मॅरेथॉन…लंगोटी यार आणि गोवा

-ललितकुमार वऱ्हाडे 

 टायटल वाचून जरा चकीतच झाला असाल..तसं एकदमच रेयर कॉंबिनेशन आहे नं..?

लंगोटी यार आणि गोवा हे सुट होईल एकदाचं..पण गोव्यात जावून लंगोटी यार सोबत धावणे हा शुध्द वेडेपणाच.. तो केलाय आम्ही..

संदिप (सैंडी,बापू) , प्रशांत (मड्डू, पांडू, सत्तू) आणि मी.

लहानपणी बालवाडीत होतो तेव्हापासूनचे आम्ही दोस्त..

गावातल बालपण म्हणजे कसं एकदम सम्रुद्ध..सर्व प्रकारचे ग्रामीण खेळात रमेलेलं आणि गावरान रानमेवा चाखलेलं आमचं बालपण.. सगळ्या ग्रामीण मुलांचं प्रतिनिधित्व करणारं बालपण होतं आमचं..रानात फिरणे,धरणात, विहीरीत पोहणे..ऊस,बोरं,जांब,पपया,हरबरं,टेंभुर्ण, चिंचा,कारबीटं, यरमुलं शोधत खात फिरणारे उनाड गावठी पोरं आम्ही….

घरच्यांना बरोबर चुकांडा देत विटीदांडू,काच्यागोट्या,गजाळी, डाबडुबली,धपाकुटी,लपनाछपनी,रेघोट्याओढी,गजखुपसी,चंफुल,पत्ते,पकडापकडी… इत्यादी अस्सल गावरानी खेळासोबतच क्रिकेट, खोखो,हॉलीबॉल हे खेळही मोठ्या उत्साहात खेळत असू..खेळायला,उंडरायला आम्हाला दिवस कमी पडत असे ..घरच्यांच्या धाकानं तसा थोडा अभ्यासही करावा लागेच म्हणा..

असं सगळं मस्त सुरु असतांना यापेक्षा ही वेगळं काही जगणं असू शकतं ह्याची पुसटशीही कल्पना नसणारे आम्ही.. बालपणाच्या आनंदात मश्गुल असल्याने काळ व वेळेचे भान नव्हतंच.  जेव्हा,तुम्ही आता मोठे झालात जरा जबाबदारीने वागायला शिका… असं घरचे लोकं म्हणायला लागले तेव्हा कुठं थोडं भानावर आलो. पण मोठ्ठ होणं काही कोणालाच रुचलं आणि पचलंही नाही.. नाराजीच्या सुरातच आम्ही गाव सोडला…आणि सुरु झाला नवीन संघर्ष.. शिक्षण..करियर..नोकरी..संसार.. एक एक पायरी गावापासून आम्हाला आमच्या बालपणाला तोडत गेली..एका वेटाळात राहणारे आम्ही एका गावात काय, एका जिल्ह्याचेही राहिलो नाही..वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आमच्यातल्या बालकाचा गळा आवळू लागल्या व आम्ही विचार करुनही तो फास वेगळा करण्यात अपयशी ठरु लागलो..रस्ते बदलले. आयुष्याचे संदर्भ बदलले पण आजही मन तिथंच जातंय.. फिरुन फिरुन…तो भुतकाळ एवढा मजेशीर आणि लाघवी आहे की त्या आठवणी मनात कायम रुंजी घालत असतात.

गावातून धरणाकडे जाणारी वाट..तो खळखळून वाहणारा पाण्याचा पाट..ठेचा ,भाकरी,कांदा,भरीताचं भरलेलं ताट..दमून आल्यावर तहान भागवणारा थंडगार माठ..दोस्तांच्या गळ्यात गळे घालून तयार होणारी दोस्तीची आनंदी लाट…आणि कधीच सुटू नये असं वाटणारी मैत्रीची रेशीम गाठ..सगळं सुटल्याचा भास होतो कधीकधी.. आणि मग एकदम अस्वस्थ वाटू लागतं..म्हणून गावात तरी जातो कधीकधी..जुन्या सगळ्या आठवणींचा फिल घ्यायला. मनाला लहान होतांना पाहायला…

आता वर्षातून दोन तीनच भेटी होतात.. बाकी  सोशल मीडियामुळं आभासी का होईना पण कनेक्ट असतो आम्ही बालमित्र….

असं म्हणतात की ज्यांच्या सगळ्या वाईट सवयी जुळतात ते चांगले मित्र होतात.. आम्हाला सवयी म्हणजे काय, हे माहिती नसतांनाची आमची मैत्री आजवर तशीच घट्ट आहे.. बहुतेक सवयी सारख्याच आहेत.. ते औरंगाबादला धावतात मी ज्या गावात असेल तिथं धावतो..

मॅरेथॉनसाठी एकत्र येतो. काल गोव्यात होतोय मॅरेथॉनसाठी..आम्ही एकमेकांचे प्रेरणास्थान आहोत..एकमेकांना आधार देणारे एकमेकांचा धीर वाढवणारे..लहानपणी पाण्यात उडी मारायला मला भिती वाटायची तर हे सगळे बालमित्र माझा हुरुप वाढवायचे.. आम्ही आहोत रे… तूला बुडू देणार नाही म्हणणारे ..बिनधास्त उडी मारायला लावणारे..आजही हेच हात माझ्या सोबतीला आहेत…मी नशीबवान आहे..त्यामुळं हाफ काय आणि फुल्ल काय ? मॅरेथॉन धावतोच कोण…?

दोस्तांसोबत उंडरतोय आजही..

जागा बदलत राहते म्हणून काय झालं…यार तो वही है पुराने ..कमीने साले…!

आयुष्यात आरोग्य ही महत्त्वाची संपत्ती आहे. मान्य आहे, पण त्यापेक्षा  मोठ्ठी संपत्ती आहे,,,

ही दोस्तं लोग..

आणि म्हणून …मन आपसूकच गुणगुणत जातं..

” एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तो..

ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तो..”

 

(लेखक यवतमाळचे निवासी जिल्हाधिकारी आहेत)

9822730412

Previous articleआठवणींना शाप असतो न विसरण्याचा!
Next articleकळे न हा चेहरा कुणाचा ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. आपण जेंव्हा मोठे होतो आणि जबाबदाऱ्या वाढत जातात, तेंव्हा ‘ लहानपण देगा देवा” ची आठवण निश्चित येते. जबाबदाऱ्या येण्यापूर्वीच्या आठवणी वरहाडे सरांनी कथन केल्या, त्या प्रत्येकाच्या जीवनात कमी अधिक प्रमाणात नेहमीच डोकावतात. मित्र जर अधिकारी झाला तर त्याला सर म्हणणारे खूप मिळतात, पण केवळ वर्ग मित्र, आणि बालपण चे मित्र जेंव्हा त्या अधिकाऱ्याला नावाने आणि आरे कारे म्हणून संबोधित करतात, तेंव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो. वरहाडे साहेबांनी नेहमीच मित्र मंडळी गोळा करण्यात यश मिळविले, आणि मैत्री टिकवली, ही त्यांची खासियत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here