अकोला लोकसभा: आंबेडकर व काँग्रेसच्या भांडणाचा फायदा भाजपलाच

रणजित पाटीलांकडून हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न झाल्यास धोत्रेंच्या अडचणी वाढणार
-अजिंक्य पवार
अकोला लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघाची भौगोलिक रचना अकोला, वाशीम जिल्ह्यात आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला पश्‍चिम, अकोला पूर्व, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर या पाच विधानसभा मतदारसंघासह वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचा अकोला लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. २०१४ ची स्थिती लक्षात घेता सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. लोकसभेतही भाजपचे खासदार संजय धोत्रे हे सर्वच मतदारसंघात आघाडीवर होते. काँग्रेसचे हिदायत पटेल यांनी अडीच लाखावर मते घेवून दुसरे स्थान मिळविल्याने ॲड. प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते . काहीसे हेच चित्र यावेळी देखील राहण्याची शक्यता आहे. गतवेळी नरेंद्र मोदींच्या प्रभावाने एकतर्फी लढत झाली. अकोला लोकसभा मतदारसंघात हा फॅक्टर यावेळीही काहीप्रमाणात प्रभावी आहेच. शिवाय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाराबाबत अद्यापही तळ्यात मळ्यातच असल्याने अकोला लोकसभा मतदारसंघातील चित्र गतवेळपेक्षा फारशे वेगळे राहण्याची शक्यता नाही.
 मराठा उमेदवार आमन-सामने आल्यास चित्र बदलेल
भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजय धोत्रेच राहणार आहेत. त्यांची पक्ष संघटनेवर असलेली मजबूत पकड आणि मराठा समाजातील त्यांचे वर्चस्व ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेतील तेच-तेच चेहरे काही प्रमाणात कार्यकर्त्यांना दूर घेवून जाण्यास कारणीभूत ठरणार आहे. त्याचा परिणामही आगामी निवडणुकीत दिसू शकतो. महापालिका निवडणुकीच्या काळात अनेकांची तिकिटे केवळ खासदार व आमदारांमुळे कापले गेल्याचा आरोप झाला होता. ही दुखावलेली मंडळी पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत राजकारण उफाळून आले तेव्हा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या गटात अनेक भाजप नेत्यांची उठबस वाढली होती. ही मंडळीही लोकसभेत खासदारांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यांना मराठा समाजातील सक्षम पर्याय मिळाल्यास त्यांनी दुसऱ्या पर्यायाची निवड न केल्यास आश्‍चर्य वाटेल. नेमकी हिच परिस्थिती अोळखून काँग्रेसकडून यावेळी मराठा समाजातील उमेदवार उभा केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसकडे दोन पर्याय असले तरी डॉ. अभय पाटील यांच्या पाठीमागे असलेली कार्यकर्त्यांची फळी आणि समाजिक कार्याचे पाठबळ त्यांचे पारडे जड करणारे आहे. डॉ. अभय पाटील यांच्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावरून कापूस, सोयाबीन, धान परिषद आयोजित करणारे प्रशांत गावंडे यांची नावे चर्चेत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्या एेवजी सोलापूर मतदारसंघाची निवड करण्याची चर्चा रंगू लागली आहे. तसे संकेत खुद्द अांबेडकरांनी दिले असले तरी हा त्यांच्या राजकीय डावपेचाचा एक भाग मानला जात आहे. प्रत्येकवेळी अकोल्यातून आंबेडकर यांना पाडण्यासाठीच काँग्रेसने उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या व्यूहरचनेला तोडण्यासाठी आंबेडकरांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुशिलकुमार शिंदे यांच्या विरोधात टाकलेला हा फास असल्याची चर्चा आहे.
वंचित घटक अन् एमआयएमची साथ
राज्यात ज्या समूह घटकांना आतापर्यंत संख्याबळाअभावी राजकीय विजनवासात ठेवण्यात आले अशा घटकांना अर्थातच बारा बलुतेदारांना एकत्र करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची घोषणा केली. या आघाडीत पुढे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची साथ मिळाली. लोकसभा निवडणुकीपूर्वीच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंढरपुरातून वंचित आघाडीची निव ठेवल्या गेली. आतापर्यंत या पक्षाने लोकसभेच्या २२ उमेदवारांची घोषणा केली आहे. यातही सर्वाधिक उमेदवार हे धनगर समाजाचे असले तरी वंचित आघाडी अस्तित्वात येण्यास कारणीभूत ठरलेल्या उद्देशाप्रमाणे आघाडीचा ‘बारा बलुतेदार’ चेहरा कायम ठेवण्याचा प्रयत्नही झाला. त्यात माळी, कोळी, तेली, कुणबी, मातंग, बंजारा, धनगर समाजाला उमेदवारी देण्यात आली. वंचितांना गोंजारण्याचा हा अकोला लोकसभा मतदारसंघात अांबडेकर यांचे मताधिक्य वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यातच त्यांना एमआयएमचे मिळालेले पाठबळ मुस्लीम मतदारांना गोंजारण्यास पुरेशे आहे. त्यासाठी अांबेडकर यांनी अकोला शहरातील मुस्लीम बहुल परिसरात गोपनियरित्या बैठका सुरू केल्या आहेत. त्यातच दोन मराठा उमेदवार एकमेकांच्या समोर उभे ठाकल्यास हिंदू मतदारांचे होणारे विभाजनही अांबेडकरांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास ते जरी अकोला मतदारसंघातून लढणार नसल्याची चर्चा रंगत असली तरी शेवटच्या क्षणी अकोल्यातून तेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील.
   दुभंगलेली मन आणि युती…
गेली चार वर्षे सत्तेत राहूनही शिनसेनेला भाजपकडून मिळालेल्या सावत्र वागणुकीने तळागाळातील शिवसैनिकांमध्ये भाजपबाबत ‘शत्रुत्वा’ची भावना निर्माण झाली आहे. एेन निवडणुकीच्या तोंडावर भाजपसोबत शिवसेनेने केलेली युती कोणत्या अपरिहार्यतेमुळे केली हेच तळागाळातील शिवसैनिकांंच्या पचणी न पडलेली बाब आहे. जेव्हा सत्तेत होतो तेव्हा त्याची फळ चाखायला मिळाली नाही. चार वर्षात भाजप नेत्यांकडून मिळालेली वागणूक शिवसैनिक एवढ्या लवकर कसे विसरू शकेल? त्यामुळे युती झाली असली तरी दुभंगलेली मन जुळविताना शिवसेना-भाजपच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच विधानसभेसाठी गुडघ्याला वाशिंग बाधून असलेल्या शिवसेना नेत्यांचा या युतीने हिरमोड झाला आहे. त्यामुळे युतीत राहून शिवसेनेचे किती नुकसान होते, हे दाखविण्याची एकही संधी या इच्छुकांकडून सोडली जाणार नाही, हे उघडत आहे. त्याचा परिणामही अकोला लोकसभा मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर दिसून येणार आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात वाशीम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. येथे सध्या काँग्रेसचे अमित झनक वडिलांच्या पुण्याईने आमदार आहेत. भाजपसह वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा येथील संपर्क निवडणूक ते निवडणूक असाच आहे.त्यामुळे जिल्हाबाहेरील हा विधानसभा मतदारसंघ उमेदवारांसाठी आव्हान ठरणार आहे.
   अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रमुख प्रश्‍न 
1) मंजूर झालेल्या अकोला-खंडवा रेल्वेमार्गाचे काम
2) जिल्ह्यातील रखलेले सात प्रमुख सिंचन प्रकल्प
3) राष्ट्रीय महामार्ग क्र. सहाच्या अमरावती-चिखली फेजचे चौपदरीकरण
4) अकोला येथील शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण व विमानसेवा
5) अकोला आैद्योगिक वसाहतीचा विकास , फूड हब, टेक्सटाईल पार्क
…………….
हे ठरवतील उमेदवारांचे भाग्य
मतदार संघ  पुरुष      महिला       तृतीय पंथी    सर्विस वोटर   एकूण
अकाेट           १४८६९९  १३१५०४           ०३        ६३८         २८०८४४
बाळापूर           १५१९५९    १३९००३        ००        ८१७        २९०९६२
अकाेला पश्चिम १६७०६१    १६११८८     १६       २५७           ३२८२६५
अकाेला पूर्व     १७३८६५    १६४१५८        १९        ५०१         ३३८५४७
मूर्तिजापूर       १६३३८३    १५४९१३       ०५        ५५१         ३१८८५२
रिसाेड            १५७६०९     १४१३९३        ०१       ४०४        २९९४०७
एकूण            ९६२५७६     ८९२१५९         ४४      ३१६८    १८५७९५१
२०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत मिळालेली मतं (मतदारसंघ निहाय)
मतदारसंघ    भाजप    काॅंग्रेस         भारिप-बमंस
अकाेट        ७७९८४   ४५५६०       ३६१५९
बाळापूर        ६३५८७    ४३२१४       ५४४९७
अकाेला पश्चिम  ७२०८३    ५७३८०       १६८६९
अकाेला पूर्व          ८९९९१    २०७५२       ५२६३०
मूर्तिजापूर           ७३१२७ ३५२४४ ४८०३८
रिसाेड            ७९२२४ ५०९०५ ३०४७६
पाेस्टल मतं     ४७६ ३०१         १०७
एकूण        ४५६४७२ २५३३५६ २३८७७६
(टीम मीडिया वॉच)
Previous articleवर्धा लोकसभा – तडसांसाठी मेघे समर्थक डोकेदुखी
Next articleयवतमाळ-वाशिम: अंतर्गत मतभेदांमुळे शिवसेनेची वाट अवघड
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.