अज्ञान दूर सारणारी ज्ञानज्योत…. विशाल भेदूरकर

संतोष अरसोड
…………………………………………..

        विकास म्हणजे काय याचा मागमूसही नसलेल्या एका खेड्यातील एक तरुण डोळ्यात स्वप्न घेऊन घराबाहेर पडतो. अध्यापक होण्याची मनीषा बाळगतो. डोक्यावर भाजीपाल्याची टोपली घेऊन यवतमाळमध्ये गल्लोगल्ली फिरतो. फावल्या वेळात शिकवणी वर्ग घ्यायचे आणि रात्रीला ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकींग हा त्याचा दिनक्रम. डोळ्यासमोर कितीही अंधार असला तरी हा तरुण मात्र डगमगत नाही. कारण त्याला प्रकाशाची स्वप्न पडत असतात. भाजीपाला विकता विकता हा तरुण शिक्षक होतो आणि शिक्षक झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देवून तो वित्त व लेखाधिकारी होतो. मात्र तो येथेच थांबत नाही तर ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी धडपडत राहतो. त्याच्या या धडपडीत पत्नी, दोन्ही भाऊ आणि मित्र सहभागी होतात. आडवळणावरील एका खेड्यातील हा तरुण स्पर्धा परीक्षेचे माहेरघर असलेल्या पुण्यात आपलं वेगळं स्थान निर्माण करतो. बेरोजगारीचे ‘विशाल ‘ चक्रव्यूह भेदू पाहणाऱ्या या  अधिकाऱ्याचं नाव आहे विशाल भेदूरकर.  पुण्यातील प्रथितयश ज्ञानज्योती एज्युकेशनचे हे जन्मदाते आहेत.
घाटंजी तालुक्यातील पंगडी नावाचं एक छोटंसं खेडं. स्वातंत्र्यानंतर होऊ पंगडी  विकासाच्या प्रक्रियेत अजूनही पारतंत्र्यातच आहे. काल-परवा पंगडीच्या बाजूच्या खेड्यात महामंडळाची बस पोहोचली. एकीकडे देशात पोस्ट बँक सुरू होत आहे मात्र पंगडी चे पोस्ट ऑफिस सायतखर्डा आहे. विकासापासून कोसो दूर असलेल्या पंगडीसारख्या खेड्यात जन्मलेल्या विशाल भेदूरकर नावाच्या एका तरुणाने तळहातावर निखारे झेलत यशाची उत्थानगुंफा कोरली. त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा तरुण आयुष्याशी झगडत झगडत भविष्यात विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एखादी अकादमी उघडेल हे त्या गावाला ही ठाऊक नव्हते. मात्र ज्याचे अंधाराशी असते ती माणसं प्रकाशाच्या बेटांचा शोध घेत असतात. आशा माणसांमध्ये असलेला आत्मविश्वास अज्ञानाला नेस्तनाबूत करीत असतो. भाजीपाला विकणारा एक तरुण वित्त व लेखा अधिकारी होतो आणि अनेक अधिकारी तयार व्हावेत यासाठी धडपडतो. खरं तर मनाला उभारी देणारी ही प्रेरणा कथा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आणून त्यांना आर्थिक व शैक्षणिक सावली देऊन जगण्याची नवी दिशा देणारा हा ‘माइलस्टोन ‘ आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या पावलात नव्या पाऊलवाटा निर्माण करण्याचं सामर्थ्य प्रदान करणारा हा माणूस म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बलांचे ‘ओयासिस’ आहे. त्यांच्या रूपाने एक नवा आशेचा किरण विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना प्राप्त झालेला आहे.
विशाल भेदूरकर यांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. वडील महादेवराव शेतीमध्ये राबराब राबायचे ,कष्ट उपसायचे. त्यांच्या घामाच्या धारांना नैतिकतेचा सुगंध होता. आपल्या पोरांनी खूप शिकावं हीच त्यांची इच्छा होती. ज्ञानाचा  वापर अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी करा हेच वडील या पोरांना सातत्याने सांगत होते. शेतीतील कष्टप्रद आयुष्य शिक्षणामुळे सुकर होईल ही आशा वडिलांच्या मनात होती. सारे आर्थिक विवंचनेस तोंड देत विशाल यांनी शिक्षणाची कास धरली. पटकन पायावर उभे राहावे म्हणून डीएड ला प्रवेश घेतला. D. Ed झाल्यानंतर घरून पाच रुपये घेऊन विशाल यांनी यवतमाळ गाठले. खिशात दमडी नव्हती पण संघर्ष करण्याची ताकत मन ,मेंदू ,मनगटामध्ये होती. उद्याचा शिक्षक यवतमाळात डोक्यावर टोपले घेऊन भाजीपाला विकू लागला. भाजीपाला विकल्यानंतर ग्रामीण भागातील पोरांच्या विशाल शिकवणी घेऊ लागलेत. रात्रीच्या वेळी ट्रॅव्हल्स वर तिकीट बुकिंग चे काम आणि शिकवणी वर्ग अशी ही सर्कस सुरू होती. अशातच सन १९९८ ला भाजी विकणारा हा तरुण जिल्हा परिषदेवर शिक्षक झाला.
शिक्षकाची नोकरी लागल्यामुळे एक नवा आत्मविश्वास विशाल यांना प्राप्त होऊ लागला. काही काळ गेल्यानंतर मात्र शिक्षकी पेशातही त्यांचे मन रमत नव्हतं. ‘शिक्षणाचा वापर परिवर्तनासाठी कर’ वडिलांचे हे वाक्य विशाल यांना अस्वस्थ करायचं. अशातच सन २००६ ला  रात्रीच्या वेळी शेतात जागल करत असताना  वडिलांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आणि त्यांचेवर अचानक आभाळ कोसळले. बापाच्या स्वप्नासाठी काम करायचं ठरलं असताना बापच निघून जावा या जगातून ही वेदना मात्र विशाल यांना अस्वस्थ करत होती. आता नव्या पर्यायांचा वेध घेतला पाहिजे म्हणून वडिलांचा यांनी अंतिम टप्प्यात यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ते मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचले सुद्धा मात्र वयाच्या मर्यादेमुळे यूपीएससीचा प्रवास त्यांना नाईलाजाने थांबवावा लागला. मात्र एमपीएससी च्या माध्यमातून विशाल भेदूरकर नावाचा शिक्षक सन 2012 ला वित्त व लेखाधिकारी झाला. ही वार्ता जेव्हा त्यांच्या गावात पोहोचली तेव्हा गावातील रस्त्यांनाही आनंदाचे उधाण आले होते.
शिक्षणाने त्यांना एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त होत होता. आलेल्या संकटावर मात कशी करायची याचे भान शिक्षणामुळे विशाल भेदूरकर यांना आले होते. त्यांच्या डोळ्यांना रोज नवी नवी स्वप्न पडत होती. वित्त व लेखा अधिकारी झाल्यानंतरही पत्नी  अर्चना मात्र अस्वस्थ होती. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण ही वेगळे होते. अर्चनाच्या मनात एक वेगळेच वादळ घोंगावत होते. उशिरा का होईना तुम्ही अधिकारी झालात हे जरी खरे असले तरी मात्र योग्य वेळी ग्रामीण भागातील विद्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत यासाठी आपण आता काहीतरी करू या, प्रसंगी नोकरी सोडून द्या असा विचार अर्चना यांनी विशाल यांना बोलून दाखविला. हा नुसताच विचार नव्हता तर गर्भपेरणी होती शेतकऱ्यांच्या मुलांच्या स्वप्नांची. या विचारांमध्ये राखेतून नवे फिनिक्स जन्माला घालण्याची ताकत होती. पत्नीच्या या प्रस्तावाला विशाल यांनी तत्काळ मान्यता दिली आणि याच ठिकाणी जन्म झाला ‘ज्ञानज्योती एज्युकेशन’ चा. नववीत असताना विशाल यांनी महात्मा फुले यांचे चरित्र वाचले होते आणि ‘ज्योती ‘याच नावावरून त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी स्थापन केलेल्या अकादमीचे ‘ज्ञानज्योती ‘हे नाव ठेवले.
तत्पूर्वी यवतमाळ मध्ये याची त्यांनी सुरुवात केली होती. जिल्ह्यातील पोरांना स्पर्धापरीक्षेची तोंड ओळख झाली पाहिजे म्हणून त्यांनी शिबिर घेण्याचे ठरविले. मित्रवर्य रमेश घोलप ,डॉ आनंद पाटील यांना यवतमाळात निमंत्रित करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आशेची एक ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर १० जुलै २०१० ला दहिवलकर प्लॉटमध्ये ज्ञानज्योती ची शाखा उघडण्यात आली. ग्रामीण भागातील पोरं केवळ कारकुनीवर भर देतात हे लक्षात आल्यानंतर त्यांना राज्यसेवेच्या परीक्षेकडे वळविण्याचा निर्णय घेण्यात आला. इतिहास ,लोकप्रशासन ,मानसशास्त्र आदी विषय सोप्या पद्धतीने ज्ञानज्योती मध्ये विशाल भेदूरकर सर शिकवू लागले. एक नवा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना येऊ लागला. स्पर्धा परीक्षेचे वातावरण यवतमाळमध्ये निर्माण होऊ लागले. अशातच वित्त व लेखा अधिकारी म्हणून विशाल भेदूरकर यांना यवतमाळ येथेच काम करण्याची संधी मिळाली. केवळ वर्ग चालविणे हा ज्ञानज्योती चा हेतू नव्हता तर जे मुलं हुशार आहेत पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना त्यांना ‘ कमवा व शिका ‘या योजनेतून मोठा आधार दिला. या माध्यमातून ज्ञानज्योतीने आपले सामाजिक उत्तरदायित्व पुढे नेत असल्याचे सिद्ध केले.
यवतमाळ मधून आता पुणे येथे ज्ञानज्योती चा विस्तार करावा यासाठी नियोजन करण्यात आले. पुण्याला स्पर्धा परीक्षेचे माहेरघर संबोधले जाते. जाहिरातबाजीच्या या युगात मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लूट होताना दिसत आहे. विदर्भातील अनेक विद्यार्थी पुण्यात येतात खरे मात्र त्यांना आपलं म्हणणार तिथे कुणीच नाही. स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली सामाजिक जाणिवा नसलेले अनेक लोक पुण्यात हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात चालवीत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त होत आहे. जाहिरातींमुळे भ्रमित झालेल्या पोरांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून विशाल भेदूरकर सरांनी पुण्यात ज्ञानज्योती ची शाखा उघडली. सदाशिवपेठेतच सन २०१७  मध्ये ज्ञानज्योतीच्या शाखेचे उद्घाटन झाले. रात्रंदिवस चालणारी प्रशस्त अभ्यासिका, २  वर्गखोल्या, १६ कर्मचारी असा ज्ञानज्योती चा ‘ज्ञानसंसार’ पुण्याच्या सदाशिव पेठेत सुरू आहे. ज्योतिराव फुले यांच्या पुण्यात ‘ज्ञानज्योती’ चे हे आगमन अनेक आर्थिकदृष्ट्या वंचितांसाठी आधार ठरले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान संपादन करीत आहेत. आज सारा संसार उभा करण्यासाठी विशाल भेदुरकर यांना शेत व घर विकावे लागले.
केवळ धंदा म्हणून पुण्यात या क्षेत्रात उतरणार्‍या लोकांना ज्ञानज्योतीने चांगलीच चपराक लावली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही असे विद्यार्थी पुणे येथील शाखेमध्ये सहा तास शैक्षणिक काम करतात. त्याबदल्यात त्यांचे शिक्षण ,निवास व भोजनाची व्यवस्था ज्ञानज्योतीने केली आहे. ‘कमवा व शिका’ या योजनेचे सकारात्मक परिणाम सुद्धा नुकतेच समोर आले आहे. सन २०१७ च्या कर सहाय्यक या परीक्षेत अक्षय वातीले हा गरीब विद्यार्थी राज्यातून प्रथम आला तर मयुरी नाले ही विद्यार्थिनी अनुसूचित जातीमधून मुलींमधून प्रथम आली आहे. पंढरपूरची सुप्रिया पांढरकर ही विद्यार्थिनी नुकतीच पोलीस उपनिरीक्षक झाली आहे. अंधकारमय भविष्य डोळ्यासमोर असलेल्या सुप्रियाला उज्वल भविष्य ज्ञानज्योतीने प्रदान केले आहे. ‘कमवा व शिका ‘योजनेतून दरवर्षी 15 विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणारी ज्ञानज्योती ही एकमेव संस्था असावी. आतापर्यंत २०० च्या वर विद्यार्थी ज्ञानज्योती च्या माध्यमातून लोक सेवेमध्ये सहभागी झालेले आहेत. नुकतेच IRS झालेले अनिल खडसे यांनी ज्ञानज्योती मध्ये अध्यापनाचे काम केलेले आहे. ज्ञानज्योतीच्या या यशामध्ये पत्नी अर्चना यांचेसह भाऊ प्रशांत व प्रफुल यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे.
हे काम गाव खेड्यांमध्ये विस्तारित व्हावे यासाठी प्रसंगी नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी असलेल्या विशाल भेदूरकर यांचे या क्षेत्रातील योगदान शब्दातीत आहे. ज्या मुलांना काही करायचे आहे त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची तळमळ असलेला हा माणूस वैदर्भीय भूमीतील बावनकशी सोनं आहे. समाजात मोठा सकारात्मक बदल घडवून आणायचा असेल तर सामाजिक परिवर्तनाची बीजं विद्यार्थ्यांच्या मनात पेरणे आवश्यक आहे. ही जबाबदारी ज्ञानज्योतीने आपल्या समर्थ खांद्यावर घेतलेली आहे.

(लेखक मीडिया वॉच अनियतकालिक व वेबपोर्टलचे असोसिएट एडिटर आहेत)

9623191923

Previous articleआंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र
Next articleचंद्र पाहिलेल्या पहिल्या माणसाच्या अद्भुत कथा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here