६० वर्षांपूर्वीची हाती लागलेली माझी डायरी

-स्नेहलता दातार, चेन्नई

जुन्या पुस्तकांच्या अडगळीत माझ्या अनेक वर्षांच्या घरखर्चाच्या डायरी आहेत. १९६५ सालची ही महाराष्ट्र दैनंदिनी.. त्याच्या जाड पुठ्ठ्याच्या कव्हरमुळे ती इतर पुस्तकात ठेवली गेली, आणि काल सहज हाती लागली. सगळ्या नोंदी पेन्सिलीत. त्याकाळी बॉल पॉईंट पेन नव्हते. चांगल्या पेन्सिली आणि त्याला एका बाजूला छोटे रबर. आज साठ वर्षानंतर सुद्धा त्या नोंदी स्पष्ट आहेत. पुणे अनाथ विद्यार्थी ग्रहाची ती भेट होती .  स्वच्छ मराठी, तुमच्या गरजेपुरती पंचांगाची आवश्यक ती माहिती त्यात आहे. कालनिर्णय ‘७२ साली आले.

वडिलांच्या शिस्तीमुळे मी  रोजचे हिशेब ६२ सालापासून नियमित लिहीत असे.  त्याचबरोबर कोण आले, कोण गेले, आमचे  सोशल कॅलेंडर, आणि काही खास  नोंदी, म्हणजे… आज पुलाव बिघडला, इथपासून ज्यादा खर्च , पाहुण्याच्या बरोबर घालवलेला वेळ, पाहिलेली सिनेमा, नाटके, महाराष्ट्र मंडळाच्या चहाच्या कपातली वादळे,.. पाने चाळताना मला  खूप   गंमत वाटली . एक जुलैचे पान आले त्यात ,

‘ हेरल्ड गाडी आली’ ही नोंद होती.

  साठ वर्षांपूर्वी आम्ही घेतलेली ही पहिली नवी कोरी गाडी. आधी दोनतीन वर्षे बुकिंग करावे लागत होते. तोपर्यंत आमची  हिलमन गाडी होती, पण ती सेकंड हॅन्ड घेतलेली होती. आषाढमेघाच्या राखी रंगाची ही छोटी देखणी गाडी ,नंतर मी १९८४ पर्यंत चालवत होते, आणि पुढेही पाच सात वर्षे  ती आमच्याकडे होती. एकरकमी संपूर्ण किंमत देऊन घेतलेली गाडी, त्याचे अप्रूप त्या वेळेला फार होते. बँकेचे कर्ज घ्यायला कमीपणा वाटे. आता ईएमआय असले, तर कमीपणा वाटतो.

त्या काळात मद्रासमध्ये बस सर्विस असली , तरी ती मुंबई सारखी सोयीस्कर मुळीच नव्हती . त्यामुळे मी गाडी शिकायचे ठरले. दांडेकर कुटुंबाचा जुना ड्रायव्हर मदुरै हा माझ्या ड्रायव्हिंगचा शिक्षक. घरातली सर्वांची कामे करून मदुरै दुपारी दोन अडीचच्या सुमाराला येई. मला गावभर  गाडी चालवायला लावून,हिंडवून , नंतर दांडेकरांचे तिन्ही शाळकरी मुलगे , आर्मेनियन स्ट्रीटवरच्या सेंट मेरीज स्कूलमध्ये होते. त्यांना  शाळेतून आणून  घरी सोडले की माझी शिकवणी संपायची. त्या काळात मद्रासमध्ये भरपूर सायकल रिक्षा व थोड्या हातरिक्षा होत्या. स्टेशनजवळ व हॉस्पिटल जवळ,  काळी पिवळी अंबुताई टॅक्सी रांगेत उभी असे. नेमकी त्याच वेळेला मद्रास  पोर्ट ट्रस्टचे अधिकारी, व चांगले मित्र, कॅप्टन शेषाद्री यांना त्यांची जुनी, पण छानशी Vauxhaul गाडी विकायची होती. ती आमच्याकडे आली. मुलांची शाळा, कार्यक्रम ,पाहुण्यांचे येणे जाणे, स्टेशनवर आणणे, पोहोचवणे, महाराष्ट्र मंडळातले करमणुकीचे  कार्यक्रम, शनिवार- रविवार मंडळात रमी, आणि बोटीवरच्या कामाच्या, जाण्या-येण्याच्या अनियमित वेळा, या सर्वांत प्रभाकर यांची फार ओढ व्हायची. म्हणून त्यांनी फर्मान काढले, की घरातली बाकीची कामे ड्रायव्हरबरोबर मी नवी गाडी घेऊन करायची, आणि त्यांचे ऑफिसचे व हार्बरचे काम यासाठी त्यांनी Vauxhaul वापरायची.

त्या काळात वाहतुकीचे नियम कठोर होते. नियम भंग केल्यास, लगेच पावती फाडून दंड, नाहीतर  नोटीस, पाठवण्यात येई. या पोलिसी खाक्याचा  प्रसाद, बहुतेकांना केव्हा ना केव्हा मिळत. असे.आम्ही कौतुकाने घरी पांढऱ्या कागदावर मोठ्या लाल रंगात L अक्षराचा बोर्ड तयार केला, व आसपासच्या ठिकाणी जायचे असेल तर मी बोर्ड लावून गाडी चालवत असे. ड्रायव्हर शेजारी व मुले पाठीमागे. दोन दरवाज्याचीच गाडी होती ती .  मदुरैला वेळ असेल, तेव्हा माझी ड्रायव्हिंगची शिकवणी असायची . आरामशीरपणे दिवस चालले होते. त्यात मला कौटुंबिक कारणांसाठी दोन-चार वेळा मुंबई पुण्याला जावे लागले होते, व पुढे आमचा  ईशान्य मान्सून पावसाळा , म्हणून माझी शिकवणी दीर्घकाळ चालली.

  पुढे फेब्रुवारी ,मार्च मध्ये केव्हातरी मी संध्याकाळी साडेचार पाचच्या सुमाराला मुलांना घेऊन महाराष्ट्र मंडळात चालले होते. त्यावेळी वाहतूक नियंत्रण पोलीस हातवारे दाखवून करीत असत. ऑटोमॅटिक सिग्नल नव्हते. दासप्रकाश जंक्शनवर पोलीस आपले लांब हात उजवीकडे डावीकडे हलवीत वाहतूक छान नियंत्रित करीत. त्या संध्याकाळी छत्रीधारी पोलिसअण्णांनी हात दाखवून  आमची रांग थांबवली, आणि समोरून येणाऱ्या वाहतुकीला उजवीकडे जायला मार्ग दिला. थांबलेल्या आमच्या रांगेत माझा पहिला नंबर होता. तो पोलीस खड्या आवाजात तामिळमध्ये गरजला, “काय अम्मा, सात आठ महिने झाले तरी अजून ‘एल’ बोर्डच का .?” गाडी चालवणाऱ्या बायकांबद्दलचे विनोद वाचले होते, ऐकले होते, पण त्या पोलीसच्या विनोद बुद्धीला मात्र मी मनापासून दाद  दिली.  माझा तेजोभंग त्याने जाहीररित्या केला होता, म्हणून मी जरा नेटाने पुन्हा शिकवणी सुरू केली.

सावकार पेठेतल्या चिंचोळ्या रस्त्यामधून मदुरै मला घेऊन जायचा. रस्त्याच्या कडेला  टोपल्या घेऊन बसलेले फळवाले, भाजीवाले, हातरिक्षा आणि सायकली यांचा सुळसुळाट होता. त्यातूनच त्या जुन्या पेठेत अनेक घरात गाय किंवा म्हैस त्या काळात होती. .त्या गोमाता दुपारच्या उन्हात पाय मोकळे करायला रस्त्यावर येऊन चक्कर मारून जायच्या. ‘गाय, म्हैस, समोरून आली तर गाडी थांबवायची .त्यांच्या पाठीमागून आपण जायचे, समोर जायचे नाही,’ ही  मदुरै यांनी दिलेली शिकवण.  ‘ हातगाडीवाले किंवा बैलगाडीवाले, यांना ओव्हरटेक करायच्या भानगडीत पडू नये. त्यांच्या गाडीला ब्रेक नसतो , आपल्या गाडीला असतो; तसेच ट्रक, बस, यांना पुढे जाऊ  द्यावे.त्यांना घाई असते, आपल्याकडे भरपूर वेळ आहे .’ इत्यादी इत्यादी, आपुलकीचे काळजीयुक्त धडे.

अखेरीस माझ्या शिक्षकाला विश्वास वाटला आणि त्याने मला ट्रॅफिक ऑफिसमध्ये परमनंट लायसन्स साठी अर्ज करायला सांगितले . मंडळात आणखी दोन मैत्रिणी गाडी शिकत होत्या, त्यांचेही लायसन्स काढायचे होते. बिन्नी मिल्स मध्ये काही मराठी अधिकारी होते. त्यामुळे तो परिसर आम्हाला आमचाच वाटे. एक  अँग्लो इंडियन तरुण हरकाम्या म्हणून मिलमध्ये सगळ्यांची सरकार दरबारी किंवा इतर कचेऱ्यातली  वेळखाऊ कामे छानपैकी करीत असे. ड्रायव्हिंग टेस्ट पास झाले तर  दोन किंवा तीन आठवड्यानंतर परमनंट लायसन्स मिळत असे. तो तरुण लायसन्स घेऊन येणार होता आणि त्याबद्दल त्याला दहा रुपये मानधन द्यायचे होते. तिघींच्या परीक्षा एकाच दिवशी होत्या. सकाळी दहा ते बारा अशी वेळ होती. तोपर्यंत मी कधी नापास झाले नव्हते, पण त्यावेळेला ड्रायव्हिंग मध्ये सर्रास नापास करीत आणि ‘पुन्हा या, दोन महिन्यांनी’ ,म्हणून  सांगत  असत.

परीक्षेची व्यवस्थित तयारी केली आणि आदल्या दिवशी, संध्याकाळी सिंदिया शिपिंग कंपनीचे इथले एजंट  मि. सईद युसुफ , यांच्याकडून फोन आला. “अरे दातार,  सकाळी दिल्लीहून आज इथे  श्रीयुत अण्णासाहेब शिंदे, राज्यमंत्री, हे आले आहेत. ते उद्या सकाळी ब्रेकफास्टला घरी येणार आहेत ,तेव्हा तुम्ही दोघेही त्यांच्याबरोबर मराठीमध्ये गप्पा मारायला या. तुझ्या बायकोला दोन मराठी पदार्थ करून आणायला सांग.” या बड्या घरच्या पुरुषमंडळींना आमच्या छोट्या घरातल्या कौटुंबिक समस्या कधीच समजत नाहीत. आता सत्वपरीक्षा आली की!

मी जेमतेम तीस वर्षाची, दोन मुलांची आई, पण चांगला स्वयंपाक हा तेव्हाही  काही माझा प्लस पॉईंट नव्हता. मल्याळी स्वयंपाकी सुरुवातीपासूनच होता, त्यामुळे आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास, तशी अवस्था झाली. पहाटे उठून मी शिरा आणि सुरळीच्या वड्या केल्या. धावपळ करीत कसेबसे आम्ही दोघे त्यांच्या मोठ्या बंगल्यावर पोचलो. “मला साडेदहापर्यंतच वेळ आहे हो . माझी आज ड्रायव्हिंग टेस्ट आहे,” असे मी यजमानांना सांगितलं. “नो प्रॉब्लेम, तुम्ही जाल वेळेवर. फक्त तुमचे नाव पत्ता मला सांगा”.. त्यांच्या चिटणीसांनी माझे नाव, पत्ता, फोन नंबर ,लिहून घेतले. शिंदे साहेब आले ,छान गप्पा झाल्या, त्यांनी तामिळ पदार्थ थोडे थोडे  चाखले. गोड खात नाही म्हणून शिरा घेतला नाही आणि एकच सुरळीची वडी खाल्ली.   माझे सारखे लक्ष घड्याळाकडे होते. पण शिंदे साहेबांसारखी श्रेष्ठ व्यक्ती, सरकारच्या नव्या योजना, त्यातल्या अडचणी सर्वांना समजावून सांगत होते, त्याचीही उत्सुकता खूप होती. दातार साहेबांना बरेच काम होते त्यामुळे ते लवकर  निघाले. काही वेळ अवांतर गप्पा मारून, शिंदेसाहेब  निघाल्यानंतर मीही घाईने निघाले. “ऑल द बेस्ट मिसेस दातार,” युसुफ पती-पत्नीने मलाही निरोप दिला.

ड्रायव्हर सोबत होता. आवश्यक ती मोजकी कागदपत्रे घेऊन आम्ही ट्रॅफिक ऑफिसमध्ये डेरे दाखल झालो , तोपर्यंत साधारण साडेअकरा वाजले होते. माझ्या मैत्रिणींची परीक्षा होऊन त्या परत गेल्या होत्या. आमची गाडी थांबताच आतून एक वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी हसतमुखाने मला नमस्कार केला आणि म्हणाले, “ तुम्ही मिसेस दातार ना? चला, तुमची टेस्ट घेऊ.” ड्रायव्हर एव्हाना उतरला होता, आणि बाजूच्या  फ्रंट सीट वरून मी उतरल्यानंतर ते अधिकारी माझ्या गाडीत बसले. त्यांच्या पाठोपाठ दोन पोलीस  शिपाई  अदबीने उभे होते. मी चांगलीच नर्व्हस होते. “बीच वरच्या रस्त्याला जायचं का ?” मी घाबरत विचारले.

“ No no, just take a round here on this driveway ” मला वाटलं इथे 8 च्या आकड्यात मला गाडी रिव्हर्स मध्ये चालवायला लागणार. तशी परीक्षा घेतलेली मी ऐकले होते. गर्दीच्या रस्त्यावर, स्टेशनवर पार्किंग, अशा अनवट जागी नेऊन परीक्षा घ्यायची आणि नापास करायचे, असेही ऐकलेले होते.  आठच्या 8 आकड्यात गाडी नेता आली पाहिजे, मनात भीमरूपी आठवली. ते गृहस्थ हसून म्हणाले, “नाही, नाही ,फक्त इथे एक चक्कर मारा ,आणि पोर्चमध्ये पार्क करा.” हा कोण माणूस आहे ते मला माहित नव्हतं. गाडी पार्क गेल्यावर ते आत गेले , आणि   मिनिटभरा नंतर  पुन्हा केवळ येऊन गाडी जवळ येऊन त्यांनी माझ्या हातात एक कव्हर दिले, “ हे तुमचे लायसन्स घ्या. तुम्ही पास झाला आहात.” मला काही कळेना. ते म्हणाले “ I have signed your licence. I am Singaarvelu. All the best.” मी इतकी गोंधळले होते की त्यांचे आभार मानलेले सुद्धा आठवत नाहीत. त्या काळातले ते  प्रमुख पोलीस कमिशनर म्हणून नावाजलेले, एक अतिशय उत्तम अधिकारी होते. त्यांचे नाव ऐकले होते, पण पाहिले नव्हते. आणि पहिली ओळख अशी होईल  हीदेखील कल्पना नव्हती.

मिस्टर सय्यद युसुफ यांनी त्यांना माझ्या  टेस्ट बद्दल सांगितले होते,हे नंतर समजले.   मी घरी पोचल्यानंतर ऑफिसमध्ये फोन करून कळवले, आणि हातात लायसन्स देखील मिळाले हे सांगितले. युसुफ मिया हसले, आणि म्हणाले, “ मला माहितीये, तुम्ही गाडी नीट चालवता,”. पण त्याची धुळवड पुढे महाराष्ट्र मंडळात दोन-चार वर्षे टवाळी करायला उपयोगी पडली. “ माझी परीक्षा घेऊन नंतर मी लायसन्स मिळवलय बर का, दातार बाईंच्या सारखं वशिल्याने नाही ,”  हे कानावर अधून मधून पडत राहिले. आता खरी गोष्ट किती जणांना सांगणार?

सुदैवाने त्या गाडीला कधी अपघात झाला नाही. गाडी पंकचर होणे, पेट्रोल संपणे, ब्रेक नीट न लागणे वगैरे , अडचणी होत्या. तरीपण  महाबलीपुरमच्या मोकळ्या रस्त्यावर अनेकदा मी गाडी नेलेली होती. मे महिन्याच्या सुट्टीत थोरला मुलगा आजी-आजोबांकडे पुण्याला गेला होता. माझे सासरे त्यावेळेला नातवाकडे आमची विचारपूस करीत होते. “आई गाडी कशी चालवते ?” असे त्यांनी विचारले.  चिरंजीवांनी कौतुकाने सांगितले , “अगदी फास्ट चालवते.” लगेच त्यांचे मला काळजी युक्त पत्र आले,  “तुम्ही गाडी फार जोरात चालवता असे कळले. त्यातून हल्लीच्या या १४-१५ हजाराच्या  , हलक्या, tinpot गाड्या…. तुम्हाला जरी गाडी चांगली चालवता येते असे वाटत असले , तरी समोरुन येणाऱ्या माणसाला नीट ड्रायव्हिंग येत असेलच, याची खात्री नसते. तरी गाडी जपून चालवावी.” त्या आठवणीने आजही डोळे भरून येतात.

त्या काळात इम्पोर्टेड गाड्या मिळत नसत, पण परदेशी वकिलाती किंवा अधिकारी दर तीन वर्षांनी गाड्या बदलत त्यामुळे त्या जुन्या Dodge, कॅडिलॅक, Ford, Buick,Chevrolet, अशा मोठ्या गाड्या सिनेमा नटनट्यांकडे असत. बाकी सगळे Fiat , Herald आणि Ambassador वापरत.  मद्रास मध्ये तोपर्यंत ऑटो रिक्षा अजिबात नव्हत्या. त्यामुळे गाड्या कमी, पार्किंग भरपूर, रस्ते स्वच्छ, आणि चांगले ड्रायव्हर. या गाडीवर आमच्याकडे दिल्ली बादशहा या नावाचा ड्रायव्हर होता.  त्याला शंभर रुपये पगार होता, म्हणून माझी शेजारी डॉक्टर वत्सला श्रीनिवासन एक दिवस तावातावाने येऊन म्हणाली, “ तुम्ही ड्रायव्हरला जास्ती पगार का देता? आमचेही ड्रायव्हर त्यामुळे जास्त मागतात.” त्या ७० रुपये पगार देत होत्या . आम्ही मुंबईहून आलो होतो, त्यामुळे आम्हाला मद्रास स्वस्त वाटत होते, आणि काटकसरी मद्रासी लोकांना आम्ही  उधळपट्टी करतोय, असे वाटत होते. हा दिल्ली आमच्याकडे चार-पाच वर्षे तरी होता. नंतर एक दिवस अचानक १८ ऑगस्टला आला आणि म्हणाला, “ सर, मी तुमची नोकरी सोडतोय. मला बीनी मिल्समध्ये चांगली नोकरी आली आहे, म्हणून मी जातोय.” आम्हाला दोघांना साष्टांग नमस्कार घालून, हातात दोन दोन चॉकलेट देऊन तो काम सोडून गेला. परंतु त्यानंतर दरवर्षी १८ ऑगस्टला तो येऊन नमस्कार करून जायच्या. “याच दिवशी मी तुमची नोकरी सोडली आणि मला परमनंट नोकरी मिळाली.” एक वेगळीच आपुलकी आणि बांधिलकी !!

पुढे मुलेही ह्याच गाडीवर ड्रायव्हिंग शिकली, पण त्यानंतर अंबुताईही (Ambassador), होती, त्यामुळे  ही छोटी गाडी  घरातल्या बायकामुलांसाठीच राहिली. त्या काळात पावसाळ्यात टर्किश टॉवेलिंगचे सीट कव्हर बनवून मिळत. त्यामुळे गाडीचे सीट खराब होत नसत. तेव्हा AC गाड्या नव्हत्या, आता एसी शिवाय गाडी नसते. बऱ्याच वर्षानंतर पुण्याला गेले होते. सकाळच्या विमानाने परत येताना पुतणीने , नंदिताने, माहितीचा कॅब ड्रायव्हर ठरवून दिला होता. त्या लोखंडे दादांना मी आपलं सहज विचारलं, “तुम्हाला रात्री अपरात्री येता जाताना किंवा एरवी सुद्धा विमानतळाहून परतताना विचित्र, खडूस पॅसेंजर भेटतात का हो? ”

त्या स्वच्छ पांढरा पायजमा , सदरा व गांधी टोपी घातलेल्या पुणेकराने मला सहजपणे सांगितलं, “अहो, आपण चांगलं असलं ना, तर आपल्याला नेहमी चांगलेच लोक भेटतात बघा .” मी माजी  मुंबईकर, पुणेकर, आणि आता चेन्नईकर,…पण इतके सोपे, साधे उत्तर, ऐकून मी थक्क झाले. ही आपल्या संतांची शिकवण, आणि मराठी परंपरा; आजच्या गढूळलेल्या विषारी वातावरणात मला  ही  नेहमी आशेचा किरण   दाखवीत आली आहे . ड्रायव्हिंग लायसन्स विनासायास मिळाले होते, आता हे अभावीतपणे मिळालेले समाधानाचे लायसेन्स , तुकारामाच्या शिष्याने दिलेले .

(लेखिका सुप्रसिद्ध अनुवादक आहेत.)
९४४५२४२०३५

Previous articleत्रिभाषा धोरणाबद्दल फडणवीस सरकारची भूमिका दुटप्पी…च !
Next articleएक होता चांदोबा!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here