-अशोक मानकर
हो ना करता अखेर आम्ही तिघांनी त्या अत्यंत जुनाट आणि कैक वर्षांपासून कुणीच राहत नसलेल्या डाकबंगल्यात मुक्कामी जायचा निर्णय घेतला.
कटरी या दीडशे लोकवस्तीच्या गावातून पश्चिमेला अरुंद रस्ता जातो.
पुढे टेकडी आहे.
तिच्या पायथ्यानं पुढे गेलं की दाट जंगल लागते. इथून दोन किमी अंतरावर मोकळ्या जागेत हा डाकबंगला आहे.
त्याच्या चारी बाजूंना गंज चढलेल्या तारांचं कुंपन आहे. मधे फाटक आहे. ते ही गंजलेलं आहे आणि त्यावर जागोजाग खपल्या धरल्या आहेत.
समोरचा मोकळा भाग सोडता बाकी तिन्ही बाजूंनी डाकबंगला गर्द झाडीनं वेढलेला आहे.
आम्ही निघालो तो अमावस्येचा दिवस होता.
कटरीच्या अलीकडे केथल नावाचं गाव लागते.
गावात तीस चाळीस घरं आहेत.
आम्ही अंथरुणे पांघरुणे सोबत घेतली होती. बॅटरीचे दिवे घेतले होते आणि जेवायचा डबाही घेतला होता.
पण मुक्कामी थांबायचं तर डाकबंगल्याची स्वच्छता करून घेणं गरजेचं होतं.
यासाठी कटरीतला कुणी माणूस शोधावा तर ती अशक्यप्राय गोष्ट होती.
कारण तुम्ही लाख रुपये देऊ केले तरी साफसफाईच काय डाकबंगल्यात पाय ठेवायलाही इथलं कुणीच तयार होत नाही.
म्हणून आम्ही केथलमध्ये गेलो आणि कामासाठी कुणी गडी मिळतो का ते शोधू लागलो.
साधारण पंचेचाळीशीतला माणूस मिळाला.
तो फार कमी बोलणारा होता. पण त्यानं अट टाकली.
साफसफाई झाल्यावर दिवस मावळायच्या आत मला परत आणून सोडावं लागेल.
आम्ही ते कबूल केलं.
त्याला घेऊन आमची गाडी डाकबंगल्याकडे निघाली.
कटरी ओलांडून काहीच वेळात आम्ही डाकबंगल्यासमोर आलो.
लोखंडाचा सांगाडा झालेलं फाटक उघडलं. गाडी आत घेतली.
आत जाऊन सगळं पाहून घेतलं.
किचनपासून बाथरून संडास आणि झोपायला दोन मोठी दालनं होती. दालनात दोन सागवानी पलंग होते.
पण ते इतके जुनाट होते की झोपणं दूर त्यावर बसावसंही वाटत नव्हतं आणि तिथं जे जे काय होतं ते सगळं भग्नावस्थेत होतं.
लोखंडी सामान तर सडायला आलं होतं.
आवारात डावीकडे हापशी होती.
आम्ही गाडीतून बादली गुंडी मग्गा आदी साहित्य काढून गड्याच्या सुपूर्द केलं आणि त्याला डाकबंगला होता होईल तेवढा स्वच्छ करायला सांगितला.
गड्यानं होकारार्थी मान हलवली.
तो धोतर कमरेला खोचून कामाला लागला.
दुपारचा एक वाजत होता.
आम्हाला आता वेळच वेळ होता.
आमच्यापैकी आम्ही दोघे गाडीत पहुडलो.
आमचा तिसरा मित्र आवारात फेरफटका मारायला गेला.
उजवीकडे उंच गवत वाढलेलं होतं. मित्र त्यात घुसला. घुसताच त्यानं आम्हाला हाक मारली.
आम्ही जाऊन पाहतो तर तिथं एक थडगं होतं.
त्या भंगलेल्या थडग्यावर मारिया स्मिथ १८८९ असं सिमेंटमध्ये कोरलेलं होतं.
पूर्वी इथं ब्रिटिश राहत असावेत. त्यातली ही स्त्री इथं मरण पावली असावी असं आम्ही अनुमान काढलं.
पाचच्या सुमारास गड्याची साफसफाई पूर्ण झाली.
ठरल्याप्रमाणे आम्ही तिघंही गाडीत बसलो आणि त्या गरीब माणसाला ठरवले होते त्यापेक्षा शंभर रुपये अधिक चुकते करून पोचवायला निघालो.
परत आलो तेव्हा दिवस मावळतीला आला होता.
आम्ही आवारातच सतरंजी अंथरली.
त्यावर जेवणं आटोपली.
नंतर शतपावली करू लागलो.
थोडा वेळ असाच गेला.
मग अंधार पडू लागला.
एकट दुकट रातकिडा बाहेर येत होता आणि समूहगान सुरू होण्यापूर्वी सरावाचा भाग म्हणून स्वर आवळून पाहत होता.
आम्ही बॅटरिचा दिवा पेटवला.
आवाराचं फाटक जमेल तसं बंद करून घेतलं.
कारण या टापूत रात्री वन्य श्वापदांचा स्वैर वावर असतो हे आम्हाला ठाऊक होतं.
मग आत येऊन आम्ही वळकट्या अंथरल्या.
दालनाचं दार कसंबसं आतून बंद करून घेतलं.
दिवा तसाच ठेवला आणि अंगावरून चादरी ओढून घेतल्या.
दरम्यान झाडून सगळ्या रातकिड्यांचे समूह तारस्वरात ओरडू लागले होते.
लगतच्या झाडीतून खसफसण्याचे, कुणीतरी हळूवार पावलं टाकत चालल्याचे आवाज येत होते.
आम्हाला झोप येत नव्हती.
मग अकराच्या नंतर केव्हातरी आमचा डोळा गुरमाळला.
अचानक आम्ही तिघेही दचकलो.
खाडकन उठून बसलो.
बहुतेक तो बारा एकचा सुमार असावा.
बाहेरून कुणीतरी दाराची कडी वाजवत होतं.
………………..
अशा अपरात्री आणि ते ही बारा एकच्या सुमारास दाराची कडी कोण वाजवतंय म्हणून कितीही म्हटलं तरी आम्ही थोडे चरकलोच.
मुळात माझे दोन्ही मित्र विज्ञान शाखेचे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिवाय पीएचडी.
माझं म्हणाल तर माझाही अशा गोष्टींवर विश्वास नाही.
पण आता आमची सत्त्वपरीक्षा दारावर आली होती.
दाराची कडी वाजत होती.
काय करावं ते कुणालाच सूचत नव्हतं.
यातच आमच्या सिनिअर मित्रानं जरा मोठ्या आवाजात विचारणा केली, “कोण आहे?”
बाहेरून प्रत्युत्तर आलं नाही.
पण कडी वाजणं थांबलं.
आम्ही तिघेही कान टवकारून बाहेरच्या हालचालींचा वेध घेत होतो.
दोन तीन मिनिटे अशीच गेली.
पुन्हा कडी वाजवली गेली.
मित्रानं पुन्हा विचारणा केली, “अरे कोण आहे, सांगाल की नाही?”
उत्तर येत नव्हतं.
कसलातरी आवाज ऐकू आला.
कुणी वाळलेल्या काटक्या तोडाव्या तसा.
रप्पकन काहीतरी खाली पडल्याचं जाणवलं.
हा ध्वनी दगड पडल्यावर येतो तसा होता.
नंतर काही क्षण शांतता पसरली.
काही वेळानं कुणीतरी चालत गेलं.
त्या पावलांनी पालापाचोळा वाजला.
रातकिड्यांच्या किरकिराट चरम सीमेवर गेलेला होता.
मागच्या झाडीतून खॉक्क ख्यॅक असे आवाज उठले. ते बहुधा प्राण्याचे असावेत.
मग पुन्हा शांतता पसरली.
रातकिड्यांचा अॉपेरा सोडला तर दुसरा कसलाच आवाज नव्हता.
पुन्हा कडी वाजते का त्याची आम्ही बरीच वाट पाहिली.
पण ती वाजली नाही.
मग बरेच सैल होत आम्ही अंगावरून चादरी अोढल्या आणि अंगे टाकली.
सगळं लक्ष दाराकडे होतं.
झोप येत नव्हती.
पहाटे केव्हातरी आम्ही तिघेही झोपी गेलो.
जाग आली तेव्हा सूर्य उगवून बराच वर आलेला होता.
त्याची किरणे दाराच्या फटीतून आत आली होती.
आम्ही अंगांना आळोखे पिळोखे देत उठलो.
अंथरुणे आवरली. दार उघडून बाहेर आलो.
बाहेर मन प्रसन्न करणारा वारा सुटला होता.
पलीकडच्या बहाव्याच्या झाडावर सातबायांचा कलकलाट सुरू होता.
आम्ही हापशीवरून बिसलेरीच्या बॉटल्स भरल्या आणि हातोहात फाटक उघडून लगतची झुडपं शोधली.
तिकडून आल्यावर साबणीनं हात धुतले. तोंडं धुतली.
आणि मग हापशीवर अंघोळी केल्या.
हापशीच्या बाजूची काटेरी झुडपे धुळीनं माखलेली होती. ती पाणी मारून स्वच्छ केली. ओलेती वस्त्रे सुकण्यासाठी त्यावर टाकली.
आता मस्तपैकी चहा हवा होता.
कपडे सुकल्यावर आम्ही कटरीला जायचं योजत होतो.
तोच आमच्या सिनिअर मित्राचं लक्ष कटरीकडून येणार्या रस्त्याकडे गेलं.
मित्रानं तिकडे बोट दाखवत आम्हाला खूण केली.
कालचा केथलमधला माणूस येत होता.
त्याच्या हातात पिशवी होती
आम्ही बुचकळ्यात पडून त्याच्याकडे पाहू लागतो तोवर तो सरळ आमच्याकडे आला.
आत येत त्यानं हात जोडले. “रामराम जी साहेब.”
त्याचं नाव बछुवा होतं.
त्याला हिंदी पण नीट बोलता येत नव्हतं. बोलण्यात मधेच त्याच्या बोलीतले शब्द येत.
अरे. तू अचानक नि न बोलावता कसा काय आलास?
असं विचारल्यावर त्यानं उत्तर दिलं. मी तुम्हाला चहा करून द्यायला आलो आहे.
आम्हाला पुढे बोलायला संधी न देता तो हापशीजवळ गेला. बाजूचे तीन दगड उचलून आणले आणि ते मोकळ्या जागेत मांडले. कुंपणाजवळच्या वाळक्या झुडपांच्या काटक्या तोडून आणल्या. पिशवीतून पातेलं काढलं.
चहाच्या सामानाच्या दोन पुड्या काढत त्यानं आम्हाला म्हटलं, “चाय बिगर दूध चलेंगा ना शाब?”
कारण मी दूध सोबत आणलं नाही, असं कारण देत त्यानं आमच्या उत्तराची वाट न पाहता काटक्या मोडून त्या दगडाच्या चुलीत लोटल्या.
सामानाच्या पुड्या सोडल्या.
आमचा सिनिअर मित्र त्याच्याजवळ गेला.
बछुवानं चहापत्तीची पुडी सोडली.
दुसरी गुळाची होती.
गुळाचा विचित्र वास येत होता.
शिवाय गूळ खूपच लालभडक होता.
त्यातून रक्त अोघळतं की काय असं वाटत होतं.
ते पाहून मित्र चरकला. त्यानं ताबडतोब त्याला मनाई केली. “आप पहले पूछ लेते तो अच्छा होता. क्यों की हम लोग चाय नही पिते.”
बछुवानं धांदलीनं गूळ पुडीत बांधून ती पुडी पिशवीत ठेवली.
पण त्यानं आग्रह केला. माझ्या हातचा चहा एकदा घेऊन तर बघा. असा चहा तुम्हाला कुठंच मिळणार नाही. असं तो म्हणू लागला.
तिकडे दुर्लक्ष करत आम्ही तिघेही लगबगीनं गाडीपाशी आलो.
सिनिअर मित्र आम्हाला इशारा करत हळूच पुटपुटला, “आता इथून लवकर निघालेलं बरं!”
आम्ही त्वरेनं आपापल्या सिटांवर बसलो.
तो लगबगीनं आमच्याजवळ आला नि म्हणाला, चहा नाही तर जेवण करून जा शाब लोक. मी कटरीतून शिदाआटा घेऊन येतो. रानातली करडीची भाजी आणतो. इथं दगडावरच रांधतो. तुम्ही माझ्या हातचं जेवून तर बघा.
पण आम्ही ते नाकारलं.
मित्रानं चावी लावून इंजिन सुरू केलं.
आम्ही काचा वर करू लागलो तसं त्यानं आम्हाला दोन मिनिटं थांबायची विनंती केली.
“शाब भूखा मत जाना.” असं म्हणत त्यानं सांगितलं, “मै रात को भी यहां आया था. दरवाजा खटखटाया. आप को भूक लगी होंगी इसलिये आया था शाब. पन तूम लोग सोये थे शायद.”
मित्रानं गाडी सुरू केली. काचा वर नेल्या.
मागे पाहतो तर बछुवा दुडक्या गतीनं आमच्या मागोमाग घावत येत होता. अोरडत होता, “शाब, तुमकू मारिया मित का कहानी सुनाना रय गया शाब… रुको शाब… मै बताता ना शाब…”
आम्ही सुसाट वेगात गाडी दामटली.
पुढे आमच्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे याची त्यावेळी आम्हाला सुतराम कल्पना नव्हती.
पण काहीतरी घडणार होतं.
…………….
आमची गाडी सुसाट निघाली होती. चालक मित्र वगळता आम्ही दोघे मागे पाहत होतो.
बछुवा पाठलाग करत होता.
पण त्याची चाल दुडकी असल्यामुळे गाडीच्या वेगात पळणं त्याला शक्य नव्हतं.
काहीच वेळात गाडी कटरीत येऊन पोचली आणि आम्ही सुटकेचा श्वास घेतला.
एकदा मागं पाहून घेतलं.
गावात तुरळक माणसं बाहेर दिसत होती.
आम्ही कुठं चहा मिळतो का ते पाहू लागलो.
एका झोपडीवजा घरात किराणा सामानाचं छोटसं दुकान होतं.
उघड्या अंगाचा बुटका दुकानदार दुकानात बसलेला होता.
तिथं जाऊन आम्ही त्याला चहा बनवून देणार का विचारलं.
त्यानं हाक मारून घरातून बायकोला बोलावलं आणि तीन कप चहा करायला सांगितलं.
घरासमोर लिंबाचं झाड होतं. बुंध्याशी एक खाट उभी केलेली होती. दुकानदारानं अगत्यानं ती टाकून दिली आणि आम्हाला बसायला सांगितलं.
चहा पिताना आम्ही त्याला विचारल-
“वो आगे जो डाकबंगला है, वहां कोई रहता है क्या?”
“मालूम नही साहब.” त्यानं त्रोटक उत्तर दिलं.
“आप लोग जाते हो वहां?”
“नही.”
“क्यों?”
“ऐसेईच.” तो अधिक बोलायला अनुत्सुक दिसला. “नही जाते.”
“बाहर से कोई आते है वहां?”
“पता नही.”
“कुछ खतरा है क्या?”
“पता नही साहब.”
“उस जगह की देख- भाल किसके तरफ है?”
“पता नही.”
“तो पता क्या है?”
“जाने दो ना साहब.” त्यानं विनंती केली. “जिससे कोई मतलब नही वह बात पुछते क्यों हो?”
“अच्छा अब आखरी सवाल” सिनिअर मित्र त्याला म्हणाला, “हम लोग वहां गये तो क्या होगा?”
“मत जाना.” त्यानं अंगाला शहारा देत मनाई केली. “वहां से कोई वापिस नही आता. ऐसा सुना है हम लोग.”
आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहू लागलो.
त्याला पैसे दिले. लगेच तिथून निघालो.
थोड्याच वेळात केथल आलं.
उन चटचटू लागलं होतं.
एका लेकुरवाळ्या घराच्या पडवीत खाटेवर एक म्हातारा बसलेला होता.
मी मित्राला गाडी थांबवायला सांगितली.
आम्ही तिघेही उतरून त्याच्याजवळ गेलो.
“रामराम.”
“रामराम जी.” त्यानं हात जोडले. थोरल्या नातवाला दुसरी खाट टाकायला सांगितली आणि आम्हाला विचारलं, “स्कूल के साहब हो क्या?”
“नही.” आम्ही सांगितलं. “बस ऐसे ही घुमने आये थे.”
“बाबाजी-” मी विचारलं, “आपकी उम्र क्या होगी?”
त्यानं हात उडवले. “कौन को पता? पर सत्तर एक होगा.”
“आपके गाव के जो लोग है, उन सबको आप पहचानते होगे.”
“गाव है ही कितना!” तो हसला. “सबको पहचाने मै.”
“यहां बछुवा नाम का कोई बंदा रहता है?”
तो विचारात पडला.
मग काहीतरी आठवत म्हणाला, “इस नाम का अभी तो कोई नही. पन पहले था और उसको मरे अब पच्चीस तीस साल बित चुका है.”
आमच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला.
“उसका शक्ल सूरत कैसा था?” माझ्या तोंडून निघालं.
“अचा था. धोती पेनता था…” पुढे म्हातार्यानं जे वर्णन केलं ते आम्ही भेटून आलेल्या बछुवाशी तंतोतंत जुळणारं होतं.
“वह मरा कैसा लेकीन?” आमच्या दुसर्या मित्रानं विचारलं.
“आगे डाकबंगला है. वहां पहले अंग्रेज लोग रहता था. बाद मे कोई नही रहा. ये बछुवा वहां जाता था. घास काटने. कहते है वहां उसे कोई लडकी मिली. ये जाता था तो रात रात भर वापिस नही आता था. फिर एक दिन बछुवा वहां मरा पडा दिखा.”
“ऐसा क्या हुवा की-“
“वो लडकी चुडैल थी कहते. उसीने इसे मारा.”
आम्ही पुढचं काही विचारणार होतो. पण तेवढ्यात म्हातार्याकडे गावातली दोन माणसे आली. तो त्यांच्याकडे वळला आणि आम्ही तिथून निघालो.
रस्त्यात आमच्यात बरंच काही बोलणं झालं.
बछुवाचं ते भूत होतं तर त्यानं आपल्याला अपाय का केला नाही?
दुपारपर्यंत आम्ही बैतुलला पोचलो.
तिथल्या हॉटेलमध्ये जाऊन एक रुम बुक केली. कारण आम्ही बरेच थकलो होतो आणि थोडा आराम आवश्यक होता.
चारला उठून परतीला निघायचं नियोजन होतं.
पण अंगे टाकताच आम्हाला गाढ झोपा लागल्या.
जाग आली तेव्हा चक्क रात्रीचे दहा वाजत होते.
दरम्यान भुकाही लागल्या होत्या.
आम्ही जेवण करून निघायचं ठरवलं.
निघायला अकरा वाजले.
गाडी परतवाड्याच्या दिशेनं भरधाव जात होती.
रस्त्यानं वर्दळ नव्हती.
एखाद दुसरं वाहन येत जात होतं.
बाराचा सुमार असावा.
किट्ट काळोख होता.
रातकिडे उच्चरवात ओरडत होते.
आता रस्ता अगदी सामसूम होता.
ते पाहून मित्रानं गाडीचा वेग वाढवला.
समोर वळणाचा रस्ता होता.
वळसा येताच मित्रानं गर्रकन स्टेअरिंग व्हिल फिरवलं.
आणि अचानक पायात असेल नसेल ते बळ एकवटून त्यानं ब्रेक लावले.
टायर्सचा केवढ्यानं तरी चरचराट झाला.
आम्ही समोर पाहतो तर रोडच्या मधोमध पांढरा शुभ्र पायघोळ झगा परिधान केलेली एक मुलगी बसलेली होती.
ती उकिडवी बसलेली होती आणि आपलं मुंडकं तिनं दोन गुडघ्यांच्या मधे घातलेलं होतं.
……………..
त्या किट्ट काळोखात रात्रीचे बारा वाजता रोडवर गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली ती मुलगी पाहून आमच्या मित्रानं गाडीला करकचून ब्रेक घातला खरा.
पण आता काय होणार?
आमची अवस्था न सांगितलेली बरी.
पण चालक मित्राला कुठून सुबुद्धी सुचली कोण जाणे, त्यानं ब्रेक तर घातलाच पण दुसर्याच क्षणी गाडी न थांबवता ती गर्रकन तिच्या डाव्या बाजूनं काढली.
मग जमेल तेवढं ॲक्सीलरेटर वाढवून त्यानं ती प्रचंड वेगात पुढे दामटली.
आमच्यापैकी कुणीच मागं पाहत नव्हतं.
वार्याशी स्पर्धा करत आमची गाडी पाचेक किमी पुढे गेली.
कुठलसं गाव लागलं.
रस्त्यालगत असल्यानं थांब्यावर सटरफटर हॉटेल्स होती.
त्यातलं एक उघडं दिसलं.
मालक सगळी आवरासावर करून ते बंद करण्याच्या बेतात होता.
मित्रानं गाडी थांबवली.
खाली उतरून आम्ही मागं पाहिलं. मग हॉटेलमधे गेलो. मालकाला चहा मिळेल का विचारलं.
त्यानं होकार दिला.
चालक मित्रानं खिशातून मोबाइल काढत आम्हाला म्हटलं, “इथं माझा एक स्टुडंट राहतो. त्याला फोन करतो. आता रात्रभर त्याच्याकडे थांबू. सकाळी निघू. तेच बरं राहील.”
फोन करताच विद्यार्थी लगबगीनं तिथं आला.
तो शेतकरी पूत्र होता.
त्यानं आम्हाला आनंदानं घरी नेलं. घरच्यांना उठवून आम्हाला जेवायचा आग्रह केला.
मित्रानं त्याला फक्त झोपायची व्यवस्था करायला सांगितलं.
सकाळी आम्ही लवकरच उठलो आणि परतवाड्याकडे निघालो.
चालक मित्र तिथलाच होता. त्याच्याकडे जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊन चहा नाश्ता केला.
सिनिअर मित्र म्हणाला, “आता सरके अमरावतीले जाऊन डाक्तर xxx च्या घरी जाऊ.”
हे डॉक्टर म्हणजे अमरावतीतले प्रख्यात मानसोपचार तज्ञ होते नि ते मित्राचे चांगले परिचित होते.
आम्ही अमरावतीकडे निघालो.
सिनिअर मित्र म्हणू लागला. “लोकं सायाचे म्हंतात भूत नसते. मंग हे काय होतं? चाला डाक्तरलेच विचारू.”
दीड तासानंतर आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये होतो.
त्यांनी प्रतीक्षेत असलेले रुग्ण तात्पुरते थांबवून आम्हाला आत बोलावून घेतलं होतं.
अगत्यानं चहा बोलावला होता.
चहा घेत घेत सिनिअर मित्रानं काय काय नि कसं कसं घडलं ते त्यांना सांगितलं.
डॉक्टर त्या दोघांचे परिचित होते. मला काही ते अोळखत नव्हते. मित्रानं तिखटमीठ लावून माझा परिचय दिला.
सगळं ऐकून झाल्यावर त्यांनी निर्वाळा दिला. अगोदर त्यांनी चालक मित्राकडे पाहिलं. “हे लेखक आहेत.”
मग सिनिअर मित्राकडे पाहिलं. “आणि अलीकडे तुम्ही पण लिहू लागलात.”
नंतर ते माझ्याकडे वळले. “आणि हे तर जुने जाणते लेखक आहेत.”
त्यांनी पुढे म्हटलं. “लेखक स्वप्नाळू असतो. स्वप्न पाहिल्याशिवाय तो लिहूच शकत नाही. माणसाच्या मेंदूत एक भ्रमाचा कप्पा असतो. तो वाईटच असतो असं नाही. पण तुम्ही जे पाहून अनुभवून आले म्हणता ते सगळं भास या प्रकारात मोडते.”
याचं त्यांनी मग सविस्तर स्पष्टीकरण दिलं.
आम्ही खाली माना घालून तिथून निघालो.
सिनिअर मित्राच्या घरी गेलो.
मला आता प्रकर्षान घरी जायचे वेध लागले होते.
पण जेवण करु न देता जाऊ देणारा तो मित्र कसला!
आम्ही जेवणं केली.
मग या दोन्ही मित्रांनी मला गाडीतून राजापेठ बसस्थानकावर आणून सोडलं.
बस उभीच होती.
मी डावीकडच्या आसनावर बसलो नि ती निघाली.
मित्रांना बाय बाय केलं.
बसनं अमरावती अोलांडलं.
ती बडनेरा स्थानकात शिरली.
दोन मिनिटे थांबली.
दोन तीन प्रवासी गाडीत चढले.
कंडक्टरनं घंटी वाजवली.
बस निघाली तेव्हा सहज म्हणून मी बाहेर पाहिलं.
आटो उभे असतात तिथं कुठल्यातरी खेड्यावरच्या पाच सहा महिला कलकलाट करत उभ्या होत्या.
त्यांच्या मागे पांढरा शुभ्र वन पीस परिधान केलेली एक मुलगी उभी होती.
त्या गोर्या भुर्या आणि दिसायला अत्यंत सुंदर असलेल्या मुलीचे केस पिंगट सोनेरी होते. त्यांची तिनं बुची बांधलेली होती.
गंमत म्हणजे ती माझ्याकडे एकटक पाहत होती.
मी तिला निरखून पाहायला जातो तर बस पुढे निघाली.
पुढे लोणी आलं.
बस थांबली.
माझं लक्ष हिंगलासपूर रस्त्याकडे गेलं.
पाहतो तर रस्त्याच्या बाजूला तीच मुलगी उभी!
माझ्याकडे पाहून ती गालात हसत होती.
मी अस्वस्थ झालो.
त्यातच बस निघाली.
पुढे धनज आलं तेव्हा मी कटाक्षानं बाहेर पाहणं टाळलं.
नंतर कामरगाव आलं.
कंडक्टरच्या घंटीसरशी बस थांबली.
मी बाहेर न पाहता खाली मान घातली.
डबल घंटी होताच बस पुढे निघाली.
कामरगाव अोलांडताना डावीकडे रस्त्यालगत काही लिंबाची झाडं आहेत.
गाव मागं गेलं म्हणून मान वर काढून मी तिकडे पाहिलं.
पाहतो तर एका झाडामागे ती उभी होती!
यावेळी ती हात उंचावून मला बाय बाय करत होती आणि तिच्या चेहर्यावर गूढ हसू होतं.
बाप रे!!!
मी गावी आलो.
टी पॉइंटवर उतरून घराकडे निघालो तेव्हा माझी नजर भिरभिरत होती.
मी सारखा इकडेतिकडे पाहत होतो.
पण तसं काहीच दिसलं नाही.
घरी आलो.
घरच्या कामात गढून गेलो.
नंतर काही कामानं बाहेर गेलो की माझी नजर सारखा शोध घेत राही.
भाजी आणायला गेलं असं वाटायचं, ती दूर कुठं उभी तर नसेल?
किराणा दुकानातही मी इकडेतिकडे पाही.
एवढंच काय पीठगिरणीवर दळण घेऊन गेलो तरी माझं लक्ष लगतच्या झाडाझुडपांकडे नि लोकांकडे जात असे.
पुढचे काही दिवस असेच तणावात गेले.
पण सुदैवानं काहीच घडलं नाही.
नंतर मी माझ्या रहाटात व्यस्त होऊन गेलो.
ती स्मृती धूसर होऊ लागली.
हां हां म्हणता महिना होत आला.
आणि मग ती रात्र आली.
रात्रीचं जेवण आटोपून नेहमीप्रमाणे मी व्हरांड्यातल्या झोपाळ्यावर झोके घेत बसलो होतो.
कानात हेडफोन घालून मोबाइलमधली गाणी ऐकत होतो.
रात्री मी साधारणत: साडेअकराला झोपतो.
पण त्या रात्री कळत न कळत बारा वाजले.
झोके आवरते घेत झोपाळ्यातून उठायला जातो, अशात माझा मोबाइल वाजला.
ऑन करून मी तो कानाला लावला. “हलो.”
“Mr. XXX XXXX speaking?” आवाज मुलीचा होता आणि फारच मधुर होता.
“Yeah.” मी सावरून बसलो. “You?”
“I will tell you. But please don’t cut the call.”
“Why? And who are you?”
“Will tell you, sir. But you wouldn’t cut the call after telling that, right?”
मी आजूबाजूला पाहिलं.
“You’re listening sir,” ती म्हणाली, “aren’t you?”
“Yeah, but you- ” आज अमावस्या तर नाही? माझ्या मनाला शंका चाटून गेली.
ती हळूच उदगारली, I’m Maria, Sir.
………………
तिकडून फोनवर तिनं मारिया असल्याचं सांगताच मी ताडकन उडालो आणि मला दरदरून घाम फुटला.
काय बोलावं ते सूचेना झालं. “अं, I want to know why you are chasing me?” मी कसंबसं विचारलं.
“Yeah.” ती अत्यंत अदबीनं उत्तरली, “surely.”
“Tell me.” मी अंगात धिटाई आणली. “Why are you following me? Have you any problem from me?”
माझं इंग्रजी जेमतेम असल्यामुळे नंतर मी तोडकंमोडकं बोलू लागलो. पण मी मग चिडलो. “आणि मला मारायचं आहे का तुम्हाला? तसं असेल तर- “
माझं कच्च इंग्रजी पाहून की काय ती मराठीत बोलू लागली.
“मी का मारेल सर तुम्हाला?” तिला वाईट वाटलं आणि ती त्वेषानं म्हणाली, “उलट कुणी तुम्हाला मारायला आलं असतं नि शक्य झालं असतं तर मी त्याला मारलं असतं.”
“म्हंजे तुम्ही कुणाला मारत नाहीत?”
“Nope sir.” ती दु:खी कष्टी झाली. “आम्हा लोकांना उगीच बदनाम केलं गेलं आहे. तसं असतं तर मानव जातीतला एकही खुनी जिवंत नसता राहिला. साध्या भोळ्या लोकांना गंडवणार्यांची खैर नसती. मुली महिलांना त्रास देणारे नावाला उरले नसते. पण झालं आहे असं कधी? आमचं वास्तव्य स्मशानात असते. पण स्मशानात गूढरित्या कुणी मारल्या गेलंय का कधी? खूप व्यथा आहेत सर आमच्या. पण सांगणार कुणाला? जे देवाला मानतात ती श्रद्धा म्हणविली जाते आणि ज्यांचा आमच्या असण्यावर विश्वास असतो ती अंधश्रद्धा म्हटली जाते. असं बरंच काही आहे. असो.”
तिचं बोलणं ऐकून मला हायसं वाटलं. “म्हंजे मला तुमच्याकडून कसलाच धोका नाही?”
“Nope sir. आणि मला अहो काहो नका म्हणू. तू म्हणा.”
“ok. पण मी निश्चिंत राहू ना?”
“Yeah sir.” अशी ग्वाही देत तिनं नाराजी व्यक्त केली. “आणि सर तुम्हाला काही करायचं असतं तर मी डाकबंगल्यावरच केलं नसतं का? पण झालं का तसं काही?”
“हूं. आणि तो बछुवा? तो का मागं लागला होता आमच्या? तो तर तुझाच माणूस होता ना?”
“Yeah. तो माझाच माणूस होता. पण माझ्या घरचं माणूस म्हणून नव्हे.”
“मग?”
“He is my servent.”
“मग त्याला आदेश-“
“मीच दिला होता.”
“कशाला?”
“ते सगळं सांगते मी. But one by one. अगोदर माझ्याबद्दल सांगते. थोडक्यातच सांगते. Edward Smith आणि Alexandra यांची मी एकुलती एक मुलगी.
वडील ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीत या प्रांताचे Deputy commissioner होते. कटरीचा डाकबंगला गव्हर्नरकडून त्यांना खास विश्रांतीस्थळ म्हणून देण्यात आलेला होता.
इथं आल्यावर नंतरच्या खेपेला ते आईला नि मला सोबत घेऊन आले. हा देश त्यांना खूप आवडला होता.
त्यांनी रितसर मला सिमल्याच्या स्कूलमध्ये दाखल केलं.
सुटीत मी घरी यायचे तेव्हा ते मला नि आईला घेऊन डाकबंगल्यात यायचे.
तिथं आम्ही एकेक आठवडा राहायचो.
एकदा काय झालं, की त्या आवारात तेव्हा खूप मोठमोठी झाडं होती. आईवडील आत असल्याचं पाहून मी एका झाडावर चढले. बरीच वर गेले. आणि एकाएकी तोल जाऊन खाली पडले.”
“अरे!”
“Yeah. खाली लोखंडी पाइप ठेवलेले होते. माझं डोकं एका पाइपवर आदळलं. मेंदूला गंभीर इजा झाली. त्यात माझा मृत्यू झाला.”
“अरे.” मी हळहळलो. “सो सॅड.”
“Yeah sir. मग मी भूत बनले. I means हडळ.”
काही क्षण शांततेत गेले.
मग मी तिला विचारलं, “आणि त्या बछुवाचं काय?”
“तो खूप गरीब माणूस होता. पण हकनाक जिवानं गेला बिचारा.”
“काय झालं होतं त्याचं?”
“पुढच्या काळात डाकबंगला ओस पडला.” ती सांगू लागली. “नंतर त्या ठिकाणी फक्त माझं वास्तव्य होतं. बछुवा तिथं गवत कापायला यायचा. नेहमीप्रमाणे तो त्या ही दिवशी आला. आला नि गवत कापू लागला. पण, तो दिवस अमावस्येचा होता.”
“ohh.”
“होय. इतर दिवशी आम्ही लोकांना दिसत नाही. पण अमावस्या याला अपवाद असते.”
“कशी काय?”
“तुमचे half and full holidays असतात ना Saturday, Sunday. तसे आमचे अमावस्या नि पौर्णिमा डे असतात. अमावस्या ही तर पर्वणी असते आमच्यासाठी. खूप खूष असतो आम्ही या दिवशी. इच्छा झाली तर या दिवशी आम्हाला देह धारण करण्याची मुभा असते. ती दीड दिवसही घेता येते. But we can decide when to appear. तर त्या दिवशी मी देह धारण करून आवारात आले. आले नि बछुवाला दिसले.”
“मग?”
“मग काय? मला पाहून त्याची बोबडी वळली. फार भित्रा निघाला तो. क्षणात खाली पडला नि गतप्राण झाला.”
“बाप रे. ही स्टोरी आहे तर बछुवाची.”
“Yeah. मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी. पण काय करू शकत होते मी? nothing else. मग तो ही भूत बनला. आता माझा सेवक म्हणून काम करतो.”
“मग त्या दिवशी-“
“सांगते. त्या दिवशी तुम्ही डाकबंगल्यावर येणार आहात हे ऐकून मला इतका आनंद झाला सर, की विचारू नका.”
“आनंद झाला?” मी गडबडलो. “आणि तुला ते-“
“Yeah sir. आमच्याशी संबंधित सगळी माहिती असते आमच्याकडे. नि ती आम्हाला अगोदरच माहिती होते. Its the part of our communication.”
“बाप रे.”
“होय. मग तुम्ही येणार आणि डाकबंगला तर कमालीचा अस्वच्छ झालेला. अनायसेच तो साफ करायला तुम्ही माणूस शोधायला केथलमध्ये गेला नि ती संधी साधून मी बछुवाला तिथं पाठवून दिलं. माझं भाग्य असं की त्या दिवशी अमावस्या होती.”
“साफसफाई तू पण करू शकली असतीस.” मी प्रतिप्रश्न केला. “त्याला का पाठवलं?”
“काय सर!” ती हसली. “मी जर कामवाली म्हणून तुमच्या समोर आली असती तर तुम्हाला शंका नसती का आली? ही गोरीभुरी ब्रिटीश मुलगी इकडे कशी काय म्हणून?”
“मग आम्ही येण्यापूर्वी तुला साफसफाई करता आली असती.”
“अहो सर-” ती पुन्हा हसली. “तसं झालं असतं तर ते पण शंकेचं कारण नसतं का ठरलं? की आपण येण्यापूर्वीच हे सगळं एकदम स्वच्छ कसं काय? तुमची समजूत झाली असती, हे भुताचंच काम दिसते नि तुम्ही तिथं मुक्कामी तरी थांबला असतात का?”
“अच्छा! हे लॉजिक होतं तर ते.”
“हां.”
“बरं आम्ही डाकबंगल्यात झोपल्यावर बछुवाला रात्री पाठवायचं कारण काय?”
“तुमची शक्य आहे ती खातिरदारी करण्याची जबाबदारी मी त्याच्यावर सोपवली होती. त्याला मी वारंवार बजावत होते, हे माझे गेस्ट आहेत. त्यांना काहीच कमी पडता कामा नये. त्या आदेशामुळे तो बिचारा रात्रभर पहारा देत राहिला. मग न राहवून तुम्हाला काही हवं का ते बघायला म्हणून त्यानं त्या अपरात्री कडी वाजवली.”
“पण आम्ही घाबरलो होतो त्यामुळे.”
“I know. आणि जसं ते माझ्या लक्षात आलं तसं मी त्याला मनाई केली.”
“आणि सकाळी त्याला चहा करायला पाठवलं तर त्यात तो गूळ-“
“मीच म्हणाले होते त्याला चहासाठी.”
“पण त्या गुळात तर रक्तासारखं काहीतरी-“
“नो. रक्त नव्हतं ते. त्याचं झालं असं, की बछुवानं तुम्हाला चहा तर करून दिला असता. तुम्ही तो प्यायले असते. पण तिथून परत निघताना तुम्ही बछुवाला परत चल म्हटलं असतं. तो आला नसता. कदाचित तुम्हाला शंका आली असती. तुम्ही केथलमध्ये जाऊन त्याची चौकशी केली असती. आणि तिथं तुम्हाला कळलं असतं की तो कधीचाच वर गेला आहे.”
“हूं.”
“मग ते ऐकून तुमच्या पोटातल्या चहाचं काय झालं असतं?”
मी कल्पना केली. “आम्हाला ओकार्याच झाल्या असत्या.”
“तेच तर. आणि तो सल तुमच्या मनात आयुष्यभर राहिला असता. सो जसा बछुवा चहा मांडायला गेला तसं माझ्या हे लक्षात आलं. मी त्वरित जवळच्या झाडावरचं मध काढलं. जवळच्याच जास्वंदीच्या फुलाचा रस पिळून त्यात टाकला नि हे मिश्रण गुळावर टाकलं. ते पाहून तुम्हा सर्वांना शंका आली आणि माझा जीव भांड्यात पडला. आणि हां सर, मी तिथं हजर होते. पण तुम्हाला दिसत नव्हते. of course मी शरीर धारण केलं नव्हतं.”
“अच्छा. हा प्रकार होता तर तो.”
“होय.”
“हे झालं बछुवाचं. पण-” मला ती रोडवर बसलेलं दृश्य आठवलं. “त्या दिवशी आम्ही बैतुलवरून येताना तू रस्त्याच्या मधोमध बसण्याचं कारण काय?”
“हां ते ना. त्या दिवशी मला प्रकर्षानं वाटत होतं, तुम्ही इतक्या लवकर तिथून येऊ नयेत.”
“कारण?”
“कारण मला तुमच्याशी खूप खूप बोलायचं होतं. त्या भावनावेगात मी त्या रस्त्याच्या मधोमध येऊन बसले. या धारणेनं, की मला पाहून तुम्ही खाली उतरून माझ्याजवळ याल. माझी प्रेमानं वास्तपुस्त कराल.
आणि मी मग मला जे सांगायचं होतं ते तुम्हाला सांगेल.” ती काहीशी भावविभोर झाली. “मी हडळ असले म्हणून काय झालं? फिमेल तर आहेच ना. आणि मानव जातीतल्या फिमेल मनाला असतात त्या भावना आम्हालाही आहेत. म्हणून मी तसं करून पाहिलं.
पण तुम्ही थांबला नाहीत आणि माझी चूक माझ्या लक्षात आली.”
मी पुढचा प्रश्न केला, “आणि त्या दिवशी मी अमरावतीवरून निघालो तर माझा पाठलाग कशासाठी करत होतीस?”
“तुम्ही अमरावतीवरून निघालात ना, तेव्हा तुमच्या बाजूला बसून प्रवास करायचा विचार होता माझा.”
“बाप रे.”
“होय सर. पण मी ते टाळलं. कारण मला जे बोलायचं आहे ते बसमध्ये बसून शक्य नव्हतं. पण माझं अनावर मन मला तुमच्या मागे मागे नेत राहिलं.”
“ते कशासाठी?”
“हे पाहायला की तुम्ही सुरक्षित जाताय ना.”
“ओह.”
“पण ते तुम्हाला आवडलेलं दिसलं नाही. म्हणून मी कामरगावपर्यंत आले नि तिथून परत गेले.”
“हूं.”
“सर आता मुद्द्यावर येते. तत्पूर्वी एक सांगू का?”
“काय?”
“तुमचे ते दोन मित्र आहेत ना. खूप चांगले लोक आहेत ते. अशी माणसं मोजकीच असतात.”
“यात शंकाच नाही.”
“पण सर, त्या दोघांपेक्षा मला तुम्हीच अधिक आवडता.”
“अय पोरी.” मी वर्हाडीवर घसरत तिच्यावरही घसरलो. “काय बोलून रायली तू?”
“सर सर सर.” तिनं मला रोखलं. “Please d’ont misunderstand. त्या दोघांत आणि तुमच्यात एक फरक आहे.”
“कुठला?”
“कबूल की ते दोघे पण लिहितात.”
“हो मग?”
“पण त्यांनी एक तरी भुतावरची गोष्ट लिहिलेय का कधी? आणि तुम्ही? जास्त नाही, पण लिहिल्या आहेत!”
“अच्छा अच्छा अच्छा.” मी थक्क झालो. “ते पण ठाऊक आहे तुला?”
“मी म्हटलं ना सर. आमचं कम्युनिकेशन असतं. मला अजूनही आठवते, तुम्ही शाळेत शिक्षक असताना मुलांना भुतांच्या गोष्टी सांगायचे.”
“माय गॉड. ते पण-“
“Yeah sir. तुमच्या त्या भुतांच्या गोष्टी ऐकून किती खूष व्हायची मुलं? ब्ला ब्ला ब्ला! सर, ती मुलं तुम्हाला अजूनही विसरली नाहीत. त्यांना जर विचारलं तुम्हाला सरांच्या कुठल्या गोष्टी आवडायच्या? तर ते भुतांच्याच असं उत्तर देतील.”
“माना लागील पोरी तुला.”
“आणि सर, आम्ही वाईट असतो तर मुलांना तरी आवडलो असतो का?”
“पण भुतांच्या गोष्टीत भीती असते.” मी मुद्दाम म्हटलं.
“पण ती हवीहवीशी असते सर. नाही तर विचारा कुणाला पण. आणि लहानच नाही तर मोठी माणसं पण. ज्यांना आमच्या गोष्टी आवडत नाहीत असा एक तरी कुणी असेल का?”
“ना.” मी मान डोलावली. “असलाच तर अरसिक असेल तो.”
“आणि सर तुम्हाला ठाऊक आहे का, तुमच्या त्या गोष्टी आमच्या कम्युनिटीमधे पण चर्चिल्या गेल्या होत्या.”
“अच्छा?”
“होय. आमचं दरवर्षी annual function असते. या फंक्शनला त्या त्या रिजनमधली सगळी भुतं आवर्जून हजेरी लावतात. या कार्यक्रमात धमाल असते सर. नाचगाणी असतात. विविध स्पर्धा असतात. व्याख्याने असतात. आणि एक तर कथाकथनाचा कार्यक्रम असतो.”
“ओह!”
“हां सर. त्यात तुमच्यातल्या ज्या ज्या लेखकांनी भुतांवर कथा लिहिल्या आहेत त्यांचं वाचन केलं जाते. यात तुमच्याही कथा सांगितल्या जातात सर, बरं का!”
“What?”
“Yeah. मला व्यक्तिश: म्हणाल तर तुमच्या ‘फाशी घेणारं प्रेत’ आणि ‘भुताचा धडा’ ह्या दोन कथा खूप आवडल्या होत्या सर.”
“बाप रे बाप!” मी सर्द झालो.
“होय सर. मला तेव्हाच वाटलं होतं, या लेखकाला भेटता पाहता आलं तर किती छान होईल. आणि मी लकी ठरले.”
“हूं. बरं आता पाहिलं ना मला?”
“होय सर. पाहिलं. अगदी डोळे भरून पाहिलं.”
“मग आता काही शिल्लक तर राहिलं नाही ना?”
“राहिलं ना सर.”
“ते काय?”
“अधूनमधून अशीच किमान एखादी तरी कथा लिहीत जा आमच्यावर. I request you. बाकी काही नाही सर.”
“येस.” मला गलबलून आलं. “नक्की लिहीत जाईन.”
“बस एवढंच बोलायचं होतं मला. Wish you all the best. रात्र बरीच झाली आहे. चलो बाय. गुड नाईट. टेक केअर. and लब्यू सर.”
“अहो उठा… उठा…” कुणीतरी हाका मारत होतं. मी खडबडून जागा होऊन उठून बसलो आणि भानावर आलो.
मी स्वप्न पाहत होतो तर!
(समाप्त)
(अशोक मानकर नामवंत कथा लेखक आहेत)
8087105357








