-ॲड. अखिलेश किशोर देशपांडे
साधारणतः १८ वर्षांपूर्वी जून २००७ मध्ये माझा बारावीचा निकाल लागला आणि पुढील पदवीचे शिक्षण हे कलाशाखेमधील ‘राज्यशास्त्र’ या विषयातच घ्यायचे, हा माझा निर्णय पक्का झाला.तत्पूर्वी मी अकरावी-बारावीचे शिक्षणदेखील कलाशाखेतच मराठी माध्यमातून घेतले होते. त्यावेळी गुगलसर्च हे आमच्या पूर्णतः अंगवळणी पडले नसल्यामुळे, राज्यशास्त्र हा विषय घेऊन कलाशाखेत पदवीचे शिक्षण घ्यायचे झाल्यास ते नेमके कुठे घ्यावे, याबद्दल अमरावतीमधील काही जाणकारांशी चर्चा केली आणि पुण्याचे नाव समोर आले. मग पुण्यातील जाणकार नातेवाईकांशी संपर्क साधला असता ‘फर्ग्युसन कॉलेज’ किंवा ‘एस.पी. कॉलेज’ यांशिवाय इतर पर्यायांचा विचारसुद्धा करू नये, असे त्यांचे मत पडले. त्यातच राज्यशास्त्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या अमरावतीमधील एक निवृत्त प्राध्यापिका म्हणाल्या की, पुण्यात जाऊन राज्यशास्त्रात पदवीचे शिक्षण घ्यायचे असेल तर सर परशुरामभाऊ महाविद्यालय ऊर्फ एस. पी. कॉलेज हे सगळ्यात बेस्ट. मग पुण्यात जाऊन तेथील जाणकार नातेवाईकांच्या मदतीने फर्ग्युसन व एस. पी. अशा दोनच कॉलेजांत फॉर्म टाकले – त्यातील फर्ग्युसनने नाकारले व एस. पी. ने स्वीकारले. माझ्यात निर्माण झालेली जी राज्यशास्त्राची गोडी होती त्याच्या हे किती पथ्यावर पडले, याचा प्रत्यय लवकरच आला – आपटे मॅडम यांच्या रूपात.
पुणे विद्यापीठाचे (सध्याचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) वैशिष्टय म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या कोणत्या विषयात रुची असेल, त्या विषयाची त्यांना पदवीच्या दुसऱ्या वर्षापासूनच विशेष निवड करता येते आणि मग पदवी स्तरावरच हे विद्यार्थी संबंधित विषयाचा अधिक खोलात जाऊन अभ्यास सुरू करतात. परंतु पदवीच्या पहिल्या वर्षात आम्हाला तशी मुभा नव्हती. त्यातही कलाशाखेतील शिक्षण म्हणजे रोजगाराच्या संधींचा हमखास तुटवडा, अशी धारणा तोपर्यंत जनमानसात रूढ झालेली होती. कलाशाखेतील कुठ्ल्याही विषयाची विशेष आवड नसणारे आणि फक्त कमी मार्क्स मिळाल्यामुळे नाईलाजाने इकडे यावे लागलेल्या विद्यार्थ्यांचा भरणा इथे भरपूर होता. त्यामुळे ज्यांना खरोखरच एखाद्या विषयात रुची आहे, त्यांना हेरून त्यांची ती आवड पद्धतशीरपणे विकसित करणे आणि इतरांमध्ये किमान एकातरी विषया- बद्दल गोडी निर्माण करणे, असे कठीण कार्य कलाशाखे- तील प्राध्यापकांना पार पाडावे लागते. म्हणजेच कॉलेज- मधील आपल्या विषयाच्या विभागात दरवर्षी प्रवेशणारी विद्यार्थीसंख्या ही रोडावू नये, याची पूर्ण दारोमदार ही संबंधित प्राध्यापकांवर असते. अर्थात या वस्तुस्थितीचे नीट भान असणारे अभ्यासू प्राध्यापक हे सर्वत्र मोजकेच असतात. एस. पी.कॉलेजमधील राज्यशास्त्र विभागात शिकविणाऱ्या प्राध्यापक डॉ.संज्योत आपटे हे त्यातील एक ठळक उदाहरण. मी स्वतः एस. पी. कॉलेजमध्ये २००७ ते २०१० या कालावधीत पदवीचे शिक्षण घेतले आणि ९ जुलै २००७ हा माझा कॉलेजमधील पहिला दिवस होता.
पहिल्या वर्षी जरी आम्हाला कुठल्याही विशेष विषयाची निवड करण्याची गरज नसली, तरी मी राज्यशास्त्राच्या तासाची आतुरतेने वाट पाहत होतो. मग त्याची वेळ झाल्यावर संबंधित विद्यार्थी वर्गात आसनस्थ झाले आणि एका चाळीशीतील मध्यमवयीन महिलेचा तिथे त्वरेने प्रवेश झाला. मजबूत अंगकाठी आणि प्रसन्न व हसरा चेहरा असे त्यांचे प्रथमदर्शनी रूप हे माझ्या ‘आपटे’ या आडनावाबाबत तोपर्यंत बाळगलेल्या धारणेशी अगदीच विसंगत होते. शिकवण्याच्या ओघात बाईंचे मराठीपेक्षा इंग्रजी अधिक सफाईदार असल्याचे लक्षात आले; त्या मुळात पुणेरी नसून दिल्लीकडच्या असे नंतर कळल्यामुळे त्यामागील कारणाचा उलगडा झाला. पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याविषयी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या – १) त्यांचे राज्यशास्त्र या विषयावर खरोखरच प्रेम होते; २) त्यांचे विषय आकलन हे अत्यंत सखोल आणि प्रगल्भ होते; ३) विद्यार्थ्यांना आपला विषय सोप्या भाषेत शिकविण्याची हातोटी त्यांच्याजवळ होती; ४) त्यांच्या शिकविण्यात विव्दानाचे गांभीर्य जरी असले, तरी जडत्व मुळीच नव्हते आणि मुळात गंभीर असलेला विषय हा त्या प्रसन्न मुद्रेने शिकवायच्या; आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ५) त्यांच्याजवळ सर्वच विद्यार्थ्याप्रती एक आपुलकी नि आत्मीयता होती.आपटे मॅडम म्हणजे उदारमतवाद आणि उत्साह यांचा जणू समानार्थी शब्दच आहेत. मी त्यांना अधून-मधून तणावात नक्कीच बघितले आहे – पण त्यांना निराश अथवा थकलेले कधीच पाहिले नाही. त्यांची अफाट गुणवत्ता आणि अथक परिश्रम करण्याची तयारी यांपुढे स.प. महाविद्यालय नि त्याचा राज्यशास्त्र विभाग हे फार छोटे अंगण होते – तरी त्या स्वखुशीने तिथेच राहिल्या. एस. पी. कॉलेजमधील विविध प्रशासकीय समित्यांच्या कार्यक्षम सदस्य म्हणून त्या उत्कृष्ट काम करत होत्या आणि त्यामध्ये अतिशय व्यस्त राहूनदेखील त्या राज्यशास्त्र विभागाच्या अनेक शैक्षणिक उपक्रमांचे कुशल नियोजन करायच्या.
कॉलेजमध्ये मी कधीच त्यांना रिकामे बसलेले पाहिले नाही; त्यांची सतत धावपळ नि लगबग सुरू असायची आणि तरीही आम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी त्या नेहमीच उपलब्ध असायच्या. जणू प्रत्यक्ष जगून आम्हाला वेळेच्या व्यवस्थापनाचा कोर्स त्या शिकवत होत्या! डिपार्टमेंटसह कॉलेजमधील अनेक व्यापांचा भार त्यांच्यावर असूनही त्यांच्यातील प्रसन्नता कधी भंगली नाही. तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचा संपूर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळात चांगलाच दबदबा होता आणि आपटे मॅडमचा तिथे आदरयुक्त वट होता. त्या विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून रुजू होण्याची ऑफरही त्यांना आली होती. तिथे जॉईन होऊन पुढे विभागप्रमुख होणे आणि यथावकाश प्रगतीच्या शिड्या चढून पार कुलगुरूपदापर्यंत मजल मारणे त्यांना सहजशक्य होते. परंतु त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या नियमित सहवासाला पारखे होऊ या कारणास्तव त्यांनी तो प्रस्ताव नाकारला होता. त्यांचा हा नकार म्हणजे एस. पी. कॉलेज आणि तेथील विद्यार्थी यांच्यावर फार मोठा उपकारच होता. आपटे मॅडमच्या उत्साही कष्टांमुळे आणि त्यामध्ये आपले इतर सहकारी व विद्यार्थ्यांना सहज सहभागी करून घेण्याच्या त्यांच्यातील कौशल्यामुळे, एस. पी. कॉलेजचे पोलिटिकल सायन्स डिपार्टमेंट हे एखाद्या संस्थेएवढे भरभक्कम काम करते आहे. तसेही आपटे मॅडमना अभ्यासक्रमबाह्य शैक्षणिक उपक्रमांची अतिशय आवड आहे आणि मला मात्र शाळेपासूनच त्याची नावड होती.परंतु मला राज्यशास्त्राची आवड असल्याने मॅडमचे माझ्याकडे व्यवस्थित लक्ष होते; पण त्यांनी मला कधीच कुठल्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आग्रह केला नाही. उलट वाचन-लेखनाची मला असणारी आवड हेरून त्यांनी मला कॉलेजच्या एका गंभीर वार्षिकात लेख लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यासाठीआवश्यक असणारी ग्रंथसामग्री देखील उपलब्ध करून दिली. मला राजकीय विचारांच्या अभ्यासात विशेष रुची असल्याचे पाहून,अभ्यासक्रमात असणारे विचारवंत नि विचारधारा यांच्यावर इंग्रजीत असणारे अतिशय मौलिक लिखाण त्यांनी मला वाचावयास दिले. त्यांपैकी इटलीच्या बेनिटो मुसोलिनीचा ‘फॅसिझम’ आणि जर्मनीच्या अॅडॉल्फ हिटलरचा ‘नाझीवाद’ यांच्यातील साम्य नि फरक स्पष्ट करणारे एक लिखाण इतके सुंदर होते, की मी त्याच्या नोट्स काढून त्या आजतागायत जपून ठेवल्या आहेत.शिवाय एस. पी. कॉलेजचा राज्यशास्त्र विभाग हा दरवर्षी ‘अभिरूप संसद’ (Mock Parliament) नावाचा एक उपक्रम चालवतो. त्यामध्ये विभागाचे विद्यार्थी हे संसदेचं कामकाज नेमकं कसं चालतं, याचं प्रत्यक्ष सादरीकरण करतात. केवळ मित्रांच्या आग्रहापोटी मी त्यात सहभागी झालो आणि पुढे दोन वर्षं मी तो खूपच एन्जॉय केला. इथेही आपटे मॅडमनी मला त्यात सहभागी होण्याबद्दल स्वतःहून कधीच सांगितले नाही; पण मी त्यात सहभागी झाल्यावर त्यांना झालेला आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या उपक्रमात मी त्यापूर्वी कधीच न घेतलेला टीमवर्कचा अनुभव मला मिळाला आणि नवीन मित्र-मैत्रिणी सुद्धा भेटले. अभिरूप संसदेचं काम आम्ही विद्यार्थी स्वतःच करायचो. त्याचे विषय ठरवून त्याच्या तालमी बसवण्यात आपटे मॅडमनी कधीच हस्तक्षेप केला नाही; आम्हाला वेळोवेळी लागणारी मदत व मार्गदर्शन मात्र तत्परतेनं पुरवलं. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये अभिरूप संसदेचं जाहीर सादरीकरण व्हायचं आणि त्याचं चोख आयोजन करताना ओसंडणारा मॅडमचा उत्साह प्रेक्षकांच्या नजरेतूनही सुटत नसे. मी पदवीच्या तिसऱ्या वर्षाला असताना आम्ही अभिरूप संसदेची एक आंतर- महाविद्यालयीन स्पर्धा जिंकलो होतो आणि त्यात आमच्या टीममधील प्रत्येक सदस्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यावेळी आपटे मॅडम आमच्यावर इतक्या खूष झाल्या की त्यांनी आम्हा सर्वांना त्यांच्या घरी पावभाजी खाण्यासाठी बोलावलं. त्यांच्या घरी माझ्या काही मैत्रिणीं- सोबत मी जेव्हा सगळ्यांच्या सरबराईत मदत करू लागलो, तेव्हा मॅडमनी मला आनंदाने प्रोत्साहन दिलं आणि पुरुषांनी घरकामात हातभार लावला पाहिजे अशी आयुष्यभराची शिकवण सहजपणे दिली. पदवीचे शेवटले वर्ष सुरू होताना ऑगस्ट २००९ मध्ये आमच्या राज्यशास्त्र विभागाने एक दिल्ली अभ्यासदौरा आयोजित केला होता. त्यात आम्ही भारतीय संसद, सर्वोच्च न्यायालय, त्रिमूर्ती भवन, इंदिरा नि राजीव गांधीचे पंतप्रधान निवासस्थान, कुतुबमिनार, अक्षरधाम मंदिर, इंडियागेट अशी काही ठिकाणं फिरलो. त्यात आपटे मॅडम अगदी आमच्या फ्रेंड सर्कलचा एक भाग असल्या- सारख्या आमच्यात सामील झाल्या व चुकूनही स्वतःच्या अस्तित्त्वाचं कुठलं दडपण त्यांनी आम्हाला जाणवू दिलं नाही. अशाप्रकारे परस्परसबंधांमधील समानतेसारखी अनेक मूल्ये ही त्यांनी आमच्यामध्ये सहजपणे रुजवण्याचा प्रयत्न केला.

याअर्थाने त्या एक आदर्श शिक्षिका आहेत –कारण मुद्दाम काहीतरी शिकविण्याचा तोरा त्यांच्यात नाही. मी व्यक्तिशः त्यांच्याकडून कळत-नकळत खूप काही शिकलो. मी एस. पी. कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वास्तव्य हे कॉलेजच्याच हॉस्टेलमध्ये होते आणि ते कधीच फारसे सुखदायक नव्हते. परंतु पुण्यातील माझे जवळचे नातेवाईक, हॉस्टेलचे मित्र, कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी यांच्याबरोबरच आपटे मॅडम यांच्यामुळे माझे कॉलेज लाईफ हे पुष्कळ आनंददायी बनले. माझ्यासारख्या अंतर्मुख वृत्तीच्या माणसाला हॉस्टेलमध्ये राहणे जरा अवघडच जायचे; परिणामी सुरुवातीचा बराच काळ मला घर नि आईवडिलांची खूप आठवण येऊन सारखे ‘होमसिक’ वाटायचे.अशावेळी आपटे मॅडम यांचे तास व त्यांच्याशी होणारा संवाद हे माझ्यासाठी एक विसाव्याचे ठिकाण होते. त्यांना माझ्याविषयी वाटणारे ममत्व आणि त्यांच्यातून सहजपणे प्रगटणारा मायेचा ओलावा हा मला अगदी स्पष्ट जाणवायचा. कॉलेज प्रशासन, राज्यशास्त्र विभाग नि माझ्यासारखा सामान्य विद्यार्थी यांच्यासाठी कायम सावली धरणारा तो एक आधारवड होता आणि आता तो निवृत्त होतोय. यामुळे निर्माण होणारी पोकळी कधीतरी भरून निघेलच; त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबाबत खंत बाळगण्याचे तसे काहीच कारण नाही. उलट गेली अनेक वर्षे एवढी मेहनत केल्यावर त्यांना थोडी विश्रांती मिळेल याचा आनंदच आहे. शिवाय त्यांच्याशी निवांत गप्पा मारायला त्यांचा वेळ आता मिळू शकतो अशी आशादेखील आहेच. मी तत्कालीन पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना देखील मला त्यांचा खूप आधार होता. माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर एका वर्षात त्यांनी माझ्यासाठी नोकरी शोधून आणली होती आणि मी तिला नम्रपणे नकार दिल्यावरही त्या नाराज झाल्या नव्हत्या. पुढे मी राज्यशास्त्र व पुणे असे दोन्ही सोडून जेव्हा कायमचा अमरावतीला परतण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामागील माझी कारणमीमांसा त्यांनी सहानुभूतीने समजून घेतली आणि मला पुन्हा एकदा आश्वासक पाठिंबा दिला. आयुष्यात असा एखादा शिक्षक लाभणे हे फार दुर्मिळ आणि म्हणूनच भाग्याचे – जगातील अशा मोजक्या भाग्यशाली लोकांमध्ये माझी गणना होत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
९४२०१२८६६०









