– समीर गायकवाड
संजय लीला भन्साळीच्या वेबसिरीजमध्ये , वेगवेगळ्या माध्यमांत वा सिनेमांत जी ‘हिरामंडी‘ दाखवली जाते त्यापलीकडे या क्षेत्राचा खरा इतिहास बिभत्स आहे. हा भाग कधीकाळी अत्यंत समृद्ध होता. इथे उंची राहणीमान असणारे लोक होते, प्रासादवजा हवेल्या होत्या. कमालीची भरभराट अनुभवलेल्या हिरामंडीची आताची अवस्था जीर्ण इमारती, बकाल वस्ती अशी झाली आहे. ही एकेकाळची मोठी समृद्ध बाजारपेठ होती. राजेशाही खेळाचे मैदान, कलाकार, वेश्या आणि गणिकांची घरं अशी हिरामंडीची ओळख होती. सद्यकाळात तिथले सज्जे ओस पडले आहेत, दुकाने अस्ताव्यस्त आहेत आणि बांगड्यांच्या सुरेल आवाजाची जागा आता वेगवेगळ्या यंत्रांच्या बेसूर आवाजाने घेतली आहे.
सिनेमा, सिरीजमधून काय सांगायचे आहे ते दिग्दर्शकास पक्के ठाऊक असते. हिरामंडी ही संजय लीला भन्साळी यांची वेबसिरीज. विसाव्या शतकाच्या प्रारंभीचा कालखंड यात दर्शवलाय. ‘हिरामंडी’- पाकिस्तानचे आर्थिक केंद्र असलेल्या लाहोरचा अविभाज्य हिस्सा आहे. इथे रीतसर बायकांचा बाजार भरत असे. यातले खरे हिरे निवडून त्यांना पैलू पाडून घुंगरू बांधून बाजारात उभं करणं हा इथला कर्मभाव. मुजरा नर्तिका, गायिका यांचा जगातला सर्वात मोठा बाजार लाहोर मधील ‘हिरा-मंडी’ मध्ये भरे. आपल्या नारायणगावला जशी तमाशापंढरी म्हणतात तसे हिरामंडी ही मुजऱ्याची काशी पंढरी होय. आपल्या अनेक साहित्य व कलाकृतींचा विषय ठरलेल्या मुजरा नर्तिका असलेल्या अनारकलीचे मूळ लाहोरमध्येच सापडते. ‘अकबरनामा’ आणि ‘तुझुक -ए- जहांगिरी’ अर्थात ‘जहांगीरनामा’ या दोहोतही अनारकलीचा उल्लेख नाही पण ईस्ट इंडिया कंपनीच्या नीळाच्या व्यापारासाठी भारतात आलेला विल्यम फिंच इस. 1611 साली लाहोर येथे पोहोचला तेंव्हा त्याला अनारकली विषयी माहिती मिळाली असे त्याने नमूद केले आहे. अनारकलीच्या निधनानंतरच्या सहा वर्षे पश्चातचा हा कालावधी असल्याचे तो म्हणतो. विल्यम फिंचच्या काही वर्षानंतर भारतात आलेल्या एडवर्ड टेरी या ब्रिटीश प्रवाशानेही अनारकलीचे उल्लेख केले आहेत. इतिहासात तिच्या अस्तित्वाबद्दल एकमत नाही मात्र तत्कालीन मुजरा संस्कृती आणि गुलाम महिलांचे शोषण यावर सहमती आहे. लाहोरच्या मुजरा इतिहासाची सुरुवात अशा प्रकारे चारशेहून अधिक वर्षाची आहे.
मुजरा नृत्य करणाऱ्या बायकांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत. खरे तर यातल्या बहुतांश स्त्रिया खूप प्रेमळ आणि लाघवी असतात, त्या सच्च्या प्रेमाच्या भुकेल्या असतात, यातल्या काहींचा रोख त्यांच्या ग्राहकांच्या पैशावर, संपत्तीवर जरुर असतो हे देखील येथे नमूद करावेच लागेल! आपल्यातल्या कुणालाच ‘अमरप्रेम’मधला राजेश खन्नाने साकारलेला ‘आनंदबाबू’ बनायचे नसते पण तरीही जर कधी कुठल्या मुजरावालीशी वा कोठेवालीशी सामना झाला तर तिच्यात वेश्या पहायची की पुष्पाला शोधायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून असते. त्याच बरोबर बदलत्या काळात श्रीमंती, अय्याशी आणि ऐशारामाच्या नव्या संदर्भानुसार या दशकात काही ठिकाणी विवाह सोहळ्यात नाचण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुजरा कलावंताचे पुनरुज्जीवन होऊ लागलेय. मात्र त्यांच्या या स्वरूपास समाज कोणत्या नजरेने पाहतो हे काळच सांगेल.
‘मुकद्दर का सिकंदर’मध्ये जोहराबाई एकदा सिकंदरला म्हणते की, “एक तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कोठे पे खतम होती है..” आता कोठे उरले नाहीत आणि मुजरा नर्तिकाही इतिहासजमा झाल्यात. उरल्यात त्या केवळ त्यांच्या पाऊलखुणा. त्याचबरोबर अलीकडील काळात मुजरा नृत्याच्या नावाखाली बिभत्स आणि हिडीस नृत्य करणाऱ्या तोकड्या कपड्यातील नार्तिकांचा (?) धांगडधिंगा घालणाऱ्यांबद्दल लिहावं वाटत नाही. मुजरा नृत्य आणि नर्तिकांच्याबद्दल मानवी मनात प्रेम, वासना, रसिकता, सौंदर्यासक्ती, आकर्षण अशा विविध भावना असू शकतात त्याचे उदात्तीकरण करणे वा त्याचा धिक्कार करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो. या भावनांचे स्वरूप काहीही असले तरी मुजऱ्याच्या या पाऊलखुणा अत्यंत वेधक आणि देखण्या होत्या हे नक्की..
संजय लीला भन्साळी यांनी हिरामंडी पेश केलीय, ती तद्दन पोशाखी आणि भयंकर नटवी झालीय. याहीआधी त्यांनी ‘गंगूबाई काठेवाडी’ मध्ये असेच चित्रण केले होते. ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘देवदास’ या त्यांच्याच तिन्ही चित्रपटांचा त्यांच्यावर भयंकर पगडा आहे असे नेहमी वाटते. पिवळे, लाल नि निळे रंग ते प्रमाणाबाहेर वापरतात. अत्यंत रंगी बेरंगी नि पिवळसर सोनेरी लाइट्सच्या चकचकाटाच्या त्यांच्या फ्रेम्स असतात. कदाचित ही त्यांची मजबूरी असू शकते वा त्यांचे त्या केमिस्ट्रीशी पर्सनल बॉण्डिंग असू शकते वा बॉक्स ऑफिसची गणिते त्यांना यासाठी प्रेरित करत असतील. हिरामंडीमधल्या स्त्रिया कोणत्या पोशाख घालत होत्या नि त्यांचा शृंगार कसा असे हे सांगणारं विविध साहित्य पाकिस्तानात नि जगभर उपलब्ध आहे. अमीर उमराव आणि सरदार मंडळींची अंगवस्त्रे ‘चोटभर’ वापरून झाली की टाकून दिली जात. त्यांची रवानगी या मंडीत होई. त्यांचं रहनसहन आणि बाकी मुजरेवाल्या स्त्रियांचं राहणीमान यात जमीन अस्मानचा फरक होता.
हिरामंडीत नाचगाण्याचं काम करणाऱ्या एका थोराड नर्तिकेचा मुलगा असणाऱ्या इक्बाल हुसेन याच्या अनुभवांवर आधारित ‘हिरामंडी’ हे मूळचे फ़्रेंच भाषेतले पुस्तक आहे. त्याचा इंग्लिश अनुवाद त्याच नावाने उपलब्ध आहे. क्लॉडीन डेल्सन या फ्रेंच लेखिकेने १९८८ साली इक्बालशी भेट झाल्यानंतर हे पुस्तक लिहिले आहे. त्यात पुष्कळ वर्णने आढळतात. सियालकोट, फेरोजपूर, मुलतान, जालंधर, बहावलपूर, मुजफ्फरगढ, झेलम आणि थेट पूर्व बंगालमधून मुली इथे आणल्या जात. त्या इथे कशा नि का आणल्या जात हा अनेक पुस्तकांचा कथावस्तू होण्याइतका मोठा घटक आहे. इथल्या बायका मुजरा करण्यासाठी पर्शियन मुलुखापर्यंत नेल्या जात. त्यांचे सौन्दर्य, त्यांचा वर्ण नि त्यांचे कपडेलत्ते हे सहा टप्प्यात होतं. शेवटचा टप्पा हिजडा आणि पहिला टप्पा राणीचा होता. भन्साळीनी साऱ्यांना एकाच रागरंगात तोललंय. १९७० मध्ये पाकिस्तान सरकारने हिरामंडी कागदोपत्री बंद केली कारण इथे नाचगाणं बंद होऊन सेक्सवर्किंगच उरलं होतं. हे एका दिवसात झालं होतं का? कधीच नाही! जवळपास दोन शतके इथे स्त्रियांचे शारीरिक शोषण झाले. तवायफ वेश्या कशी झाली याची दास्तान इथल्या गल्ल्यांमध्ये कैद आहे, यातलं या सिरीजमध्ये काहीच येत नाही. वास्तवातली हिरामंडी आणि मीडियामध्ये, सिनेमा सिरीजमध्ये दाखवली जाणारी हिरामंडी यात जमीन अस्मानचा फरक आहे.
लाहोरची हिरामंडी, मुंबईचा कामाठीपुरा आणि (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) आताच्या बांगलादेश मधील दौलतदियामध्ये काही अंडर करण्ट्स काम करत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते तेव्हा कामाठीपुऱ्यात एका लेनमध्ये केवळ मुजरा चालत असे. कोलकत्याच्या कालीघाटपाशीही मुजरा चाले. बनारस, लखनौ, आग्रा, बुऱ्हाणपूर, मधुबनी आणि मुजफ्फरपूर इथेही याची केंद्रे होती. यांच्यात मुलींची देवाणघेवाण चालत असे. आता पाकमधली हिरामंडी आणि बिहारमधले मुजफ्फरपूर वगळता कुठेच नाचगाणं होत नाही. काही कटूसत्ये आहेत जी आपल्या सामान्य पांढरपेशी जीवनाच्या परिघाबाहेरची असल्याने आपल्याला ज्ञात नसतात. सामान्य माणूस दौलतदियाच्या रेड लाइट एरियात गेला तर पाचव्या मिनिटाला तो भडाभडा ओकाऱ्या करेल. आता अस्तित्वात असलेली हिरामंडी जितकी बटबटीत आहे तितकीच भणंग आहे! १९२० च्या सुमारास हा परिसर कसा असेल याची चित्रेही उपलब्ध आहेत. भन्साळी त्याच्याशी मेळ खात नाहीत. लोकांना आवडेल अशा गोष्टी छानछान वेष्टनात चकाचक कल्हई करून खपवण्यात ते माहीर आहेत. मुळात या स्त्रियांच्या मर्जीची शून्य दखल असे, जे काही असे ते सारे बळजोरीचे असे. मग ती मुलगी रुळली की तिची पेशेवर नायकीण होत असे नि मग अखेरीस तिचे पैलू वयानुसार फिके पडत, मग तिचा करुण अंत ठरलेला असे. त्या दुःख, वेदना, तो संताप नि ती फसवणूक भन्साळी दाखवू इच्छित नाहीत कारण लोकांना स्वतःला एक ‘फीलगुड’ वाईबने ग्रासलेले आहे, हे त्यांनी पक्के ताडले आहे. जमले तर ते लाल रक्तालाही सोनेरी मुलामा लावून पेश करतील आणि प्रेक्षकांसह समीक्षकही त्याची वाहवा करतील!
कचकड्याचे महाल भलेही दाखवता येतील, नटलेल्या सजलेल्या बायकांचे जत्थे दाखवता येतील, आपसात रंजीश असणाऱ्या नि प्रसंगी देशासाठी लढणाऱ्या बायका दाखवून त्यातही देशभक्तीचा फ्लेवर ऍड करता येईल मात्र बेसिक हिरामंडीत काय चालत असे हे दाखवायचे म्हटले की माणूस का कचरत असावा? उत्तर साधे आहे पैसे कमावण्यासाठी सत्याचा गळा घॊटून जे लोकांना आवडते तेच दाखवून नि स्वतःच्या आवडत्या शैलीत रसरसलेली निर्मिती पेश केली जाते! ‘हिरामंडी’मध्ये त्यांनी या मूळ अफाट नि उत्कट भावनात्मक घटकाचा आत्माच काढून घेतलेला असला तरी त्याचा देह अफाट सजवला आहे, लोकांनाही बाह्यरूपात जास्त इंटरेस्ट असतो! त्याआड असलेली लसलसती जखम कुणालाच पाहायची नसते!
हिरामंडीची सिरीजची कहाणी ज्या शाहनवाजच्या आयुष्याशी निगडित होती त्याची जन्मदात्री एका गर्द काळोख्या रात्री किंचाळत होती. तिच्या किंचाळण्याच्या आवाजाने तो जागा झाला. आवाजाच्या दिशेने आपल्या आईच्या बचावासाठी धावला. आणि समोर जे भयावह दृश्य त्याने पाहिले ते त्याच्या मनावर कामस्वरूपी कोरले गेले. अर्धनग्न अवस्थेतली त्याची आई एका मारझोड करणाऱ्या पुरुषापासून स्वतःचा बचाव करत होती. या घटनेच्या अनेक वर्षांनंतर त्याची आई त्याच पुरुषाचे मनोरंजन करताना त्याला दिसली. त्यावेळी शाहनवाजला आपल्या आईचे त्या पुरुषावर प्रेम असल्याचे समजले. परंतु हे सगळं इथेच थांबलं नाही. कालांतराने शाहनवाजच्या बहिणीचा जन्म झाला. शाहनवाजचे कुटुंब वेश्या व्यवसायाशी संबंधित होते. त्यामुळे साहजिकच त्याच्या बहिणीचा ‘लैला’चा जन्म हा त्या कुटुंबासाठी आनंदाचा क्षण होता. लैलाने ज्या वेळी बाराव्या वर्षात पदार्पण केले त्यावेळी हिरामंडीच्या परिघात मोठ्या उत्साहात तिचे स्वागत करण्यात आले. तिच्या कौमार्याचा लिलाव मांडण्यात आला. अखेर लैलाच्या कौमार्याचा लिलाव झाला. आणि ज्या पुरुषाने तिचे कौमार्य विकत घेतले, तो तोच होता ज्याने बारा वर्षांपूर्वी शाहनवाजच्या आईला मारझोड केली होती आणि त्याच्या आईचा तत्कालीन प्रियकर होता. शाहनवाजसाठी हे धक्कादायकच होते. या कथेचे तपशीलवार वर्णन फ्रेंच लेखक क्लॉडिन ले टूर्नर डी आयसन यांनी आपल्या ‘हिरामंडी’ या कादंबरीत केले आहे. २००६ साली ही कादंबरी प्रकाशित झाली होती.
हिरामंडी या कादंबरीतील मुख्य कथानक हिरामंडी या जागेभोवती फिरते. या कथेत शाहनवाज हा वेश्या व्यवसायाशी संबंधित कुटुंबात जन्मलेला एक तरुण मुलगा आहे. या कथेत तो लाहोरच्या रेड लाइट एरियामध्ये लहानाचा मोठा होतो. त्याच्या कथानकातून लेखकाने हिरामंडीची डार्क साइड समोर आणलीय. या परिसरात वेश्याव्यवसाय हा एक कौटुंबिक व्यवसाय मानला जातो. हा व्यवसाय आईकडून मुलीकडे बिनदिक्कत, उघड सोपवला जातो. विविध माध्यमांत, सिनेमांत जी हिरामंडी दाखवली जाते त्यापलीकडे या क्षेत्राचा खरा इतिहास बिभत्स आहे. हा भाग कधीकाळी अत्यंत समृद्ध होता. इथे उंची राहणीमान असणारे लोक होते, प्रासादवजा हवेल्या होत्या! कमालीची भरभराट अनुभवलेल्या हिरामंडीची आताची अवस्था जीर्ण इमारती, बकाल वस्ती अशी झाली आहे. ही एकेकाळची मोठी समृद्ध बाजारपेठ होती. राजेशाही खेळाचे मैदान, कलाकार, वेश्या आणि गणिकांची घरं अशी हिरामंडीची ओळख होती. सद्यकाळात तिथले सज्जे ओस पडले आहेत, दुकाने अस्ताव्यस्त आहेत आणि बांगड्यांच्या सुरेल आवाजाची जागा आता वेगवेगळ्या यंत्रांच्या बेसूर आवाजाने घेतली आहे.
मुघल कालखंडात हिरामंडीला महत्त्व आले. रुढीप्रिय इस्लामने नाच- गाणे निषिद्ध मानले तरी मुघल हे कलेचे चाहते होते. त्यांनी हजारो कलाकारांना शाही दरबारात मनोरंजनासाठी नियुक्त केले. २००५ साली प्रकाशित झालेल्या द ‘डान्सिंग गर्ल्स ऑफ लाहोर’ या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ लुईस ब्राउन यांनी मुघलांनी गायन आणि नृत्य कला प्रतिष्ठेच्या मानल्याचे म्हटले आहे. १६ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यन्त मुघल राजवटीत नृत्य आणि वेश्याव्यवसाय या दोन्हींना परवानगी असल्याचे आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे वरिष्ठ सल्लागार रशीद मखदुम यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. याशिवाय रखेली, बटीक ठेवण्याची परंपरा इस्लामिक संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहे, ती जरी पत्नी नसली तरी तिला कुटुंबाचे महत्त्वाचे अंग मानले जाते. अनेक हिन्दी इंग्लिश तसेच प्रादेशिक सिनेमांमधून या स्टोरीप्लॉटवर आधारित सामाजिक भाष्य केले गेलेय. भारतीय उपखंडातील सामाजिक तसेच कालबद्ध इतिहासांची पुस्तके चाळताना या बाबी अधिक ठळकपणे अधोरेखित होतात. बऱ्याचदा या बटीक, रखेली स्त्रीचा रखवाला कदरदान पुरुष मरण पावला की तिला हिरामंडीच्या बाजारात उभं राहावं लागे हे वास्तव होतं! अगतिक स्त्रियांची ती शेवटची पायरी असते, जिथे त्यांना नाईलाजाने मस्तक टेकवावं लागतं आणि लोक त्यांच्या मस्तकावर पाय ठेवून त्यांच्या घरात शिरतात! आपले शौक पुरे करण्यासाठी, आपली भूक भागवण्यासाठी! हिरामंडीत हे काम नेकीने चालायचे त्यात बेइमानी नसे, मात्र शोषण अफाट होत असे. ज्याचे उत्तर कुणापाशीही नव्हतं! इथे निव्वळ सेक्सवर्किंग चालायचं असं म्हणणं अत्यंत अन्यायकारक ठरेल. कारण हिरामंडीच्या एकूण लाईफ स्पॅनमधील अलीकडील शतक वगळता इथे बहुतांश करून मुजरा नर्तिका नि तवायफच अधिक होत्या हे वास्तव आहे!
इथे नांदणाऱ्या (होय नांदणाऱ्याच, कारण हेच या स्त्रियांचे सासर होते आणि हेच त्यांचं माहेरही होतं!) तवायफ या नृत्य, गायन आणि इतर सांस्कृतिक कलांमध्ये प्रशिक्षित होत्या. इतिहासकार प्राण नेव्हिल लिखित, २००९ साली प्रकाशित झालेल्या ‘नॉटच गर्ल्स ऑफ द राज’ मध्ये मुघल काळात तवायफशी संबंधित असणे हे दर्जा, संपत्ती, सुसंस्कृतपणा आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जात होते, असे म्हटले आहे. त्या काळच्या गणिका देखील स्वतंत्र स्त्रिया होत्या. १८५८ ते १८७७ या काळात लखनऊच्या नागरिक नोंदीवरून त्यांच्या सामर्थ्याची आणि सामाजिक गतिशीलतेची जाणीव होऊ शकते, त्याकाळी तवायफ हा सर्वात मोठा आणि सर्वाधिक कर भरणारा वर्ग होता. बहुसंख्य घरंदाज स्त्रियांना संपत्ती ठेवण्याची किंवा संपत्ती मिळवण्याची परवानगी नव्हती, परंतु मुघल काळात गणिका आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होत्या, त्यांच्या जीवनावर आणि निवडींवर त्यांचे नियंत्रण होते. ही नोंद महत्वाची आहे कारण अनेक अमीर उमराव, सरदार, जमीनदार पुरुष त्यांच्या संपत्तीचा एक हिस्सा या स्त्रियांच्या नावावर करून ठेवत असत. जेणेकरून कधी अडचण संकट आलं तर हीच संपत्ती त्यांना पुन्हा वापरता यायचा. तर उलट्या काळजाचे काही लोक असेही होते की जे या स्त्रियांशी जवळीक साधत असत, त्यांचा विश्वास संपादन करत असत आणि त्यानंतर त्यांची हत्या करून अथवा त्यांचे अपहरण करून त्यांची दौलत हडपत असत. हिरामंडीत हे सर्व घडत असे. किंबहुना हा हिरा मंडीच्या प्रारब्धाचा भाग झाला होता. इथे आणल्या जाणाऱ्या बायकांना याची सवय होऊन जाई. आपलं केवळ दैहिक शोषण होत नसून आपल्या पैशा-अडक्यावर देखील इथे इथे येणाऱ्या संभावितांचा डोळा आहे हे त्या जाणून असत. त्यामुळेच त्यांच्या वागणुकीत एक प्रकारचा कडवटपणा भरलेला असे.
एक काळ असा होता की हिरामंडीतल्या तवायफ स्त्रियां पैशाने तुडुंब भरलेल्या समुद्रात तरंगत असत. मात्र हे दिवस ही लयास गेले. १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात, अहमद शाह दुर्रानी याच्या नेतृत्वाखालील अफगाण आक्रमणांमुळे पंजाबमधील मुघल सत्ता कमकुवत झाली. अफगाण राजवटीत, तवायफचे शाही प्रायोजकत्व संपुष्टात आले. परंतु पारंपरिक उपपत्नी (concubine) संस्कृतीने वेश्याव्यवसायाला दुसरा मार्ग दिला. दुर्राणीच्या मृत्यूमुळे लाहोर शीख साम्राज्याचे पहिले महाराजा रणजित सिंग यांच्या हाती पडले, त्यांनाच शेर-ए-पंजाब (पंजाबचा सिंह) म्हणून ओळखले जाते. विशेष बाब म्हणजे वेश्यावृत्ती मुघलांमुळे आपल्या देशात आली असं म्हणणाऱ्या लोकांचा एक मोठा समुदाय आपल्याकडे आहे त्यांना हे डोळ्यात अंजन घातल्यासारखं होईल कारण अहमद शाहच्या मृत्यूनंतर नाचगाणं करणाऱ्या बायकांचं समाजातलं आस्थेचं, मानाचं, प्रेमाचं स्थान नष्ट झालं नि महाराजा रणजित सिंग यांच्या राजवटीत वेश्यावृत्तीला अत्युच्च स्थान मिळालं. ही मानसिकता तत्कालीन ब्रिटिश अंमल असणाऱ्या अखंड भारतात साथीच्या आजारासारखी पसरत गेली.
मुघल राजवटीच्या पडझडीतून तवायफ संस्कृती कधीच सावरली नाही, पण शिखांच्या अधिपत्याखाली या संस्कृतीचे काही अंशी पुनरुत्थान झाले. रणजित सिंग स्वतः मोरन सरकार नावाच्या एका मुस्लिम नृत्यांगनेच्या प्रेमात पडले होते आणि तिच्या वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी तिच्याशी लग्न करून सामाजिक रोष ओढवून घेतला. मोरन हिचे अस्तित्त्व बहुतेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये दिसत नाही परंतु लाहोरच्या शाह आलमी गेटच्या आत असलेल्या पापर मंडी भागात तिला दफन करण्यात आल्याने तिच्या ऐतिहासिक उपस्थितीची साक्ष मिळते. प्रचलित कथेनुसार, एके दिवशी मोरन भारत-पाक सीमेवरील पुल कंजरी या गावात नृत्याच्या कार्यक्रमासाठी जात होती, तेव्हा तिचा बूट कालव्यात पडला. संतापलेल्या मोरनने कालव्यावर पूल बांधला जाईपर्यंत कार्यक्रम करण्यास नकार दिला. त्यामुळे सिंग यांनी या कालव्यावर पूल बांधून घेतला. पुल मोरान नावाचा पूल आजही त्या ठिकाणी उभा आहे.
कालांतराने लाहोर हे रात्रीस घडणाऱ्या धक्कादायक घटनांचे केंद्र झाले. २०१३ साली प्रकाशित झालेल्या ‘पंजाबी सेंच्युरी’ पुस्तकामध्ये, इतिहासकार प्रकाश टंडन लिहितात, “हिरामंडी दिवसा शांत आणि निर्जन होत असे, परंतु सूर्य मावळल्यानंतर ती झगमगून निघत असे” त्यांनी म्हटल्याप्रमाणे या मुलींचे आयुष्य संध्याकाळी सुरु होत असे. सायंकाळी त्या सजून नटून तयार असत. आणि पुढे आई किंवा मालकिणीच्या सूचनांची वाट पाहत. सुट्टीच्या दिवसांत त्या काश्मीरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत करत, परंतु त्या वेळी त्यांचं राहणीमान अगदी सामान्य गृहिणीसारखं असे. जेएनयू मधील इतिहासच्या प्राध्यापिका लता सिंग यांनी व्हिजिबिलायझिंग द ‘अदर’ इन हिस्ट्री (२००७) या लेखात या स्त्रियांच्या सामाजिक दर्जाविषयी लिहिलं आहे. या महिलांना लक्षणीय सामाजिक दर्जा लाभला होता. त्या संगीतकार आणि नर्तकांना प्रशिक्षण देण्याकरिता मोठी केंद्र चालवत होत्या. विशेष म्हणजे इतर साफसफाई किंवा तत्सम काम करण्यासाठी त्या महिलांऐवजी पुरुषांची नेमणूक करत असत. तर मुलींना गायन आणि नृत्यकलेच्या प्रशिक्षणासाठी घेतले जाई.
आता कुणी किती जरी युक्तिवाद केले इतिहासाचे दाखले दिले तरी हिरामंडी हा आता लाहोरचा रेड लाईट झाला आहे हे कुणी नाकारू शकत नाही. तिथे आता प्रासादवजा भव्य हवेल्या उरल्या नाहीत, काही हवेल्यांचे रूपांतर लॉजेसमध्ये झालेय तर काही व्यावसायिक व्यापारी इमारती झाल्या आहेत. इथे आता लघुउद्योग स्वरूपाचे वेगवेगळे यांत्रिक कारखाने खडखडत असतात. काही बैठ्या घरांच्या गल्ल्यात छुप्या पद्धतीने वेश्या व्यवसाय चालतो. संध्याकाळी हा इलाखा हॉकर्सनी भरलेला असतो. तक्षली गेट परिसरात हा भाग येतो. याच्या नजीक कालीबेरी बाजार, तहसील बाजार, सैद मिठा बाजार आणि तिब्बी बाजार हा भाग आहे. काही अंतरावर लाहोरचा प्रसिद्ध किल्ला आणि रंग महल आहे. हिरामंडीमध्ये जुनं काहीच उरलेलं नाही, अगदी जुन्या इमारती नाहीत, गत काळातली शानोशौकत नाही, घुंगरांची खणखण नाही की पैंजणांची छुमछुम नाही, जीव ओवाळून टाकावा अशी नाचगाणी नाहीत की दिल गार्डन होईल अशी गायकीही नाही, पाहता क्षणी कलेजा विदीर्ण व्हावा अशी नजाकत नाही नि नजर थिजून जाईल असं सौन्दर्यही नाही. इथे आता कोरडा शुष्क व्यवहार चालतो. अधून मधून काही घरांतून गाणं बजावणं होतं मात्र ते सुश्राव्य असेलच असं सांगता येत नाही! पाय थिरकतात मात्र त्यात ती विजेची चपळाई नाही, नजरेच्या खाणाखुणा भलेही होत असतील मात्र त्यात तो मायेचा आस्थेचा लवलेशही नाही. जिस्मफरोशी हा इथला कोडवर्ड झालाय जणू! एकेकाळी इथल्या बायकांच्या नावाच्या शपथा खाल्ल्या जायच्या, आता लोक यांना केवळ शरीराची आग विझवणाऱ्या बधिर देहजणिवांचा स्त्रीदेह म्हणून पाहतात. इथे समृद्धी उरली नाही याचे दुःख नसून इथे असलेला बकालपणा हा निव्वळ शोषणाच्या बाजाराचा घटक झाला आहे, याचे क्लेश जरूर आहेत. पोलिसांचा ससेमिरा सतत असतो. स्थानिक लोकांच्या तक्रारी हा नित्याचा भाग झालाय. या बायकांना इथून हाकलून दिलं जावं आणि त्यांना सेक्सवर्किंगच्या गुन्ह्याखाली अटक करून कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी इथे सातत्याने पुढे येत असते.
हिरामंडी हा आता लाहोरच्या अस्मितेचा जागतिक घटक झाली असली तरी कर्मठ स्थानिकांना त्याच्याशी घेणेदेणे नाही, त्यांच्या मते हा एक बदनाम इलाखा आहे आणि त्यांच्या घरादारापाशी अशी वस्ती असता कामा नये. अशा वस्त्या कुणालाच आपल्या शेजारी नको असतात मात्र तिथे तोंड मारण्यासाठी साऱ्या शहरातले लोक जात असतात ते सर्वांना चालतं. हिरामंडी बदनाम असली तरी तिचं नाव पूर्वापार हे नव्हतं. हा भाग आधी शाही मोहल्ला होता. या भागाला हिरामंडी हे नाव शीख राजवटीत मिळाले होते. रणजित सिंग यांच्या मृत्यूनंतर, शीख साम्राज्याचे पंतप्रधान हिरा सिंग डोग्रा यांनी शाही मोहल्ला आर्थिक केंद्र, खाद्य बाजार म्हणून वापरले जाऊ शकते असा विचार मांडला. हिरा सिंगने स्थापन केलेला धान्य बाजार ‘हिरा सिंग दी मंडी’ (हिरा सिंगचा बाजार) म्हणजेच हिरामंडी म्हणून ओळखला जाऊ लागला. तर भन्साळीसारखे लोक हिरामंडी या शब्दाचा संबंध उर्दूमधल्या हिरा या शब्दाशी जोडतात. डायमंड मार्केट हे तिथे राहणाऱ्या स्त्रियांच्या सौंदर्याचे सूचक आहे, असे त्यांना वाटतं. वास्तवात याला कसलाही आधार नाही.
इथलं नाचगाणं कसं घटत गेलं आणि केवळ वेश्याव्यवसाय मागे उरला याचाही एक कालबद्ध इतिहास आहे. १८४९ साली हा भाग पूर्णतः ब्रिटिश अंमलाखाली आला. पंजाबवरील शीखांवरील वर्चस्वामुळे ईस्ट इंडियन कंपनीला या भागात पाय पसरण्यासाठी मार्ग मिळाला. व्हिक्टोरियन काळातील पुराणमतवादानेही हिरामंडीच्या ऱ्हासात मोठी भूमिका बजावली होती. ‘नॉच गर्ल्स ऑफ द राज’ या संदर्भग्रंथाचे लेखक नेव्हिल यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटीशांनी “कुशल व्यावसायिक पारंपरिक नर्तिका मुली किंवा देवदासी आणि सामान्य वेश्या यांच्यात कोणताही भेद केला नाही, सर्वांनाच पतित स्त्रिया म्हणून संबोधले. ब्रिटीश सुधारक आणि ख्रिश्चन मिशनरीनीं या स्त्रियांशी संबंध निषिद्ध मानला. याच परिस्थितीतून तवायफ या प्रकारातून कला वर्ज्य होऊन फक्त वेश्याव्यवसाय मागे शिल्लक राहिला. ‘शो गर्ल्स ऑफ पाकिस्तान’ या लघुपटाचे दिग्दर्शक साद खान यांच्या मते ब्रिटीशांनी त्यांची सामाजिक श्रेष्ठता दाखविण्याच्या आणि मुघल दरबाराचा वारसा कमी करण्याच्या प्रयत्नात हिरामंडीतून पारंपारिक नृत्य सादरीकरणाचा सांस्कृतिक पैलू काढून टाकला आणि फक्त शिल्लक राहिला तो वेश्या व्यवसाय. म्हणूनच ब्रिटीशांच्या काळात हिरामंडी वेश्याव्यवसायाची गुहा म्हणून ओळखली जाऊ लागली. ब्रिटीश जनरल हेन्री माँटगोमेरीच्या शब्दात सांगायचे झाले तर हा हिरामंडी ही थकलेल्या सज्जन(!) सैनिकांसाठी शरीरसुखाचा आनंद मिळवण्याची जागा ठरली. १९१४ साली इंग्रजांनी लाहोर किल्ल्यातील चौकीमध्ये तैनात असलेल्या सैनिकांना सेवा देण्यासाठी हिरामंडी येथे वेश्यालयाची अधिकृत स्थापना केली. अशा प्रकारे हिरामंडी आणि तवायफ संस्कृतीचे वेश्याव्यवसायात परिवर्तन सुरू झालं.
देशाची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तान हा इस्लामी शरियाच्या नितीवर अंमल करणारा देश होता, साहजिकच पहिल्या वाहिल्या पाक सरकारने हिरामंडीमध्ये वेश्याव्यवसाय चालणार नाही अशी भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर तिथे नाचगाणं करणाऱ्या ज्या मोजक्या स्त्रिया उरल्या होत्या त्यांच्यावरही बंधने लादत नियम घालून दिले. १९५० च्या दशकात, नृत्य करणाऱ्या मुलींना पाकिस्तानी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कलाकार म्हणून कायदेशीर मान्यता देण्यात आली होती, त्यांना दररोज संध्याकाळी तीन तासांपर्यंत सादरीकरण करण्याची परवानगी होती. हिरामंडीने नृत्य गायन सादरीकरणाची कला, संस्कृती टिकवून ठेवली आणि पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील काही प्रसिद्ध सिनेतारे निर्माण केले, हेही वास्तव आहे. या कालखंडात करमणुकीसाठीच्या अभिनय व नृत्य नाट्य कला सादरीकरणात उच्च वर्गातील स्त्रिया सहभागी होत नसत त्यामुळे हिरामंडीचे पारंपारिक कलाकार व्यावसायिक गायक आणि नर्तक त्यात सहभागी होऊ लागले. नूरजहाँ, मुमताज शांती आणि खुर्शीद बेगम यांसारख्या कलाकारांना आताच्या कुप्रसिद्ध परिसरातच प्रशिक्षण देण्यात आले होते. असे असले तरी आता मात्र हिरामंडीची रया पूर्णतः गेली आहे, अनेक समाजसुधारक, कलाप्रेमी येथील महिलांसाठी कार्यरत असले तरी मागे फक्त इतिहास शिल्लक राहिला आहे.
आजघडीला इथं आपल्या देहाची बोली लावणाऱ्या स्त्रियांच्या मूक आक्रोशात या परिसराचा श्वास घुसमटतो! या बायकांच्या वाट्याला येणारी आयुष्ये कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत. यांच्या कहाण्या कुणीही लिहिल्या तरी त्यातले सत्व गुदमरता कामा नये इतके यांचे जगणे अस्सल आहे! भन्साळीनी यांचे जसे प्रेझेंटेशन केले तसे सादरीकरण कुणी करू नये कारण अशाने दुःख वेदनांच्या डागण्या सहन करणारी रंडी देखील अतिव आकर्षक नि चित्तवेधक वाटू लागते! एखाद्या घटकाविषयीच्या आपल्या भावनांचा घाट फसव्या पद्धतीने बदलणे हा एक प्रकारचा धोका असतो नि बाजारू मार्गाने पैसे फेम कमावण्यासाठी धोके देणं आजच्या काळात न्यू नॉर्मल आहे. हिरामंडीचे वास्तव एखाद्या सिनेमा वेबसिरीजने काही काळासाठी कुणी विद्रूप करू शकते मात्र त्याने तथ्य बदलले जाणार नाही. हिरा मंडीचे वर्णन एका वाक्यातही सार्थपणे करता येईल – स्त्रीदेहाविषयीच्या पुरुषी जाणिवांचे बदलत गेलेले मूर्तस्वरूप म्हणजे हिरा मंडी! आणखी काही दशकांनी तिचे स्वरूप कोणते असेल याचे नेमके भाष्य कुणीच करू शकत नाही मात्र एक अपेक्षा आपल्यापैकी प्रत्येकजणाने करावी असं मनःपूर्वक वाटते ती म्हणजे इथे स्त्री देहाची विटंबना होऊ नये, इथे स्त्रीला मान सन्मान मिळावा. तिच्यातल्या हिऱ्याचे हरेक पैलू लख्ख उजळून निघावेत. खऱ्या हिऱ्यागत तिचे मूल्य जाणले जावे! इतकं तर आपण सारेच करू शकतो.
‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४
(लेखक नामवंत स्तंभ लेखक व ब्लॉगर आहेत.)
8380973977
…………………………………….