अंतिम शब्द विज्ञानाचा असला पाहिजे

….जयंत नारळीकर

काही वर्षांपूर्वी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका आंतररष्ट्रीय परिषदेत मी उपस्थित होतो. झपाट्याने बदलत असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे बदललेली परिस्थिती आणि त्यातून उद्भवलेले प्रश्न हा या परिषदेचा विषय होता. जसजशी परिषद पुढे जात होती आणि आंतररष्ट्रीय विश्लेषक आपली भूमिका मांडत होते तसं मला अस्वस्थ वाटू लागले. जेवणामधे मीठ कमी असावं त्याप्रमाणे. ज्या विषयाबद्दल ऐकण्याची माझी उत्सुकता होती तो विषय दुर्लक्षित होत होता. तो विषय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. शेवटी ह्या  दुर्लक्षित विषयाबाबत बोलण्याची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली.

वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तरी काय? जवाहरलाल नेहरु त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकामधे म्हणतात- *‘विज्ञान आणि आधुनिक जगामुळे तथ्य,टिकात्मक परिक्षण, पुराव्यांना महत्व त्याच बरोबर रुढी, परंपरांना जसेच्या तसे स्विकारण्यास विरोध इत्यादी महत्वाचे बदल झाले.’*

नेहरु पुढे म्हणतात, ‘तरीही रुढी परंपरा यामुळे आपण उत्साही होतो, ज्ञानी व्यक्तीची टिकात्मक विचार करण्याची क्षमता सुद्धा त्याठिकाणी कमी पडते. हे आश्चर्यकारक आहे.’ नेहरु शेवटी आशा करतात की ‘राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या जेव्हा आपण स्वतंत्र होऊ तेव्हाच आपली बुद्धी वैचारीक आणि टिकात्मक दृष्ट्या काम करेल.’

काय फरक पडला?

शेवटी झालं काय? नेहरुंनी हे विचार मांडून सात दशकं ओलांडली. पण कुठे आहे वैज्ञानिक दृष्टिकोन? आपण कुठे आहोत? आपण अजून त्याच रुढी परंपरांना चिकटून बसलो आहोत, आपला बहूमुल्य वेळ आणि पैसा त्या रुढींमधे वाया घालवून बसलो आहोत. त्या रुढी आधीच्या काळी उपयुक्त ठरल्या असतीलही, माहीत नाही, परंतु आजच्या आधुनिक जगात जगताना त्या उपयुक्त नाहीत किंवा कालबाह्य आहेत असे म्हणता येईल.

झेक रिपब्लिक येथील वैज्ञानिक व विज्ञान संज्ञापक (कम्युनिकेटर) जिरी ग्रायगर यांनी अंधश्रध्दांविषयी अत्यंत रोचक किस्सा सांगितला आहे. ते म्हणतात, *‘ज्यावेळेस सोव्हियत शासक राज्य करत होते, त्यावेळेस अंधश्रध्दे विषयी सार्वजनिक मत मांडलं जात नसे, कारण तसं करणं हे शासकांच्या विचारांच्या विरोधात आहे असं समजलं जात होते. परंतु सोव्हियत शासकांचे पतन झाले आणि मुक्त विचारांचा काळ सुरु झाला त्यावेळेस मात्र बंदी असलेल्या अंधश्रध्दांनी आपलं डोकं वर काढायला सुरुवात केली.’*

अंधश्रध्दांची भरभराट

अवकाश तंत्रज्ञानाच्या युगातही नवीन अंधश्रध्दा निर्माण होताना आपल्याला दिसतात. गेल्या शतकाच्या शेवटी मी प्युरटो रिको येथील अरेसिबो स्थित रेडियो टेलिस्कोपला भेट दिली होती. प्युरटो रिको हे बरम्युडा ट्रायंगलचे (त्रिकोण) एक टोक आहे, बरम्युडा आणि फ्लोरिडा हे बाकीचे दोन टोक. ह्या बरम्युडा ट्रायंगलबद्दल सगळ्यांमधे उत्सुकता होती. का? तर असं सांगितलं जायचे कि येथे गूढ (कदाचित घातक) शक्तींचे वास्तव्य आहे. चार्ल्स बरलिट्झ याने बरम्युडा ट्रायंगलवर पुस्तक लिहलं. त्यामधे त्याने वाचकांना आकर्षित करतील अशा मन विचलित करणाऱ्या, अशक्य अशा गोष्टी लिहील्या. ह्या गोष्टी खऱ्याच असत्या तर मग खरोखरच बरम्युडा ट्रायंगलचा परिसर धोकादायकच म्हणायला हवा! असं सांगितलं गेलं की याठिकाणी वैमानिक आपल्या विमानाची दिशाच हरवून बसतो! घड्याळाचे काटे फिरणं बंद पडतात! आशा अविवेकी अविज्ञानवादी गोष्टी सांगितल्या गेल्या.

काही वर्षांपूर्वी संशोधकांनी बरम्युडा ट्रायंगल संदर्भात सांगितल्या जात असलेल्या कथा, घटनांच्या तथ्यांची पडताळणी करायचं ठरवलं. *लोरेन्स डेव्हीड कुश्चे या संशोधकाने सांगितल्या जात असलेल्या कथांना छेद देण्याचं काम केलं. संशोधनाअंती त्यांना असं जाणवलं की ह्या गोष्टी अवास्तव पद्धतीने सांगितल्या गेल्या आहेत, किंवा पूर्ण सत्य सांगितलं जात नाही किंवा या गोष्टी सांगण्यामागे कोणाचीतरी खोड आहे. म्हणून आपण निष्कर्ष काढू शकतो की बरम्युडा ट्रायंगल मागे कोणतेही रहस्य नाही.* तरीसुद्धा जेव्हा मी शाळा, महाविद्यालयांमधे जातो तेव्हा मला बरम्युडा ट्रायंगलच्या रहस्यांमागे नक्की काय आहे हे विचारलं जातं. माझं उत्तर ऐकून ते निराश होतात. मी सांगतो की बरम्युडा ट्रायंगल मागे कोणतही रहस्य किंवा तिथे कोणीतरी परग्रही लपून बसला आहे हे साफ खोटं आहे.

अरेसिबोमध्ये ज्यांच्याकडे मी वास्तव्यास होतो त्या व्यक्तिला म्हणालो की स्थानिकांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो त्यावेळी त्यांच्या काय भावना असतात. तो हसला आणि म्हणाला की *बरम्युडा ट्रायंगल बद्दलची स्थानिकांची उत्सुकता कधीच निघून गेली आहे, त्या गोष्टींमुळे का होईना येथे पर्यटक आकर्षित करण्याचा उद्देश मात्र सफल होतो.*

संपूर्ण सूर्य ग्रहणात धोकादायक किरणांचं वास्तव्य असतं असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे अनेकांना घरामधे कोंडून घ्यावं लागतं. झिम्बाब्वे मधे एकदा मी संपूर्ण सूर्य ग्रहण पाहीलं होतं. त्यावेळी माझं स्वागत रिकाम्या रस्त्यांनी किंवा दाराआड लपलेले लोकांच्या नजरा अशा पद्धतीने होईल की काय असं मला वाटलं होतं. भारतामधे तसं चित्र असतं. परंतु तसं काही घडलं नाही. उलट अशी घातक किरणं असतात याची झिम्बाब्वेच्या नागरिकांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. ते उत्साही दिसत होते.

आपल्याकडे भारतात प्रत्येक विकारावर इलाज आहे. एकदा एका उच्चशिक्षित घरातील स्त्री मला म्हणाली की जेव्हा ग्रहण सुटतं तेव्हा फ्रिज मधलं सगळं अन्न टाकून द्यायचं असतं, का तर त्या घातक किरणांमुळे ते अन्न दुषित झालेलं असतं. अन्न टाकून द्यायचं नसेल तर जवळच्या भटजी कडे हमखास उपाय असतोच. ती स्त्री म्हणाली की *फ्रिज शेणाने सारवला की अन्न दुषित होत नाही!*

आणखी एक उदाहरण. कंपनीच्या एका अधिकाऱ्याला विमानाने प्रवास करायचा असतो. ज्या दिवशी प्रवास करायचा आहे तो दिवस अशुभ आहे असं कोणीतरी त्याला सांगतं. त्याच्या आधीचा दिवस शुभ आहे. पण अधल्या दिवशी त्याला अन्य कामे असतात. अशा परिस्थितीमधे त्याने काय केलं असावं बरं. प्रवासाची बॅग भरली आणि आदल्या दिवशीच शेजाऱ्यांकडे ठेवली आणि दुसऱ्या दिवशी विमानतळाकडे जाताना त्यांच्याकडून घेतली. *प्रवासाची बॅग आधीच्या दिवशी भरुन शेजार्यांकडे ठेवली म्हणजे त्याच्यामते त्याने प्रवास ‘शुभ दिवशीच’ सुरु केला. या युक्तिला प्रस्थान ठेवणे असे म्हणतात आणि वाईट प्रवृत्तींना दूर ठेवण्यासाठी हे पुरेसं आहे असं म्हणतात.*

                       मिथकांमधुन

वरील सर्व उदाहरणे ही *‘छद्म विज्ञानाची’* आहेत जी अंधश्रद्धेभवती उगम पावली आहेत. आपल्या मिथकांभवती सुद्धा अशाप्रकारची चिंता करण्यासारखी उदाहरणे जन्माला आली अंतिम शब्द विज्ञानाचा असला पाहिजेआहेत. जे ज्ञान आधुनिक विज्ञानापासून आपण मिळवलेलं आहे ते ज्ञान आपल्या वैदीक पूर्वजांकडे होतं का? पुराणांमधे आढळणारे पुष्पक विमान, विश्वामित्राचा स्वर्ग किंवा इंद्राची शक्ती अशा गोष्टी आपल्याला पटणाऱ्या असल्या तरी विज्ञानाच्या पातळीवर खऱ्या ठरत नाहीत. जे लोक अशा गोष्टी मानत आहेत त्यांनी त्यासंबंधी तांत्रिक माहिती दिली पाहिजे. जसे की *कोणत्या गणितीय तत्वाद्वारे हे पुष्पक विमान उडवले गेले. ते सांगू शकतील का? खरच जर ब्रम्हास्त्र हे आण्विक यंत्र आहे तर मग त्याच्यामागे कोणती विद्युत किंवा चुंबकिय शक्ती आहे ज्याद्वारे आपण आण्विक भौतिकशास्त्र समजून घेऊ शकत नाही का. आजच्या आधुनिक जगात नळाने पाणी पुरवठा किंवा विद्युतीकरण इत्यादी किमान जगण्याशी निगडीत गोष्टी प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्याचा भाग असतोच असतो. तरीपण महाभारतात सांगितलेल्या दुर्योधनाच्या हस्तिनापूर राजवाड्यात किंवा पांडवांच्या इंद्रप्रस्थामधे ह्या मुलभुत गोष्टी नसाव्यात. असं का?*

अलीकडेच भारतामधे डार्विनचा सिध्दांत चुकीचा आहे असा दावा केला गेला आणि तो सिध्दांत शांळांमधून शिकवला जावू नये असं सांगितलं गेलं. *विज्ञानात एखादा सिध्दांत सिध्द करायचा असेल तर तो दृश्य स्वरुपात असला पाहिजे. या घडीला डार्विनचा सिध्दांत हा उपलब्ध सिध्दांतांमधे सर्वश्रेष्ठ आहे.* त्यामधे काही प्रश्न अनुत्तरित राहत असले तरी किंवा काही त्रुटी असल्या तरी सुध्दा. हे का? कारण जिवाच्या उगमाचे रहस्य अजुनही विज्ञान सांगू शकले नाही. तरीपण *जोपर्यंत विज्ञानाद्वारे वेगळा शोध लागत नाही किंवा इतर संकल्पना विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध होत नाहीत तोपर्यंत डार्विनचा हा एकमेव सिध्दांत आहे तो शाळांमधे शिकवला गेला पाहीजे.*
म्हणून *वैज्ञानिक पुरावा हाच अंतिम शब्द असावा.*

(लेखक आयुका पुणे चे मानद प्राध्यापक आहेत)

Previous articleऐ जिंदगी गले लगा ले !
Next articleयोगी भांडवलदार (भाग ३ व ४ )
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.