कोई तो साथी होता ?

आॉनलाईन डेटिंगच्या प्रश्नांची (न संपणारी) मालिका..

-नीलांबरी जोशी

भारतात सुमारे १५०० आॉनलाईन विवाहसंस्था आहेत. तसंच टिंडर, ट्रुलीमॅडली, ओकेक्युपिड, बंबल अशा डेटिंग ॲप्सचं प्रमाण वाढत चाललं आहे. फेसबुक, व्हॉटस ॲप, ट्विटर, इन्स्टाग्राम, मायस्पेस अशा समाजमाध्यमांवरच्या ओळखींचाही जोडीदार निवडण्यासाठी वापर केला जातो. डेटिंग ॲप्ससाठी भारत ही जगात पाचव्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. टिंडर भारतात २०१२ मध्ये आलं. भारतात गेल्या पाच वर्षात डेटिंग प्स वापरण्यात २९३ टक्के वाढ झाली आहे. आज जगात ३० कोटी लोक डेटिंग प्स वापरतात. त्यापैकी २ कोटी लोक प्रिमियम फीचर्स वापरतात. आज टिंडर हे सर्वात जास्त वापरलं जाणारं डेटिंग आहे. त्यानंतर बंबलचा नंबर लागतो.

“आणि ते दोघं सुखानं नांदू लागले..” आपण लहानपणापासून ऐकलेल्या अनेक कथांमध्ये हे भरतवाक्य हमखास असतं. अर्थात लग्न हा आजही आयुष्याचा अविभाज्य भाग मानला जातो. It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife”. १८१३ मध्ये प्रकाशित झालेल्या “प्राईड अॅंड प्रिज्युडिस” या जेन आॉस्टेनच्या कादंबरीतलं पहिलं वाक्य एकविसाव्या शतकातही तितकंच महत्वाचं वाटतं. ही कादंबरी आजही जगात विकल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या टॉप टेनच्या यादीत आहे यावरुन हे उघड होतं. लग्नाला इतकं महत्व असल्यामुळे मग आयुष्यातल्या महत्वाच्या अॅचिव्हमेंटस मोजताना लग्न हा प्रकार फार मोठी भूमिका निभावतो.

खरं तर यौवनाच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येकाला, ”यौवनाच्या रोमरोमी जो शहारा पेरतो, तोच वादळ वाटतो अन तो किनारा वाटतो, ज्यासवे फेकून वल्हे होत नौका जायचे, कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे?” या संदीप खरेच्या ओळींत वर्णन केलेला आपला जिवलग भेटावा याची उत्सुकता असते. मात्र जोडीदार निवडताना शारीर आवेग, मनाची तारुण्यावस्थेतली अतितरल संवेदनशीलता, नातेवाईकांची जोडीदार शोधण्यासाठी चाललेली भुणभुण (घरगुती समारंभांमधले “आमच्या राहुलचं झालं, तुमचा पुष्कर करणार आहे का नाही” वगैरे हमखास तिरकस प्रश्न वगैरे), मित्रमैत्रिणींची होत असलेली लग्नं किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, काही मित्रमैत्रिणींचे सततचे ब्रेकअप्स, स्वत:ची पुरेशी न बसलेली आर्थिक घडी, .. हजार प्रकारचं काहूर मनात दाटत असतं. आपला जोडीदार कसा असावा याबद्दलचे काहीजणांचे निर्णय पक्के असतात, तर काहीजणांचे सतत बदलत असतात.

४० लाख वर्षांमध्ये समाजात “दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी एकत्र रहाणं” या पध्दतीत दोन महत्वाचे टप्पे येऊन गेले. शेतीप्रधान संस्कृती सुरु झाल्यावर आधी भटक्या असलेला माणूस एका ठिकाणी रहायला लागला. त्यातून लग्न हा सामाजिक करार उदयाला आला. दुसरा टप्पा म्हणजे इंटरनेटच्या उदयामुळे “डेटिंग आणि मेटिंग”च्या पध्दतींमध्ये आमूलाग्र बदल घडला, असं जस्टिन गार्सिया या जीवशास्त्रज्ञ असलेल्या आणि सध्या मानवी लैंगिकतेवर संशोधन करणार्‍्या शास्त्रज्ञाचं मत आहे. लग्न जुळवण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती, विवाहसंस्था यापुढचं पाऊल आता डेटिंग ॲप्सनी टाकलं आहे.

एकविसाव्या शतकात जोडीदार एकमेकांना कसे भेटतात आणि कसे प्रेमात पडतात यावर मारी बर्गस्टॉर्म या समाजशास्त्रज्ञ विषयातल्या संशोधिकेनं अनेक वर्षं संशोधन केलं आहे. “द न्यू लॉज आॉफ लव्ह” हे तिचं या विषयावरचं महत्वाचं पुस्तक आहे.  पॅरिसमध्ये “फ्रेंच इन्स्टिट्यूट फॉर डेमोग्राफिक स्टडीज”मध्ये संशोधन करत असलेल्या बर्गस्टॉर्मनं २००७ ते २०२० या वर्षांमध्ये युरोप आणि अमेरिका या ठिकाणच्या आॉनलाईन डेटिंग ॲप्सचा अभ्यास केला आहे. त्याच्या संस्थापकांच्या आणि युजर्सच्या मुलाखती घेतल्या आहेत. या ॲप्सवरुन जो डेटा गोळा केला जातो तो तिला उपलब्ध झाल्यानंतर तिनं त्या डेटातल्या निष्कर्षांचा संशोधनात उपयोग केला.

“प्रेमाबद्दलच्या आपल्या संकल्पनाच आॉनलाईन डेटिंगमुळे बदलत चालल्या आहेत. प्रेम हे अचानक, अनपेक्षितपणे समोर उभं ठाकतं, प्रेम आंधळं असतं असं आधी मानलं जात होतं. पण आता प्रेम तुमच्यासमोर अचानक येत नाही, तुम्ही ते शोधत असता.” असं तिचं म्हणणं आहे. अर्थात “खास तुमच्यासाठी असलेलं कोणीतरी आहे, तुम्ही फक्त त्या व्यक्तीचा शोध घ्यायला हवा अशी मानसिकता तयार झालेली आहे. घरात बसून जोडीदाराची वाट पहाण्यापेक्षा शोधा..” हा डेटिंग ॲपमधून मिळणारा चांगला संदेश आहे असं मारीचं मत आहे.

डेटिंग ॲप्समुळे मित्रमैत्रिणी, सहकारी किंवा ओळखीच्या लोकांच्या द्वारे भावी जोडीदाराला भेटणं याऐवजी आता भावी जोडीदारांच्या भेटी खाजगी, बंदिस्त ठिकाणी किंवा आॉनलाईन होतात. लोकांच्या नजरांना तोंड देत भेटण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर खाजगीपणा जपला जातो या कारणास्तव तरुणाईला डेटिंग अॅप्स आवडतात. एकमेकांचा खाजगीपणा जपत एकमेकांना भेटता येणं हे अनेकांना क्रांतिकारी पाऊल वाटतं. त्यामुळे डेटिंग ॲप्सवर एकमेकांचे “म्युच्युअल फ्रेंडस” जास्त असले तरी प्रत्यक्ष भेटणं टाळलं जातं इतका खाजगीपणा जपला जातो. अर्थात, डेटिंग ॲपवर भेटताना खाजगीपणा जपला जातो हे खरं असलं तरी एखादी व्यक्ती प्रत्यक्षात कशी वागते हे कळू शकत नाही. जोडीदार हा समाजात कसा वावरतो हे आॉनलाईन संवादांवरुन समजणं कठीण होतं.

एकूण, पूर्वी जोडीदार निवडण्यासाठी भेटी हा प्रकार समाजाचाच एक भाग होता. आता रोजचं सामाजिक, कौटुंबिक आयुष्य आणि डेटिंगचं विश्व हे परस्परांपासून वेगळे झाले आहेत.

 “ओकेक्युपिड” या डेटिंग वेबसाईटनं “लग्न” या विषयावर त्यांना काय वाटतं ते जाणून घ्यायला २५ ते ३५ या वयोगटातल्या  ८६००० तरुण/तरुणींचं एक सर्वेक्षण केलं होतं. त्यातल्या  ६८ टक्के जणांना लग्न करायला हवंच अशी गरज वाटत नव्हती. तसंच ९८ टक्के तरुणी आणि ९० टक्के तरुणांनी “आपल्या पालकांपेक्षा आपली मूल्यं वेगळी असल्याचं” मान्य केलं होतं. मुळात आपल्यासाठी जोडीदाराची निवड दुसऱ्या कोणीतरी करावी हा मार्ग मिलेनियल पिढीला मान्य नाही. आपण आयुष्यात कुठे उभे आहोत आणि आपल्याला आयुष्याकडून काय हवं आहे याबद्दलच्या त्यांच्या कल्पना पुरेशा स्पष्ट आहेत. यामुळे डेटिंग ॲप्स वापरणं वाढत चाललं आहे.

आज जगात ३० कोटी लोक डेटिंग ॲप्स वापरतात. त्यापैकी २ कोटी लोक प्रिमियम फीचर्स वापरतात. आज टिंडर हे सर्वात जास्त वापरलं जाणारं डेटिंग ॲप आहे. त्यानंतर बंबलचा नंबर लागतो. आॉनलाईन ॲप्समधून प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात. १८ ते २४ वयोगटातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना हुकअप्स, सहज भेट असा वापर अपेक्षित असतो. त्याहून जास्त वयाच्या लोकांना नातं जोडण्यात रस असतो. १८ ते २४ वयोगटातल्या युवांपैकी ७५ टक्के जण टिंडर वापरतात. बंबल हे ॲप वापरणारे ३१ टक्के जण आहेत. २५ ते ३४ वयोगटातल्या तरुणाईपैकी मॅच डॉट कॉम वापरणारे ३६ टक्के जण आहेत. दीर्घकाळाचं नातं जोडण्यासाठी ही साईट सर्वात लोकप्रिय आहे. ४५ ते ५४ वयोगटातल्या लोकांपैकी ५८ टक्के जण मॅच डॉट कॉम वापरतात. त्यांच्याबाबतीत टिंडर वापरण्याचं प्रमाण याच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.

कोविडनंतर आॉनलाईन डेटिंग साईटस वापरण्याचं प्रमाण वाढत गेलं. उदाहरणार्थ, मार्च २०२० या लॉकडाऊनच्या काळामध्ये टिंडरवर दररोज ३०० कोटी स्वाईपस होत होते. त्यानंतर हे रेकॉर्ड कायम प्रचंड संख्येनं मोडत गेलं. कोविडच्या काळात आपल्याला काय हवं आहे, आपली मूल्यं कोणती आहेत यावर विचार करायला अनेकांना वेळ मिळाला. स्वत:ला, स्वत:च्या कुटुंबाला, मित्रमैत्रिणींना वेळ देणं महत्वाचं आहे हे लक्षात आल्यानंतर जोडीदार निवडणं, लग्नसंस्था, कुटुंबिय या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं लक्षात आलं हे त्यामागचं कारण आहे.

डेटिंग ॲप्स वापरणाऱ्या लोकांचा वयोगट तिशीचाळिशीच्या पुढे असण्याचं प्रमाणही कोविडनंतर वाढलं. उदाहरणार्थ, २०२३ मधल्या एका सर्वेक्षणानुसार ७० टक्के लोकांना डेटिंग ॲपववरुन एका रोमॅंटिक नातेसंबंधांपर्यंत पोचता आलं. २८ टक्के जण त्यात अपयशी ठरले. मजा म्हणजे ४३ ते ५८ या वयोगटातल्या लोकांपैकी ७२ टक्के जणांना आॉनलाईन डेटिंगमधून जोडीदार लाभला असं दिसून आलं.

डेटिंग अॅप वापरणार्‍्यांपैकी प्रत्यक्षातले अनुभव कसे आहेत? उदाहरणार्थ, रीना ही २८ वर्षांची तरुणी ओकेक्युपिड, बंबल, टिंडर, इहार्मनी, मॅच, वूप्लस अशी वेगवेगळी डेटिंग अॅप्स वापरत होती. दिवसातले दोन तीन तास ती आपल्यासाठी मॅच होणारे प्रोफाईल्स पहाणं, मेसेजेस पाठवणं, मेसेजेसना उत्तर देणं आणि योग्य वाटलेल्या पुरुषांबरोबर डेटिंगला जाण्याच्या तारखा ठरवणं हे सगळं करत होती.

मात्र सतत स्वाईप करणं, एकमेकांची ओळख करुन घेण्याचे तेच तेच ठरावीक संवाद आणि एखादा पुढे जायला अनुत्सुक असला तर स्वत:च्या क्षमतेवरच शंका घेणं या गोष्टींना ती वैतागली आहे. डेटिंग ॲपवरच्या तिच्या प्रयत्नांमधून एकही जरा जास्त काळ टिकू शकेल असं नातं निर्माण झालेलं नाही. मात्र तिचं वैतागणं इथे थांबत नाही. एका तरुणानं तिला सतत फोन करुन अचकटविचकट बोलून छळायला सुरुवात केली.  काहीजणांना नात्यात पुढे जायचं नसलं तरी शारीरिक संबंध असावेत यासाठी ते सतत दबाव आणतात असं रीनाचं म्हणणं होतं. अर्थात हे सगळं असलं तरीही रीनाला डेटिंग अॅप्सवर स्क्रोल करायची सवय आहे. आपल्याला या ॲप्समधून कोणीतरी भेटेल असं तिला वाटत असतं. या डेटिंग ॲप्सवर ती चिक्कार पैसेही खर्च करते.

२०२० मध्ये केलेल्या प्यू या संस्थेच्या संशोधनानुसार, १२ टक्के अमेरिकन जोडीदार आॉनलाईन साईटवरुन भेटले आणि त्यांनी लग्न केलं. मात्र ५७ टक्के जणांचा डेटिंग ॲपबद्दलचा अनुभव सकारात्मक नव्हता. हेलेन फिशर ही मानववंशशास्त्रज्ञ “किन्से इन्स्टिट्यूट”मध्ये संशोधन करणार्‍्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. ती मॅच डॉट कॉमची प्रमुख सल्लागार आहे. डेटिंग ॲप वापरणाऱ्यांना  केवळ मानसिक थकवा जाणवत नाही तर संपूर्ण डेटिंग प्रक्रियेबद्दलच त्यांच्या मनात हताशपणा येतो असं तिचं मत आहे.

टिंडर सुरु होऊन ११ वर्षं झाली. डेटिंग संस्कृतीबरोबरच तरुणाईच्या मानसिकतेवर या ॲप्सनं खूप प्रभाव टाकला आहे. अशा ॲप्सवरुन सतत स्वाईप करुन आणि कोणी आपल्यासाठी उपलब्ध आहे का हे तपासत राहिल्यानं अनेकांमध्ये एक विचित्र दमणूकीची भावना येते. काहीजणांसाठी तर डेटिंग ॲप्स वापरणं बंद करणं हाच एकमेव उपाय ठरतो. जॅक टर्बन या कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या म्हणण्यानुसार डेटिंग ॲप वापरल्यानं होणारे मानसिक परिणाम यावर फारसं संशोधन झालेलं नाही. अनेक वर्षं आपल्याबाबतीत काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा करत रहाणं, कधीही उत्तर येईल आणि आयुष्य बदलेल अशी अपेक्षा करत रहाणं हे मानसिक आरोग्यासाठी घातक आहे असंही त्याचं म्हणणं आहे.

उदाहरणार्थ, “सुमारे दहा वर्षं सतत सर्च केल्यानंतर हा सगळा वेळ, सगळे श्रम आणि सगळा पैसा देऊन मला खरोखर काय मिळालं?” हा प्रश्न  “अ सिंगल रिव्होल्यूशन” या पुस्तकाची लेखिका शनी सिल्व्हर विचारते. “तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारं कोणीतरी भेटावं यासाठी मिळालेल्या ऑनलाईन स्पेसमधून सतत निराशा येत असेल तर माझ्या मानसिक आरोग्याचं काय होणार आहे ?” हा प्रश्न मी सतत विचारते असं शनी म्हणते. या प्रकाराला कंटाळून शनीनं सगळी डेटिंग ॲप्स काढून टाकली आणि तो आपल्या आयुष्यातला चमत्कार झाल्यासारखा अनुभव होता असं तिला वाटलं. यानंतर तिच्या मूडमध्ये खूप फरक पडला आणि तिला उत्साही वाटायला लागलं. स्वाईप करण्यात जाणारा वेळ वाचल्यानंतर विश्रांतीसाठी वेळ मिळायला लागला. इतरजण आनंदी आहेत हे पाहून तिला राग यायचा ते बंद झालं. सतत कशाचीतरी अपेक्षा करणं बंद झाल्यानं भावनिक, मानसिक आणि शारीरिक थकवा कमी झाला.

अर्थात अशा प्रकारे केवळ ॲप्स डिलीट करुन मानसिक आरोग्य लगोलग लाभत नाही. त्यासाठी डेटिंग ॲप्समुळे नक्की कोणत्या मानसिक, शारीरिक समस्या उद्भवत होत्या ते समजून घ्यायला हवं. यासाठी समुपदेशकाची मदत लागली तरी घ्यावी. तुमच्या चिंता घालवायला तुम्ही ही ॲप्स वापरता आणि ही ॲप्स वापरुन चिंता जास्तच वाढवून घेता असं घडतं आहे का ते तपासायला हवं. तुम्हाला तुमच्यावर प्रेम करणारं कोणी भेटणारच नाही का? या तणावातून हुकअप्स शोधत रहाता का? हे पहायला हवं.

डेटिंग ॲप्स वापरत असताना, आॉनलाईन असताना असमाधानी का वाटतं याची कारणं तर शोधायला हवीतच. त्याचबरोबर आॉनलाईन असतानाही नंतर नैराश्य, मानसिक थकवा येऊ नये यासाठी काही उपायही करायला हवेत. ते उपाय म्हणजे आॉनलाईन असताना एका वेळी कितीजणांशी कनेक्टेड असावं, मेसेजेस पाठवावेत याचा वेग कमी करावा. एकावेळी  मोजक्या जणांशीच संपर्क असावा.

अनेकजण डेटिंग ॲप रात्र रात्र जागं राहून बिंज करतात आणि त्यातूनही विविध शारिरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. यासाठी आपल्याला आवडलेल्या नऊ मॅचेस सापडल्यानंतर त्यानं / तिनं सर्च थांबवणं असे उपाय करायला हवेत. त्या नऊ जणांना जाणून घ्यायला प्राधान्य द्यावं. मुळात कोणत्याही व्यक्तीच्या मेंदूतली “शॉर्ट टर्म मेमरी” एका वेळी पाच ते नऊ जणांपेक्षा जास्त लोकांचे प्रतिसाद हाताळू शकत नाही.

फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे च्या आसपास डेटिंग ॲप्सवर जास्त गर्दी असते. याच सुमारास मॅच ग्रुप या टिंडर, हिंज आणि द लीग या डेटिंग ग्रुप्सच्या मालक कंपनीवर सानफ्रान्सिस्कोमध्ये सहा जणांनी फिर्याद केली. ही ॲप्स गेमिंगसारखी वापरता येतील अशा प्रकारे डिझाईन करुन त्यांचं व्यसन लागावं यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं या फिर्यादीत म्हणलं होतं. आपल्या मनासारखा जोडीदार मिळणं यापेक्षा या कंपन्यांना नफा कसा होईल ते पहाणं हा कंपन्यांचा हेतू असल्याचं त्यात नमूद केलं होतं.

मॅच हे ॲप मानसिक पातळीवर मॅनिप्युलेट करुन व्यसन लागावं अशा प्रकारे डिझाईन करुन विकसित केलेलं आहे आणि त्याच्या जाहिरातीही तशाच असतात असं या फिर्यादीत म्हणलं होतं. हा खटला कोण जिंकेल ठाऊक नाही. पण डेटिंग ॲप्सच्या या पैलूवर विचार करायला हा खटला भाग पाडतो हे नक्की.

ॲप वापरत असताना, तुम्हाला आॉनलाईन असताना योग्य वाटलेल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटणं, त्यासाठी वेळ देणं या प्रक्रियेचा आधी विचार करायला हवा. डेटिंग आणि जवळीक शोधणं हे गेम खेळण्यासारखं सनसनाटी करण्याला डेटिंग ॲप्स प्राधान्य देत असतात. त्यामुळे खळबळजनक गोष्टी घडाव्यात असं मेंदूला सतत वाटायला लागतं. जोडीदार निवडायला जो शांतपणे वेळ द्यावा लागतो ती प्रक्रिया वेगानं घडू शकत नाही. मग वेगात काहीतरी घडावं असं वाटणं आणि प्रत्यक्षातला त्याला लागणारा वेळ यातला फरक सहन न झाल्यानं मानसिक थकवा येतो.  गे – समलिंगी असलेल्या व्यक्तींना देखील सुरुवातीला आपल्याला या अॅप्सवरुन आपल्याला हवा तसा जोडीदार मिळेल अशी आशा वाटते. पण नंतर त्यातूनच त्यांचा एकाकीपणा, कंटाळा वाढत जातो.

काही ॲप्स हा मानसिक थकवा टाळण्याचे प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, बंबल हे डेटिंग ॲप यासाठी “ब्राऊज माईंडफुली” आणि “स्टे बॅलन्सड” असे इशारे देतं. मित्र, कुटुंब, काम आणि स्वत:ची काळजी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन ॲप वापरावं. “टिंडर एक्स्प्लोअर” सारखी फीचर्स आपल्याला रस असेल त्या विषयांनुसार प्रोफाईल शोधायला मदत करतात. त्यातून सर्च करण्याचे पर्याय कमी होऊन शांतपणे अ़ॅप वापरता येतं.

नॅन्सी जो सेल्स हिनं या ॲपच्या अनुभवांवर “नथिंग पर्सनल : माय सिक्रेट लाईफ इन द डेटिंग अ़ॅप इन्फर्नो” हे पुस्तकही लिहिलं आहे. डेटिंग ॲप्समुळे झालेल्या भावनिक आणि मानसिक हानीबद्दल बोललं जात नाही. त्याला वाचा फोडायला हवी असं तिचं मत आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीचे पडसाद डेटिंग ॲप्सच्या विश्वातही दिसतात. डेटिंग ॲप्स वापरताना स्त्रियांना मात्र मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या छळाला तोंड द्यावं लागतं. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही  आॉनलाईन डेटिंग साईटवर वाईट, मानहानिकारक वागणूक मिळते. मात्र स्त्रियांना अशा छळ सोसावं लागण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच जास्त आहे. मुख्य म्हणजे या अॅपवरच्या स्त्रिया या सेक्ससाठी उपलब्ध आहेत अशा प्रकारे पुरुष वागतात.

“अ सिंगल सर्व्हिंग” या पॉडकास्टची सादरकर्ती सिल्व्हर हिनं दहा  वर्षं डेटिंग ॲप्स वापरली. यावर “हॅलो” म्हणताक्षणी समोरचा पुरुष नावसुध्दा सांगायच्या आधी लैंगिक गोष्टींची मागणी करतात असा तिचा अनुभव आहे. २०२० च्या प्यू या संस्थेच्या एका सर्वेक्षणानुसार १८ ते ३४ वयाच्या ५७ टक्के स्त्रियांना या अॅप्सवरुन सतत लैंगिक मेसेजेस किंवा तशा प्रतिमा मिळत रहातात. तसंच डेटर्सपैकी ३७ टक्के जण समोरच्यानं आपल्याला रस नाही असं सांगितलं तरी त्यानंतर सतत संपर्क साधत रहातात. ३५ टक्के जणांना नको असताना आणि तसं स्पष्ट बजावूनही लैंगिक मेसेजेस, प्रतिमा मिळत रहातात.

डेटिंग ॲपवरुन प्रत्यक्ष भेटल्यानंतर होणारे लैंगिक अत्याचार हा देखील तितकाच त्रासदायक प्रकार आहे. यासाठी डेटिंग ॲप्सवरुन आॉनलाईन भेट झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटताना मोबाईल फोन चार्ज केलेला असणं, आपल्या भेटीबद्दल मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना कल्पना देणं असे उपाय केले तरीही डेटर्स लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात असं दिसून आलं आहे.

एकूण डेटिंग साईटसवरुन अनेकजणांना चांगले जोडीदार, दीर्घकालीन नातं सापडत असलं तरी डेटर्स आपापल्या जबाबदारीवर जोखीम घेऊन ही ॲप्स वापरतात.

अर्थात युजर्सइतकीच या प्रकाराची जबाबदारी डेटिंग ॲप्सच्या मालक कंपन्यांवर असते. ते काही उपाययोजना करतात. मात्र उपाययोजना पुरेशा आहेत का? आणि मुळात डेटिंग ॲप्स किंवा डेटिंग वेबसाईटसचे मालक किती प्रमाणात अशा उपाययोजना करतात? हे पहायला गेलं तर २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या “कोलंबिया स्कूल आॉफ जर्नालिझम” आणि “प्रोपब्लिका” या न्यूजसाईटनं मिळून एक महत्वाचा शोध लावला. “मॅच” या ग्रुपकडे तेव्हा ४५ डेटिंग साईटसची मालकी होती. त्यापैकी लैंगिक छळ करणारा मजकूर आणि प्रतिमा यांना रोखण्याचं काम फक्त जी ॲप्स पैसे भरुन वापरली जात त्याच साईटसवर होत होतं. टिंडर, ओकेक्युपिड किंवा हिंज सारख्या फ्री ॲप्सवर कोणतीच बंधनं नव्हती. हा शोध लागल्यानंतर अमेरिकेत डेटिंग साईटसबद्दल नियम तयार झाले तसंच काही गोष्टींवर कायद्यानं बंधनं घातली गेली. अर्थात या कायद्यातल्या पळवाटा शोधून डेटिंग ॲप्स आपली जबाबदारी झटकतच असतात.

यानंतर टिंडरनं मशिन लर्निंगच्या तंत्रज्ञानाद्वारे अपमानास्पद भाषा आणि मेसेजेस ओळखणं सुरु केलं. लैंगिक मेसेज लिहिणार्‍्याला आपली भाषा सुधारुन तो मेसेज लिहायला हे तंत्रज्ञान प्रवृत्त करतं. २०२० मध्ये बंबल या अॅपनं एआयद्वारे काही प्रतिमा धूसर करुन युजरनं परवानगी दिली तरच त्या उघडतील अशी सोय केली. काही अॅप्समध्ये “युजर व्हेरिफिकेशन”मध्ये युजरचा सेल्फी अॅपद्वारे काढला जातो आणि युजरनं दिलेल्या प्रतिमेशी ताडून पाहिला जातो. यातून आॉनलाईन आर्थिक किंवा लैंगिक फसवणूक म्हणजे कॅटफिशिंग या प्रकाराला आळा बसू शकतो. तसंच फेक प्रोफाईल वापरुन आपलं अस्तित्व युजर लपवू शकणार नाहीत असे प्रयत्न केले जातात.

सुरक्षिततेच्या दृष्टीनं कायदा आणि कॉर्पोरेट पातळीवर नियम असणं हा एक उपाय आहे. मात्र सांस्कृतिक आणि सामाजिक पातळीवर डेटर्सनी सजगपणे आपलं वागणं बदलायला हवं. आपण केलेल्या छळाचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतो इकडे बहुतांशी पुरुष दुर्लक्ष करतात. स्त्रियांना दुय्यम लेखतात. स्त्रियांनीही आपला छळ होत असताना तो सहन करणं चुकीचं आहे. त्याबद्दल आवाज उठवायला हवा. अॅप वापरणं बंद करणं किंवा युजर्सना ब्लॉक करणं एवढंच आत्ता स्त्रियांच्या हातात आहे. असे प्रयत्न चांगले आहेत मात्र अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे.

डेटिंग अॅप्सबाबत हे सर्व प्रकार भारतात घडत असले तरी ही अॅप्स भारतात वापरली जाण्यामागे काही विशिष्ट आव्हानं आहेत. भारतात लग्न एक तर अॅरेंज्ड पध्दतीत किंवा प्रेमविवाह या मार्गानं होतं. या दोन्ही बाबतीत आॉनलाईन विवाहसंस्था, डेटिंग वेबसाईट्स आणि अॅप्स आणि समाजमाध्यमं या तीन डिजिटल माध्यमांचा उपयोग केला जातो. पण मुळात भारतातल्या मिलेनियल म्हणजे २००० सालाच्या आसपास जन्माला आलेल्या पिढीला लग्न म्हणजे यशस्वितेचं गमक किंवा लग्न करुनच माणूस आनंदी होतो असं वाटत नाही.

या पिढीला लग्न करायचं असेल तर पारंपारिक कांदेपोहे प्रकरणातून जोडीदार निवडायला बिलकुल आवडत नाही. तेव्हा जोडीदाराच्या निवडीसाठी डेटिंग किंवा मॅट्रिमोनी वेबसाईटस धुंडाळणं त्यांना सोपं वाटतं. भारतात ६९ टक्के पुरुष आणि ५६ टक्के स्त्रियांना आॉनलाईन डेटिंग जोडीदार शोधण्यासाठी योग्य मार्ग वाटतो. त्यामुळेच भारतात डेटिंग अॅप्स किंवा आॉनलाईन विवाहसंस्था दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालल्या आहेत. भारतात सुमारे १५०० आॉनलाईन विवाहसंस्था आहेत. तसंच टिंडर, ट्रुलीमॅडली, ओकेक्युपिड, बंबल अशा डेटिंग अॅप्सचं प्रमाण वाढत चाललं आहे. फेसबुक, व्हॉटसअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, मायस्पेस अशा समाजमाध्यमांवरच्या ओळखींचाही जोडीदार निवडण्यासाठी वापर केला जातो. डेटिंग अॅप्ससाठी भारत ही जगात पाचव्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. टिंडर भारतात २०१२ मध्ये आलं. भारतात गेल्या पाच वर्षात डेटिंग अॅप्स वापरण्यात २९३ टक्के वाढ झाली आहे.

शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींमुळे भारतातल्या तरुणींना आपला जोडीदार स्वत: निवडावा असं वाटण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण त्याचबरोबर आपल्याकडे स्त्रियांना निवडस्वातंत्र्य कमी असल्यामुळे त्यांना जोडीदार निवडताना आॉनलाईन डेटिंग/मॅट्रिमोनी साईटस वापरण्याचे फायदे जास्त होऊ शकतात. या पध्दतीत आपल्या इच्छा, भावना, आशाआकांक्षा, आवडीनिवडी, रहाणीमान, जीवनमूल्यं, आर्थिक/सामाजिक/राजकीय/धार्मिक विचारांशी ज्याचे विचार जुळू शकतील असा जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते. पण या सर्व बाबतीत ज्या तरुणींचे विचार स्पष्ट आहेत त्यांनाच याचा फायदा होऊ शकतो हे यात महत्वाचं आहे. तसंच हा मार्ग  स्त्रियांसाठी पारंपारिक पध्दतीत भेटीगाठी घेण्यापेक्षा जास्त सोपा वाटू शकतो.

पण आॉनलाईन माहिती देताना ६१ टक्के जण खोटं बोलतात असं आढळून आलं आहे. त्यामुळे आॉनलाईन ओळखींमधून स्त्रियांच्या फसवणुकीचं प्रमाण वाढत जातं. नमिताची केस यासाठी पुरेशी बोलकी आहे. ३३ वर्षांची नमिता दिल्लीत एका आयटी कंपनीत मोठ्या पदावर होती. आपल्या भल्यामोठ्या फ्लॅटमध्ये ती एकटीच रहात होती. लग्न करायचा विचार मनात आल्यावर तिनं एका मॅट्रिमोनी साईटवर नाव नोंदवलं. तिथे तिची सागर या तरुणाशी ओळख झाली. दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या. परदेशात रहाणार्‍्या सागरनं मग तिला भेटवस्तू पाठवल्या. त्यावर खुष होऊन नमितानंही त्याला महागड्या भेटवस्तू पाठवायला सुरुवात केली. काही काळानंतर आपल्या आजारी वडिलांचं हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी सागरनं नमिताला पैसे पाठवायची विनंती केली. कळवळा येऊन तिनं काही लाख रुपये त्याला पाठवले. दोनतीन वेळा एकूण ६० लाख रुपये तिनं त्याच्या अकाऊंटला भरल्यावर तो नंतर नाहीसाच झाला. नमितानं पोलिसांकडे तक्रार करेपर्यंत चिक्कार उशीर झाला होता. याच विषयावरची नेटफ्लिक्सवरची “टिंडर स्विंडलर” ही डॉक्युमेंटरीही डोळ्यात अंजन घालणारी आहे.

कोविडनंतर तर भारतातही डेटिंग ॲपचं व्यसनही लागलेलं आहे असं दिसून येतं. ही ॲप्स वापरणाऱ्या १० पैकी ९ जण आपल्याला व्यसन लागल्याचं मान्य करतात. झोपी जाण्यापूर्वी शेवटची कृती म्हणजे ही ॲप्स वापरणं हे या ॲप्सचे ४८ टक्के युजर्स मान्य करतात. एका डेटवर असतानाच ही अॅप्स मोबाईलवर चेक केल्याचं १२ टक्के जण मान्य करतात. कामाच्या ठिकाणी सुमारे २८ टक्के जण ही ॲप्स चेक करतात.

भारतातल्या तरुण लोकांना ही ॲप् वापरण्यात कोणती आव्हानं वाटतात? असा विचार केला तर विसाव्या वर्षी आयुष्यात काय हवं आहे हे ठाऊक नसताना कमिटमेंट देणं हे सर्वात अवघड काम आहे. नातं हवं आहे पण हे नातं कुठे चाललं आहे? पुढे काय घडेल या प्रश्नाची आजकालच्या तरुणाईला भीती वाटते. हे कॅज्युअल नाही आणि आयुष्यभराचं वचन द्यावं इतकं गंभीर नाही या दोन टोकांच्या मध्ये २२ टक्के भारतीय तरुण लोक लोंबकळत असतात.

पारंपारिकता आणि आधुनिकता याबद्दल भारतात विलक्षण गोंधळाची अवस्था आहे. बायका हा पुरवठादार आणि पुरुष हा मागणी करणारा अशी मानसिकता भारतीय संस्कृतीत घट्ट रुजलेली आहे. त्यामुळे डेटिंग अॅप्सवर १००० पुरुषांमागे १ स्त्री असं प्रमाण दिसतं. बंबलसारखी ॲप्स स्त्रियांना संवाद सुरु करायला प्राधान्य देतं. मात्र सुरुवातीला त्या बोलल्या तरी नंतर संवादाची सूत्रं पुरुषांकडे जातात असा अनुभव दिसतो. भारतात शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग आहेत. मात्र त्यातल्या टिअर १ वर्गात मोडणार्‍्या शहरांमध्येच डेटिंग ॲप वापरलं जातं. बाकीच्या शहरांमध्ये ही ॲप्स वापरली जात नाहीत. सामाजिक बंधनांमुळे या भागात ही ॲप्स वापरण्याचं प्रमाण कमी आहे.

डेटिंग या संकल्पनेला भारतीय पालकांचा सहसा विरोध असतो. आजही ठरवून केलेली लग्नं हा प्रकार प्रचलित आहे. तरुण डेटर्सना पालक ही डोकेदुखी ठरते. एका सर्वेक्षणात, २० ते ३५ वयोगटातल्या ३६ टक्के जणांनी तरी पालकांना आपलं हे नातं मान्य नसल्याचं सांगितलं. ज्याबरोबर डेटिंग सुरु आहे ती व्यक्तीच पालकांना नको असते किंवा डेटिंगबद्दलच टॅबू असतो. त्यामुळे पालकांना न सांगणं हा मार्ग अनेकजण पत्करतात.

नोकरी आणि आर्थिक स्थैर्य नाही हे कारण डेटिंग ॲप् वापरताना निराशा देतं. विशीतल्या भारतीयांपैकी तुमच्या नोकरीच्या सध्याच्या अवस्थेवरुन डेट नाकारली गेली असं सातपैकी एका केसमध्ये तरी घडतंच. भारतातला बेरोजगारीचा प्रचंड दर डेटिंगच्या आणि आॉनलाईन डेटिंगच्या मध्ये येतो. चांगली नोकरी न मिळवता आल्यानं नातं पुढे गेलं नाही असंही घडतं. आर्थिक बाबतीत जुळणार नाही या कारणानं ब्रेकअप्स होतात.

कम्युनिकेशनच्या कौशल्याचा अभाव हेदेखील डेटिंग ॲप्स वापरताना आव्हानच असतं.  समोरच्या व्यक्तीशी संवाद साधता आला नाही, संवाद पुढे नेता आला नाही या कारणानं नातं तुटतं. याच कारणानं अंतर्मुख प्रवृत्तीच्या लोकांना हॅलो म्हणणं देखील जमत नाही. त्यामुळे विशीतल्या मुलामुलींपैकी अशा प्रवृत्तीच्या लोकांना डेटिंग ॲप्स वापरणं अवघड जातं. अशा लोकांना नातंही सखोल गहिरं असावं अशी अपेक्षा असते. जे मिळणं सोपं नाही. पारंपारिक मार्गानंही जोडीदार हे नातं जुळणं अवघड आणि ॲप्सवर संवाद साधता येत नाही अशी त्यांची अवस्था होते. स्वत:बद्दल खात्री नसणं, सेल्फ एस्टीमची उणिव, मूड स्विंग्ज याचाही डेटिंग ॲप्स वापरण्यावर परिणाम होतो.

डेटिंग करत असलेल्या व्यक्तीवर आपल्या नैराश्य, चिंता अशा भावनांचा मानसिक ताण टाकणं हा प्रकार सर्रास घडतो. आपल्याला डेटिंग करणारी व्यक्ती हा आपला समुपदेशक असल्यासारखा तिच्यावर / त्याच्यावर भार टाकला जातो. त्यामुळे ब्रेक अप झाल्यावर कित्येकजण समोरच्यावर अतिअवलंबित्व असल्यानं आत्महत्येपर्यंत पोचतात.

अखेरीस, एक परिपूर्ण जोडीदार, परिपूर्ण नातं असं काही अस्तित्वात नसतं हे लक्षात घ्यायला हवं. डेटिंग ॲप् वापरतानाही आपण बुटांच्या, कपड्यांच्या, मोबाईल फोन्सच्या जाहिरातींमधली चित्रं जशी सरकवत जातो, तसं जोडीदार निवडण्यासाठी आकर्षक चेहरे आपल्या डेटिंग बास्केटमध्ये जमा करत जातो. नवीन चेहरे सतत दिसत असतातच. मग क्षणभरापूर्वी निवडलेला चेहरा लगोलग आपला तजेला गमावून बसतो. स्क्रीनवरचे चेहरे ही एक कमोडिटी होऊन बसते. चांगला किंवा नवीन पर्याय आल्यावर जुनी वस्तू सहज फेकली जाते तसं घडतं. शॉपिंग कधी थांबतच नाही.

“बॅरी श्वार्टझ” यानं आपल्या “द पॅरॉडॉक्स आॉफ चॉईस” या पुस्तकात हे सविस्तरपणे मांडलं आहे. अनेक पर्यायांमधून एक निवडण्यापूर्वी आणि निवडल्यानंतर दोन्ही वेळा आपल्याला आपण निवडलेल्या पर्यायाचा त्रास होऊ शकतो. म्हणजे टीव्ही किंवा मोटारगाडी निवडल्यानंतर जसं “अरे, ते मॉडेल घ्यायला हवं होतं, अपना चुक्याच” असं अनेक नवनवीन पर्याय समोर आल्यामुळे वाटत जातं. तसंच जोडीदाराबाबत निवडलेली व्यक्ती चुकीची निवडली असं वाटण्याचं प्रमाण डेटिंग ॲप वापरल्यानं होऊ शकतं.

यशस्वी नातं असं अस्तित्वात नसतं. नातं यशस्वी करण्यासाठी आयुष्यभर सतत प्रयत्न करावे लागतात हे लक्षात घेऊन प्रत्येकानं जोडीदाराची निवड करायला हवी..! डेटिंग ॲप वापरणं हा निवडीचा फक्त एक पर्याय आहे.

(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४)

(नीलांबरी जोशी या ‘माध्यमकल्लोळ’, ‘कार्पोरेटकल्लोळ’, ‘मनकल्लोळ’ या गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत.) 

८४११०००७०६  

[email protected]

Previous articleहिरामंडी – रीललाईफ ते रिअ‍ॅलिटी!
Next articleमेळघाट भ्रमंती – डाक बंगला
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here