माझ्या प्रिय साड्यांनो….

संडे स्पेशल 😊

-शीतल यदुराज मेटकर

माहेर सोडून निघतांना एका सुटकेसीत मावणारी ती बाहुली, सासरी येऊन काहीच वर्षात माऊली होते. सुरुवातीला “नको नको” म्हणणाऱ्या  त्या लाजरीबुजरी चं लाजरेपण हळूहळू ओसरत जातं आणि सणावाराला कुणी कौतुकाने दिलेल्या साड्या(बिड्या) ती मोकळेपणाने स्विकारू लागते.

पुढंपुढं मोकळेपणात चांगलीच प्रगती होत ती घरभर पसरत जाते. आणि प्रगतीपुस्तकात जास्त होणाऱ्या साड्यांना मग माड्याही कमी पडू लागतात. . . . .

वाढत्या पसार्यावरून नवरा-लेकरांचे टोमणे वगैरे ऐकून काही काळ जराशी ओशाळतेबिशाळते सुद्धा. आणि दर वर्षी ठरवते (डिक्लेयरच करते) “या वर्षात मी एकही साडी घेणार नाही म्हणजे नाही!😌” …….

पण साड्या मेल्या तिचं ऐकतच नाहीत मुळी 🙄. येतच राहतातआप्पोआप् कुठून ना कुठून, आणि कालांतराने चक्क बाजूच्या कपाटात घुसखोरी सुरू होते. 😜.

मग घरातल्या #Don कडून 😎 धमक्या मिळणं सुरू होतात, “हे सगळे कपाटं आता तूच घेऊन टाक. मी गेस्टरूम मधेच शिफ्ट होऊन जातो एकदाचा”🔫 …….. वगैरेवगैरे.

तरी साड्यांची घुसखोरी काही केल्या थांबत तर नाहीच, उलट वाढतच जाते.

पण बिच्चारी माऊली! तिला तर त्या सर्व साड्यांना आपल्या सावलीत जपण भागच असतं ना! शेवटी तीच बिचारी शक्य तेवढी तडजोड करत, कुणालाही त्रास नं देता, एकटीच निघते online मार्केटच्या पायऱ्या झिजवत. काटकसरीनं वागणारी ती, पै पै जोडून, मल्टीलेयर हँगर्स चा पुरेसा (वाटणारा) स्टाॅक विकत घेऊन, थकूनभागून परत येते.

मग सर्व वेगवेगळ्या कपाटातल्या, खोल्यातल्या, पंलंगातल्या, सज्ज्यांवरच्या साड्या भराभ्भर येऊन तिच्या पुढे सज्ज होतात. आणि साडी-सम्मेलन समारंभाची ती एकपात्री आयोजक/अतिथी/अध्यक्षा, त्या सर्वस्तरीय साड्यांपुढे मनातल्यामनातच भाषण ठोकते.

…. “हे माझ्या प्रिय साड्यांनो, अब तुम्हे किसिसे भी डरने की कोई जरूरत नही। आता तुम्हा सर्वांना तुमच्या हक्काच्या जागेत व्यवस्थित माववून देणार आहे तुमची ही माऊली!”

आणि जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे एकेका Multi लेयर हँगरवर दहादहा साड्यां सजवते आणि ‘दुनियाँ मे जो आये है तो जीना ही पडेगा….” गुणगुणत जीना उतरून खाली जाते.

त्या साड्या सुद्धा तिथे दाटीवाटीने का होईना, पण आनंदात हँगू लागतात. मात्र लोकसंख्या जास्त असल्यामुळे उरलेल्या साड्या, पुनः जमेल तिकडे पांगू लागतात.

” हम आज से चुराई हुई हँगरा नही वापरते!” च्या अविर्भावात रिकाम्या झालेल्या स्टीलच्या साध्या ओल्डफॅशन्ड हँगरा, त्या माऊलीनं, कधीच्याच डाॅनच्या इलाक्यात फेकून दिलेल्या असतात.

पिच्चर अभी बाकी है दोस्तो……

फिर #दो_तीन_दीन_बाद

जैसेही कपाट का पर्दा खुलता है, 🙆‍♀️

🤦‍♀️🤦‍♀️Multilayer हँगर्स तर हँगओव्हर नं उतरल्यावाणी पार डुलूडुलू झालेल्या अस्त्यात🥴🥴

ते बघून त्या कनवाळू माऊलीच्या संवेदनशील मनाला लगेच जाणीव होते, की डाॅनच्या इलाक्यात बेवारस पडलेल्या हँगरांना तीच्या मायेच्या सावलीची नितांत आवश्यकता आहे. आणि आपल्या या निस्वार्थ कार्याचा कुठेच गवगवा होणार नाही, याची काळजी घेत, ती माऊली हड्डूच्च एकएक हँगर जवळ घेऊन त्यांवर आपल्या साड्यांच्या घड्यांची माया पांघरते.

(लेखिका उत्कल नृत्य निकेतनच्या संस्थापक आहेत)

Previous articleएका सत्तांतराची गोष्ट
Next articleअनुभव व्याघ्रगणनेचा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.