अनुभव व्याघ्रगणनेचा!

– सीमा शेटे-रोठे, अकोला.

जेव्हा तो सोबतच्या बहुतेकांना दिसतो पण नेमका तुमच्या भागात असूनही तुम्हाला मात्र दिसत नाही, तेव्हा थोडावेळ हिरमुसायला होतं. पण मग लगेच दुसऱ्या बाजूने सकारात्मक विचार करतो तेव्हा पदरी भरपूर काही नवीन मिळालेलं असतं, त्याचा आनंद घेण्यात तुम्ही मश्गुल होता….

वाचणा-यांना वाटत असेल, कोण तो…काय नवीन, कसचा आनंद? साहजिकच आहे. तर सांगतेच सगळं सविस्तर😊

गोष्ट सुरू आहे, निसर्ग अनुभवाची! ज्यालाच आपण व्याघ्रगणना म्हणतो. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री तेजस्वी चंद्रप्रकाशात मचाणावर बसून प्राणी बघणे आणि त्यांची गणना कागदावर लिहून वनविभागाला देणे, असा तो कार्यक्रम असतो.

कोरोनाच्या आधी म्हणजे दोन वर्षांपूर्वी निसर्ग कट्टाच्या अमोल सावंत यांच्या सहकार्याने पहिल्यांदा या मोहिमेत सहभाग नोंदवला होता. त्या अनुभवामुळे दोन वर्षानी आयोजित या ‘व्याघ्रगणनेत सहभागी होण्यास प्रचंड उत्सुक होते. माझ्याचसारखे अनेकजणं या संधीची वाट पहात असल्याने ज्यादिवशी वन विभागाने नोंदणी लिंक सुरू केली, त्यादिवशी नेटक-यांची गर्दी झाली आणि आमची काही केल्या नोंदणी होईना. मी, स्वाती, अर्चंना, देवू, धनू सगळ्याच हिरमुसलो. यंदा संधी हातची जातेय बहुधा! या विचाराने अस्वस्थ झालो.

पण सर्वांच्या जबरदस्त इच्छेचा परिणाम दिसून आला. दुसऱ्या दिवशी नेटक-यांच्या गर्दीत आम्हाला संधी मिळाली आणि स्वातीने धडाधड नोंदणी करुन पैसे भरले आणि ‘बुकिंग झाले ग…💃🏻 ‘ करत आम्हाला मेसेजही पाठवलेत. अर्थात याहीवेळी ‘निसर्ग कट्टाचे अमोल सावंत यांची मदत होतीच. जंगलात जायचे आणि व्याघ्र गणना करायची, ही कल्पनाच तशी मनात उत्तेजना निर्माण करणारी आहे. जंगलात मिसळल्या जातील अशा हिरव्या शेडसचे कपडे, पाठीवर एक सॅक ज्यामध्ये एक नॅपकीन, एक चादर, एक बिस्कीटचा पुडा आणि एक पाणी बाॅटल असं नाममात्र सामान घेऊन आम्ही निघालो. अर्थात सोबत मोबाईल, कॅमेरा, दुर्बीण होतीच. अकोल्याहून निघालो आठ वाजता. अंदाज होता, जास्तीत जास्त दहा-सव्वा दहा पर्यंत पोहचण्याचा. मात्र आम्ही तिथे रिपोर्टींग टेबलवर नोंदणी करायला गेलो तेव्हा वाजले होते, साडे बारा! अकोला ते ज्ञानगंगा अभयारण्य गाठायला साडे चार तास? कुणालाही आश्चर्य वाटावं, अशी ही बाब. ती का घडली? कशी घडली ? त्यामुळे आमच्या ज्ञानात मोठीच भर पडली.😊

आम्ही पाच मैत्रिणी. देवश्री नि स्वातीला ड्रायव्हिंग येत असल्याने आणि अंतर फार नसल्यामुळे आम्ही तिच्या स्विफ्टने निघालो. गप्पागोष्टी रंगात आल्या होत्या. सहज बाहेर नजर गेली तर गावाचे नाव,”आंबेटाकळी” ते कसे पडले असावे याचा तर्कवितर्क सुरु होताच. मधून मधून गुगलबाई टर्न लेफ्ट, थर्टी किलोमीटर स्ट्रेट वगैरे सूचना देत होतीच. असं करता करता ती सांगत होती की, एक मिनिटाच्या अंतरावर बोथा आहे. आम्ही अवाक्! कारण कुठेही जंगल सदृश्य चिन्ह दिसत नव्हती. वनविभागाची पाटी किंवा काही दिसत नव्हतं. आता आम्ही गप्पा थांबविल्या. गुगलबाई बंद केली. समोर जे गाव आलं तिथल्या एका बाईला विचारलं,”बोथा जंगलात जाणारा रस्ता?”

आम्ही भलतं काय विचारतोय, असा भाव तिच्या चेहऱ्यावर उमटला. आणखी चारपाच हवसे मार्गदर्शक धावतच गाडी पर्यंत आलेत. “आसपास कुठेही जंगल नाही. पण हे बोथा गाव आहे”, हे कळले आणि रस्ता चुकल्याची आम्हाला जाणीव झाली. गाडी मागे वळविली. काही अंतर गेलो तर परत रस्ता दोन भागात विभागलेला. एकीच्या मॅपमध्ये सरळ रस्ता निळा रंग तर दुसरीच्या मॅपमध्ये लाल रंग… संभ्रम वाढला. विचारावं कुणाला? मला लक्षात आलं की काही अंतर मागे एक चौकी दिसत होती. देवूला म्हटलं,”तिथे विचारु”

ती वनविभागाची चौकी होती पण तिथे दाराला कुलूप! एक माणूस बाहेर बसलेला. तो म्हणाला, “मी इथे उन्हाचा थोडावेळ टेकलो आहे. मला ठाऊक नाही. पण इथल्या एका कर्मचाऱ्याचा नंबर आहे माझ्याकडे त्याला विचारतो. तो कर्मचारी जवळपास असावा. लगेच आला. त्याने आम्हाला सांगितले की, हा ‘बोथा काजी’ गावाचा परिसर आहे. तुम्ही मागे जा. उंद्रीहून पुढे रस्ता पकडा. गाडी वळविली. मॅपबिप बंद केले. येणा-या प्रत्येक गावाजवळ थांबून विचारु लागलो,”उंद्री?”

“हे पुढे…सरके तीऽर जाजा. उंद्री न् पुढे बुलढाणालोक पोहचता”

पण त्यांना आम्ही चुकून जरी ‘जंगल रस्ता’ विचारले तर ते त्यांना माहिती नसायचे. आता पुढे तर जातोय पण बरोबर आहे की नाही? या शंकेने अमोल सावंतांना फोन लावला. रस्ता चुकल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या खुणांच्या आधारे मांडवा, धोत्रा नाईक वगैरे गावं पार करत उंद्री फाट्यापर्यंत पोहचलो. तिथून खामगाव रस्ता पकडला. खामगावहून बुलढाणा रस्त्याकडे वळलो तर समोरच वनविभागाचा मोठ्ठा फलक नि त्यावर ज्ञानगंगा अभयारण्याची माहिती व बोटींगचा फोटो. आता कुठे हायसे वाटले. मग पिशवीतले चिक्कू बाहेर आलेत. आनंदाच्या भरात काय गडबड झाली कळलं नाही, घशात चिक्कू अडकला. मला श्वासही घेता येईना, शब्द फुटणे तर दूरचीच गोष्ट. स्वाती आणि देवश्री समोर बसलेल्या. त्यांचे लक्ष नव्हते. धनश्रीला कळेना की, मावशी असे हातवारे काय करतेय. अर्चनाचे लक्ष गेले. तिने गाडी थांबवायला सांगितली आणि माझ्या पाठीवर गुद्दे मारून माझा श्वास मोकळा केला. हा अनुभव यापूर्वी कधीच आला नव्हता. श्वास थांबणे म्हणजे काय, त्याची चुणूक मिळाली.

शेवटी एकदाचे ज्ञानगंगा अभयारण्य, वनविभागाचे कार्यालय दिसले. तिथे रिपोर्टिंग केले. आणि गप्पा मारत बसलो. या बायकाच निसर्ग अनुभवासाठी आल्यात, याचं नवल आणि जिज्ञासा प्रत्येकाला होती. याआधी कधी, किती आणि कोणती जंगलं बघितली याबद्दल त्यांच्याकडून विचारणा झाली. आम्ही हा विभाग किती मोठा आहे, कोणते प्राणी, पक्षी आहेत, झाडं झुडपं फुलं आदी चौकशी करत होतो. तुपकर सर, गावंडे सर, खरात मॅडम… उत्साहाने माहिती देत होते. त्या गप्पांमध्ये कळले की, या भागात तीन बोथा आहेत. हे बोथा अजिंठ्याच्या खो-यात वसलेलं आहे. खोरं आणि डोंगरकडांनी वेढलेला हा भाग आहे. अंजन, साग, पळस हे वृक्ष इथे अधिक प्रमाणात आहेत. मेडशिंगी, लाल काळी गुंजही मुबलक आहे. वाघ नाही पण बिबट मात्र आहे. अस्वलं भरपूर आहेत. साळींद्र, रानडुक्कर, मोर, नीलगाय यांचा वावर आहे. गवा अलिकडे दिसायला लागला आहे. हरिण मात्र कमी आहेत. पक्षीही भरपूर आहेत….

निसर्ग निरीक्षणासाठी आलेल्या चौदा निरिक्षकांची उत्तम भोजन व्यवस्था करुन प्रादेशिक विभागातून आणखीन तीन महिला गार्ड त्यांनी बोलाविल्या. अकोल्याहून वनविभागाचे निमजे साहेब आलेत आणि त्यांनी व चौघापाच जणांनी भरपूर चर्चा करून, महिला एका पट्ट्यात आणि मोबाईल रेन्जमध्ये येतील या पद्धतीने मचाण लाॅटरी चिठ्ठ्या तयार केल्यात. आधी पुरुष निरिक्षकांना संधी देत लाॅटरी काढली गेली आणि मग वेगळ्या डब्ब्यात ठेवलेल्या पाच चिठ्ठ्या आम्हाला उचलायला सांगितल्या. अशारितीने मचाण वाटप झालं. प्रत्येकासोबत वनविभागाचा कोणता माणूस आहे, त्यांची ओळख करून देण्यात आली. निमजे सरांनी शुभेच्छा देत आम्हा निरिक्षकांना वन नियम समजावून सांगत आवश्यक सूचना दिल्यात. अर्थात आमच्या चौदाजणांपैकी बहुतेकांना आधीचा अनुभव असल्याने मचाणावर कसे रहावे, कोणते नियम पाळावेत हे माहिती होतेच.

इथे बसमध्ये चढताना सुद्धा शिस्त होती. तुपकर सरांनी एक निरीक्षक व सोबतचा गार्ड अशा एक एकाला बसविले. ‘बिबट दिसो’ या शुभेच्छा घेऊन बस निघाली. रस्त्याने जाताना मावळतीच्या सूर्यप्रकाशातलं जंगल सौंदर्य नजरेला सुखावत होतं. कधी गर्द पाचूच्या रंगाचा मोर आपली मान उंचावून बसकडे बघत होता तर कधी त्या आवाजाने बिचकून या रस्त्याच्या एका बाजुवरून दुसऱ्या बाजूला उडत जात होता. कुठे शांतपणे नीलगाय चरत होती तर कुठे सातभाई कलकल करत होते. एक एका मचाणापर्यंत बस जात होती. मचाणाची जागा आली की, कच्च्या रस्त्यावर बस थांबवून तिथला निरीक्षक, गार्ड खाली उतरत होते. सोबत दोन गार्ड उतरायचे. निरिक्षकाचे सामान, वन विभागातर्फे पाण्याची कॅन, चार पेले असे त्या मचाणावर चढविलं जात होते. आर. एस. मोरे हे त्या त्या निरीक्षकाचा मचाणावर चढताना आणि चढून दारात बसलेला फोटो काढत होते.

सायंकाळी सहाच्या सुमारास आम्ही मचाणावर पोहचलो. आसपास पानं झडलेली सागाची झाडं, हिरवी पानं ल्यायलेले अंजन वृक्ष आणि काही तुरळक कडूलिंबाची झाडं होती. एका बाजूने सूर्य निरोप घेत होता तर दुसरीकडे चंद्राचे आगमन होण्याची वर्दी मिळत होती, प्रत्यक्ष तो मात्र दिसत नव्हता. मचाणाच्या पश्चिमेला पाणवठा होता पण मचाण पूर्णपणे गवताने झाकले असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. जोर लावून पश्चिम आणि पूर्वेला आम्ही फटा तयार केल्या जेणेकरून बाहेरचे दिसावे. पण पाणवठ्याच्या आणि आमच्यामध्ये झाडाच्या फाद्यांचा अडथळा मात्र दूर करू शकलो नाही. त्या मध्ये येतच होत्या. वर चढल्याबरोबरच वनपाल शिला खरात यांनी माझे लक्ष रस्त्यावरून जाणा-या धष्टपुष्ट डुक्कर आणि त्यांच्या पिल्लांकडे वेधले. लगेच वनविभागाकडून मिळालेल्या फाॅर्मवर त्याची नोंद केली. किती वाजून किती मिनिटाला दिसले, संख्या किती होती, मोठे किती, छोटे किती, नर की मादी… इ. माहिती त्यात भरायची होती.

हळूहळू अंधार पडू लागला. आसपास तशी शांतता मधूनच काही पक्षी मचानावरुन जोरात आवाज करत अलिकडे पलीकडे करत होते. खाली आसपास जी वाळलेली पानं होती, त्यांचा आवाज होत होता. आवाज झाला की आम्ही सावधपणे चाहूल घ्यायचो. एकटक पाणवठ्यावर नजर होती. पण काहीच दिसत नव्हतं. मध्येच दूरुन बस जात असल्यासारखा आवाज यायचा. खरात मॅडम म्हणाल्यात, “ती हवा आहे” आणि खरंच थोड्यावेळात हवेची झुळूक स्पर्श करून निघून जायची. “वारा वाहतो” ही संकल्पना मला त्यादिवशी पहिल्यांदा अनुभवायला मिळाली. आता आकाशात चांदण्या दिसू लागल्या. चंद्रदेव मात्र अद्याप आले नव्हते. रातवा अधिकच आवाज करत होता. मधूनच विविध पक्षांचे आवाज कानावर पडत होते. पण कोण असतील ते कळत नव्हते. तेव्हा प्रकर्षाने जाणवले की, यापुढे रेकाॅर्डर सोबत आणायला हवा. अमोल, उदय, अवि कुणाकडून तरी नंतर त्याबद्दल माहिती समजून घेता येईल.

वेळ मंदगतीने पुढे सरकत होता. अचानक दूरवर दिवे दिसले. लक्षात आले, गस्तीची जिप आहे. खरंच होतं रात्री ९-९.३०च्या सुमारास तुपकर सर स्वतः निरिक्षकांसाठी भोजन पाकिट घेऊन आले होते. मी त्यांना पाणवठ्याच्या भागातील काही दिसत नसल्याची तक्रार केल्यावर ते वर आले आणि त्यांनी आम्हाला दोन्ही बाजूंचे गवत हाताने तोडून काढत खिडकी करून दिली. पॅकेट देवून ते गेले आणि पाचच मिनिटांत खरात मॅडमच्या मोबाईलवर बिबट्याचा फोटो आला. आमच्या मचाणाच्या समोरच्या रस्त्यावर ‘तो’ खेळत बसला होता. त्याआधी देवूला मचाणावर सोडून देताना ‘तो’ दिसला. फोटो आलेत. जवळच आहे तर इकडे येण्याची शक्यता आहे. आमचीही आशा जागृत झाली. वाटलं, आता येईल मग येईल…पण छे!

या जंगलात अस्वलं खूप आहेत, तर ते तरी येईल. पण अंहं… काहीच नाही. मध्येच पानांवरुन चालल्याचा स्पष्ट आवाज यायचा तिन्ही दिशेला डोळे फाडून बघायचो पण काहीही नाही.

वाट बघता बघता पहाट झाली. दिवस उजाडला पण कोणताही प्राणी दिसला नाही. उषेची लाली पसरली. पुन्हा एकदा पक्षांची किलबिल सुरू झाली. दूरवर परत एक डुक्कर दिसले. काही वेळात चमकदार त्वचेची निळी झाक असणारी देखणी नीलगाय पाणवठ्याच्या दिशेने येता येताच पलटून निघून गेली. सातभाईंची भांडाभांडी परत सुरू झाली. खाली उतरुन ‘पगमार्क’ दिसतात का, याचा शोध घेतला. पण कोणतेही चिन्ह आढळले नाहीत. आठ वाजले. घ्यायला बस आली. बसमध्ये पायरीवर पाय ठेवता क्षणी प्रश्न विचारल्या गेला, काही दिसलं? त्या काही मध्ये अपेक्षित फक्त ‘तो’च होता. मी नाही सांगितलं तर ज्यांना दिसला त्यांनी उत्साहाने स्वतःचा अनुभव सांगितला. पुन्हा कार्यालय परिसरात आलो. चहा,नाश्ता, फोटो आणि अनुभव कथन झाले आणि प्रत्येकजण आपापल्या गावी रवाना झाला.

परतताना मी विचार करत होते, मला तो दिसला नाही. तो तर नाहीच नाही पण अस्वल, साळुंद्री, उदमांजर, गवा, हरिण हे इतरांना दिसले पण मला दिसले नाही. म्हणून मग माझा ‘निसर्ग अनुभव’ वाया गेला का? मनात थोडी निराशा आली पण अशावेळी अविरत आठवला. तो नेहमी सांगतो, जंगल अनुभव म्हणजे केवळ व्याघ्रदर्शन नव्हे. वाघ हा तर केवळ केकवरचं आयसिंग आहे. मिळालं उत्तम. पण नाही मिळालं तरी केकची मूळ चव कमी होत नाही. तसंच जंगलाचं आहे. वाघ, बिबट दिसावा ही इच्छा असते पण ते नाही दिसले तरी त्या जंगलातील इतर अनुभव तितकेच आनंददायी असतात, त्याची अनुभूती आपण घ्यावी.

खरंच किती वेगळा अनुभव असतो हा…काळोख-रात्र-रातवे! आपल्याही श्वासाचा आवाज मोठा वाटावा इतपत गूढ अशी शांतता! केवळ आणि केवळ निसर्गाचे आवाज. मधूनच टिटवीची टिवटिव, अंधारात भासणारी प्राण्यांची हालचाल, रात्री दोन वाजता चंद्राचे माथ्यावर येणे, त्याच्या प्रकाशाने तनामनाला स्पर्शणारी धवल भावना, कधी कल्पनेतही न सुचणारा विचार प्रत्यक्ष दिसल्यावर, अरेच्चा! हे असंही असतं का? असा आपल्याच मनाशी उच्चारलेला उद्गार! कारण लहानपणापासून ऐकलेलं की, चंद्राच्या प्रकाशात चांदण्या दिसत नाहीत आणि इथे तर मचाणाच्या दरवाजातून वर आकाशात एकाच वेळी चमकदार चंद्र आणि बाजूला पाच टिमटिमणा-या चांदण्या दिसत होत्या. त्यातच मधूनच दिव्यांचं लुकलुकणं लक्ष वेधत होतं. ते आभाळातून जाणारं विमान होतं. रात्री तीन साडेतीनच्या आसपास मोराचे साद घालणे, लागोपाठ माकडांचे ओरडणे, घुबडाचा घुत्कार … हे अनुभव मन सुखावणारे होते. विविध पक्ष्यांचे आवाज, हवेचा आवाज, पानांचे आवाज माझ्या ‘आवाज की दुनिये’मध्ये भर घालत होते.

हा निसर्ग अनुभव माझ्यासाठी मोठाच आहे, त्यामुळे नाही ‘तो’ दिसला…कोई बात नही 😊 या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी! बेट्या मी तुला भेटायला येणारच! तुझ्या निमित्ताने निसर्ग अनुभव घेणारच!

(लेखिका अकोला आकाशवाणीत प्रासंगिक उद्घोषिका आहेत)

9422938040

Previous articleमाझ्या प्रिय साड्यांनो….
Next articleही मैदानावरच्या यादवीची सुरुवात…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here