ये ‘है’ लंडन मेरी जान…

– आशुतोष शेवाळकर

इंग्लंड हा देशच आणि त्यातल्या त्यात लंडन हे शहर मला फारच आवडतं. लंडनच्या थोडं खालोखाल न्यूझीलंड मधलं ‘ख्राइस्ट चर्च’  सोडलं तर परदेशातलं एकही शहर मला मनापासून कधी फारसं भावलेलं नाही. जपान मधली लोकं मला अतिशय आवडतात, ती अगदी प्रेमात पाडणारीच असतात, अमेरिकेतली सुसंस्कृतता मला आवडते, बर्मापासून बाली बेटापर्यंत पसरलेल्या सगळ्या दक्षिण-पूर्व देशातली आपल्या संस्कृतीशी मिळती-जुळती संस्कृती आवडते. नीटनेटकी वसवलेली, काळाच्या पुढे रस्ते व इतर सुविधा असलेली, देवदत्त निसर्ग सौंदर्य लाभलेली, पैसा पाण्यासारखा ओतून त्यात आणखी सौंदर्य ओतलेली अशी अनेक शहरे जगात आहेत. स्वित्झर्लंडमध्ये तर लहान मोठ्या सगळ्याच गावांची ‘रेल्वे स्टेशन्स’ आपल्या घरापेक्षा जास्त स्वच्छ असतात. धूळ तिथे औषधालाही दिसत नाही. प्रत्येक दहा फूटाला ठेवलेल्या फुलं आणि हिरव्या पानांनी सजवलेल्या कुंड्यांनी ही ‘रेल्वे स्टेशन्स’ सजलेली असतात. निगराणी राखून ही सजावट आपल्या इकडच्या पंचतारांकित हॉटेलच्या लॉबी मधल्या कुंड्यांच्या सजावटीपेक्षा जास्त प्रफुल्लित दिसत असते.

खरंतर लंडनमध्ये असं काहीच कुठेच नाही. पण तरीही मी पहील्यांदा इथे आलो तेव्हाच या शहराच्या प्रेमात पडलो होतो. त्याअर्थानी लंडन हे माझं ‘लव्ह अॅट फर्स्ट साईट’ आहे. पहिल्या भेटीत इथलं सगळं काही मला अगदी आपल्यासारखं दिसलं होतं. मुंबईला व्हीटी स्टेशन, फ्लोरा फाऊंटनच्या आसपासचा भाग जसा दिसतो तसा सगळा लंडनचा जुना भाग दिसतो. आपल्या अगदी गावोगावच्या, खेडोपाडीच्या तहसील कार्यालय, कोर्ट, डाक बंगला, जेल, पोस्ट ऑफीस सारख्या अनेक इमारती इथे आहेत. त्यामुळे हे सगळं अगदी ओळखी ओळखीचं वाटलं होतं. तेव्हा येथील सीटी बसही मागे बसलेला कंडक्टर आणि दोरीनी वाजवायची घंटी असलेली होती. आता त्या इतर पाश्चात्य शहरांसारख्या कंडक्टर नसलेल्या, ‘इलेक्ट्रॉनीकली ऑपरेटेड’ दरवाजांच्या आणि ‘एअर सस्पेशन’ मुळे थांबल्यावर फस्स फस्स दम टाकणाऱ्या झाल्या आहेत. हे सगळं ‘आपल्यासारखं’ पाहुन तेव्हा मला आश्चर्य वाटलं होत. मग लगेच लक्षात आलं, हे ‘आपल्यासारखं’ नसून आपलं ‘यांच्यासारखं’ आहे. ब्रिटीशांनी दीडशे वर्ष राज्य करतांना ‘आपुल्या सारीखे करीती तात्काळ’ या संत वचनाप्रमाणे आपल्याला ‘त्यांच्यासारीखे ‘ करून टाकलं होतं.

पहिल्यांदा या शहरात माझं येणं ‘एस्कलेटर’ व ‘ग्लास कॅप्सुल लिफ्टस्’ विकत घ्यायच्या निमित्ताने झालं होतं.  तेव्हा एका बेल्जियमच्या लिफ्ट कंपनीने इथे माझी बडदास्त ठेवली होती. एअरपोर्टवर घ्यायला एक जख्ख ब्रिटिश म्हातारा टॅक्सीवाला त्याची ‘ब्लॅकी’ घेऊन आला होता. ‘ब्लॅकी’ हे लंडनचं आणखीन एक ‘हेरीटेज’. दरवाजे उलटे उघडणाऱ्या या जुन्या फोर्ड गाडया गेल्या शंभर वर्षापासुन इथे टॅक्सी म्हणुन चालतात आहेत. आधी त्या काळ्याच रंगाच्या असायच्या म्हणुन त्यांना ‘ब्लॅकी’ म्हणायचे. आता त्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात, पण अजुनही इंग्रज प्रेमानी त्यांना ‘ब्लॅकी’च म्हणतात. गाडी चालवता चालवता खांदे उडवत व डोळे मिचकावत एका जुन्या ‘इंग्लिशमन’ च्या खास स्टाईलनी तो ‘ड्रायव्हर’ माझ्याशी बोलत होता. त्या ब्रिटीश म्हाताऱ्याशी माझी चांगलीचं गट्टी जमली होती. हॉटेलला पोचेपर्यंतच्या एक-दीड तासांच्या गप्पांमध्ये त्यानी मला मनानी अगदी पार चाळीस-पन्नास वर्ष जुन्या लंडनमध्ये नेलं होतं. गांधी, सावरकर, आंबेडकर हे पण तेव्हा अशाच गाड्यांमधून फिरत असतील, कधी मधी या गाडीत सुद्धा ते बसले असतील आणि त्या गाडीत आपण आता बसलो आहोत ही भावनाच अंगावर थरार आणणारी होती. नेहरूंचे कपडे शिवायला आणि धुवायलाही लंडन मधे यायचे हे लहानपणापासूनच बऱ्याचदा वाचलं होतं. कुठल्या तरी खेपेत मोकळा वेळ असला की ती ‘लॉन्ड्री’ शोधायचंही मी ठरवलं होतं.

तसं पहायला जाता मला नावडत्या अशा अनेक गोष्टी या शहरात आहेत. एकतर जगातल्या सगळ्यात महागड्या शहरांपैकी हे एक शहर आहे. लंडन, पॅरिस व टोकियो या तीन शहरातल्या उगीचच्या उगीच असलेल्या महागाईचा मला मनस्वी तिटकारा आहे. लंडनमध्ये ‘अंडरग्राउंड रेल्वे’ सोडली तर स्वस्त असं काहीच दिसत नाही. इथे ‘रेशीअल’ कर्मठ गोरे पण काही प्रमाणात आहेत. पण तरीही लंडन मला इतकं का आवडतं हे गेली अनेक वर्ष मला कळलेलच नाही. याबाबतीत  मागचा जन्म आपला इथे गेला असावा इतका टोकाचा विचार सुद्धा मी केलेला आहे.

गेल्या दोन-तीन शतकातल्या सा-या जगाच्या ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, सभ्यता, संस्कृती, कला, साहित्य यांच्या गंगा बहुतांशी लंडनच्याच गंगोत्रीतून उगम पावल्यात. लहानपणापासून आपण नाव ऐकत आलेले शेक्सपियर, शेले, किटस्, वर्डसवर्थ, जॉर्ज बर्नार्ड शॉ हे सगळे याच शहरात वावरून गेलेत. त्यांच्या लंडन मधल्या वास्तव्य व वावराच्या खुणा अजुनही या देशानी हृदयाशी कवटाळुन जपून ठेवल्या आहेत. चर्चिल पंतप्रधान आणि बर्नार्ड शॉ ‘हाउस ऑफ लॉर्डस’ मधे असतांना पार्लमेंट मधे आणि पार्लमेंट बाहेर त्यांच्या मधे घडलेल्या अत्युच्च बौद्धिक आणि सर्जनशील, सामिष किस्से     आणि संवादांच्या आठवणींनी अजूनही लंडन मधल्या मैफलींच्या रात्री रंगतात.  शेक्सपिअरची शाळा, शेक्सपिअरचे घर, अॅना या त्याच्या प्रेयसीचं घर, हे सगळं तर लंडन पासून जवळ असलेल्या त्याच्या स्ट्रॅटफोर्ड नावाच्या खेड्यात जपून ठेवलेलेच आहे. पण लंडन पायी फिरण्यासाठी असलेल्या ‘वॉक टुर्स’ मधे ‘शेक्सपियरचं लंडन’ हा एक वेगळा ‘टुर’च आहे. या ‘वॉक टुर्स’ मधे प्रत्येकी ८ पौंड घेऊन एक गाईड १०-१२ लोकांच्या ग्रुपला दिवसभर फिरवतो. या सगळ्या लोकांचा ‘अंडर ग्राउंड रेल्वेचा’ संपूर्ण दिवसाचा ‘डे पास’ तो काढतो. शेक्सपियरच्या काळाचं लंडन पाहायचं तर तो रहायचा कुठे, जेवायचा कुठे, त्याचं पहिलं नाटक झालं ते ‘थिएटर’, तो कॉफी प्यायला जायचा ती जागा, अशा सगळ्या जागा तो त्या त्या स्टेशन पर्यंत ‘अंडरग्राउंड’ नी जाऊन व मग वर चढून तो भाग, त्या जागा पायी फिरत दाखवून आणतो. मग् लगेच ‘अंडर ग्राउंड’नी दुसरं स्टेशन व तिथल्या सगळ्या अशा जागा पायी फिरत बघायच्या, असा तो ‘वॉक टुर्’ असतो. गोविंदराव तळवळकरांनी एका कनिष्ठ सहकाऱ्याला लंडनला गेलास की कार्ल मार्क्स जिथे कॉफी पित विचार करत बसायचा ती जागा व खुर्ची त्या कॉफी शॉपच्या मालकानी स्मृती म्हणून तशीच जपली आहे, ती नक्की पाहून ये, असं सांगितलं होतं. ही गोष्ट त्या सहकाऱ्यानी मला एका खाजगी बैठकीत सांगितल्यावर मला आश्चर्य वाटलं होतं. मार्क्स जर्मनीचा एवढंच फक्त समीकरण तेव्हा माझ्या मनात होतं. पुढच्या खेपेत ही पण जागा शोधायची असं मग मी ठरवलं.

सॉमरसेट मॉमच ‘समींग अप’ हे पुस्तकं हाती लागल्यावर आयुष्यातलं एखादं वर्ष तरी मी ‘मॉम’मयच होतो.त्यांची शोधून मिळतील तितकी सगळी पुस्तकं मी या काळात वाचली होती. जॉर्ज ऑरवेलचं ‘अँनीमल फार्म’ १९९५ मधे वाचलं तेव्हा भारतीय लोकसभेतला तेव्हाचा बाष्कळपणा पाहून त्यांनी हे  अगदी आत्ता आत्ता लिहिल्यासारखं वाटत असे. हे सगळे लोक या शहराच्या अंगाखांद्यावर बागडले आहेत ही भावनाच लंडनच्या रस्त्यांवरून चालतांना एका अजीब ‘नॉस्टेलजिया’त नेणारी असते.

वेंम्बली या लंडनच्या सबर्ब मधे पायी चालतांना अचानक एक दिवशी ‘रुदर फोर्ड वे’ अशी पाटी रस्त्यावर पाहुन मी गदगदलो होतो. फिजिक्स मध्ये ‘अॅटोमीक मॉडेल्स’ च्या अभ्यासानंतर पहिल्यांदा हे नाव असं कुठे वाचायला मिळालं होतं. केंब्रिज विद्यापीठात ‘प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ म्हणून सर इसाक न्यूटन यांच्या खाली सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांची सही आहे. नव्या जगाचा आईन स्टाईन असलेला स्टीफन हॉकिंगही तेव्हा वास्तव्याला केंब्रिज मधेच असायचा. त्याचं वास्तव्य असतांना मला केंब्रिजला जायचं होतं व जमलं तर त्याच्या पायाला हात लावायचा होता. पण दुर्दैवाने तो हयात असेपर्यंत माझं तिथे जाणं झालं नाही आणि मनात ती एक सल कायमची वास्तव्याला आली. ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी’ मात्र मी इंच न इंच पाहून आलो. ‘डिक्शनरी’ म्हटली कि आपल्याला ‘ऑक्सफोर्ड’चीच ‘डिक्शनरी’ आठवतं इतकं आपलं या सगळ्या प्रांताशी लहानपणापासूनच नातं आहे.

जगभर गाजलेल्या कपोलकल्पित पात्रांना देखील या शहरानी अजून उराशी जपलं आहे. शेरलॉक होम्सचं ऑफिस म्हणून ‘221-बी, बेकर स्ट्रीट’ हा कथा आणि सिनेमात गाजलेला पत्ता असलेली जागा तिथल्या सरकारनी विकत घेऊन तिथे ‘शेरलॉक होम्स म्युझियम’ केलं आहे. अगदी त्याच्या दारावर लावलेल्या ‘स्कॉटलंड यार्ड’ पोलीस च्या १८७८ सालच्या नोटीससह इथे सगळ्या त्याच्याशी संबंधित त्या काळातल्या गोष्टी ठेवल्या आहेत. ‘अन्डर ग्राउंड रेल्वे’च्या ‘बेकर स्ट्रीट’ स्टेशनवरच्या सगळ्या टाईल्सवर शेरलॉक होम्सच्या चेह-याची तस्वीर आहे आणि स्टेशनमधून बाहेर पडल्या बरोबर ‘फेल्ट हॅट’ व ‘ओव्हरकोट’ घातलेला, तोंडात पाईप घेऊन उभा असलेला शेरलॉक होम्सचा सिनेमातल्या सारखा हुबेहुब पुतळा आहे. एवढा सन्मान तर आपण आपल्या इथे होऊन गेलेल्या हाडामासाच्या जिवंत अशा मोठ्या माणसांनाही क्वचितचं देतो. रहस्यकथा वाचायच्या नादाच्या काळात ‘पिकॅडली सर्कस’ या चौकाचं नाव खूपदा वाचण्यात आलं होतं. कथा कादंबरीची सुरुवातच डिटेक्टीव्ह हीरो ‘पिकॅडली सर्कस’ वर उभे राहून सिगरेट पीत असतांना व्हायची. मी पहिल्यांदा लंडनला गेलो तेव्हा एखादं प्रेक्षणीय स्थळ पहायला जावं तसं लंडनचे ‘पिकॅडली सर्कस’ व ‘ऑक्सफोर्ड सर्कस’ हे चौक पहायला गेलो होतो. या भागातला दिव्यांच्या झगमगाटानी झळकत असलेला व रात्री उशिरापर्यंत जागा रहात असलेला प्रसिद्ध ‘बॉन्ड स्ट्रीट’ हा ‘जेम्स बॉन्ड’च्याच नावावरून ठेवला आहे या गैरसमजात मी अनेक वर्ष होतो.

या शहरानी आपल्या अंगावर साहित्य, कला, ज्ञान, विज्ञान या बरोबरच शौर्य आणि क्रोर्याच्या खुणाही जागोजागी जपल्या आहेत. सूर्य मावळणार नाही इतकं साम्राज्य मिळवण्यासाठी जग जिंकताना एक एक प्रदेश जिंकून आलेल्या कर्नलच्या स्वागतासाठी एका एका चौकात त्या विजयाचं तेव्हा स्मारक उभारण्यात यायचं. चौकाच्या मधोमध उभारलेली ही स्मारके अजूनही तशीच आहेत. ट्रांझीस्टरवर बीबीसी स्टेशन कसंबसं पकडून टेस्ट मॅचची कॉमेंट्री ऐकताना लहानपणापासून ‘लॉर्ड्स’ या क्रिकेट मैदानाचं  नाव अनेकदा कानी पडत असे. प्रत्यक्षात जेव्हा हे ‘लॉर्ड्स’ मैदान पाहिलं तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिले होते.

‘विंडसर कॅसल’ मधे राजे-राजवाडयांच्या पुतळ्यांच्या रांगेत सर विंस्टन चर्चील यांचा पुतळा पाहून डोळ्यात पाणी येतं. एका सामान्य कुटुंबातल्या मुलानं केवळ आपल्या कर्तृत्त्वाने हे  स्थान मिळवलं आहे. इंग्लंडची राणी सुट्टीसाठी ‘वारवीक कॅसल’ मधे गेलेली असतांना तिथे तिने भारताला स्वातंत्र्य देण्याला संमती दिली होती. या बैठकीची खोली व लॉर्ड माऊंट बॅटन या बैठकीसाठी जिथे बसले होते तो सोफा तिथेच अजूनही तसाच ठेवलेला आहे. तो सोफा पाहतांना, त्याच्यावरून हात फिरवतांना अंगावर काटा उभा राहतो.

(साभार :महाराष्ट्र टाइम्स)

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

9822466401

आशुतोष शेवाळकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –आशुतोष शेवाळकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous article‘फाजल’ सुलभाताई !
Next articleसुनील यावलीकर :  स्मरणचित्रांचे सांस्कृतिक वैभव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.