– मुक्ता चैतन्य
सोशल मीडिया स्पेस्मध्ये सातत्याने काही ना काही बदल होत असतात. त्यांचे अल्गोरिदम बदलत असतात, नवीन नवीन फीचर्स येत-जात असतात, युजर एक्सपीरिअन्स मध्येही बदल होत असतो. त्यातही हा युजर कोण आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पेव रिसर्च सेंटरने 2022मध्ये केलेल्या सर्वेक्षणाचे तपशील फारच महत्वपूर्ण आणि सोशल मीडियाचा वापर काय पद्धतीने बदलत जातोय हे अधोरेखित करणारे आहेत.
हे सर्वेक्षण अमेरिकन आहे. पण तरीही आजवरच्या माझ्या अभ्यासानुसार विशेषतः टिनेजर्सच्या संदर्भातले तपशील हे अमेरिका आणि भारत या दोन्ही देशात कमी अधिक प्रमाणात सारखेच असण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणातली सगळ्यात महत्वाची नोंद म्हणजे टिनेजर्स आणि तरुणाईचा झपाट्याने कमी होणारा फेसबुक वापर. याचा अर्थ मिलेनिअल्स आणि जेन झी पिढी सोशल मीडियापासून दूर गेली आहे असं मानण्याचं कारण नाही, उलट ही पिढी टिकटॉक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, रेडिट, ट्विटर अशी इतर माध्यमे फेसबुकपेक्षा अधिक वापरायला लागली आहेत.
मी कामाच्या निमित्ताने जेव्हा जेव्हा टिनेजर्सना भेटते तेव्हा ही पिढी आवर्जून सांगते की आम्ही फेसबुकवर नाही कारण फेसबुक हा म्हाताऱ्यांचा सोशल मीडिया आहे. याचाच अर्थ त्यांना खिळवून ठेवता येईल असं काहीही त्यांना फेसबुकवर सापडत नाही. याला काही प्रमाणात फेसबुकचे अल्गोरिदम कारणीभूत आहेत. फेसबुकवर सतत तीच ती माणसं दिसत राहतात. वेगळ्या लोकांच्या संपर्कात येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. ज्यासाठी वेळ आजच्या पिढीकडे नाही. त्यामानाने इतर माध्यमांची फीचर्स आणि रिच त्यांना अधिक आकर्षक वाटतोय हे उघड आहे. २०१४-१५ मध्ये अमेरिकन टिनेजर्समध्ये फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या ७१ टक्के होती, आज फक्त ३२ टक्के अमेरिकन टिनेजर्स फेसबुक वापरतात असं हे सर्वेक्षण सांगत. आणि सर्वाधिक वापराचं माध्यम आहे टिकटॉक. १३ ते १७ वयोगटातील टिनेजर्स सर्वाधिक टिकटॉक वापरताना अमेरिकेत दिसतायेत.
तर युट्युब अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्या टिनेजर्सपैकी ९५ टक्के युजर्स नियमित युट्युब वापरतात असं दिसून आलेलं आहे. त्यानंतर नंबर लागतो टिकटॉक (६७%)चा. आणि त्यानंतर इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटचा. फेसबुकचा नंबर बराच नंतर येतो याचाच अर्थ फेसबुकची हवा आता टिन्समध्ये नाहीये. तो त्यांच्या दृष्टीने जुना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झालाय.
यातही मुलांचा कल युट्युब, ट्विच आणि रेडिटकडे आहे तर मुलींचा कल टिकटॉक, इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटकडे आहे. बहुतेक टीनएजर मुलामुलींना सोशल मीडियाचा वापर बंद करणं अवघड गोष्ट वाटते. २०१४-१५ मध्ये अमेरिकन टिनेजर्सचा रोजचा इंटरनेट वापर ९२ % होता तो आता ९७ टक्के आहे. याचं कारण आता आपल्या खाण्यापिण्यापासून बँकिंगपासून मनोरंजनापर्यंत सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा सर्वसाधारणपणे सगळ्यांचाच ऑनलाईन टाइम किंवा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. त्यामुळे प्रत्येक टीनएजर मूल रोज निरनिराळ्या कारणांसाठी इंटरनेटचा वापर करतंय.
टिनेजर्स कुठल्या सोशल मीडियावर सर्वाधिक पडीक असतात हे आता बदलतंय आणि तरुणांच्या गळ्यातला ताईत असण्याचे फेसबुकचे दिवस संपले आहेत हेच या सर्वेक्षणातून दिसतंय. भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. आपल्याकडे टिकटॉक बंद आहे, पण इंस्टाग्रामवर तरुणाईचा सर्वाधिक वापर दिसून येतोय. आपल्याकडे अशा प्रकारची सर्वेक्षण होत नाहीत. समजा झाली तर टिनेजर्सच्या सोशल मीडिया वापराचे नेमके पॅटर्न्स समजून घेता येतील.
(मुक्ता चैतन्य या डिजिटल माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)