एका ज्येष्ठ नेत्याचे हिणकस ट्रोलिंग करणाऱ्या त्या अतिशय हिणकस स्त्रीचे तितकेच हिणकस ट्रोलिंग होताना पाहून मनात पुन्हा एकदा आय ऍम अ ट्रोलची आठवण जागली.
ते सारे वाचताना आणि मराठीत आणताना हे असेच दोन्हीकडून वाढत गेले तर आपल्या सांस्कृतिक भानाचे काय होईल या विचाराने तेव्हाही मन थरकापले होते… हे सारे कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला.
काल आणि आज हे हिणकस ट्रोलिंग थांबवावे असे सुचवणाऱ्या मित्रांच्या पोस्ट्स आणि त्यावर चालू दे- जे होतंय ते बरोबरच आहे असं लिहिणाऱ्यांच्या कमेंट्स वाचल्या. त्यामुळे फॅशिस्ट राजकारणाच्या क्षितिजावर उगवलेला हा अंधार आता सर्वव्यापी होणार याची खात्री पटत चालली आहे.
भाजप आय़टी सेलने २०१३पासून जे विषाचे फवारे सर्वत्र सोडायला सुरुवात केली. क्रियेला प्रतिक्रिया येतेच या खेळाचीच त्यांना अपेक्षा होती. वातावरण बिघडवा आणि परिस्थिती चिघळवा- मग त्याचा राजकीय फायदा उचला हे त्यांचे तत्त्व आहे. त्यानुसार एक हिणकस, गलिच्छ क्रिया झाली की त्यावर येणाऱ्या तशाच हिणकस गलिच्छ प्रतिक्रियांवर त्यांचे वातावरण बिघडवण्याचे कारस्थान शिगेला पोहोचते.
हे कसे थांबवायचे हा प्रश्न लवकरच भाबडा ठरेल किंवा ठरला आहे.
हे आता थांबणारे नाही. फर्माइशी प्रतिक्रियांची विविध भारती सुरू झाली आहे. घाणघाण लिहिणारांचे लाईक्स वाढत आहेत. फॉलोअर्स वाढत चालले आहेत. दोन्ही बाजूंना तेच आहे. मुंबई ब वर आपली आवड लोकप्रिय आहेच. आणि मग हे जरा बोअर झाले की न संपणाऱ्या मालिकांसारखे ट्रोलिंग सुरू रहातेच. रोज वेगळे कपडे घातलेला जुना विषय. की मग बाकी सारे विसरले जाते. पगार वाढत नाही, नोकरी गेलीय ती परत मिळत नाही, शेती अशक्य होतेय… यात होरपळलेल्या निम्नमध्यमवर्गाला, बहुजन समाजातील लोकांनाही कुणीतरी कुणालातरी घाण बोलतंय याचा आनंद कसा घेता येतो- प्रश्न पडेल. पण मिळतो त्यांनाही आनंद हे सत्य आहे.
एकंदरीत संघाच्या राम माधवांनी सोडलेला घोडा आता देशालाच लागलेला आहे.
एखाद्या केसबाबत नीतीमत्तेला, सुसंस्कृतपणाला आवाहने करून हे थांबणारे नाही हे ओळखून घ्या.
हिंसेने हिंसाच वाढते. शाब्दिक हिंसेनेही शाब्दिक हिंसाच वाढते. ही प्रत्यक्ष मैदानावरच्या यादवीची सुरुवात आहे. नुकतीनुकती सुरुवात.
या साऱ्याचा तार्किक शेवट व्हायला काही वर्षे जाणार आहेत.
या हिणकसपणामुळे दुःखी झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींना एवढंच सांगते. की तुम्ही तुमचा अवकाश जरूर जपा. पण दगडफेक सुरू असताना- दुसरी बाजू फुलं फेकू शकत नाही, किंवा रॅम्पवॉकही करू शकत नाही हे आपल्याला लक्षात ठेवलंच पाहिजे.
माझ्यापुरतं मी कुणावरही व्यक्तिगत हिणकस लिखाण करणार नाही, कुणाच्याही मरणाची इच्छा करणार नाही, कुणासाठीही काल्पनिकही नरकाची इच्छा करणार नाही. एवढंच.
बाकी जे सुरू आहे ते पर्वताच्या गुळगुळीत उतारावरून शिखरावरच्या कुणीतरी ढकलून दिलेले गोटे आहेत.
या देशात हिंदुत्व इतकं खोलवर रुतून बसलेलं असताना ते खतरे में अशी वेडगळ गर्जना लोक ऐकतात- त्या देशात बरेच गडगडणारे गोटे आहेत.
डोकं सांभाळा. बाकी दूर जा…
(लेखिका इंडिया स्टडी सेंटर ट्रस्टच्या व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत)
अगदी मनापासून मला हेच वाटत.फक्त शब्दात नेमक मांडता येत नव्हत. राजकारण खऱ्या अर्थानं आता खालच्या पातळीवर गेलेलं आहे, गुरगमी परिणाम भयंकर असतील.