एखादं शहर नाहीसं होतं म्हणजे नक्की काय होतं?

नीलांबरी जोशी

“नागार्जुनकोंडा हे आंध्र राज्यातलं शहर १९२० साली उत्खननात सापडलं. एकेकाळी त्याला विजयपुरी म्हणत असत. २२० ते ३२० (CE) या काळात इक्ष्वाकू घराण्याची ती राजधानी होती. रोमबरोबर व्यापार करणार््याळ या नगरात तेव्हा बुध्दिझम प्रमुख धर्म होता. प्राचीन भारतातलं एकमेव अॅंफीथिएटर तिथे होतं. त्या ठिकाणी मी मनानंच फिरलो. नागार्जुनच्या कल्पना काय असतील याचा विचार केला.”

“इंडियन्स : अ ब्रीफ हिस्ट्री आॉफ अ सिव्हिलायझेशन” या नमित अरोरा यांच्या नवीन पुस्तकातलं हे वर्णन. नमित अरोरा हे लेखकाचं नाव वाचून हे पुस्तक वाचायचा मोह झाला, याचं कारण म्हणजे, त्यांचं पहिलं Lottery of Birth हे पुस्तक खूप आवडलं होतं.

आपण हे पुस्तक का लिहिलं याबद्दल प्रस्तावनेत नमित अरोरा म्हणतात, “एखादं शहर नाहीसं होतं म्हणजे नक्की काय होतं? माचू पिचू, अंगकोर बट, मेंफिस, मोहेंजोदारो ही शहरं उत्खननात सापडली हे माहिती असूनही आपण आपल्याभोवतीचं जग हे कायम रहाणार आहे अशा भ्रमात मजेत जगत असतो. लहानपणापासून मला या नाहीशा होणार््याख शहरांबद्दल कुतूहल होतं. त्यावरुन “इंडियन्स” हे पुस्तक लिहिण्याची कल्पना मला २००४ साली सुचली. १९८९ सालापासून मी अमेरिका आणि युरोपमध्ये कामानिमित्त वास्तव्य करत होतो. भारतात फक्त कुटुंबियांच्या भेटी घ्यायला यायचो. त्या दरम्यानही रुटीन कामाचा कंटाळा आल्यानं सुट्टी घेऊन मी लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडात बॅगपॅक पाठीवर टाकून फिरलो. “प्रवास म्हणजे काही फक्त स्थळं पहाणं नव्हे तर प्रवासामुळे आपल्या जगण्याच्या संकल्पनाच मुळापासून आणि कायमस्वरुपी बदलून जातात” असं मिरियम बेअर्ड म्हणतो. तसं माझं झालं. अखेरीस मी भारतात कायमस्वरुपी परतलो. २००४ साली मी २० राज्यांमधल्या ११० ठिकाणी गेलो. ऐतिहासिक स्थळं, निसर्गसुंदर ठिकाणं, समुद्रकिनारे आणि पर्वतरांगा, हरवलेली शहरं आणि गजबजलेली शहरं अशी सर्व ठिकाणं फिरलो. साध्यासुध्या हॉटेल्समध्ये राहिलो आणि पायी चिक्कार चाललो, बस, रेल्वे, बोट, कार, स्कूटर, बाईक, रिक्षा आणि उंट अशा मिळेल त्या वाहनानं प्रवास केला.”

१७ वर्षांच्या भ्रमंतीतून आणि अभ्यासातून हे पुस्तक जन्माला आलं आहे. ढोलावीरा (२६००-१९०० बीसीई), नागार्जुनकोंडा (२२०-३२० सीई), नालंदा (४२५-१३५० सीई), खजुराहो (९५०-१२५० सीई), हंपी (१३३६-१५६५ सीई) आणि वाराणसी (८०० बीसीई पासून पुढे) अशी सहा ठिकाणं आणि Megasthenes, Faxian, Xuanzang and Yijing, Alberuni, Marco Polo and Francois Bernier असे सहा प्रवासी यांच्यावर या पुस्तकात स्वतंत्र प्रकरणं आहेत.

भारतीय लोक कसे रहात होते, काय खात होते, त्यांची राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक विचारसरणी काय असू शकेल याचा उहापोह या पुस्तकात केवळ ३३३ पानांमध्ये केला आहे. भारतीय संस्कृतीतला मणी, पॉटरी आणि अन्न यांचा धांडोळा, मोहेंजादारोमधलं पाण्याचं व्यवस्थापन इथपासून ते तत्वज्ञानापर्यंत अनेक विषयांवर नमित अरोरानं सहजपणे ओघवत्या भाषेत लिहिलं आहे. माणसं, ठिकाणं, हजारो वर्षांपासून चालत आलेल्या गोष्टी एकत्र एका धाग्यात गुंफून लोकांपर्यंत पोचवणं हे काम अर्थातच सोपं नाही. मायकेल वूडच्या “द स्टोरी आॉफ इंडिया” या मालिकेसारखं हे पुस्तक उत्कंठावर्धक आहे.

इतिहासाबद्दल बोलताना, आपण अखेरीस इतिहासातल्या माणसांबद्दलच बोलतोय आणि त्या माणसांच्या स्वभावांमध्ये देखील चांगलेवाईट पैलू होते हे आपण अनेकदा विसरतो. मग केवळ इतिहासातल्या घटनांचं उदात्तीकरण, सपाटीकरण किंवा विपर्यास केला जातो. हे या पुस्तकामुळे लक्षात येतं. त्या दृष्टिकोनातून प्रस्तावनेतला हा उल्लेखही महत्वाचा आहे – “सगळ्याच कथा शेवटी काल्पनिक असतात असं हेडन व्हाईट हा इतिहासकार म्हणतो. ऐतिहासिक सत्यं ही तपासता येऊ शकतात, पण कथा मात्र दस्तावेजांमध्ये सापडू शकत नाहीत. इतिहासातल्या सत्य घटनांवर आधारित कथा रचणारा माणूस आपल्या प्रकृतीधर्मानुसार त्याला रंगरुप देतो.”

संदर्भ :

1. https://www.amazon.in/Indians-History…/dp/0670090433

2. https://www.amazon.in/Lottery…/dp/9383968192/ref=sr_1_1…

3. https://en.wikipedia.org/wiki/The_Story_of_India

4. https://www.youtube.com/watch?v=iahL6VjzgAc…

(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)

[email protected]

………………………………………………………………………………………….

नीलांबरी जोशी यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –नीलांबरी जोशी– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleओबीसींमध्ये ‘गर्व से कहो … ‘ ची लागण
Next articleसारा खेळ निवडणुकांचा !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here