तळेगावच्या ४०० वर्ष पुरातन वाड्यातील ‘गाडगेबाबांची खुर्ची’

 

– ललितकुमार वऱ्हाडे

अमरावती – वर्धा मार्गावर तळेगाव दशासर (ता.धामणगाव रेल्वे) नावाचे एक ऐतिहासिक गाव आहे. ‘पटाचं तळेगाव’ म्हणून तळेगावाची ओळख आहे . एकेकाळी येथील शंकरपटाची संपूर्ण विदर्भात ख्याती होती . माझे सिनिअर ,सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख सर (काका) यांचे ते मूळ गाव. त्यांचे पूर्वज तळेगावाचे देशमुख.  देशमुखी त्यांच्या  घरात. अलीकडेच त्यांच्यासोबत तळेगावला जाण्याचा योग आला . तळेगावच्या प्रवासात गप्पा सुरु असताना काकांनी सांगितले की, गावात त्यांचा वडिलोपार्जित वाडा आहे. मोठा दुमजली चिरेबंदी वाडा. त्या वाड्याचे चित्र मनात उभं करत गावात शिरलो.  गावात पोहचताच  जवळपास पाच एकरापेक्षा जास्त परिसरातील वाडा पाहून थक्कच झालो . ४०० वर्षापूर्वीचा हा वाडा आता मोडकळीस आला आहे . काही भाग कोसळला आहे . खिंडारं पडली आहेत . वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोकांनी अतिक्रमण करुन घरं बांधली आहेत.मात्र वाड्याकडे नजर जाताच एकेकाळी या वाड्याचे वैभव ,रुबाब काय असेल ,हे लगेच लक्षात येते .

  चिरेबंदी भिंती. मोठी माडी.  पूर्वी गडांना असायचा तसा भला मोठा दरवाजा…. तुटलेली डोली,नक्षीदार डमनीचे जू ,कोरीव -आखीव खांब. जुना लाकडी नक्षीदार पलंग. लाकडी जिना, हे सगळं पाहताना या वाड्याने एकेकाळी काय वैभव अनुभवलं असेल , याची कल्पना करत असताना काका सांगत होते , ‘हे सगळं चारशे वर्षापूर्वीचं आहे ललित. आमचे वंशज गजमलसिंह इंगळे. ते आमच्या घराण्याचे मूळपुरुष. त्यांनी हा वाडा बांधला.’  त्यांच्या फोटोकडे बोट दाखवत ते एकेका पिढीतील प्रमुखाचा फोटो दाखवत होते. आपल्या कर्तबगार पूर्वजांनी कष्टाने उभारलेलं हे वैभव जपता यायला हवं, त्याचं मातेर होऊ नये असं त्यांच्या प्रत्येक वाक्यातून ते सांगत असल्याचं मला जाणवत होतं.

  वाडा पाहता -पाहता एकदम एका वस्तूवर माझी नजर स्थिरावली. ‘काका, हे काय आहे? खुर्चीसारखं दिसतय काही तरी..’

 ‘अरे ती खुर्चीच आहे.खास बनवली होती खुर्ची…’, काकांनी सांगितले .

एकदम हटके अशी खुर्ची मी याअगोदर कधीच बघितली नव्हती..

पूर्ण सागवानी लाकडाची,नक्षीदार, सुबक. खाली लाकडाचाच बेस असणारी. खुर्चीवर बसण्यासाठी लाकडी पायऱ्या असणारी एकदम आरामदायी अशी खुर्ची.

मी म्हटलं, ‘काका, ही खुर्ची देशमुखांची खास आहे वाटतं…’

काका म्हणाले, ‘नाही रे..या खुर्चीची एक वेगळीच कहाणी आहे.’

‘ ही खुर्ची देशमुखांची नाही. ही फार महत्वाची खुर्ची आहे.  दोन दोन युगपुरुषांचा स्पर्श या खुर्चीला झाला आहे.’

 

   काकांचे आजोबा बापूराव उर्फ बापूसाहेब देशमुख हे फार हुशार, धोरणी,आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते.  डॉ. पंजाबराव  देशमुख,आबासाहेब खेडकर हे बापुरावांचे जवळचे मित्र.  बापूसाहेब देशमुख त्यांचे सोबत कायम विविध सामाजिक कामात अग्रेसर असायचे. सामाजिक कार्याच्या निमित्ताने बापूरावांची गाडगेबाबांसोबत अनेकदा भेट व्हायची. एकदा बोलता बोलता बाबांनी  मी अमुक एक महिन्यात कीर्तनासाठी तळेगावला येणार आहे , असे  सांगितले .  ते ऐकताच बापुरावांनी मनाशी काहीतरी ठरवले . वाड्यात येताच त्यांनी सुतारांना बोलावून घेतले . गाडगेबाबांसाठी एक विशेष खुर्ची बनवायची आहे , असे त्यांनी सांगितले . जवळपास १५ दिवसाच्या मेहनतीनंतर गाडगेबाबांसाठी खास खुर्ची तयार झाली . गाडगेबाबा तळेगावला आले. वाड्यात आलेत. सगळीकडं फिरले. डोक्यावर गाडगं आणि हातात झाडू घेऊन फिरणारा हा फकीर बापूरावांच्या आग्रहाखातर काही वेळासाठी या खुर्चीत बसला. बापुरावाचं दातृत्व, समाजासाठीची त्यांची तळमळ. वाड्याच्या जागेत उघडलेली शाळा. गोरगरीबांसाठी धडपडणारं त्यांच संवेदनशील मन,  हे गाडगेबाबांना दिसत असावं. त्यामुळेच त्यांनी खुर्चीत बसण्याचा आग्रह मानला असावा .

 

एकदा गाडगेबाबा त्या खुर्चीत बसले म्हटल्यावर पुढे त्या कोणी त्या खुर्चीवर बसण्याचं काही कारणंच नव्हतं. पुढे वाड्यात येणारा प्रत्येक माणूस त्या खुर्चीसमोर श्रद्धेने नतमस्तक व्हायचा. बाबांच्या चरणस्पर्शाने देशमुखांचा वाडा आणि वाडेकरी पावन झालेत. मी त्या खुर्चीकडे एकटक पाहत होतो. गाडगेबाबा शांतपणे बसलेले मला दिसलेत. दुसरीकडे बापूराव गाडगेबाबांच्या प्रसन्न मुद्रेकडे बघत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर धन्य झाल्याचे भाव आहेत, असे मला बापुरावांच्या फोटोत दिसत होते . तेव्हा काय संभाषण झालं असेल त्या दोघांमधे? काय संदेश दिला असेल गाडगेबाबांनी?  काय सांगितलं असेल त्यांनी? आजच्या पिढीतील काकांना ते माहीत नाही. त्यांचे भाऊ,त्यांचे काका, कोणालाच माहीत नाही. फक्त त्या संवादाचा  एकच शाश्वत साक्षीदार आहे. तो म्हणजे ४०० वर्षाचा देशमुखांचा वाडा. जरा आपुलकीने,विश्वासाने,प्रेमाने विचारलं तरं वाडा इतिहासातील ती जीर्ण होऊ लागलेली पानं अलगद उघडून दाखवेल, असा विचार माझ्या मनात डोकावून गेला . पण ही सारी कल्पनाच. पुढे या वाड्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पावलंही लागलीत.या दोन युगपुरुषांची आठवण जपणारा वाडा ही खऱ्या अर्थाने ऐतिहासिक धरोहर आहे .

 

(लेखक यवतमाळचे निवासी जिल्हाधिकारी आहेत )

9822730412

Previous articleचेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार
Next articleसुधीर जोशी… ऐसा नेता पुन्हा न होणे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.