एका सत्तांतराची गोष्ट

-प्रभू  राजगडकर

‘सत्तांतर ‘ही व्यंकटेश माडगूळकर यांची कादंबरी फार वर्षापूर्वी वाचली .१९८५-८६ मध्ये.ती गाजलेली कादंबरी. त्याचे झाले असे. तेव्हा मी राजधनी एक्स्प्रेसमध्ये काम करत होते. त्याकाळी  कलकत्ता-दिल्ली व मुंबई- दिल्ली  ह्या  दोनच राजधानी एक्स्प्रेस  होत्या. एक दिवस राजधानी नेहमी प्रमाणे ४ वाजता मुंबई सेंट्रल वरुन सुटली.ह्या  गाडीला बडोदा, रतलाम  हे दोन थांबे होते. आणि त्यावेळी चेअरकार क्लास होता. मी चेअरकार मध्ये पॅसेंजर चेक करणे सुरु केले. एकूण सात चेअरकार होते. चेक करताना एका कोच मध्ये एका पॅसेंजर च्या हातात ‘सत्तांतर ‘ ही कादंबरी दिसली.मी सर्व कोच चेक करून आल्यावर त्या ‘सत्तांतर ‘ असलेल्या पॅसेंजर जवळ गेलो. आणि  त्याला म्हणालो, ‘सत्तांतर मला वाचायला देता का ! सकाळी वाचून परत करतो’.तसे त्याने  आनंदाने मला ‘सत्तांतर’ दिले.

बडोदा गेल्यानंतर रतलाम येई पर्यंत माझ्या जवळ तीन तास आणि पुढे दिल्लीपर्यंत सकाळी नऊ पर्यंत चा वेळ होता.

पूर्ण रात्र जागून मी ‘सत्तांतर ‘ वाचून काढली. आणि गंगापूर सिटी येथे टेक्निकल हाल्ट असल्याने तेथे राजधानी थांबायची. तेथूनच पॅसेंजर ना ब्रेकफास्ट देणे सुरू व्हायचे. या ब्रेकफास्ट वेळी मी त्या

‘सत्तांतर ‘दिलेल्या पॅसेंजर जवळ गेलो आणि कादंबरी परत करुन त्याला धन्यवाद दिले.तो पॅसेंजर मॅजेस्टिक चा प्रतिनिधि होता.

पुस्तक परत केल्यावर माझेकडे आश्चर्याने पाहू लागला. म्हणाला, ‘झाले वाचून !’

मी म्हणालो, हो !

मला ती कादंबरी खूपच आवडली.

पुढे मुंबई सुटल .ती नोकरीही सोडली. विदर्भात आलो.विदर्भात ब-याच जिल्ह्यात काम केल.खानदेशात धुळेतही काम केल.

ब्लॅक अँड व्हाईट चा जमाना जाऊन कलर टी वी.आला.

मग १९९१च्या दरम्यान सॅटेलाईट मुळे  प्रायव्हेट चॅनेल्स चा जमाना सुरु झाला. ‘झी ‘ आले. मागे मागे रुपर्ड मरडोक च ‘स्टार ‘ पण आलं.आणि आता तर कितीतरी चॅनेल्स आहे.त्यात एक ‘नॅशनल जिऑग्राफिक ‘ अस एक ज्ञानवर्धक चॅनेल आहे.त्यावर फार चांगले चांगले माहितीपूर्ण दीर्घ डॉक्युमेंट्रीज दाखवल्या जातात. एक ‘इंडियन लंगूर ‘ अशा काही नावाची युरोपियन माणसाने शुट केलेली डॉक्युमेंटरी पाहण्यात आली. सुंदर आहे.कधी रिपीट झाली तर अवश्य पाहा. आपले पूर्वज  वानर -बंदर-लंगूर इत्यादि असल्याची थिअरी सर्वानाच ज्ञात आहे.डार्विन ने ही ते ग्रंथीत केल आहे.आमचे सीपीआय चे एक गुरूजी होते श्रीकांत लाड. ते कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्याचे वर्ग घेत महाराष्ट्र भर फिरायचे. पनामा सिगरेट त्यांची आवडती. सतत पित राहायचे.विद्वान माणूस .अकाली गेले. ते सांगायचे-मार्क्सने डार्विन ला पायावर उभे केले. असो .

तर नॅशनल जिऑग्राफीवरील इंडियन लंगूर पाहिली आणि एकदम ‘सत्तांतर ‘ कादंबरी आठवली.

वानराच्या एकूणच वर्तनाविषयी अभ्यासपूर्ण ती डॉक्युमेंटरी आहे.

वानरांच्या टोळ्या असतात. त्यांच्या टोळीत वीस पासून पुढे कितीही सदस्य असू शकतात. त्या टोळीच नेतृत्व सक्षम नर वानर करतो.हा नर वानर त्या टोळीचा रक्षक असतो. मादी वानरी पासून प्रजनन करण. हे त्याच काम.

पण गम्मत पुढे आहे.हा नर वानर निसर्ग नियमानुसार म्हातारा होतो.होणारच. मग मादी वानरी सक्षम व प्रजनन क्षम नर वानराचा शोध घेते. असे नर वानर टोळीतील प्रमुख मादीच्या मागावर असतात. हे तरूण  नर वानर वानरी शी जुगायला म्हणजे संभोग करायला जातात तेव्हा मूळ नर वानर विरोध करतो. पण ते तरूण नर वानर अत्यंत आक्रमक होतात. तसेच टोळीतील  मादी वानरीला व तिच्या सोबत असणा-या तरूण मादींना ही तरुण नराची गरज असते. हे  नैसर्गिकही आहे.हे तरूण नर आक्रमक होऊन जुन्या वयस्क नर वानरला पिटाळून लावतात. तो एकटाच निघून जातो. भटकत असतो. त्याला कोणत्याच टोळीमध्ये प्रवेश नसतो. पुढे त्याच काय होत असेल आपण समजू शकता.

आज इतक्या दीर्घ कालावधीनंतर ‘सत्तांतर ‘कादंबरी ची ,त्या डॉक्युमेंट्री ची मन पिळवटून टाकणारी आठवण झाली आहे.

कारण अलीकडेच असा अनुभव मनुष्य प्राण्यात आला.

त्याचं झालं असं.  माणसातील एक नर आणि मादी पाहताक्षणी प्रथम नजरेत आकर्षित झाले.मादी २८ वर्षाची, नर ३५ वर्षाचा. नर लेकुरवाळा. हे मादीलाही माहिती होत .पण मादी नर या दोघांच नात दिवसेंदिवस घट्ट होत गेल.नर मादीची काळजी घेऊ लागला. मादीही खुश होती.नर मादी तसे सांसारिक झाले.पण मादीनी एक काळजी घेतली .पिल होऊ दिले नाही.वाटत होत याही मादीपासून पिल असावी. पण मादी चालाख म्हणाव का ! मादीने तस होऊ दिल नाही. एकदा तर मादीने येऊ घातलेल्या पिलालाही आतल्याआत खरवडून काढल.नर काही वर्षानी रिटायर झाला. नराच्या रिटायर नंतरच्या काही वर्षानी मादीच्या वर्तनात  हळूहळू बदल  होत गेले.नराने मादीबाबत काही स्वप्न पाहिले होते. पण मादी जसे जसे नराचे वय वाढत होते तसतसे नराला टाळू लागली.नराला टाळण्याचे वाढत्या वया शिवाय दुसरे काही अन्य कारण कळू शकले नाही.नराचे मादीचे वाद व्हायला लागले. मादी खोटे कारण सांगून नर आपणहून वेगळा कसा होईल असे प्लॅन करित होती. हे नराच्या खूप उशीरा लक्षात आले. नराने  मादीला त्यांनी एकमेकाला  दिलेल्या आश्वासनची आठवण करून दिली .पण मादी बधली नाही.मादीने दुसरा नर तर शोधला नसेल!नराला क्षणभर वाटून गेले.पण नराचा विश्वास एवढा की मादी तस काही करणार नाही. त्याने तो  विचार  झटकून  दिला.पण मादीच काहीतरी वेगळच सुरू  होत.याच्यातला  कोणी  व्हिलन ? नराने शोध घेण्याचा प्रयत्न केला.पण हाती काही लागले नाही.नराला जाॅर्ज आर्वेलची 1984 आठवली. कोण काय नियंत्रित करतय, कोण नजर ठेवतय काहीच कोणाला थांग लागत नाही.नराने शेवटचा निकराचा प्रयत्न केला.पण मादी दादच देईना. मादी  मनाचा थांग लागू  देईना .शेवटी प्रदीर्घ सहजीवनानंतर ‘नाईलाजाने’ एक दिवस नरानेच  मादीला गुडबाय केला.

आता  मादी स्वतंत्र झाली होती. दरम्यान मादीही रिटायर झाली. मादीच काय चाललय नराला काहीच कळल नाही.

मात्र अगदी अलिकडेच मादीने नवा नर शोधला असल्याच जुन्या नराला कोणी सांगितले.  एक  ‘सत्तांतर’ मादीने घडवून आणल्याच त्या नराला कळल.मादी नव्या सत्तांतरात आनंदी असल्याच समजत.

हे असं  आजूबाजूला घडताक्षणी मला व्यंकटेश माडगूळकर  यांची  ‘सत्तांतर’ कादंबरी व ती युरोपियन कलावंताची इंडियन लंगूर डॉक्युमेंट्री आठवली.

खरेच आपण माकडाचे वंशज आहोत.

(प्रभू  राजगडकर हे माजी सनदी अधिकारी व नामवंत कवी आहेत)

9422191202

Previous articleताजमहाल नेमका कोणाचा?
Next articleमाझ्या प्रिय साड्यांनो….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.