चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार

-समीर गायकवाड

एखाद्या माणसाला एकाच फ्रेममध्ये अडकवून ठेवलं की त्याचे बाकीचे पैलू कधीच नजरेत येत नाहीत आणि ती व्यक्ती तितक्याच मर्यादित परिघात बंदिस्त होऊन जाते. बप्पीदा याचे बेस्ट एक्झाम्पल ठरावेत. बप्पीदांविषयी लिहिण्याआधी त्यांनी केलेल्या नियतीच्या पराभवाबद्दल सांगायचेय. साल होते १९८७. आपला दोस्त एका खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतोय म्हटल्यावर त्याला हात देणाराच त्याचा मित्र असतो. राज सिप्पींनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये ‘इन्कार’च्या यशातून शिरपेच खोवला. यातील हेलनचं ‘मुंगळा मुंगळा’ गाणं आणि तगडा विनोद खन्ना लोकांच्या मनात ठसले.

यशाची चव चाखल्यानंतर दोनेक दशकांनी विमनस्क झालेला विनोद खन्ना आधी एकांतवासात आणि नंतर रजनीशआश्रमात गेला. राज सिप्पी दुखी झाले. त्यांनी विनोदखन्नासाठी आपल्या मनाची कवाडे खुली ठेवली ऍज लाईक बेअरर चेक ! विनोद खन्नाचे करिअर मातीत गेल्यात जमा होते.

चार वर्षे ओशोंच्या आश्रमात राहून शिष्यत्व पत्करून तो परतला होता. हा माणूस आपल्याला जाम आवडतो. अनेकदा त्याची पडझड झाली, अक्षरशः मातीमोल झाला. मात्र पुन्हा पुन्हा नव्याने तो उभारी घेत राहिला. ‘मेरे अपने’ ते ‘कुर्बानी’ हा त्याचा ग्राफ भारीच होता. तगड्या देहाचा मोस्ट हॅण्डसम नायक होता तो ! त्याचं व्यक्तिगत आयुष्य दोलायमान होत राहिलं आणि त्याच्या सोबत त्याच्या अख्ख्या कुटुंबाने त्यात हेलकावे खाल्ले, मुलांचे करिअर दोलायमान झाले. आता तर त्याचा तरुण पोरगाही संन्यासाच्या वाटेवर आहे. असो..

तर १९८७ मध्ये राज सिप्पींच्या ‘सत्यमेव जयते’मधून त्याचं कमबॅक होतं. त्याच्या मोठ्या अडचणी होत्या. त्याचं वय होतं अधेड उमर एक्केचाळीस वर्षे ! ‘सत्यमेव जयते’साठी त्याच्या हिरॉईनचा शोध जारी होता. त्याला फिट बसेल अशी नायिका नव्हती आणि त्याच्यासोबत काम करायला कुणी उत्सुक नव्हतं.

पंचविशी पार केलेली अनिताराज तयार झाली, नव्हे हसत हसत राजी झाली. मुंबईत आता ड्रेस डिझायनरचं काम करणाऱ्या या अभिनेत्रीला कधीच टॉपच्या रेसमध्ये जाता आलं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरून तिला खूप ऐकवलं जायचं, जगदीशराजची मुलगी ही ओळख तिला अजून पुसता आली नव्हती !

तिच्याच वयाची दुसरी नायिका होती मीनाक्षी शेषाद्री. सुखवस्तू कुटुंबात जन्मलेली नि दर दोन वर्षाआड एक हिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्रीला नेमकी स्पेस गवसली नाही, ती लग्न करून विदेशात गेली. ‘सत्यमेव जयते’कडून कुणाच्याच फारशा अपेक्षा नव्हत्या.

याच सिनेमात आणखी एक अभिनेत्री होती, माधवी ! ‘एक दुजे के लिये’, ‘अंधा कानून’ वगळता हिचा एकही सिनेमा चालला नव्हता. तिला ऑफर्स यायच्या बंद झाल्या होत्या ! ‘सत्यमेव जयते’ मधील अख्खी कास्टिंग पडीक आणि बी ग्रेड म्हणून हिणवली गेलेली होती. स्टोरीतही काही दम नव्हता.

सगळे असे दुकानदारी बंद झालेले चेहरे घेऊन राज सिप्पींनी डाव लावला आणि सक्सेस झाला. सर्वांनाच जणू संजीवनी मिळाली ती देखील नियतीला हरवून ! आपल्या कामासाठी एक छदामही न घेऊन या यशाचा लाभ एका माणसाला बिलकुल झाला नाही तो म्हणजे बप्पीदा ! खरे तर त्यांच्या एका गाण्याने सिनेमा तारला होता तरीदेखील त्यांचे नाव झाले नाही !

या संपूर्ण काळात जगात आसपास जी माणसं होती ती नियतीला हरवून पुढे आली होती. १९८४ ला इंदिराजींची हत्या होऊन राजीव गांधी पंतप्रधान झाले होते. त्यांच्या कालखंडात १९८७ च्या दरम्यानच श्रीलंकेत तमिळ इलमच्या उग्रवाद्यांचा विद्रोह शिगेला गेला होता. रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी जगाला ग्लासनोस्त आणि पेरीस्रोईकाची नवी परिभाषा दिली होती. ग्यानी झैलसिंग यांच्या जागी वेंकटरमण राष्ट्रपती झाले होते. सर्वत्र एका नव्या नि स्थिर बदलाच्या समीकरणाचे दिवस होते, अगदी ‘सत्यमेव जयते’सारखे आणि अस्तित्वाच्या खोजमध्ये असणाऱ्या बप्पीदासारखेच !

या चित्रपटातल्या गायकांच्या नावावर एक नजर टाकली तर हे म्हणणे अधिक पटेल ! एस. जानकी, कविता कृष्णमूर्ती, शैलेन्द्र, मिताली मुखर्जी आणि स्वतः बप्पीदा ! एका अर्थाने म्हटलं तर तो काळच कामचलाऊ माणसांचा होता.

देश स्वतंत्र झाला पन्नासच्या दशकात त्यामुळे त्या पिढीचा ताजाताजा गवगवा नि थोरवी नव्वदपर्यंत कायम होती. मात्र स्वातंत्र्योत्तर काळखंडात सत्तरच्या दशकात जन्मलेली पिढी आज कोणत्याच हिशोबात नाही.

नव्या मिलेनियममध्ये जन्मलेल्या लोकांनी नवी डिजिटल दुनिया बनवलीय तर एकोणीसशे तीस चाळीसच्या क्रांतीपर्वात जन्मलेले लोक आता स्मृतीशेष झालेत ! मग मधल्या लोकांचे काय झाले ?

काळाच्या पटलावरचे त्यांचे अस्तित्व काय ?

फारशा अपेक्षा न करता सुखात समाधानात जगलेल्या या पिढीला नियतीशी लढता आले नाही किंबहुना नियतीशी तिचा सामना झालाच नाही.

या पिढीच्या आयुष्यात एक ठहराव होता, एक शांत शीतल जुम्बिश होती, एक समर्पण होतं. मात्र त्यांना कसलं क्रेडीट कधीच कुणी दिलं नाही. बप्पीदा याचेच एक प्रतिनिधी ठरावेत !

त्यांनी विशेष काही अतिप्रचंड भन्नाट लोकप्रिय झालेलं कालातीत संगीत मोठ्या प्रमाणावर दिलं न्माही. ही गिव्ह प्लेन्टी ऑफ हिट नम्बर्स ! बप्पीदांच्या नावावर जी हिट गाणी आहेत ती बहुतांश एका पठडीतील आहेत त्यामुळे त्या पलीकडचे बप्पीदा कुणाला दिसले नाहीत आणि त्यांचा कुणी शोधही घेतला नाही.

मॅटीनीचा सुवर्णकाळ सरत आला होता. अमिताभ जुना झाला होता. नव्या चेहऱ्यांचे आगमन सुखावह ठरत होते. हे समीकरण जवळपास प्रत्येक क्षेत्रात असोशीने समोर येत होते, अशाही अवस्थेत जुनी सागवानी मंडळी तग धरून होती. अनिलकपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा यांच्या मर्यादा उघड्या पडल्या होत्या. सगळे एकमेकास धरून पुढे जात होते.

मात्र विशेष असं काही घडत नव्हतं कारण ज्याला त्याला शिक्के मारलेले होते आणि जो तो त्या शिक्क्यांना जागून आपली भूमिका सराईतपणे वठवत होता.

बप्पीदा याला अपवाद नव्हते. त्यांच्या वाट्याला बहुत करून आला होता मख्ख चेहऱ्याचा मिथुन ! क्वचित अमिताभ वाट्याला आला, पण जेंव्हा कॉम्बिनेशन यशस्वी झालं तेंव्हा त्यांनी नमकहलाल, शराबीसारखे उत्तुंग म्युझिकल हिट्स दिलेत !

पार्श्वगायकांत त्यांच्या हिश्श्यात आला तो अत्यंत हार्ड टोन असलेला विजय बेनेडिक्ट ! ज्याच्यासाठी पॉप डिस्कोवरून घेतलेल्या काही ट्युन्स !

उषा उत्थुपच्या करिअरचा तो पीक टाईम होता. कल्पना अय्यर आणि पद्मा नारायण यांच्या डान्सिकल व्हॅम्पनी जादू केली होती. ही सगळी गाणी त्या त्या काळापुरती हिट होती. त्यांची रिमिक्सेस येऊन गेली.

पण ही गाणी बप्पीदासारखीच स्वतःच्या ओळखीच्या शोधात भटकत राहिली.

सत्तर ते नव्वदच्या दशकातील पिढी आजही जशी स्वतःच्या आयडेंटीटीच्या शोधात भटकतेय तसे बप्पीदांचे झाले.

खूप काही होतं त्यांच्या संगीतात, मात्र तो लौकिक त्यांना कधी मिळालाच नाही जो आधीच्या शंकर जयकिशन वा नंतरच्या ए.आर. रेहमानना मिळाला, त्यांची खास अशी गणना झालीच नाही.

त्यांची चर्चा अधिक झाली ती त्यांच्या सोनेरी व्यक्तिमत्वापायी !

त्यांच्या डिस्को गीतांविषयी अधिक बोललं लिहिलं गेलं, त्यांच्या सायलेंट क्लासिक्सविषयी क्वचित चर्चा झाली.

‘शराबी’, ‘ऐतबार’, ‘मनोकामना’, ‘नमकहलाल’, ‘चलते चलते’, ‘जख्मी’, ‘पतिता’मधली त्यांची गाणी ऑफ बीट होती तरीही त्यांची चर्चा झाली नाही.

त्यांच्या उचललेल्या थीम्सवरून त्यांची टवाळकी अधिक झाली मात्र त्यांच्या ओरिजिनल ट्रॅक्सविषयी कमी कौतुक झालं !

त्यांनी इंग्लिश, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड, गुजराती गीतांना चाल लावली त्याला कधी दिलखुलास दाद मिळाली नाही.

प्लेबॅकसिंगर म्हणून त्यांनी सिंगल हिट्स गाणी दिली.

अगदी रशिया आणि बाल्टिक देशांसह आखाती देशांत त्यांची गाणी गाजली मात्र इथे त्यांना ते स्थान मिळालं नाही जे इतरांना मिळालं होतं.

बप्पीदा निरंतर प्रयॊग करत राहिले, स्वतःला आजमावत राहिले मात्र त्यांची एकच फ्रेम झाली नि नकळत त्यांच्यावर अन्याय झाला.

आधीची सगळी समीकरणं मोडून नवी मांडणी केली जात होती, अगदी संगणकीकरणापासून ते डिस्कोपर्यंतचे आगळेवेगळे बदल हरेक क्षेत्रात घडत होते. आता मागे वळून पाहताना या बदलांचे विशेष वाटत नाही कारण हे जून झालेत. मग या काळात ज्यांनी योगदान दिले त्यांचे काय ?

ती नावं त्या एका काळापुरतीच जगली असं नव्हतंच, किंबहुना त्यांनीच तर डळमळत्या पायावर इमारतीचे बांधकाम केलं आणि आज जे भव्य स्वरूप दिसतंय त्यात हे झाकून गेलेय.

बप्पीदांचे असेच झालेय. १९७३ ते २०२० अशी सत्तेचाळीस वर्षे त्यांनी संगीत देऊनही त्यांना एका चौकटीत बंदिस्त केलं गेलं हे मूल्यांकन योग्य नव्हतं.

त्यांच्या वाट्याला आलेले सिनेमे, नायक नायिका आणि गाण्यांच्या पोझिशन्स सर्व काही साचेबंद होत गेलं.

याला कारण त्या पिढीच्या साचलेपणात देखील होतं ! एकाच व्यक्तीमध्ये असणारे बहुविध गुण तेंव्हा शोधलेच जात नव्हते. तरीदेखील ते तगून होते नव्हे तर टिच्चून उभे होते ! टीकाकारांना फाट्यावर मारून काम करत होते !

लेखाच्या प्रारंभी ‘सत्यमेव जयते’चा उल्लेख तेव्हढ्यासाठीच केला आहे.

जो तल्लख बुद्धीचा आहे त्याला मेरिटमध्ये आणणाऱ्या शिक्षकांचा गौरव दुनिया भलेही करत असेल मात्र जो थोडासा मागे पडतोय वा ज्याचे फारसे स्किल नाही, बल नाही त्याला पुढं आणणाऱ्या शिक्षकाचं कौतुक व्हायलाच हवं ! पण समाज इथे कद्रूपणा करतो, तो अशा शिक्षकांसह त्यांच्या विद्यार्थ्यांनाही मानाचं पान देत नाही ! बप्पीदांची गाणी आणि संगीत हे याच तऱ्हेने काहीसे दुय्यम समजले गेले मात्र बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वास अलविदा केलंय..

चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते त्यामुळे त्यांची खरी नि नेमकी ओळख झालीच नाही. कदाचित हीच त्यांची ओळख असावी !

‘सत्यमेव जयते’मधलं ‘दिल में हो तुम..’ हे गाणं बप्पीदाचं द बेस्ट साँग आहे.. तुम्ही आमच्या स्मृतीत असाल बप्पीदा !

दिल में हो तुम…

लेखक नामवंत स्तंभ लेखक ब्लॉगर आहेत.

8380973977

…………………………………….

समीर गायकवाड यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –समीर गायकवाड type करा आणि Search वर क्लिक करा.

नक्की ऐका-Top 10 Songs of Bappi Lahiri-क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here