक्षणीय स्थळही प्रवाशांना दाखवली जात असे. भारतात ताजमहाल, दिल्लीतील राजपथ, राजघाट, गंगा नदी , वाराणसीतील मंदिरं आदी ठिकाणं दाखवली जात असे.
पहिल्यांदा ही बस भारतात आली तेव्हा कोलकात्यातील ‘स्टेट्समन’ या दैनिकाने या बसेसेवेबाबत सविस्तर बातमी प्रकाशित केली होती . ३२, ६७० किलोमीटरचा प्रवास करून बस लंडनला परत पोहचल्यानंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या प्रख्यात दैनिकाच्या प्रतिनिधीने बसचा मालक, चालक आणि प्रवाशांना त्यांचे अनुभव विचारून एक सविस्तर वृतांत प्रकाशित केला होता. बसचा चालक गॉरो फिशर याने अनुभव कथन करताना, तुर्कस्थानातील हेअरपिनच्या आकाराची अतिशय अवघड वळणे, वाळवंटात बसची चाके वाळूत रुतून बसल्याने लाकडी फळ्या टाकून बस बाहेर काढण्याचा प्रकार , धुळीची वादळं, मुसळधार पाऊस, याशिवाय भारतातील अतिशय अरुंद रस्ते व मोठ्या प्रमाणात असलेल्या सायकलस्वारांमुळे ड्रायव्हिंग करतांना खूप काळजी घ्यावी लागायची, असे सांगितले. बसचा लंडन- कलकत्ता हा प्रवास सुरु असताना बसमधील सर्व प्रवाशांना इराण- पाकिस्तानदरम्यान लुटारूंनी मारून टाकले, अशी बातमी लंडनमध्ये पसरली होती . त्यावेळी संपर्काची साधने मर्यादित असल्याने काहीच कळायला मार्ग नव्हता . दोन दिवसानंतर ती बातमी अफवा असल्याचे स्पष्ट होताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.