विधान परिषद सदस्य झाल्यावर सुधीर जोशींच्या नागपूर चकरा वाढल्या . नंतर त्यांच्या सोबतच्या शिवसेना आमदारांचीही संख्या वाढली . त्यात मनोहर जोशी , प्रमोद नवलकर , छगन भुजबळ अशी भर पडत गेली . हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूर बाहेरच्या मित्र आमदारांना एकदा तरी ‘रात्र भोज’साठी आमंत्रित करण्याची माझी सवय होती कारण मुंबईला गेलो की ही मंडळी फार ममत्वानं खाऊ पिऊ-घालत असत ; त्यांची ‘सुदामी’ परतफेड करण्याचा माझा प्रयत्न म्हणजे हे ‘रात्र भोज’ असे . ) त्याला सुधीर जोशी आणि मनोहर जोशी आवर्जून प्रतिसाद देत . आमची गप्पांची मैफल रंगलेली असताना हातात सरबताचा ग्लास घेऊन सुधीर भाऊ माझ्या बेगम मंगलाशी गप्पा मारत असत . माझ्या बेगमला विविध स्वादाच्या सुगंधी सुपारी खाण्याचा नाद होता . मुंबईहून येताना दादरच्या कोणत्या तरी दुकानातून सुधीर भाऊ वेगवेगळ्या स्वादाची सुपारी तिच्यासाठी आणत असत . जेवण संपल्यावर रात्री उशिरा अनेकदा सुधीर जोशी , प्रमोद नवलकर आणि मनोहर जोशी ऑटो रिक्षाने आमदार निवासात परतल्याचं पक्कं आठवतं . त्या ऑटोरिक्षात बसताना उंच , धिप्पाड सुधीर भाऊंना बरीच कसरत करावी लागत असे . पण त्याबद्दल त्यांनी कधीही कुरकुर केली नाही .
महसूल मंत्री असताना प्रवासात असताना सुधीर जोशींच्या कारचा अपघात झाला . गंभीर झालेल्या सुधीर जोशी यांना प्रदीर्घ काळ सत्तेच्या दालनापासून लांब राहावं लागलं . त्यांचं महसूल खातं नारायण राणे यांच्याकडे गेलं . याच उपचाराच्या काळात सुधीर भाऊंचा कंपवाताचा ( पार्किनसन्स ) अधिक बळावला तरी मोठ्या उमेद आणि जिद्दीनं सुधीर भाऊंनी मंत्रालयात पाय टाकला . त्यांच्याकडे शिक्षण खातं सोपवण्यात आलं . पुढे मुख्यमंत्रीपदाची सूत्रं मनोहर जोशींकडून नारायण राणेंकडे गेली . सेनेच्या सत्ताकारणाचा सारा बाजच बदलला . सुधीर जोशी जाहीरपणे काही व्यक्त झाले नाहीत पण , खाजगी बोलण्यात डावललं जाण्याची निराशा आली , हे मात्र खरं .