सुनील यावलीकर :  स्मरणचित्रांचे सांस्कृतिक वैभव

-डॉ. अजय देशपांडे

 कलावंत त्याच्या काळजातले सांगणे शब्दांतून आणि रेषांमधून – कुंचल्यातून मांडत असतो. काळजातून आलेले चित्र मनःपूर्वकतेने कॅनव्हासवर उतरते तेव्हा ते पाहणाऱ्यांशी भावस्पर्शी संवाद साधत असते. सुनील यावलीकरांची चित्रे काळजातून कॅनव्हासवर उतरली आहेत. ही चित्रे शब्दांतून सांगता येत नाही असा आशय कथन करणारी आहेत.

दुधाळ धरेला 

बांधले रेषेत 

रक्ताच्या नशेत

जागेपणी

कवी, चित्रकार, कादंबरीकार सुनील यावलीकरांच्या या ओळी त्यांच्या भावस्पर्शी चित्रांच्या निर्मितीचा एक अनुबंध उजागर करणाऱ्या आहेत. ही धरती माता म्हणूनच या चित्रकाराला साद घालते. या चित्रकाराच्या वाट्याला आलेली धरती दुधाळ आहे.ती विचार आणि संस्कारांचे भरणपोषण करणारी आहे . लोकसंस्कृतीचे मातीशी म्हणजे भूमीशी असणारे नाते सुनील यावलीकरांच्या कवितांतून आणि चित्रांतून अभिव्यक्त झाले आहे. बालपण ,माती , शेती, नाती आणि एकूणच बालमनाच्या सांस्कृतिक पर्यावरणाशी सुनील यावलीकरांच्या चित्रांचे भावसंदर्भ जुळलेले आहेत. सायंकाळी आकाशातील बगळ्यांच्या रांगा पाहून ‘ बगळ्या बगळ्या दूध दे , पाची बोटं रंगवून दे ‘ असे म्हणणाऱ्या लहानलहान मुलांच्या भावस्थितीचे स्मरण आणि वास्तव स्थिती यांचा शोध यावलीकरांनी कविता आणि चित्रातून एकाच वेळी घेतला आहे.

रोज सायंकाळ

मज देते हूल

बगळ्याने कधी

दिले नाही फूल

 

रंगलीच नाही

माझी पाच बोटे

आभाळच बोले

वर्तमान खोटे 

बालपणीचा बालमनाचा लोकसंदर्भ पुढे प्रौढपण आल्यावर वेगवेगळ्या वास्तवदर्शी स्थितींच्या ऐरणीवर तपासून घेतला जातो. या चित्रात बगळा आणि मुलगा पाचही बोटे आणि काळा रंग या घटकांनी चेहऱ्यावरची उदासी नेमकी दाखवली आहे. ( चित्र : रोज सायंकाळ मज देते हूल..)

गायीच्या मानेवर डोके ठेवून शांत उभ्या असलेल्या एका मुलाचे चित्र विलक्षण करुण आणि बोलके आहे.या चित्रात मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाहीत पण गायीच्या मानेवर डोके ठेवून उभा राहण्याची देहबोली मात्र त्याची भावस्थिती दर्शवणारी आहे.गायीच्या डोळ्यात कृषिसंस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या प्राण्यांच्या डोळ्यातले कारुण्य दिसते.चेहरा नसणाऱ्या पण खूपच भावनाप्रधान असणाऱ्या असंख्य संवेदनशील मुलांची देहबोली कारुण्यपूर्ण सकारात्मकतेने या चित्रात साकारली आहे.

यावलीकरांच्या चित्रांमध्ये बालपण आणि बालमन येत राहते. ‘ एक्सप्लोरिंग चाईल्डहूड ‘ या चित्रमालिकेतील प्रत्येक चित्रात बालमनातील आणि बालप्रतिभेतील अनावर उत्सुकतेचे दर्शन निर्मळ बालसुलभतेने दिसते. गोट्या खेळणाऱ्या मुली, पतंग उडवणारी मुले, ग्रामीण भागातील विविध खेळ खेळणारी मुले , सायकलवर फिरणारे बापलेक, सायकलवर गुलाबी रंगाचे बुढ्ढीके बाल व खाण्याचे इतर पदार्थ विकणारा माणूस आणि त्याच्या भोवती रमणारी मुले , जमिनीला टाच लावून उभ्या केलेल्या पायाच्या तळव्याच्या आंगठ्यावर दुसऱ्या पायाचा तळवा ; त्यावर दोन हातांच्या दोन विती रचून बसलेला मुलगा आणि दोन पावले दोन वीत यांवरून उडी मारणारी मुलगी , सनावळ्या – चोपड्या काढून वर्षानुवर्षांचा लेखाजोखा वाचून पुन्हा बासनात व्यवस्थित गुंडाळून ठेवणाऱ्या बापाकडे एकटक पाहणारा मुलगा , जंगलातून लाकडाची मोळी डोक्यावर वाहून आणणाऱ्या बापाची वजनाने लकाकणारी मान न्याहाळत एक काठी ओढत चालणारा मुलगा , गायीचे पिल्लू खांद्यावर घेऊन उभा असलेला मुलगा , ढोल वाजवणाऱ्या आईकडे पाहत असणारा मुलगा ही आणि अशी कितीतरी सुंदर भावस्पर्शी चित्रे आपल्याही आपल्या बालपणाभोवती आणि बालमनाभोवती पिंगा घालायला लावतात. बालमनाची निरामय उत्सुकता , निरागसता , मनःपूर्वकता आणि सकारात्मकता या दुर्मीळ वैभवाला ही चित्रे साद घालतात. यावलीकरांनी ‘ एक्सप्लोरिंग चाईल्डहूड ‘ या चित्रमालिकेतून ग्रामीण जीवनातील गतकाळातील बालमनांचे सांस्कृतिक वैभव जतन करून ठेवले आहे.

व्हिसेंन्ट व्हॅन गॉग एकदा म्हणाला होता , ” पिवळा रंग हा निर्मितीचा रंग आहे,सूर्याचा रंग तोच आहे आणि मैत्रीचा रंगही तोच आहे.” या पिवळ्या रंगाच्या निर्मितिशील ऊर्जेशी यावलीकरांचे नाते आहे.यावलीकरांचे गव्हाच्या शेताचे नितांतसुंदर चित्र आहे. वसंतऋतूतले निरभ्र निळे आकाश, गर्द हिरवी झाडे, कथ्थ्या देठांचे गव्हाचे पिवळे पिवळे शेत लालजर्द फळसफुल्या रंगाचा कपडा डोक्याला बांधलेली जांभळ्या वस्त्रातली गव्हाची कापणी करणारी स्त्री .. असे हे चित्र विलक्षण आशयघन आहे.यावलीकर लिहितात,

पळस ओली स्तब्ध दुपार

 शेतावरती आहे पेंगत

 गंध कोवळ्या निंबावरती 

एक पक्षी स्वरात झिंगत

धम्म पिवळ्या गहू पिकात

 लखलखते विळ्याचे पान 

कापणीची गाणी ऐकतो 

व्हॅन गॉगचा दुखरा कान

  या ओळींमधून व्हिसेंन्ट व्हॅन गॉगच्या निर्मितिशील ऊर्जेशी यावलीकरांचे प्रतिभावंत मन सहकंप पावले आहे.

यावलीकरांचे ‘ थिंकिंग पास्ट ‘ या शीर्षकाचे चित्र देखील सुंदर आहे.माणूस बाजेवर बसला आहे , ठाव्याशी जमिनीवर भिंतीला टेकून पत्नी बसली आहे. बाजूला एक काठी बाजेच्या आधाराने ठेवली आहे. ही काठी या दोघांच्या थकलेपणाचे प्रतीक आहे. खाली बसलेली ती पतीकडे पाहत आहे. तो दूर अंतराळात पाहत बोलत असावा..सभोवती खूप उजेड नाही, अंधारही नाही पण जरा काळवंटून आले आहे. दोघेही ओंजळीतून निसटून गेलेल्या काळात म्हणजे भूतकाळात हरवून गेले आहेत. वर्तमान जगताना मन मात्र भूतकाळात रुंजी घालत असते हे दाखवणारे चित्र भावस्पर्शी आहे.

बैलगाडीतून गोण्यात तूर किंवा तत्सम पीक बांधून नेणारा शेतकरी , वर्तमानाचा आणि भविष्यकाळाचा विचार करीत बसलेल्या स्तब्ध बायका , अखंड नादाची वीणा घेतलेले निर्मळ मनाचे वारकरी , ओटी खोचून कष्टासाठी सज्ज झालेली श्रमिक स्त्री , रानातून जलतनाची मोळी डोक्यावर घेऊन येणारी स्त्री ,उन्हाची तमा न बाळगता हातात रिकामी कॅन आणि गाठोडे घेऊन कपडे धुण्यासाठी पाणवठ्यावर निघालेल्या दोघीजणी , संसाराच्या साहित्याची गाठोडी डोक्यावर आणि अंगाखांद्यावर मुले घेऊन अखंड पायपीट करणारी स्थलांतरित कुटुंबे , ओंढक्यांवर काठ्या घेऊन बसलेले विचारमग्न म्हातारे ही आणि अशी कितीतरी आशयघन चित्रे आपल्याशी दृश्य संवाद साधतात.यावलीकरांची ही चित्रे हातून नकळत निसटलेला भूतकाळाचा आणि हातातून कणाकणाने झिरपून जाणारा वर्तमानाचा आपल्याशी संवाद घडवून आणतात. ‘ दे टॉकिंग अबाऊट फोर्थ ‘ या शीर्षकाच्या यावलीकरांच्या एका कोलाजमध्ये बसलेली तीन माणसे तेथे उपस्थित नसलेल्या चौथ्या माणसाबद्दल बोलत असल्याचे दृश्य आहे. यावलीकरांची चित्रे पाहताना आपण आपल्या सोबत नसलेल्या पण स्मृतिकोशात जिवंत असलेल्या माणसांविषयी, निसर्गाविषयी, काळाविषयी बोलत राहतो.भूतकाळाचा आठव आणि वर्तमानाची जाणीव करून देत ही चित्रे आपल्याशी संवाद साधतात . हा संवाद मनस्वी आणि निर्मळ असतो . तो प्रत्येकाचा स्वतंत्र असतो , तरीही या चित्रांशी प्रत्येकाचे अतूट नाते आहे. स्मृतिकोश स्वतंत्र असणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याच्या भूतकाळातील आठवणींशी मनस्वीपणे जोडणे हे यावलीकरांचे सामर्थ्य आहे.

जमिनीपासून वीतभर अंतर ठेवून निर्घृणपणे कापून काढलेल्या ; जीवनरसच आता न मिळणाऱ्या मजबूत झाडाचा उदास बुंधा आणि मातीत कणखरपणे रुतून बसलेल्या मुळांच्या ठायी पुन्हा पालवी अंकुरवण्याचा अदम्य आशावाद यावलीकरांनी एका चित्रात रेखाटला आहे. सद्यस्थितीत आपण असे मुळापासून तुटलो आहोत का ? आपल्याला सामूहिक सदाचाराची पालवी पुन्हा एकदा फुटणार आहे का ? असे बिटव्हिन द लाईन्स असणारे म्हणजे चित्रांच्या आशयाच्या पलिकडचे अनेक सवाल ही चित्रे आपल्याला विचारतात.

“जे कॅनव्हासवर उतरतं ते माझ्या काळजातून आलेलं असतं ” थोर चित्रकार व्हिसेंन्ट व्हॅन गॉगच्या या वाक्याची प्रचिती त्याच्या साऱ्या चित्रांमधून येते.यावलीकरांना मनापासून जे सांगायचे आहे ते त्यांच्या चित्रांमधून व्यक्त झाले आहे.

‘ पीळ ‘ या कवितासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेत यावलीकरांनी वडिलांचे भावूक स्मरण केले आहे. ‘ उनारताना तिफनीवर पडून मातीमय झालेले वडील ‘ यावलीकरांच्या प्रतिभावंत मनाच्या स्मृतिकोशात कायम जिवंत राहिले. म्हणूनच यावलीकरांच्या चित्रांतील शेतकरी कष्टकरी माणसांमधील पितृभाव आपल्या साऱ्यांच्या स्मृतिमंजूषेतील बाप नावाच्या संस्कारविचार कोशाला उजागर करीत राहतो.

यावलीकरांचे एक सुंदर रेखाटन आहे.काळ्याकभिन्न महाकाय पाषाणावर एक हिरवेकंच झाड घट्ट मुळं रोवून उभे आहे .या झाडाचा मजबूत बुंधा म्हणजे माणूस आहे, या माणसाच्या हातांना , मेंदूला हिरव्यागार पानांच्या फांद्या फुटल्या आहेत. या माणसाच्या पायांची मुळं काळ्या पाषाणाचे अंग फोडून पार जमिनीत पोचली आहेत. यावलीकर कमालीची सकारात्मकता पेरणारे चित्रकार आहेत. माती , माणूस , निसर्ग , मानवता आणि अभंग सकारात्मकता यांच्या एकरूपतेतून सभोवतीच्या प्रतिकूलतेतही जगण्याची अभेद्य उमेद यावलीकरांनी कुंचल्यातून साकारली आहे, चित्रांमधून सांगितली आहे. त्यांचे हे सांगणे निराशेच्या काळोखावर अभंग आशावादाच्या उजेडाची नक्षी काढणारे आहे , म्हणून ते समकाळाच्या संदर्भात मौलिक आहे.

( लेखक समीक्षक आहेत.)

डॉ. अजय देशपांडे

मराठी भाषा आणि साहित्य विभाग

लोकमान्य टिळक महाविद्यालय

वणी ४४५३०४ जि.यवतमाळ

संपर्क : ९८५०५९३०३०

[email protected]

Previous articleये ‘है’ लंडन मेरी जान…
Next articleपुरुषी शोषण व्यवस्थेवर जहरी डंख करणारी ‘मुन्नी’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.