जामताडाका फोन कॉल…आदमी को कंगाल बना देता है!

जामताडा नावाचा झारखंडमध्ये एक जिल्हा आहे. या जिल्हयाची ओळख म्हणजे इथे साप मोठ्या प्रमाणावर सापडतात. या जिल्ह्याचे नाव देखील सापांवरूनच पडले आहे. संथाली भाषेत जाम म्हणजे साप आणि ताडा म्हणजे घर. सापांचे घर म्हणजेच जामताडा असे हे सगळे प्रकरण आहे. बॉक्साइटच्या खाणी ही देखील या जिल्ह्याची विशेषता आहे. पण गेल्या काही वर्षांत या जिल्ह्याची ओळख काही औरच तयार झाली आहे. या जिल्ह्यातून आलेल्या एका-एका कॉलने कित्येकांना कंगाल केले आहे.

काही वर्षांपूर्वी हा जिल्हा मागास म्हणून ओळखला जात होता. सायकलवर फिरणे हीच काय तिथली चैन. फारतर काय, काही लोकांकडे मोटरसायकल असायची. पण आता घरोघरी कार दिसतात. घरे पण एकापेक्षा एक भारी आहेत. एकेकाळी सायकलवर फिरणारे गाड्या कसे विकत घेऊ लागले?

तुम्ही म्हणाल लोकांनी चांगलीच मेहनत केलेली दिसते. तर तसे नाहीय. या गावातल्या कित्येकांना फक्त एका कॉलने मालामाल केले आहे.

या एका कॉलची काय भानगड आहे, याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल. तर असे आहे की हे गाव सायबर क्राईमचे घर मानले जाते. तुम्हाला कॅशबॅक, लॉटरी किंवा बँकिंगसंबंधी कॉल येऊन तुमची माहिती विचारली जाते, त्यातले बरेच कॉल हे जामताडाहून आलेले असतात. काही भोळे लोक आपली माहिती शेअर करतात आणि इथेच घात होतो. त्या माहितीमुळे हे लोक तुमच्या अकाऊंटमधले पैसे वळविण्यात यशस्वी होतात. आता कित्येकांचा हा नेहमीचा धंदा झाला आहे. असे म्हणतात की भारतातील कुठल्याच राज्यात असे पोलीसच नसतील, जे चौकशीसाठी जामताडाचा दौरा करून आले नसतील.

या अशा गुन्ह्यांना फक्त सामान्य लोक बळी पडतात असे नाही. कित्येक सेलेब्रिटीजसुद्धा त्यांचे शिकार ठरले आहेत. काही वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या खात्यातून ५ लाख रुपये गायब झाले होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांच्या पत्नी खासदार परनीत कौर यांच्या खात्यातून सुद्धा २३ लाख वळविण्यात आले होते. एक केंद्रीय मंत्री आणि केरळमधील एका खासदाराला दोन आणि दीड लाख रुपयांचा चुना लावण्यात आला होता. अर्थात ही काही मोजकी नावे आहेत. अशा हजारो लोकांना रोजच्या रोज चुना लावण्याचे प्रकार याच जामताडामधून घडत असतात.

एका रिपोर्टनुसार जामताडा येथे हे धंदे २०१३च्या दरम्यान सुरू झाले. दिवसेंदिवस प्रगती(!) करत लवकरच लोकांना फसवण्याचे प्रकार वाढायला लागले. कित्येक राज्यांतले पोलीस येऊन इथल्या लोकांना अटकही करतात. लोकांना फोन करून मूर्ख बनविणे हा समान सूत्र या गावातून घडणाऱ्या गुन्ह्यांमधून दिसून येतो.

या जिल्ह्यात शेकडो गावे आहेत आणि प्रत्येक गावातील कुणी ना कुणी या कारनाम्यांमध्ये गुंतलेला असतो. फोन करून लोकांना बँकेतून किंवा फोन पे, पेटीएम सारख्या ऑनलाईन बँकिंग कंपनीमधून बोलत असल्याचे पटवून त्यांची बँक डिटेल्स काढून त्यांच्या अकाउंटमधील पैसे चोरी करायचे हा कार्यक्रम सर्रास सूरु असतो. म्हणूनच आम्ही सुरवातीला म्हटले की यांचा एक कॉल इंसान को कंगाल कर सकता है!!!

या सगळ्या कारनाम्यांआधारित वेबसिरीज जानेवारीत नेटफ्लिक्सने रिलीज केली आहे. जामताडा याच नावाने ही सिरीज आहे. असल्या प्रकारांपासून वाचण्याचा एकच उपाय आहे तो म्हणजे आपली कुठलीही माहिती यांना शेअर न करणे.

आपली कोणतीही माहिती म्हणजेच पूर्ण नाव, आईचे माहेरचे नाव, जन्मतारीख, आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डावर समोर लिहिलेला १६ अंकी कार्ड क्रमांक आणि मागे लिहिलेला तीन किंवा चार अंकी CVV, फोनवर आलेला कोणताही ओटीपी(OTP), पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्डाचा पिन नंबर, खाते नंबर वगैरे काहीही कुणालाही, अगदी जवळच्या मित्रालाही सांगायचा नाही. अनोळखी माणसाला किंवा बाईमाणसालाही मुळीच नाही.

तुमच्या पेटीएम खात्याचा केवायसी रद्द झाला आहे, तुम्हांला इतक्या लाखांची लॉटरी लागली आहे म्हणून सांगितले, तरीही वरती लिहिली आहे तशी -म्हणजे फक्त तुम्हांलाच माहित असू शकेल अशी- माहिती कुणालाही द्यायची नाही. सहसा हे लोक आत्ताच्या आता माहिती दिली नाही तर कार्ड ब्लॉक होईल वगैरे कारणं देतात आणि आत्ता लगेच माहिती द्या म्हणतात. अशांच्या बिल्कुल नादाला लागायचे नाही. कुणी पोर कॅन्सरमुळे उद्या ऑपरेशन झाले नाही तर मरेल म्हणून आत्ताच्या आत्ता फोन चालू असतानाच अमुक पैसे द्या म्हणणाऱ्यांना तर मुळीच थारा द्यायचा नाही. खूपच आग्रह केला तर मी जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन प्रत्यक्षात माहिती घेऊन माझं काम करेन असं फोनवर उत्तर द्या.

पण आलेला कॉल फ्रॉड आहे हे कसे ओळखायचे?

माहिती दिली नाहीत आणि तो कॉल फ्रॉड असेल, तर सहसा हे लोक खूप चिडतात. एकतर त्यांचं इंग्रजी बरेचदा चांगलं नसतं, चिडले की एकदम त्यांच्या खास बिहारी-झारखंडी टोनमध्ये अपशब्द वापरायला लागतात, प्रसंगी शिव्याही देतात. लक्षात घ्या, कुठल्याही बँकेचे अधिकृत कॉलसेंटरवाले लोक असं तुमच्याशी अर्वाच्य शब्दांत बोलूच शकत नाहीत. कधीकधी तुम्हांला एकाच नंबरवरून दिवसभर फोन येत राहील, त्यालाही भीक घालू नका. हे लोक निर्ढावलेले आहेत आणि त्यांना भितीही कदाचित वाटत नसेल. काही असो, फोनवर माहिती न देता थेट बँकेत जाऊन शहानिशा करून मग आपली माहिती दिलीत, तर काही नुकसान होत नाही. आपण तात्काळ माहिती न दिल्याने जग थांबत नाही, आपण इतकेही महत्त्वाचे नाही आहोत हे आधी लक्षात घ्या. ‘दुर्घटनासे देर भली’ हे ध्यानात घ्या.

असे फोन आले तर गोंधळून जाऊ नका आणि अशा स्कॅम्सना बळीही पडू नका.

Previous articleलंडन-कोलकाता-लंडन: अनोख्या बससेवेची रंजक कहाणी
Next articleघराघरात ‘बबडू’ कसे तयार होतात?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.