फिरकीचा जादूगार

-शेखर पाटील

शेन वॉर्न गेला. . .क्रिकेटच्या पीचचा बादशहा !  साधारणपणे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू असतात तसा वांड आणि याच्या जोडीलाच बर्‍यापैकी छंदी-फंदी असणार्‍या शेन वॉर्नला तसे क्रिकेटमध्ये आधीच अढळपद मिळालेले आहे. सर्वकालीन महानतम खेळाडूंपैकी एक म्हणून त्याला चिरप्रसिध्दी लाभली आहे. आज क्रिकेटचे क्लासिकल स्वरूप मागे पडत असून फलंदाज केंद्रीत सामन्यांची रेलचेल असतांना कधी काळी क्रिकेटमध्ये शेन वॉर्न नावाची चालती-बोलती दंतकथा होती, आणि आम्ही ‘याची देही-याची डोळा’ तिची जादू अनुभवली हे आपले सौभाग्यच. . .!

………………………..

फिरकी गोलंदाजी म्हटल की, भारतीय उपखंडाचे नाव समोर येते. जगातील बहुतांश सर्वश्रेष्ठ फिरकी गोलंदाज हे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशातून अनेक लीजंडरी स्पीनर्स होऊन गेलेत. मात्र जिथे द्रुतगती गोलंदाजीची अतिशय तेजस्वी परंपरा आहे, अन् जिथे बदलीचा गोलंदाज म्हणून स्पीनरचा वापर करणे प्रचलीत आहे अशा ऑस्ट्रेलियन संघात शेन वॉर्नने आपले निर्माण केलेले स्थान हे खरंच त्याची महत्ता दर्शविणारे आहे. लेग स्पिन ही खरं तर क्रिकेटमधील अतिशय दुर्मीळ कला होय. आज देखील चेंडूला अतिशय अचूक असा लेग स्पीन करणारे गोलंदाज आपल्याला बोटावर मोजण्याइतकेच आढळतील. यामुळे स्पिनर्सची परंपरा नसणार्‍या कांगारू संघात शेन वॉर्न हा जवळपास दीड दशके त्यांच्या आक्रमणाचा आधारस्तंभ बनतो ही बाब त्याला महान खेळाडूच्या पंक्तीमध्ये मानाचे स्थान देणारी ठरली आहे.

शेन वॉर्नची चेंडू वळविण्याची कला ही अतिशय अफलातून अशीच होती. हाच त्याचा सर्वात ‘स्ट्रॉंग पॉईंट’ देखील होता. इतर फिरकीपटूंना थोडा-फार चेंडू वळविण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करावी लागत असतांना या बहाद्दराचे चेंडू वितभर नव्हे तर हातभर वळून जेव्हा भल्याभल्यांची भंबेरी उडवत, त्यांच्या दांड्या गुल करत तेव्हाचा नजारा हा क्रिकेटमधील अजरामर अशा क्षणांमध्ये परिवर्तीत झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. त्याच्या गोलंदाजीला वळण होते, त्याचा टप्पा अतिशय अचूक असा होता, आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे फलंदाजांना आपल्या तालावर अक्षरश: नाचविण्याची ताकद त्यांच्या गोलंदाजीत होती. चेंडूला उंची देऊन फलंदाजाला क्रिजबाहेर काढून चकविण्याची त्याची खासियत देखील अनेक फलंदाजांना तंबूत पाठविणारी ठरली होती. कसोटी आणि एक दिवसीय या दोन्ही प्रकारांमध्ये शेन वॉर्नने एकसमान विलक्षण ताकदीने गोलंदाजी करून आपला गुणवत्तेची अमीट छाप निर्माण केली.

ऍलन बॉर्डरच्या कर्णधारपदापासूनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे सुवर्णयुग सुरू झाले. यानंतर मार्क टेलर आणि स्टीव्ह वॉ यांनी कागांरूंच्या वर्चस्वाची द्वाही जगभरात पसरवली. याच ‘ड्रीम टिम’मधील महत्वाचा मोहरा हा अर्थातच शेन वॉर्न होता. १९९९च्या विश्‍वचषकातील आपल्या संघाच्या विजेतेपदात त्याचा सिंहाचा वाटा होता. या पठ्ठयाने सेमी फायनल आणि फायनल या दोन्ही मॅचेसमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’चा बहुमान मिळविला ही बाब त्याचे महत्व सिध्द करणारी आहेच. दुर्दैवाने २००३ आणि २००७ च्या विश्‍वचषकात तो खेळू शकला नाही. खरं तर वन-डे सामने त्याच्या वाट्याला तुलनेत कमी आले. मात्र जे आले त्यात त्याने आपला ठसा उमटवला.

शेन वॉर्नने जगभरातील मातब्बर फलंदाजांना आपल्या तालावर नाचविले. मात्र भारता विरूध्द त्याची कामगिरी फारशी सरस ठरली नाही. यातील एक कारण हे अर्थातच भारतीय फलंदाजांना फिरकी खेळण्याचा चांगला सराव असणे हे होय. यातच, सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज फलंदाजाने लेग स्टंपच्या बाहेर ‘स्टान्स’ घेऊन शेन वॉर्नच्या आक्रमणाच्या ठिकर्‍या उडविता येत असल्याचे दाखवून दिल्यानंतर सेहवाग व अन्य भारतीय फलंदाजांनी देखील त्याची यथेच्छ धुलाई केली. मात्र सचिनसकट भारताच्या मातब्बर फलंदाजांना त्याने अनेकदा जाळ्यात अडकवल्याची बाब विसरता येणार नाही.

वास्तविक पाहता, भारतीय उपखंडाच्या बाहेर बहुतांश खेळपट्टया या द्रुतगतीला अनुकुल असतात. अर्थात, यावरून चेंडू वळविणे तसे खूपच कठीण असते. मात्र अशा खेळपट्टयांवरही वॉर्नने देदीप्यमान कामगिरी केली. खेळपट्टी हिरवीगार असो की, अगदी पाटा. . .त्याला कोणताही फरक पडत नसे. अनेक क्रिकेट समीक्षक तर शेन वॉर्न हा काचेच्या वा सिमेंटच्या पीच वर देखील हातभर चेंडू वळवेल असे म्हणत. आणि ते खरे देखील होते. त्याने आपल्या कारकिर्दीत अगदी अशक्य वाटणार्‍या अशा अनेक विकेटस् घेतल्या. यात १९९३ सालच्या इंग्लंडच्या दौर्‍यात तर माईक गॅटींगला लेग स्टंपच्या खूप बाहेरून चेंडू वळवून त्याचा ऑफ स्टंप उडविल्यानंतर त्याने वासलेला आ अजूनही रसिक विसरलेले नाहीत. ‘बॉल ऑफ दी सेंच्युरी’ म्हणून याला अजरामरत्व प्राप्त झाले आहे.(समोरील लिंकवर क्लिक करा- (https://www.youtube.com/watch?v=16mudGUYsBw) याच प्रकारे अँड्ˆयू स्ट्रॉस याला तर अगदी ऑफ स्टंपच्या वाईड जाईल इतक्या बाहेर टाकलेला शेन वॉर्नचा चेंडू त्याची लेगची दांडी घेऊन उडाल्यानंतर देखील तो असाच अवाक झाला. असे असंख्य क्षण शेन वॉर्नच्या कारकिर्दीत आले. फलंदाजाला मस्तपैकी फसवून बाद केल्यानंतर त्याचा अतिशय उत्स्फुर्त असा जल्लोष अन् चेहर्‍यावरील खट्याळ हसू हे क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झालेले आहे.

शेन वॉर्नचे नाव आले की, साहजीकच मुथय्या मुरलीधरनचे नाव देखील येतेच. दोघांचे देश वेगळे, शैली वेगळी. एक लेगस्पीनर तर दुसरा ऑफ स्पीनर. पण या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण ? हा वाद देखील होतोच. आकड्यांचा मापदंड तपासून पाहिला असता मुरलीधरन हा शेन वॉर्नपेक्षा कितीतरी पुढे आहे. मात्र फिरकीपटूंची परंपरा नसतांना, आणि तुलनेत कमी गोलंदाजी मिळाल्यानंतरही शेन वॉर्नने केलेली कामगिरी ही त्याची महत्ता दर्शविणारी ठरली आहे.

आज क्रिकेटला बाजारू स्वरूप आलेय. कधी काळी मनगटाच्या फलंदाजीच्या सौंदर्यावर भाळणार्‍या रसिकांना आता ‘बाहुबली’ चौकार-षटकारांचे व्यसन लागलेय. आयपीएलसारख्या गल्लाभरू स्पर्धा याला खतपाणी घालताय. यामुळे फलंदाज मनगटांपेक्षा आता आपल्या बाहुंवर जास्त विश्‍वास टाकताय. गोलंदाजीत देखील हाच प्रकार आहे. आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये तर गोलंदाज हे जणू काही कत्तलीसाठीच असतात असा सगळा प्रकार आढळून येतोय. या बाबींचा विचार करता, आपल्या विलक्षण नजाकतभर्‍या फिरकीने क्रिकेट विश्‍वावर अधिराज्य गाजविणारा शेन वॉर्न हा किती महान होता हे कुणाला नव्याने सांगावे लागणार नाही. ते त्याने आपल्या कर्तबगारीतून आधीच सिध्द केले आहे. ५२ हे काही जाण्याचे वय नाही. मात्र तो गेला. पण अजरामरत्व मिळवून. आपल्याला भरभरून आनंद देणार्‍या शेन वॉर्नला कृतज्ञतापूर्वक नमन. . .

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)

9226217770

Shane Warne’s Magical bowling

Previous articleभाजप विरोधाची कच्ची मोळी !
Next articleविठ्ठल वाघांची अद्भुत संवादी चित्रे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.