पुरुषी शोषण व्यवस्थेवर जहरी डंख करणारी ‘मुन्नी’

– समीर गायकवाड

‘मुन्नी’ ही Aruna अरुणा सबानेंची कादंबरी. खरे तर ही लिखित स्वरुपात असल्याने कादंबरी, अन्यथा ही तर त्यांची मानसकन्याच ! वेश्या व्यवसायाच्या दलदलीत रुतलेल्या मुन्नीला त्यातून बाहेर काढलं जातं आणि एक नवं आयुष्य तिच्या वाट्याला येतं, नव्या नावासह ! याकामी तिला मदत होते एका समाजसेविकेची. मुन्नीच्या कथेचा अवकाश असा दोन ओळीत सामावता येईल मात्र मुन्नीच्या आयुष्याचा अन्वयार्थ लावायला पाने कमी पडावीत. मुळात ज्या दुनियेला पांढरपेशी सभ्य जगाने अघोषितरित्या बहिष्कृत केलेलं आहे त्या जगात काय घडलं नि काय घडलं नाही याच्याशी बहुतांशांना काहीच घेणंदेणं नसतंच ! आणि असावं तरी कशासाठी, कारण आजघडीला कोणत्याही सामान्य माणसाचं आयुष्य समस्येशिवायचं साधं सुकर राहिलेलं नाही. दुःख, व्याधी, असमाधान, न संपणाऱ्या गरजा आणि अभावग्रस्ताचं जिणं यामुळे हरेक जीव त्रस्त झालाय. मग त्यात या घाणीत अडकलेल्या बायकांची दुखणी अशांच्या खिजगणतीत कशी असतील ? मात्र सगळीच माणसं अशी पोटार्थी व्यावसायिक नसतात, काहींना त्यांच्या संवेदना सदैव टोकरत असतात. त्यांच्यासाठी उभं जग हे जणू बंदिशाळाच ठरते, मग एकेका जीवांची दुःखे त्यांना सलत राहतात, त्यातून साकारतात मुन्नीसारखी धारदार शब्दचित्रे !

अरुणा सबानेंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात इतकं काही सोसलं, झेललं आहे की तो एक स्वतंत्र लेखनविषय व्हावा. सहनशीलतेचा अंत झाल्यावर माणूस एकतर नियतीपुढे हतबल होतो नाहीतर आपली पिचलेली मनगटे सर्वशक्तीनिशी आवळून विधीलिखितावर कठोर प्रहार करतो, मात्र यासाठी वज्रनिश्चय असावा लागतो, सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असावी लागते. अरुणाताईंच्या करारी स्वभावामुळे त्यांना हे शक्य झाले. तोच अंश त्यांच्या लेखणीतून उतरलाय आणि पुरुषी शोषण व्यवस्थेवर जहरी डंख करत सुटलाय. त्याच डंखाची एक झलक ‘मुन्नी’मध्ये आहे. नागपूरच्या गंगा-जमुना या रेड लाईट एरियातली मुन्नी ही तरुणी. मुन्नीला आश्रय देणारी वैदेही ही समाजसेविका, मुन्नीला आपलंसं करून तिला आपलं नाव देऊ इच्छिणारा मनापासून प्रेम करणारा तरुण सोहम यांच्याभोवती ही कादंबरी फिरते. एका अभागी तरुणीचा मुन्नीपासून सुरु झालेला प्रवास मैत्रेयीपाशी येऊन पुरा होतो.

वरवर हे एक जबर आव्हान वाटते इतकाच या घटनेचा पैस नाही. मुन्नीच्या आयुष्यातील परिवर्तनाची ही घटना, तिच्या वाट्याला आलेले सुखद बदल हे सर्व वाचताना आपल्याला हवेहवेसे वाटतात किंबहुना त्याचा आनंदही होतो की, एका तरुणीची या नरकातून यशस्वी सुटका तरी होतेय ! पण पुढे काय होते ? आपण एका सलग बैठकीत वाचून काढलेली कादंबरी शेल्फमध्ये ठेवून देतो. एका चांगल्या साहित्यकृतीचा आनंद मिळाल्याच्या भावनेने कृतकृत्य होतो, त्यानंतर आपण आपल्या रोजमर्राच्या विश्वात सराईतपणे रममाण होतो. मुन्नी हे एक पुस्तकातले पात्र बनून आपल्या स्मृतीत जाते पण पुस्तकातल्या त्या समाजसेविकेचे वैदेहीचे काय होते ? तिला तर नित्य नव्याने एका मुन्नीला राखेतून उभं करायचेय ! बदनामीची असंख्य वादळे झेलत, बीभत्स कटाक्षांचे जहर सोसत, समाजाचे शेलके बोल ऐकत, वळणवाटांच्या आड येणारी अडथळ्यांची शर्यत पार करत तिला हे करावेच लागते. किंबहुना हेच अरुणाताईंच्या जीवनाचे समर्पणभाव असावेत. वैदेही दुसरी तिसरी कुणी नसून अरुणाताईंवरच बेतलेली स्त्री आहे असे मला राहून राहून वाटते ते याचसाठी !

यातली ‘मुन्नी’ नेमकी कोण ? अवघ्या काही रुपयांसाठी अंगावरची वस्त्रे उतरवण्यास मजबूर असलेली, नात्यांची वीण उसवलेली, जगण्याचा आधार गमावून बसलेली मायेला पारखी झालेली चमडीबाजारात उभी असलेली कुठलीही हतबल तरुणी म्हणजे मुन्नी असं आपण रुढार्थाने म्हणू शकू, पण सत्य इतकंच नाही. समाजात नासूर बनून राहिलेली ही खोल भळभळती जुनी जखम आहे. खरे तर हिला नाव नाही, आपल्या पोरीबाळी आज सुरक्षित आहेत मात्र येणाऱ्या काळात सुरक्षित असतील की नाही हे छातीठोकपणे कुणीच सांगू शकत नाही. मुन्नीच्या जागी आपल्या रक्तातलं कुणी असू शकतं. मग आपण इतक्या सहजतेने या पुस्तकाचे पान मिटू शकू का ? कदापिही नाही ! अरुणाताईंची ही मानसकन्या कादंबरीच्या अखेरीस सभ्य दुनियेच्या चाकोरीत परतते, मात्र तिला स्वीकारले जाईल की नाही हा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक तसाच वाचकांवर सोडून दिलाय. कदाचित हरेक वाचकाने याचे उत्तर आपल्या मनात सच्चेपणाने शोधायचेय, उगाच शेखी मिरवून आपल्यालाही हे जमेल असं म्हणायचं नाहीये.

‘मुन्नी’मध्ये एक उपकथानक सायनाचे आहे. कोवळ्या वयात अपरिचित पुरुषावर भाळलेली ही एक साधीभोळी तरुणी. तिचा ‘साब’ तिला सोडून जातो कारण त्याचा मुलगा मृत्यूशी झुंजत असतो. तिला ज्या हॉटेलमध्ये ठेवलेलं असतं तिथला मॅनेजर तिला वेश्यावस्तीतल्या आंटीला विकतो. सुरुवातीला पेहलवान आणि लंगडयाला भिऊन राहणारी रडून आक्रंदन करणारी ती दीड दशकात अव्वल दर्जाची कुंटणखानेवाली होते. तिचा स्वतःचा अड्डा खोलते. प्राध्यापकापासून ते भणंगभटक्यापर्यंत अनेकजण तिचे कस्टमर असतात. तिच्यात होणारं परिवर्तन कुणातही होऊ शकतं ही या रेड लाईट एरियाची खासियत ! अरुणाताईंनी हा संपूर्ण कथाभाग अक्षरशः जिवंत केला आहे. उसासे सोडण्यावाचून आपल्याला पर्याय राहत नाही.

‘मुन्नी’ची लेखनवैशिष्ट्ये तिच्या मांडणीत आहेत. कथेचा अवकाश खूप प्रदीर्घ नसूनही हरेक पुरुषाचं भावविश्व तिच्या परिघात सामील आहे, निवेदन शैलीतलं प्रवाही लेखन खिळवून ठेवतं. अरुणाताईंनी स्वतःला न्याय दिल्यानंतर समाजातील विविध स्तरांवर खितपत पडलेल्या शोषित वंचित स्त्रियांसाठी आवाज उठवलेला आहे, या स्त्रियांचे विश्व त्यांना चांगलेच ठाऊक आहे त्यामुळे रेड लाईट एरियातील अनेक बारकावे सहजगत्या समोर येतात. ही दुनियाच बीभत्स असली तरी या पुस्तकाची भाषा बीभत्सकडे झुकणारी नाहीये, तिच्यात अर्वाच्चताही नाहीये. जो काही आहे तो आक्रोश आहे आणि मूक रुदनही आहे. एका धीरोदात्त स्त्रीने साकारलेलं दुसऱ्या एका थकल्या भागल्या जीवाचं पुनर्वसन आहे. ‘मुन्नी’ची भाषा कधी मवाळ होते तर कधी टोकदार ! संवादी शैलीऐवजी निवेदन शैलीचा यथार्थ वापर केल्याने कथानक खुललेय. बटबटीतपणाला पूर्णतः फाटा दिला आहे ही मोठी जमेची बाजू आहे. प्रसंगांची मालिका वेगाने घडत राहते, नकळत आपण या दुनियेचे एक साक्षीदार बनून जातो. वैदेहीसारखं आपणही काहीतरी उत्तुंग करावं अशी प्रेरणा मनी येते हे या कादंबरीचे यश होय. चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ अगदी यथार्थ आहे.

इतक्या देखण्या कादंबरीच्या लिखाणादरम्यान कोणत्याही लेखकाला समाज प्रबोधनपर भाष्य करत संदेश देण्याचा मोह झाला असता, अरुणाताईंनी तो कसोशीने टाळल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक ! कारण ‘मुन्नी’ वाचून झाल्यानंतर या विषयीचे आपले दृष्टीकोन कसे असावेत हे ज्याचे त्याला ठरवायचे आहे, लेखिकेने फक्त वास्तव मांडलेय. त्यावरची भूमिका आपणच ठरवायचीय. ही हुरहूर हाच या कादंबरीचा आत्मा आहे. कविता महाजन यांच्या ‘ब्र’ नंतर या विषयातली ही अत्यंत सक्षम आणि दखलपात्र अशी कादंबरी आहे. अरुणाताईंचे त्यासाठी आभार ! बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !

__________________________________________________

🌿मुन्नी – ले. अरुणा सबाने

🟩पृष्ठसंख्या – २०५
मूल्य – २४० रु.

🟢आकांक्षा प्रकाशन

नागपूर -१५.

मो. 9970095562

लेखक नामवंत स्तंभ लेखक ब्लॉगर आहेत.

8380973977

…………………………………….

समीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleसुनील यावलीकर :  स्मरणचित्रांचे सांस्कृतिक वैभव
Next articleनपुंसक पौरुषाच्या फाइल्स…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here