‘फाजल’ सुलभाताई !

-प्रवीण बर्दापूरकर

ज्येष्ठ संगीत समीक्षक सुलभा पंडित मूळच्या सोलापूरच्या ,त्यांचं शिक्षण औरंगाबादला झालं आणि विवाहोत्तर वास्तव्य झालं विदर्भात . सुलभाताईंच्या निधनाला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं . त्यानिमित्तानं सुलभाताईंनी संगीतविषयक लिहिलेले कांही लेख , परीक्षणं आणि व्यक्तिचित्राचं ‘सुरावरी हा जीव तरंगे’ हे कॉफी टेबल बुक त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने प्रकाशित होत आहे . या पुस्तकासाठी लिहिलेला हा लेख-
……………………………………………………..

सुलभा पंडित यांना मी सुलभाताई म्हणून संबोधत असे .सुलभाताईंशी असलेला परिचय सुरुवातीची अनेक वर्ष औपचारिकच होता  . ‘सप्तक’ या संस्थेच्या संगीतविषयक विविध कार्यक्रमांनी नागपूरवर गारुड केलेले ते दिवस होते . संगीतातले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक दिग्गज सप्तकच्या व्यासपीठावर त्या काळात हजेरी लावून गेले . कार्यक्रमांना सहाजिकच तुडुंब गर्दी असे . तो काळच असा होता की , सप्तकचं सदस्यत्व फार प्रतिष्ठेचं समजलं जाई .  सप्तकच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं  ‘स्टेटस सिंबॉल’ झालेलं होतं . सदस्यत्व मिळवण्यासाठी लोक गर्दी करत , रांगा लावत असत. माझ्यावर मात्र सप्तकचा काय व्यक्तिगत लोभ होता माहिती नाही . विलास मानेकर किंवा विकास लिमये या दोघांपैकी कुणीतरी कार्यक्रमाचे पासेस माझ्याकडे निगुतीनं पोहोचते करत असत . अनायसे पासेस आहेत आणि काहीतरी चांगलं ऐकायला मिळतं आहे म्हणून मग मी आणि माझी बेगम मंगलानं , सप्तकच्या कार्यक्रमात सहभागी होणं सुरु केलं . कुठल्यातरी एका कार्यक्रमात सुलभा पंडित यांची ओळख झाली . तेव्हा बहुधा दैनिक ‘तरुण भारत’मधे त्यांचा संगीतविषयक स्तंभ सुरु होता . तो मजकूर वाचताना त्याचं नाव रजिस्टर झालेलं होतं . सुलभा पंडित यांच्याशी पुढे कधीतरी आपण प्रदीर्घ काळ काम करणार आहोत याचे पुसटसेही संकेत आम्हा दोघांनाही तेव्हा , पहिल्या भेटीत  मिळालेले नव्हते .

मध्यम उंची , किंचित स्थूल शरीरयष्टी , केसांची एक वेणी घातलेली , चेहऱ्यावर कायम गांभीर्य , किंचित काजळ घातलेले टपोरे काळेशार डोळे आणि अत्यंत शालीनपणे नेसलेली साडी , असं सुलभा पंडित यांचं व्यक्तिमत्त्व होतं  . त्या फार लोकांत मिसळत होत्या असंही दिसत नसे पण , परिचितांशी हसतमुखानं संवाद साधण्याची त्यांची शैली लक्षात आलेली होती . त्यांचा आवाज किंचित किनरा होता . मध्यम पट्टीत त्या बोलत . एक छानशी रसाळ लय त्यांच्या बोलण्याला होती . शांतपणे बसून आणि चेहऱ्यावर गांभीर्य पांघरुन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असत . संगीतातली त्यांची डोहखोल जाणकारी त्यांच्या साप्ताहिक सदरात उमटत असे . संगीताचं किमान सखोलही ज्ञान नसल्यानं अशा सर्वच  ज्ञानी माणसांपासून दूरच राहण्याचा शिरस्ता मी तेव्हा तरी पाळलेला होता . मात्र समोरासमोर आलो तर ‘नमस्कार’ किंवा ‘काय कसं’ अशा शब्दांची देवाणघेवाण न चुकता होत असे . हा सिलसिला आणखी काही वर्ष असाच सुरु राहिला .

‘लोकसत्ता’ची विदर्भ आवृत्ती नागपुरातून प्रकाशित होणं सुरु झालं . तत्कालीन निवासी संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या आग्रहानंतर सुलभा पंडित ‘लोकसत्ता’साठी संगीतविषयक लेखन करु लागल्या आणि आमच्यातला संपर्क वाढला . ‘लोकसत्ता’चा तेव्हा मी मुख्य वार्ताहर होतो . कुठल्याही कार्यक्रमाच्या प्रवेशिका मुख्य वार्ताहर म्हणून माझ्याचकडे येत असत . संगीत समीक्षक स्तंभ लेखिका म्हणून प्रवेशिका  सुलभा पंडित यांच्याकडे पाठवण्याची जबाबदारी अर्थातच माझ्याकडे आली . मग त्या निमित्तानं प्रवेशिका मिळाल्या आहेत किंवा नाही , छायाचित्रकार आणि मजकुराचं नियोजन अशा विषयांवर आमच्यात नियमित संपर्क सुरु झाला . एखाद्या कार्यक्रमात भेट झाल्यावर थोडासा निवांतपणा असेल तर गप्पाही होऊ लागल्या .  त्या गप्पातून सुलभा पंडित संथ  लयीत  उलगडत गेल्या . पंडित हे त्यांचं लग्नानंतरच आडनाव . मुळच्या त्या देवधर आणि हे देवधर कुटुंबीय सोलापूरचं . तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठातून सुलभा देवधर यांनी संगीत विषय घेऊन बी. ए. आणि विवाहानंतर नागपूर विद्यापीठातून एम. ए. केलेलं . आमचा हा परिचय वाढत होता तेव्हा संगीतात पीएच. डी. साठी पुढचं संशोधन त्या करत होत्या . याच अशा गप्पातून कधीतरी लक्षात आलं की , सुलभा पंडित माझ्यापेक्षा वयानं सहा-सात वर्षांनी मोठ्या आहेत आणि मी त्यांना सुलभाताई म्हणू लागलो.

सुलभाताईंचा स्वभाव अतिशय मृदु . त्यांनी आवाज चढवून कधी कुणाशी संवाद साधला आहे असं कधीच अनुभवायला मिळालं नाही किंबहुना बोलण्याबाबत वरची पट्टी सुलभाताईंना कधी मानवलीच नसावी असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं . पदवी , पदव्युत्तर आणि  पुढचं संशोधनही संगीतात केल्यानं , जो काही ज्ञानताठा अशा तज्ज्ञांमधे दिसतो तोही कधी सुलभाताईंमधे जाणवलाच नाही . ‘अमुक करा’ किंवा ‘करु यात का ,’ अशा आग्रही स्वरात सुद्धा सुलभाताई कोणतीच सूचना करत नसत ; आदेश देणं तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हतं . ‘मला काय वाटतं ,’ या तीन आर्जवी शब्दांनी बोलायला सुरुवात केली की , सुलभाताईंना काहीतरी मुद्दा किंवा विषय सुचवायचा आहे , हे पुढे माझ्या अंगवळणी पडलं . ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीत मुंबईप्रमाणेच कोणतंही सदर एक वर्षच सुरु ठेवायचं , असा पायंडा संपादक म्हणून मी रुढ केला ; त्याला अपवाद सुलभा पंडित आणि वसंत वाहोकर यांचा आहे . मी आधी निवासी संपादक आणि मग संपादक असतानाच्या काळात सुलभा पंडित यांनी तब्बल साडे अकरा वर्ष ‘लोकसत्ता’साठी स्तंभलेखन केलं . ‘लोकसत्ता’च्या सर्व आवृत्त्यातही एखाद्या स्तंभलेखकांनं  इतकं दीर्घकाळ नियमित लेखन केल्याचं , हे एकमेव उदाहरण असावं .

सुबोध लेखनशैली हे सुलभाताईंचं प्रमख वैशिष्ट्य . संगीतासोबतच मराठी आणि इंग्रजी साहित्यातही त्यांना केवळ रुचीच नव्हती तर चांगली जाणकारी होती . मराठी साहित्यातले  संत , अभिजात , विद्रोही हे मराठी साहित्यातले प्रवाह त्यांना चांगले ठाऊक होते . भारतीय लोकसंगीताबद्दल त्यांना असणारी माहिती थक्क करणारी होती . त्यातच संगीताची मूलभूत जाण असल्यानं सुलभाताईंच्या लेखनाला वजन आपसूक प्राप्त होत असे . त्यांच्या भाषेला एक डौलही असे . एकदा त्यांची कॉपी वाचायला सुरुवात केल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवली जात नसे , एक नितळ  प्रवाहीपण त्यांच्या लेखनाला होतं . अक्षर उजव्या बाजूला किंचित झुकलेलं पण , अतिशय सुवाच्च . व्याकरणाची चूक सुलभाताईंच्या लेखनात फार क्वचित…फारच क्वचित सापडत असे , अशी त्यांची भाषेवरची पकड जबर होती . घाईत असलो तर अनेकदा सुलभाताईंचा मजकूर मी थेट कम्पोजिंगसाठी सोडून देत असे आणि सवड मिळाल्यावर प्रुफावर एखादी नजर टाकत असे . या विदग्ध लेखन शैलीमुळेच ‘नागपूरच्या संगीतविषयक जगताच्या राजदूत’ म्हणून सुलभाताईंना  एकमताने मूकसंमती मिळाली . जिथे त्यांचा वावर असेल तिथे त्यांना तशी वागणूक मिळू लागली तरी सुलभाताई मात्र उतल्या नाहीत की मातल्या नाहीत . सामाजिक वावरातली एक जन्मजात शालीनताच दर्शवणारा त्यांचा वावर असे .

  त्यांच्या माझ्यातला संपर्क एव्हाना सख्यात रुपांतरित झाला होता तरी त्यात तो अकृत्रिम उबदार स्नेह धारण करेल असं काही तेव्हा वाटलं नव्हतं . ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीची सूत्र मी स्वीकारली तेव्हा ‘लोकसत्ता’ची परिस्थिती एकूणातच गंभीर होती . दैनिक ‘रिलाँच’ करण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला होता . तेव्हा नुकतेच संपादक झालेल्या कुमार केतकर यांनी नागपूरची जबाबदारी माझ्यावर टाकलेली होती . ‘रिलाँच’ची जुळवाजुळव सुरु असताना सुलभा पंडित यांचा स्तंभ प्रकाशित होत नसल्याचं लक्षात आलं . चौकशी केली तर त्यांच्या लेखनाचं वीस महिन्याचं मानधन थकलेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या संदर्भात त्यांनी चौकशी केली असता एका ज्येष्ठ सहकाऱ्याकडून दुरुत्तर करण्यात आल्यामुळे सुलभा पंडित स्वाभाविकपणे दुखावल्या होत्या . संगीतात दर्दी असलेला सहकारी राम भाकरे याला घेऊन मी थेट सुलभा पंडित यांच्या घरी एक दिवस धडकलो . मला बघितल्यावर सुलभा पंडित चमकल्या तर खऱ्या पण , ‘लोकसत्ता’च्या  संदर्भात सकारात्मक राहावं , अशी मन:स्थिती नसल्याचं त्यांनी त्यांच्या परिचित मृदू शैलीत स्पष्ट सांगितलं . सुरुवातीला गप्पात तो विषय न काढता जुन्या आठवणी काढून त्यांना जरा खुलवलं , नोस्टाल्जिक केलं  . शेवटी आता आवृत्तीची सूत्रं माझ्याकडे कशी आलेली आहेत हे सांगून झाल्या प्रकाराबद्दल अतिशय स्पष्ट शब्दात मी दिलगिरी व्यक्त केली आणि सुलभाताईंचा एकदाचा रुसवा मावळला . त्यांनी पुन्हा ‘लोकसत्ता’साठी लिहायचं मान्य केलं .

माणूसमयता जन्मजातच स्वभावात असल्यानं हट्टीपणा करावा , एखादा विषय तुटेल एवढा ताणावा हे त्यांच्या शालीन वृत्तीत बसणार नाही , याची खात्री मला होती आणि घडलंही अगदी तसंच . ‘लोकसत्ता’ रिलाँचच्या वेळेस कुमार केतकर नागपूरला आले तेव्हा सर्व स्तंभ लेखकांसोबत  त्यांची एक बैठक आयोजित केली होती . त्या बैठकीत सुलभाताईंची ओळख करुन देताना त्या आपल्यावर कशा नाराज होत्या याचा ओझरता उल्लेख मी केतकरांकडे केला तेव्हा सुलभाताई पटकन म्हणाल्या , “जाऊ द्या हो , संपला तो विषय आता .” त्यांच्या या बोलण्यातून त्यांच्यातील क्षमाशील वृत्तीचाही परिचय घडला. बहुसंख्य लोक आपले टिकली पेक्षाही लहान असणारे मान-अपमान आयुष्यभर जोपासत आणि उगाळत असताना सुलभाताई मात्र मोठा अपमान सहज विसरुन आमच्या परिवारात सहभागी झाल्या , हे इथे आवर्जून नोंदवायला हवं .

नंतर सलग साडेअकरा वर्ष सुलभा पंडित यांनी केवळ ‘लोकसत्ता’च्या विदर्भच नाही तर सर्व आवृत्त्यासाठी लेखन केलं . त्यांच्या नियोजित स्तंभाशिवाय अन्य एखाद्या विषयावर मजकूर मागितला आणि तो कधी वेळेत मिळाला नाही असं कधी घडलंच नाही . या काळात आम्ही खूपच संपर्कात आलो . आठवड्यात किमान एकदा तरी आमची भेट होत असे . आमची संपादकीय बैठक वगैरे नाही किंवा कुणी व्हिजिटर नाही , याची खातरजमा केल्याशिवाय त्या कार्यालयात येत नसत . अनेकदा त्या पतीसह येत . त्यांच्या भेटीत साहित्य आणि संगीतविषयक मैफिलच रंगत असे . अनेक गायक आणि लेखक समान आवडीचे असल्यामुळे आमच्या त्या मैफिली कधीच बेसूर झाल्या नाहीत . संगीताच्या क्षेत्रातील दिग्गज असूनही सुलभाताईंचा ‘लोकसत्ता’च्या कार्यालयातील वावर आश्वासक वडीलधाऱ्या सहकाऱ्यासारखा असे. 

हळूहळू आम्ही कौटुंबिक पातळीवरही भेटू लागलो . डॉ . सुलभा आणि प्रा . डॉ . प्रमोद  पंडित दाम्पत्य अनेकदा वसंतनगरमधील आमच्या छोट्या घरी येत असे . डॉ . प्रमोद फारच माफक बोलत , तो मक्ता सुलभाताईकडेच असे . त्यांच्या येण्यानं आमचं घरही सात्विकतेनं उजळून जात असे . सुलभा पंडित यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तो करिष्मा होता . माझी पत्नी मंगला हिच्याशीही त्यांचा स्वतंत्र संपर्क निर्माण झाला . त्या दोघीत प्रामुख्यानं साहित्यावर गप्पा होत असत . पुढे पुस्तक आणि ध्वनिफितींची देवणाघेवाण , असे उपक्रम आमच्यात सुरु झाले . मंगलाला माझं बेगम म्हणणं त्यांना फारच अप्रूपाचं वाटे . या काळात आमच्यात एक अनौपचारिक असा स्नेहबंध बांधला गेला यात शंकाच नाही .

‘लोकसत्ता’ सोडायचा निर्णय सुलभा पंडित यांना मी सुमारे दोन महिने आधी सांगितला तेव्हा त्या काही क्षण स्तब्ध झाल्या . ‘तुम्ही गेल्यावर मी ‘लोकसत्ता’साठी लेखन करु शकेल असं वाटत नाही’ , असं त्यांनी स्पष्ट केलं . संपादक आणि स्तंभ लेखक यांच्यात निर्माण झालेल्या  विश्वासाच्या नात्याचा संदर्भ त्या म्हणण्यामागे होता .  नागपूरच्या काही कलावंतांनी सादर केलेल्या एका सांगितिक कार्यक्रमाबद्दल एका कथित जाणकारानं सुलभा पंडित यांच्यावर टीका करणारा मजकूर ‘लोकसत्ता’कडे पाठवला होता . प्रत्येकाला एक मत असतं , प्रतिवाद असतो अशी माझी धारणा असल्यामुळे तो मजकूर प्रकाशित व्हावा आणि त्या जाणकाराचं सुमारपण वाचकांसमोर उघडं पडावं असं मला वाटलं . तो मजकूर मी सुलभा पंडित यांच्याकडे पाठवला आणि त्यावर त्यांचाही प्रतिवाद मागवून घेतला . अतिशय संयत पण सडेतोडपणे सुलभा पंडित यांनी त्या छटाकभर जाणकाराच्या मजकुराचे वाभाडे काढणारा मजकूर पाठवला . खोचक संपादकीय टिपणीसह ते दोन्ही मजकूर प्रकाशित झाले . स्तंभ लेखकांच्या पाठीशी संपादक ठामपणे उभा राहातो , हा अनुभव सुलभा पंडितांना बहुधा पहिल्यांचदाच आला असावा . त्यामुळे त्या कृतीचं त्यांना फारचं कौतुक वाटलं आणि त्यांनी ते अनेकदा बोलूनही दाखवलं.

मी ‘लोकसत्ता’ सोडल्यावर सुलभा पंडित यांनी स्तंभ लेखन थांबवलं . मात्र आमच्यातल्या भेटीगाठी होतंच राहिल्या . पुढे मी दिल्लीत पडाव टाकला आणि नंतर औरंगाबादला स्थायिक झालो तेव्हा आमच्यातल्या भेटी टेलिफोनिकच उरल्या तरी आमच्यातला परस्पर ऋणानुबंध मुळीच क्षीण झाला नाही . नंतर प्रदीर्घ आजाराने आधी बेगम मंगला आणि नंतर अचानक सुलभाताई पंडित यांचं निधन झालं . आमच्या स्नेहातला सूरच जणू सुलभाताईंच्या निधनामुळे मौन झाला ; शालिनतेचा एक पारदर्शी प्रवाह खंडित झाल्यासारखं झालं . नागपूरच्या सांगितिक घडामोडींची मर्मज्ञ आणि काहीशी मनोज्ञ वळणाची मनोभावे समीक्षा करणाऱ्या दुसऱ्या सुलभा पंडित यापुढे निर्माण होतील की नाही , याविषयी माझ्या मनात शंका आहे.

उर्दूत ‘फाजल’ नावाचा एक शब्द आहे . फाजल म्हणजे सालस . पत्रकारितेच्या निमित्तानं साडेचार दशकात वेगवेगळ्या क्षेत्रातील अगणित लोकांशी संपर्क आला मात्र , सुलभा पंडित यांच्यासारखी फाजल व्यक्ती एकच आणि ती म्हणजे सुलभाताईच !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर – type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleएका संजीवनी (गूढ )बेटावरचा एक दिवस!
Next articleये ‘है’ लंडन मेरी जान…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.