‘अतुल’नीय कौशल्याचे धनी – डॉ अतुल व डॉ. रोहिणी यादगिरे

संतोष अरसोड

  मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आपल्या निष्णात हातांनी आणि कुशाग्र मेंदूने अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या अमरावतीचा एक तरुण डॉक्टर केवळ गावाकडच्या माणसांच्या प्रेमापोटी जन्मभूमीत परत येतो. मायानगरीतील चंदेरी आयुष्यापेक्षा आपले ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग आपल्या शहरातील , जिल्ह्यातील लोकांना व्हायला हवा हे त्याला अधिक महत्वाचे वाटते . तसंही लहान असतानापासून रुटीन वाटेपासून वेगळी वाट पकडायची , नवीन आव्हानांना भिडायची त्याला हौसचं होती . पतंग जसा दिव्यावर झेप घेतो तसाच हा तरुण डॉक्टर आव्हानांच्या ज्योतीवर सतत झेप घेत असतो अन् त्यात तो यशस्वी सुद्धा होतो. वैद्यकीय व्यवसाय  वेगवेगळ्या कारणांनी बदनाम होत असताना हा ‘ सर्जनशील ‘सर्जन आपल्या रोखठोक पद्धतीने  वैद्यकीय क्षेत्रातील कॅन्सरला हद्दपार करू पाहतो आहे. रुग्ण व डॉक्टर यांचे नाजूक नाते टिकविताना गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करणारा हा डॉक्टर आहे, अमरावतीचे निष्णात सर्जन  अतुल यादगिरे.
डॉ. अतुल यादगिरे हे अमरावती जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठं नाव. रुग्णाप्रती सजग असलेले नामवंत सर्जन. कुठलीही कठीण शस्त्रक्रिया असो ते लीलया पार पाडतात आणि रुग्णाला जीवदान देतात. आई-वडील दोघेही अमरावतीमधील नामवंत डॉक्टर. १९७३ पासून यादगिरे कुटुंब आरोग्य क्षेत्रात सेवा देत आहे. याच पार्श्वभूमीतून अतुल यादगिरे हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्राकडे वळले. एम. एस. हे शल्यक्रियेतील  महत्त्वाचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. १९९६  ते २००० या कालावधीत ते मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होते. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर शस्त्रक्रिया करताना त्यांच्यातील सर्जन अधिक कुशल होत होता. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ते रात्रीचा दिवस करत असत. एखाद्या निष्णात सर्जनला घारीचे डोळे, सिंहाचे हृदय आणि कुशल हात  आवश्यक असतात. हे तीनही गुण डॉ.अतुल यांचेकडे असल्याने ते अनेक शस्त्रक्रिया लीलया पार पाडून रुग्णांना मृत्यूच्या कराल दाढेतून सहज बाहेर काढत असत. मुंबईत स्वतंत् रुग्णालय उघडून त्यांनी माफक दरात रूग्णसेवेला प्रारंभ केला होता. अमरावतीचा एक तरुण मुंबईमध्ये कॅन्सर सर्जन म्हणून नावारूपास येत होता. पण अंतर्यामी कुठेतरी अस्वस्थता होती .आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या परिसरातील लोकांना होत नाही ,  ही भावना त्यांना अस्वस्थ करत होती. त्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी सुरुवातीला ते अमरावतीला व्हिजिटिंग डॉक्टरच्या स्वरुपात यायला लागलेत . शनिवार व रविवारी अमरावतीत मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये ते सहभागी होऊ लागलेत .यानिमित्ताने एक वेगळा आधार परिसरातील रुग्णांना मिळू लागला. शेवटी निर्णय घेण्याची वेळ आली .अमरावतीत  मिळत असलेला प्रतिसाद, मुंबईतील व्यस्त जीवनशैली व वडीलांना झालेला कर्करोग यामुळे डॉ. अतुल यांनी अमरावतीत येण्याचा निर्णय घेतला.

     टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेचे धडे घेतलेल्या या सर्जनच्या एका नव्या इनिंगला सन २००३ मध्ये अमरावतीच्या राजकमल चौकात प्रारंभ झाला. टाटा मधून अमरावतीमध्ये आलेले ते पहिले सर्जन ठरलेत. सर्व आर्थिक सुखसुविधा  पायाशी लोळण घेत व अतिशय उत्तम करियर समोर दिसत असताना त्यांनी केवळ आपल्या मातीच्या ओढीपायी त्यांनी अमरावतीत रूग्णसेवेला प्रारंभ केला.  ते इथे आले खरे , कामाला सुरुवातही केली पण बोलायला अगदी रोखठोक  व वैद्यकीय क्षेत्रातील  काही खुज्या प्रवृत्तीमुळे सुरुवातीच्या काळात अनेक त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले .  मात्र आपलं वैद्यकीय  कौशल्य व नैतिक आत्मबळाच्या जोरावर डॉक्टर या संकटाला यशस्वीपणे सामोरे गेले .

     वैद्यकीय व्यवसायात अनेक चढउतार येत असतात. खरं तर डॉक्टर हा रुग्णांसाठी प्राणदूत असतो. रुग्णावर उपचार करीत असताना डॉक्टर कडे प्रचंड धाडस लागतं. डॉक्टर अतुल यादगिरेकडे ते धाडस व नेमकी निर्णयक्षमता सुरुवातीपासून आहे . हा माणूस नेहमीच आपल्या निर्णयावर ठाम राहिलेला आहे. अमरावतीला येऊन जेमतेम सव्वा वर्ष झालंअसेल,  तेव्हा एका विचित्र प्रसंगाचा त्यांना सामना करावा लागला. एका दुसऱ्या रुग्णालयातील एक गंभीर महिला रुग्ण त्यांच्या दवाखान्यात रात्रीला दाखल करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा रुग्ण वाचणे शक्य नव्हते. मात्र धाडसी स्वभाव असलेले डॉक्टर अतुल यादगिरे यांनी नातेवाईकांच्या आग्रहाखातर उपचार करण्यास प्रारंभ केला . चार डॉक्टर सोबत घेण्यात आले. रात्री दोन वाजता रक्ताची व्यवस्थाही करण्यात आली अन तिसाव्या मिनिटात गर्भाशय काढण्याचा सकारात्मक , प्राण वाचविण्याचा  निर्णय घेण्यात आला.  सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अपयश आलं. या दुर्दैवी घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील काही हितशत्रूंनी डॉक्टरांना घेरण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती माहीत असतानाही जाणिवपूर्वक बदनामी करण्यास सुरुवात झाली . खरं तर तो खच्चीकरण करण्याचा प्रकार  होता. एक लॉबी मुद्दामहून त्यासाठी कार्यरत होती .  मात्र डॉक्टर यादगिरे डगमगले नाहीत . जे काही घडलं ते त्यांनी स्वतःहून अनेकांना सांगितले . त्यात लपविण्याजोगं किंवा शरम वाटावी असे काहीच नव्हते . उलट प्रयत्नांची पराकाष्ठा करून संबंधित महिलेचा जीव वाचविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता . रुग्ण दगावला त्यात त्यांचा कुठलाही दोष नव्हता. मात्र या घटनेने त्यांना बरंच काही शिकायला मिळालं.
जलद पैसा कमविण्याच्या नादात वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. दूषित दृष्टिकोन ठेवत अनेक जण या क्षेत्रात कार्यरत  आहे. अशांना दुसऱ्याचं कौशल्य पाहवत नाही . गुणवत्तेत आपण मात देवू शकत नाही मग बदनामीचा मार्ग पत्करा असा प्रकार ते करतात . मात्र डॉक्टर व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ . रोहिणी यादगिरे यांनी गुणवत्तेनीच याला उत्तर द्यायचा निर्णय घेतला .आपल्या कामाचे विश्लेषण बाहेरची मंडळी करणार नाहीत तर आपले रुग्ण करतील या विश्वासातून त्यांनी आपल्या रुग्णांसोबत आपुलकीचे , विश्वासाचे बंध निर्माण केले . रुग्ण व डॉक्टर यांचे विश्वासाचं नातं अधिक दृढ व्हावे यासाठी हे दोघेही  सतत दक्ष असतात. असाच एक प्रसंग ते सांगत होते. ‘अमरावतीच्या बायपासवर दोन मुलांना ट्रकने धडक दिली  होती. जखमी अवस्थेतील त्या दोन मुलांना घेऊन इर्विन हॉस्पिटल मध्ये जाणारा ऑटो  अचानक यादगिरे हॉस्पिटल समोर बंद पडला. मृत्यू डोळ्यासमोर असतानाच ऑटो बंद पडावा हा खरं तर दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. यादगिरे हॉस्पिटलमधील काही कर्मचारी बाहेर चहा घेत असताना त्यांना हे दृश्य दिसले. जखमी अवस्थेतील त्या दोन्ही अनोळखी मुलांना डॉ. यादगिरे यांनी उपचारासाठी दवाखान्यात घेतले. कुठलाही नातेवाईक सोबत नसताना केवळ या रुग्णांना वाचविणे आवश्यक आहे, या भावनेपोटी डॉ.यादगिरे यांनी उपचार सुरू केले. यातील एक तरुण  अतिशय गंभीर होता. त्याचा श्वास मंद होऊ लागला होता. अशातच त्यांनी निर्णय घेतला आणि दुर्बीणच्या सहाय्याने त्याच्या श्वासनलिकेतील अडथळ्यांचा शोध घेतला. पाहतात काय, तर त्या तरुणाच्या श्वासनलिकेत चक्क दात अडकले होते. मृत्यू दहा मिनिटाच्या अंतरावर वाट पाहत होता. सातव्या मिनिटाला डॉक्टर यादगिरे यांनी त्या तरुणाच्या श्वासनलिकेत अडकलेले दात बाहेर काढले. नुसतेच दात काढले नाही,  तर मृत्यूच्या दाढेतून त्याला बाहेर काढले अंजनगाव सुर्जीचा तो मुलगा आज  इंजिनियर झालेला आहे. डॉक्टरचे ते उपकार तो अजूनही विसरला नाही .

   असे अनेक प्रसंग आहेत . अनेकांना या डॉक्टर दाम्पत्याने मृत्यूच्या तावडीतून बाहेर खेचून आणले आहे . या दोघांचीही खासियत म्हणजे रुग्ण कितीही क्रिटीकल अवस्थेत असो , हे परिस्थितीला थेट भिडतात . आपल्याकडून जेवढं बेस्ट होईल तेवढं करतात . अनेक डॉक्टर रिस्क घेत नाही . रुग्णाला नागपूरकडे रेफर करतात . मात्र हे दोघे आव्हान स्वीकारून अतिशय कमी पैशात मोठ्या शहरात मिळणारी treatment इथे देतात . रुग्णाच्या नातेवाईकांना उगाच panic न करता वस्तुस्थिती आणि उपचाराची योग्य माहिती ते देतात . गंभीर अवस्थेतील रुग्ण योग्य वेळेत जर डॉ . यादगिरे हॉस्पिटलमध्ये पोहचला तर १०० टक्के वाचेल हा विश्वास या डॉक्टर दाम्पत्याने आपल्या मेहनतीतून कमविला आहे .
गेल्या १०- १५ वर्षात मृत्युच्या दारात पोहचलेल्या अनेकांना त्यांनी जीवदान दिले आहे . एकदा रुग्ण आयसीयूत गेला की रुग्णांच्या नातेवाईकांनी बिनधोक व्हावं एवढा विश्वास त्यांनी कमविला आहे . रुग्णांचा विश्वास मिळविणे यासाठी डॉक्टर यादगिरे यांची सतत धडपड सतत चालू असते. ते विश्वासात घेवून रुग्णाला काय झाले , आपण कुठले उपचार देत आहोत , धोके काय आहेत याची सविस्तर माहिती देतात . त्यांच्या रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा आहेत.  पत्नी डॉक्टर रोहिणी ह्या ICU मधील तज्ञ आहेत. ICU Managment मध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही . आयसीयूमध्ये सोनोग्राफीची सुविधा दुर्मिळ असते मात्र ही सुविधा त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिली आहे. रुग्णांप्रती सदैव सजग असलेल्या डॉ. रोहिणी यांच्या कौशल्यामुळे आयसीयूतीलल अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

               डॉक्टर अतुल हे कुशल शल्य चिकित्सक आहेत . मेंदू व हाडांचे कर्करोग सोडून अनेक प्रकारांच्या कर्करोगावर डॉ. अतुल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. विदर्भाच्या कानाकोपऱ्यात त्यांना शस्त्रक्रियेसाठी जावे लागते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून प्रशिक्षित होऊन अमरावतीत आलेले ते एकमेव सर्जन आहेत.  ही टाटा मेमोरियलचे MCH प्रमाणपत्र त्यांनी मिळविले आहे . त्यांचे अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे अमरावती येथील पहिले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे..  व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेली पहिली कार्डियाक ॲम्बुलन्स सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. कोणत्याही परिस्थितीत  रुग्ण जगावा हीच या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचीे व येथील टीमची धडपड असते.
यादगिरे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये त्यांनी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कॅन्सर सर्जरी, कॅन्सर रोग निदान व उपचार ,जनरल सर्जरी ,लॅप्रोस्कोपी, हाय रिस्क सर्जरी, एक्सीडेंट ,ब्रेन हॅमरेज ,लकवा, ब्राँकोस्कोपी,किमोथेरपी, इंडोस्कोपी आदी सुविधा या ठिकाणी आहे. पोटाच्या विकाराचे अचूक  निदान व उपचार व्हावे म्हणून त्यांनी व्हिडिओ गॅस्ट्रोस्कोपची ही व्यवस्था केली आहे. परीक्षणाची ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. व्हिडिओ गॅस्ट्रोस्कोपद्वारे परीक्षण केल्यानंतर आतील भागाचे चित्र वीस पटीने मोठे दिसते. हे चित्र टीव्हीवर रुग्ण व त्यांचे नातेवाईक सुद्धा पाहू शकतात. या परीक्षण पद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामुळे पोटातील विकाराची योग्य जागा दर्शवून त्याचा  फोटो काढता येतो. ही फोटो फिल्म पाहूनन इतर डॉक्टरांना देखील आजाराचे निदान करता येते. या सगळ्या बरोबरच अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या रुग्णांना एक नवा दिलासा देणारी इंडोप्रोस्थेसिस या उपचाराची व्यवस्था सुद्धा व्हिडिओगॅस्ट्रोस्कोपच्या सहाय्याने करण्यात येते.अमरावतीसारख्या शहरांमध्ये अशा पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळतो आहे.
आपले हॉस्पिटल सांभाळून डॉक्टर अतुल यादगिरे यांना वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी जावे लागते. प्रत्येक सोमवारी तसेच पहिल्या व दुसऱ्या गुरुवारी तुकाराम हॉस्पिटल, अकोला येथे जाऊन ते सेवा देतात . ब्रीच कँडी हॉस्पिटल ,टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजि येथील अनुभव त्यांना या क्षेत्रात त्यांच्यासाठी मोठी शिदोरी ठरला आहे. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल व विशेष प्रबंध सादर केल्याबद्दल म्यासिकॉन 99 येथे त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष निबंध सुद्धा त्यांनी सादर केले आहे. कर्करोग म्हणजेच मृत्यू अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते मात्र त्याच्याशी मानसिकदृष्ट्या कसं लढावे याचे सुद्धा मार्गदर्शन ते रुग्णांना करत असतात. योग्य आहार ,व्यायाम ,जीवनशैली यासह व्यसनापासून दूर रहा, असा सल्ला नेहमीच ते रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देत असतात. हे सारं करीत असताना डॉक्टर अतुल यांनी या व्यवसायातील अनागोंदीपासून स्वतःला दूर ठेवले आहे. बदलत्या काळातही त्यांनी नैतिक मूल्ये टिकवून ठेवली आहे.  हा ‘ सर्जनशील ‘सर्जन नवीन काही शिकण्यासाठी कायम सज्ज असतो .

डॉ . अतुल यादगिरे यांचा मोबाईल क्रमांक – 98225 74174

(लेखक मीडिया वॉच अनियतकालिक व वेब पोर्टलचे असोसिएट एडीटर आहेत)

96231 91923

Previous articleशापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा
Next articleभारतीय राजकारणातील सौहार्दपर्वाची अखेर ……..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.