-स्नेहलता दातार
‘चांदोबा’ म्हटलं की पाच -सहा पिढीतील वाचक रोमांचित होतात. १९४७ ते २०१० असे जवळपास ६३ वर्ष चांदोबा हे मासिक केवळ लहान मुलेच नाही तर आबालवृद्धांचे आवडते मासिक होते. तब्बल १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या चांदोबाच्या एकेकाळी १० लाखापेक्षा अधिक प्रती प्रसिद्ध होत असे. अनेक पिढ्यांना भारतीय संस्कृती , परंपरा , इतिहासातील नायक , लोककथा याची ओळख चांदोबाने करून दिली. ”चांदोबा’ ने अनेक पिढ्यांच्या मनात चांगुलपणा रुजवला. चेन्नई येथे १९६१ पासून वास्तव्यास असलेल्या स्नेहलता दातार यांनी जवळपास दहा वर्ष चांदोबा साठी काम केलं. आज ९० वर्षाच्या असलेल्या दातार मॅडम यांनी ‘चांदोबा’ चा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास , वाटचाल , वेगळेपण मांडताना तिथे काम करतानाचे त्यांचे अनुभवही सांगितले आहेत.
………………….
“… भारत देश एका नव्या पर्वाची सुरुवात करीत होता. ब्रिटीशांच्या अंमलातून स्वतंत्र झाल्यानंतर देशाला आता आपल्या पायावर उभे राहण्याची गरज होती. माझे मित्र चक्रपाणी व मी, आम्हाला दोघांनाही वाटत होते की जर आता छोट्या मुलांच्या चेहऱ्यावर आम्ही हास्य फुलवले तरच उद्याचा भारत आनंदी होईल. आम्हाला वाटले की जर आमच्या मुलांना आम्ही देशाच्या महान परंपरेवर प्रेम करायला शिकवले तर उद्याचा भारत एक समर्थ देश होऊ शकेल. त्याच्यासाठी मुलांना वाचनाची गोडी लागावी, आणि चांगल्या साहित्याचा आनंद मिळायला हवा, म्हणजे त्यांना भारतीय एकजुटीची मनोवृत्ती समजायला लागेल . आम्ही दोघेही या कल्पनेने भारावून गेलो होतो, आणि एक अगदी आगळे वेगळे, वेडे धाडस , किंवा हा असाधारण अनन्य प्रयोग आम्ही केला, तो म्हणजे चांदोबा! किशोरवयीन मुलांसाठी एकच मजकूर, अनेक भाषेत उपलब्ध करुन देणारा चांदोबा म्हणजे भारताच्या दंतकथा, लोककथा ,आणि कल्पनांनी भरलेली जणू ही अलीबाबाची गुहाच होती ”
हे शब्द होते ‘चांदोबा’ चे संस्थापक कै. श्री बी. नागी रेड्डी यांचे. १९४७ चा स्वातंत्र्य सूर्य उगवण्यापूर्वी काही दिवस अगोदरच हा ‘चांदोबा’ उर्फ ‘चंदामामा’ भारताच्या पूर्व किनाऱ्यावर उगवला. त्यावेळची नागी रेड्डी यांची भूमिका त्यांच्या वरील शब्दात स्पष्ट होते. या मासिकाची ही विचारधारणा त्यांनी व त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री विश्वनाथ रेड्डी व चक्रपाणी यांनी साठ वर्षे जपली होती. अनेक स्वप्नांचे गाठोडे सांभाळणारे हे दोघे मित्र. स्वातंत्र्याच्या चळवळीत हे मित्र एकत्र आले होते. मातृभूमीचे प्रेम आणि देशभक्तीचे वेड त्यांच्या नसानसात भरलेले होते. त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांच्यापुढे ‘मुलांसाठी मासिक’ ही कल्पना मांडली. तेव्हा नुकतीच खेड्यापाड्यात साक्षरतेच्या प्रसाराला सुरुवात झाली होती. नव्या भारतात छोट्या मुलांना वाचायला चांगला मजकूर मिळायला हवा आणि तो मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचता येईल, या विचारातून चांदोबाचा जन्म झाला. पुढच्या पिढ्यांमध्ये देशप्रेमाचे बीज अगदी कोवळ्या वयात पेरण्यासाठी मुलांचे मासिक अगदी योग्य राहील , हे विश्वनाथ रेड्डी व चक्रपाणी या दोघांच्या लक्षात आले. खेडेगावातल्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांना साक्षर करायचं असेल तर त्यांना आवडतील, पचतील अशा तऱ्हेचे मासिक त्यांच्या हातात असायला हवे. म्हणून पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक, आणि अद्भुत, यापैकी काहीतरी वाचायची उत्सुकता वाढवणारे माहितीपूर्ण आणि रंजक असे मासिक आपण सुरू करावे, असे या दोघांनी ठरवले.
भारत स्वतंत्र होण्यापूर्वी महिनाभर अगोदर जुलै १९४७ मध्ये ‘चांदोबा’ मासिकाचे प्रकाशन सुरू झाले. प्रथम तेलगू व नंतर तामिळमध्ये ‘अंबुलीमामा’ या नावाने हे मासिक प्रसिद्ध होऊ लागले. मुले आणि त्यांचे पालक, सर्वांनीच या मासिकाचे उत्साहाने स्वागत केले. दोन्ही भाषांमधले अंक दरमहा नियमित प्रसिद्ध होऊ लागले. सुरुवातीला ६ आणे किमतीच्या चांदोबाच्या सुमारे ६००० प्रती विकल्या जात होत्या. लवकरच ‘चांदोबा’ चे नाव घरोघरी ऐकू येऊ लागले. साहजिकच इतर भाषांतही आवृत्ती निघाव्यात म्हणून आग्रह सुरू झाला. प्रकाशक संपादकद्वयीने हा आग्रह उचलून धरला. काही काळातच इतर भाषांमध्ये चांदोबा प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. १९४८ साली कन्नडमध्ये, १९४९ मध्ये हिंदी मध्ये ‘चंदामामा’ सुरू झाला. १९५२ मध्ये ‘चांदोबा’ नावाने मराठीमध्ये, व मल्याळम भाषेत ‘अंबीलीअम्मावन’ नावाने अंक निघायला लागला . त्यानंतर १९५४ मध्ये गुजराती, १९५५ मध्ये इंग्लिश, १९५६ मध्ये उडिया व सिंधी, १९७२ मध्ये बंगाली, १९७५ मध्ये गुरुमुखी व पंजाबी, आणि १९७६ मध्ये असामिया भाषेमध्ये चंदामामाचे अंक प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. चंदामामा (भारत) प्रकाशन समूहाच्या वतीने हे सर्व भाषेतील अंक प्रकाशित होत असत.

चक्रपाणी आणि नागीरेड्डी यांनी चांदोबा सोबतच तेलुगू चित्रपटांच्या निर्मितीचेही काम सुरू ठेवले. चक्रपाणी यांचे १९७५ मध्ये निधन झाल्यानंतर विश्वनाथ रेड्डी यांनी चांदोबाचे काम पाहण्यास सुरुवात केली. १२ भाषांमध्ये प्रसिद्ध होऊ लागलेला चांदोबा लोकप्रिय होत होता. १९८० मध्ये चांदोबाच्या सर्व भाषा मिळून सुमारे ९ लाख प्रती विकल्या गेल्या. नागीरेड्डी तोपर्यंत एक यशस्वी चित्रपट निर्माते म्हणूनही गणले जाऊ लागले होते. त्यांचे “राम और श्याम”, “ज्युली” वगैरे चित्रपट हिट झाले होते.
१९७८ मध्ये सिंहली भाषेत चंदा मामाची पहिली परदेशी भाषिक आवृत्ती सुरू झाली. श्रीलंकन मुलांना आणि तत्कालीन अध्यक्ष जयवर्धने यांना ही आवृत्ती अर्पण केली. पहिली प्रत प्रधानमंत्री प्रेमदासा यांना दिली होती. त्यांना ती इतकी आवडली की, पुढचे काही महिने त्यांनी या मासिकासाठी कथाही लिहिल्या होत्या. नंतर श्रीलंकेत वांशिक समस्या उद्भवल्या आणि सिंहली अंकाचे प्रकाशन नाईलाजाने बंद करावे लागले. सिंधी व गुरुमुखी चंदामामाही फार दिवस चालला नाही. १९८४ मध्ये संस्कृत आवृत्ती सुरू झाली. २००४ साली संथाली भाषेतही चांदोबा येऊ लागला. आदिवासी जमातीतल्या मुलांसाठी त्यांच्या मातृभाषेत येणारे हे पहिलेच सचित्र मासिक होते. अनिवासी भारतीय मुलांमध्ये त्यांच्या मातृभाषेचा वापर व्हावा वाढावा म्हणून सिंगापूर मधल्या मंडळींसाठी इंग्लिश व तामिळ अशी द्वैभाषिक आवृत्ती २००३ पासून सुरू झाली. या आवृत्तीचा प्रसार सिंगापूर शिक्षक वर्गातर्फे होत होता . ही कल्पना यशस्वी झाली, म्हणून अशाच तामिळ- तेलुगु हिंदी व गुजराती आवृत्या तयार केल्या गेल्या. उत्तर अमेरिका आणि कॅनडामध्ये त्यांच्या चाचण्या घेण्यासाठी वाटप करण्यात आले होते. त्याचे अधिकृत उद्घाटन झाले होते पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

२००२ सालापासून चंदा मामाच्या इंग्लिश आवृत्ती मध्ये बदल झाला. अंकाच्या आकार मांडणी व छपाई वेगळ्या प्रकारे सुरू झाली नवीन मोठ्या आकारामध्ये ज्युनियर चंदा मामाची आठ पानाची पुरवणीही सोबत निघाली. त्याच्यानंतर नऊ वर्षाखालील वयाच्या लहानग्यांसाठी एक वेगळेच मासिक असावे, अशी पालकांकडून सातत्याने मागणी होत गेली. याचा परिणाम म्हणजे मे २००३ पासून ५४ पानाचे ‘ज्युनियर चंदामामा’ हा अंक सुरू झाला. पहिल्या अंकाची प्रत राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना देण्यात आली. त्यांचे आशीर्वाद या आवृत्तीला मिळाले. त्यानंतर ज्युनियर चंदा मामाची भुरळ इतर भाषिक बालकांनाही पडायला लागली. १९८१ पासून चंदा मामाची ब्रेल आवृत्ती चार भाषांत निघत होती. हैदराबाद मधली एक स्वयंसेवी संस्था विशेष फाउंडेशन व दिल्लीच्या ऑल इंडिया कॉनफेडरेशन ऑफ द ब्लाइंड ,यांच्या सहकार्याने ब्रेल लिपीतल्या तेलुगू , इंग्लिश , व हिंदी आवृत्ती यांचे प्रकाशन व वितरण होत होते. इतक्या साऱ्या भाषांमध्ये मुलांचे मासिक प्रकाशित करण्याचे हे एकमेव उदाहरण असावे.
२००० सालापासून चंदामामा ने आपले कार्यक्षेत्र जास्त विस्तृत केले. देशी- विदेशी चंदामामाच्या जुन्या व नवीन अंकातला मजकूर व चित्रे पुरवण्याचे काम वेगवेगळ्या माध्यमांना पुरविण्याचे काम सुरू केले गेले. त्यानंतर चंदा मामा मल्टीमीडियातर्फे साहित्य, मजकूर, गोष्टी, व कला इत्यादी माहिती असलेल्या असलेल्या सीडी तयार होऊ लागल्या. दूरदर्शन हैदराबाद व ई-टीव्ही वाहिनीवर दोन तेलगू धारावाहिक मालिकांसाठी चंदामामा ने साहित्य व मजकूर पुरवला होता. २००१ पासून चंदामामांनी स्वतःची वेबसाईट सुरू केली होती. नव्या बदलानुसार पर्यटन, पर्यावरण ,ऊर्जा बचाव मोहीम, बायोडायव्हर्सिटी, इत्यादी विषयावर चंदामामाने ओरिसा पर्यटन केंद्र, इंडिया फाउंडेशन, व पीसीआरए, यांच्या सहकार्याने पुस्तिका तयार केल्या. हे असे अनेक कार्यक्रम, उपक्रम , व इतक्या भाषेतले अंक नियमितपणे प्रसिद्ध करणाऱ्या कर्मचाऱ्यांची टीम वाखाणण्यासारखी होती. चांदोबाचे प्रथमपासून सल्लागार होते रस्किन बाँड व मनोज दास सारखे यासारखे विख्यात साहित्यिक व तज्ञ! त्याशिवाय श्री रामकृष्णन यांच्यासारखे सर्वस्वी साहित्य सेवेला वाहून घेणारे खादीधारी देशप्रेमी पाईक. दिल्लीला शंकर्स वीकली मध्ये ते बरीच वर्षे होते. निवृत्तीनंतर त्यांनी दक्षिणेत स्थायिक व्हायची इच्छा व्यक्त केली. नागी रेड्डीसारख्या जाणकार माणसांच्या नजरेतून अशी गुणवंत व्यक्ती सुटणे शक्यच नव्हते. रामकृष्णन यांची भेट झाल्यावर ते त्यांना म्हणाले , ‘चला, ही शेजारची केबिन पहा. आजपासून ही तुमची केबिन.’

अशा या चांदोबात जवळपास १० वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली. चांदोबाचे काम माझ्याकडे अनपेक्षितरित्या आले. चांदोबाच्या मराठी आवृत्तीचे काम पाहणाऱ्या श्रीमती ब्रह्मे पाँडिचेरीमधून हे काम करत असत.. मला आठवतं, मार्च १९९९ मध्ये एक दिवस ‘चांदोबा’ चे एक अधिकारी माझ्याकडे आले . ब्रह्मे बाईना ऑक्सिडंट झालाय. एप्रिलच्या अर्धा अंक तयार आहे, तो तुम्ही पुरा करून द्याल का, अशी विचारणा त्यांनी केली. माझे मानधनही त्यांनी विचारले. मी म्हटले, ‘मी अंक तयार करून देते आणि बाई बऱ्या होईपर्यंत मी हे काम सांभाळीन. त्यानंतर माझ्या घरी कागद येत. प्रूफ तपासणी आणि दुरुस्त्या फोनवर होत असत. ब्रह्मे बाईंना लॉरीने धडक दिली होती त्यामुळे त्या चटकन बऱ्या झाल्या नाहीत. त्यामुळे मी ‘चांदोबा’ मध्ये गुंतले ती २०१० पर्यंत. या कामाने मला भरपूर आनंद दिला. शिवाय अनुवादाची इतर बरीच कामे मला मिळत गेली. श्री विश्वनाथ रेड्डी व त्यांची पत्नी राणी यांची ओळख होतीच, पण लवकरच मी चांदोबा परिवारात मराठी मॅडम म्हणून ओळखली जाऊ लागले. चंदामामाच्या कचेरीत कुठेही गडबड गोंधळ कधी जाणवत नव्हता . एखाद्या मंदिरासारखे शांत निवांत ऊर्जा देणारे स्थान, असेच तिथे गेल्यावर वाटत असे. फिल्म स्टुडिओमध्ये सारे बॅक स्टेज कर्मचारी मांजर पावलाने काम करीत राहतात,तशीच शिस्त इथेही दिसत असे. ‘चांदोबा’ कचेरीत अगदी आनंदात काम होत असे. चांदोबाच्या विविध भाषेतीत आवृत्त्यांमधील मजकूर व चित्रे सारखी राहत असे. विक्रम वेताळ असो, तेनालीरामन, बिरबल किंवा इतर काही कथा -कथानके असोत, ते सर्व आवृत्त्यांमध्ये असत. त्या कथांमध्ये सदैव चांगुलपणाचा विजय असे, आणि काहीतरी तात्पर्य वाचकांच्या मनावर ठसविल्या जात असे. त्याखेरीज भारतातल्या नद्या , किल्ले इत्यादी भौगोलिक, ऐतिहासिक, माहितीही दिली जात असे. सर्व भाषेतला मजकूर व चित्रे सारखा असल्याने १२ भाषेतले अंक काढून सुद्धा कधी गोंधळ झाला नाही . अंक वेळेवर जात असत. ‘चांदोबा’ ला वाचकांची पत्रे भरपूर येत असत.
‘चांदोबा’ ला सुंदर चित्रांनी सजविणारे चित्रकार के. सी. शिवशंकर
‘चांदोबा’ ला सुंदर चित्रांनी सजविणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांनी जवळपास पन्नास वर्षाहून अधिक काळ’ चांदोबा ‘साठी चित्रं काढली. त्यांनी रेखाटलेला वेताळाला पाठीवर टाकून हातात तलवार घेऊन निघालेला विक्रम कोणीही विसरु शकत नाही. ‘चांदोबा’ या मराठीतल्या मासिकाने सर्वच लहान – थोर मंडळींना त्या काळात वेड लावलेलं होते एवढे नक्की! मुळात ‘चांदोबा’ हे काही केवळ लहान मुलांचेच मासिक म्हणून विख्यात नव्हते, तर ते संपूर्ण कुटुंबाचेच मासिक होते. चांदोबातल्या गोष्टी या उत्कंठावर्धक तर असतच पण संस्कारवर्धकही असत. गोष्टीची सुरूवात ही ‘कोणी एके काळी काशी राज्यात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत असे….’ अशी वाचली रे वाचली की ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय वाचकांना चैन पडत नसे. .
भारतातल्या सर्व लहान मुलामुलींना – थोरांनी चांदोबाचा आनंद मनमुराद घेतला. साधारण वहीच्या आकारातील या मासिकानं मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली त्याला तोड नाही. यात बोलक्या रंगीत चित्रांचा मोठा वाटा आहे. के. सी. शिवशंकर यांची चित्रे शालीन होती. साडी किंवा परकर पोलक्यामधील मुली, स्त्रिया , वृध्दा नेहमीच संस्कारी दिसायच्या. पुरूष मंडळी झब्बा धोतर किंवा सलवार मध्ये असायचे. केसांचा भांग हा राजकुमारासारखा असायचा चित्रांमधील पात्र सौष्ठवपूर्ण असायची. अंकातील चित्रांची मांडणी टिपीकल असायची. अंकाच्या उजव्या व डाव्या बाजूची चित्रं फ्लॅशकटअसायची. अंकाच्या मधले चित्र फुलपेज असायचे. तेच बहुदा मुखपृष्ठावर वापरले जायचे. अंकाच्या शेवटी जगातल्या आश्चर्याकारक वास्तूची सचित्र माहिती दिलेली असायची. त्यानंतर जोडफोटोचं एक पान असायचं, एकाच विषयावर दोन फोटो आणि त्याखाली शीर्षक किंवा एकादी काव्यपंक्तीअसायची, काही गोष्टी क्रमशः चालू असायच्या. त्या कथांमधील पात्रांची नावे महाराष्ट्रीयन वाटायची. हातात अंक आल्यावर एका बैठकीत अंक वाचून काढला जात असे. त्याकाळात टीव्ही नव्हते त्यामुळे महिन्याला नियमित येणारा ‘चांदोबा’ वाचणे हा तर आनंदाचा एक भाग होताच. चांदोबाचे जुने अंक मिळवून ते आधाशासारखे वाचणे या सारखा अलौकिक आनंद दुसरा त्याकाळी नव्हता. ‘चांदोबा’ चा जुना अंक म्हणजे मनोरंजनाचा खजिना वाटायचा.
दहा वर्ष चांदोबासोबत
