‘अनटोल्ड’ मनोहर म्हैसाळकर…

-प्रवीण बर्दापूरकर   

कार्यकर्ता , संघटक आणि माणूस अशा दोन पातळ्यांवर मनोहर म्हैसाळकर जगत असत . या दोन्ही पातळ्यांवर त्यांच्या बऱ्यापैकी निकट जाण्याची किंबहुना त्यांच्या खास गोटातला एक होण्याची संधी मला मिळाली . वैयक्तिक पातळीवर माधवी आणि मनोहर म्हैसाळकरांची नागपुरातील जी लाडकी पण व्रात्य कार्टी म्हणून ओळखली जात , त्यातला एक होण्याचा मान मला मिळाला . आत्ताच तीन साडेतीन आठवड्यांपूर्वी म्हैसाळकरांचा फोन आला तेव्हा इतर बोलणं झाल्यावर ‘विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त तू एक व्याख्यान द्यायला ये. व्याख्यान होईल , भेट होईल आणि गप्पाही होतील’ असं ते म्हणाले .

आम्ही नागपूर सोडल्यापासून म्हैसाळकर आणि माझ्यात महिन्या दीड- महिन्यातून एकमेकांचे गिले-शिकवे जाणून घेतानांच परस्परांची येथेच्छ टवाळकी करणारा संवाद नियमित होता . ‘तू कोणत्या विषयावर बोलशील?’ असं त्यांनी विचारताच , मी लगेच म्हणालो , ’ म्हैसाळकरांची वात्रट कार्टी’ हा विषय धमाल होईल . ’

‘ म्हणजे तुला माझ्यावर टीका करायला संधी देणं झालं की ,तू नको देऊ व्याख्यान नुसताच ये भेटायला ,’ असं म्हैसाळकर म्हणाले .

एक पॉझ घेऊन ते पुढं म्हणाले , ‘या प्रत्येक व्रात्य कार्ट्याचा मला अभिमान आहे हे विसरु नकोस . ’

मनोहर म्हैसाळकर याचं निधन झाल्याची बातमी नागपूरचा एकेकाळाचा सहकारी पत्रकार पीयूष पाटीलनं कळवली तेव्हा सगळ्यात पहिले आठवला आमच्यातला हाच संवाद .

■■

पहिली भेट झाली तेव्हा मनोहर म्हैसाळकर विदर्भ साहित्य संघाच्या ( आता अस्तित्वात नसलेल्या ) धनवटे रंग मंदिराचे निमंत्रक होते आणि गेल्या आठवड्यात निधन झालं तेव्हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवहारातलं एक बडं प्रस्थ झालेले होते . शिस्तबद्ध कार्यकर्ता , कुशल संघटक अशी त्यांची ख्याती होती . तेव्हा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर आष्टीकर होते . आष्टीकर आणि तेव्हाच्या माध्यमाचं नातं ‘हेट अँड  लव्ह’ असं होतं . तेव्हा मी नागपूर पत्रिका या दैनिकाचा वार्ताहर होतो . या दैनिकात आष्टीकरांच्या विरुद्ध फारसं काही प्रकाशित होत नसे . कारण संपादक यमुनाताई शेवडे तसंच संस्थेचे कार्यकारी संचालक नरेश गद्रे यांच्याशी त्यांचा स्नेह होता . मात्र त्याच वेळेस मीही त्या दोघांचा ‘ब्लू आईड बॉय’ होतो . एक दिवस आमचे मुख्य वार्ताहार बाल साहित्यिक दिनकर देशपांडे यांनी माझी भेट मनोहर म्हैसाळकरांशी घडवून आणली .  पँट आणि झब्बा गळ्यात शबनम बॅग , डोईवरचे केस काहीसे मागे वळवलेले , डोळ्यावर चष्मा , भरघोस दाढी अशा व्यक्तिमत्त्वाचे पाऊणे सहा फुटाच्या आसपास उंची असणारे मनोहर म्हैसाळकर अजूनही पक्के आठवतात . त्यांच्या तोंडात तेव्हा किमाम आणि ३२० तंबाखूचा पानाचा तोबरा असे आणि तो मुखात धरुनच म्हैसाळकर बोलत असत . त्यांचा स्वभाव बोलका असण्या आणि नसण्याच्या सीमारेषेवरचा म्हणजे ज्याच्याशी सूर जुळत त्याच्याशी ते गप्पा मारत पण , जो माणूस कामापुरता जवळ केला आहे किंवा फारसा सलगीचा नाही , त्याच्याशी अतिशय माफक आणि मुद्द्याचं ते बोलत .

तर , बर्डीवरील गुलमर्ग नावाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या एका प्रशस्त बारमध्ये आमची भेट झाली . ओळख झाली . विचारपूस झाली . भरपूर गप्पा झाल्या आणि निघताना पुन्हा भेटण्याचे आवतण त्यांनी दिलं . मी बहुधा त्यांना त्यांच्या कामाचा वाटलो असणार . पुढे अनेक भेटी झाल्या . आष्टीकरांविरुद्ध अनेक चमचमीत बातम्या आणि त्या बातम्यांच्या समर्थनार्थ कागद , पत्रही त्यांनी मला दिली . तेव्हा दबदबा आणि खप असलेल्या नागपूर पत्रिका सारख्या दैनिकात त्या बातम्या प्रकाशित होत असल्यामुळे म्हैसाळकर खूष होते . आमच्यातले सूर जुळण्यातला आणि म्हैसाळकरांच्या गोटात आणि घरातही शिरण्याची संधी मला मिळण्याचा तो काळ होता . या सर्व गाठीभेटी गुलमर्गमध्येच होत . तेव्हा मी सडाफटिंग होतो आणि मंतरलेल्या सोनेरी पाण्याचा भक्त मुळीच नव्हतो . मला ते वर्ज्यही नव्हतं पण , मी तिथे तुडूंब जेवून घेत असे हे मात्र खरं . या भेटीत दिनकर देशपांडे  आणि वामन तेलंग या दोघांपैकी किमान एक जण आणि अनेकदा दोघेही असत . बिल कायमच म्हैसाळकर देत असत . ज्या कार्ट्यावर लोभ आहे त्या कार्ट्याला पैसे खर्च करु न देण्याचा त्यांचा गुण होता . एक अपवाद वगळता तो त्यांनी अतिशय निगुतीनं माझ्याबाबतीतही पाळला .

■■

म्हैसाळकर घराणं  मुळचे मिरजेतले . नंतर ते अमरावतीला आले .  मनोहर म्हैसाळकर  नोकरीच्या निमित्तानं नागपूरला आले . ते नाटकवाले . नाटक आणि गाण्यातली त्यांची आणि माधवी म्हैसाळकरांची जाणकारी थक्क करणारी होती . माधवी वहिनी तर गाण्याची परंपरा असलेल्या घरातून आलेल्या , बडबड्या आणि अतिशय लाघवी . म्हैसाळकरांसोबत शेकडो लोक टिकून राहिले त्याचं श्रेय माधवी वहिनीच्या लाघवीपणा आणि अगत्याला आहे . खिलवणं आणि पिलवणं हे दांपत्य अगत्यानं करत असे .

माझ्यासारख्या अनेकांसाठी माधवी आणि मनोहर म्हैसाळकर म्हणजे नागपूरचं ‘ग्रामदैवत’ झालेलं  होतं  . वेळ अवेळ न बघता , खाण्यापिण्याची इच्छा झाली किंवा मन मोकळं करावसं वाटलं की , धंतोलीतलं म्हैसाळकरांचं पहिल्या मजल्यावरचं घर गाठावं . आमच्या पिढीचा सुरुवातीचा आणि संघर्षाचाही तो काळ होता . आपलं म्हणणं कुणी तरी ममत्वानं ऐकून घ्यावं आणि धीर द्यावा असं वाटण्याचं ते वय होतं . घरापासून लांब असणारे आम्ही सर्वच जण ज्याच्या शोधात असायचो  तो ममत्वाचा शोध म्हैसाळकर दांपत्यापाशी संपत असे . पानाचा तोबरा भरुन ड्रिंकचा घुटका घेत म्हैसाळकर शांतपणे ऐकत राहात तर माधवी वहिनींची बडबडी साथ आम्हाला असे . असं हे अदृश्य  नात्याचं कर्तेपण या दोघांनी त्या काळात स्वीकारलेलं होतं .

■■

साधारण पाच-सहा वर्षांतच मनोहर म्हैसाळकर विदर्भ साहित्य संघात पक्के स्थिरावले . त्यांची मांड इतकी पक्की बसली की , त्यानंतर म्हणजे , आष्टीकरांनंतर झालेला प्रत्येक पदाधिकारी म्हैसाळकरांच्या पुण्याईवरच निवडून आला . तशीच पकड पुढे अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि साहित्य संमेलनाध्यक्षाची निवड  व संमेलनाच्या आयोजनावर म्हैसाळकर यांनी प्राप्त केली .

अतिशय कमी बोलणं . मनात काय चालू आहे यांची चुणूक न लागू देणं चेहेरा कायम निर्विकार ठेवणं , अलगदपणे इतरांच्या पोटात शिरुन काय ते जाणून घेणं , ते जाणून घेईपर्यंत आपले पत्ते उघड न करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्थेच्या आर्थिक व्यवहारात स्वच्छ असणं  हे म्हैसाळकरांचं वैशिष्टयं .  त्यांचं कसब मात्र त्यांच्या दीर्घ दृष्टीत होतं . कोण माणूस किती कामाचा आहे आणि त्याचा विदर्भ साहित्य संघासाठी कसा चपखल वापर करुन घेता येईल याची तीक्ष्ण दूरदृष्टी त्यांच्यात होती . त्यामुळे मराठी साहित्यात आलेले नवीन प्रवाह आणि समाजातले संस्थापयोगी अनेक जण विदर्भ साहित्य संघाशी नव्यानं जोडले गेले . आष्टीकरांच्या पठडीतल्या एका जुन्या खोडांची जागा या धडाडीच्या नव्या कार्यकर्त्यांनी घेतली . वामनराव  तेलंग , शोभाताई  उबगडे , श्रीपाद भालचंद्र जोशी , रवींद्र शोभणे , विलास मानकर , शुभदा फडणवीस आता भागयश्री बनहट्टी  अशी कितीतरी नाव सांगता येतील . मात्र ज्याचं उपयोगिता मूल्य संपलं आहे त्याला म्हैसाळकरांनी संस्थेत कधी म्हणजे कधीच सर्वोच्च पद मिळू दिलं नाही ; काहींना तर अलगदपणे दूरच केलं .  अशा लोकांशी ते विलक्षण कोरडेपणानं वागत . म्हैसाळकर कपटी नव्हते किंवा दुष्टही पण , सहज कपडे बदलावे तसे अनेक सहकारी त्यांनी बदलले किंवा काही कपडे फेकून न देता खुंटीवर टांगून ठेवले जातात तसं त्यांनी कांहीना टांगून ठेवलं  . वामनराव  तेलंग , श्रीपाद भालचंद्र जोशी त्यांच्या खास गोटातले    पण , ते दोघंही कधीच साहित्य संघाचे अध्यक्ष होऊ शकले नाही याचं कारण हेच .

■■

माझं उदाहरण तर मनोहर म्हैसाळकरांच्या स्वभावावर प्रकाश टाकणारं आहे.. त्यांनी मला एकदा साहित्य संघाच्या कार्यकारिणीवर घेतलं . नेमकं त्याच काळात जुनी इमारत पाडून नवं साहित्य संकुल उभारण्याचा मनोदय आकाराला आला . या नव्या प्रकल्पाला माझा पूर्ण पाठिंबा होता . हे काम आशुतोष शेवाळकराला मिळायला हवं असा म्हैसाळकर यांचा कल होता आणि बहुसंख्य कार्यकारिणी सदस्य म्हैसाळकरांच्या ऐकण्यातच होते . याही प्रस्तावाला माझा तत्वत: विरोध नव्हता पण , रीतसर अन्य प्रस्ताव वगैरे मागवून आशुतोष शेवाळकरच्या फर्मचं नाव अंतिम करावं  अनेक बिल्डर्सचे प्रस्ताव रितसर मागवावे आणि आणि ती बैठक नानासाहेब उपाख्य प्राचार्य राम शेवाळकर अध्यक्षतेखाली होऊ नये अशी आग्रही भूमिका मी  घेतली . प्रकिया जर कांटेकोरपणे पूर्ण केली नाही तर वाद होईल , असं मला वाटत होतं . माझ्या या भूमिकेमुळे म्हैसाळकर आणि ( भास्कर लक्ष्मण भोळे व श्रीपाद भालचंद्र जोशी वगळता ) अन्यही सदस्य नाराज झाले . म्हैसाळकरांनी माझा विरोध रेकॉर्डवर घेतलाच नाही . मी विरोध ‘रेकॉर्ड’ करत आहे . हे लक्षात आल्यावर तर म्हैसाळकर चक्क दुखावलेच . पुढे प्राचार्य राम शेवाळकरांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला . नानासाहेब शेवाळकर आणि मी सोबतच  जागतिक मराठी संमेलनासाठी मॉरिशसमध्ये असतांना तो मंजूरही झाला . सुरेश द्वादशीवार अध्यक्ष झाले . पुढे कंत्राट देण्याचा ‘तो’ ठरावही झाला . काही महिन्यांनी म्हैसाळकरांना हृदयाचं गंभीर दुखणं बळावलं . त्या काळात मी केलेल्या त्या विरोधाबद्दल कधीही कुठेही बोलणार नाही , असं वचन म्हैसाळकर यांनी  माझ्याकडून घेतलं . सहसा कुणाकडे जाऊन बसावं असा म्हैसाळकरांचा स्वभाव नव्हता पण , दुखण्यातून बरं झाल्यावर माझ्या घरी येऊन ते सगळं रेकॉर्ड दिल्या गेल्या वचनांचा हवाला देऊन त्यांनी ताब्यात घेतलं . बैठकीला उपस्थित असल्याच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या . नंतरही आम्ही नागपूर सोडेपर्यंत म्हणजे जून २०१३ पर्यंत म्हैसाळकर आमच्या घरी पूर्वी कांहीच घडलं नाही अशा सहज भावनेनं अनेकदा आले .

अपेक्षेप्रमाणे पुढे काही वर्षांनी या संदर्भात वाद उफाळून आलाच आणि तो उकरुन काढला तो दस्तुरखुद्द कविश्रेष्ठ सुरेश भट यांनी . त्यांना ती सर्व माहिती कुणी दिली मला ठाऊक नाही पण , मी केलेला विरोध सुरेश भट यांना समजला . ते माझ्या घरी आले आणि ती सर्व माहिती देण्याचा ‘प्रेमळ’ सल्लाच त्यांनी दिला . मी स्पष्ट शब्दांत नकार देत म्हैसाळकरांना दिलेल्या वचनाची हकिकत त्यांना सांगितली . सुरेश भटही ग्रेटच , ‘मनोहरला दिलेलं वचन तू मोडलं नाहीस तर मला आनंदच आहे पण , तू माहिती दिली नाही म्हणून मी नाराजही आहे .’ असं खडसावून गेले . सुरेश भट  यांच्या तक्रारीची सरकारनं दखल घेतली , समिती नेमली . त्या समितीचे प्रमुख माझे मित्र होते . औपचारिकपणे विचारण्यात आलं तेव्हा , या व्यवहारात आर्थिक घोटाळा कांहीच नाही केवळ प्रक्रिया जशी पार पडायला हवी तशी पार पाडली गेलेली नाही असं त्या अधिकाऱ्यांना सांगितल . काय घडलं तेही म्हैसाळकर यांना सांगितलं त्यांनी कांहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही . या प्रकरणाचा त्यांना खूप त्रास झाला हे मात्र खरं .

सुरेश भट माझ्यावर खरंच नाराज झाले . इतके नाराज की , आम्ही समोरासमोर आलो तरी ते ओळख दाखवत नसत . मी मुंबईत असताना एकदा आम्ही मंत्रालयात समोरासमोर आलो तेव्हा त्यांनी चक्क मान फिरवली .

मनोहर म्हैसाळकर वि . सा . संघाचे अध्यक्ष झाल्यावर एकदा आमच्यात झालेल्या गप्पात हा विषय निघाल्यावर ‘तुझं  म्हणणं तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं’  , असं  म्हैसाळकर म्हणाले पण , एव्हाना पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं होतं…साहित्य संकुल अद्यापही पूर्ण झालेलं नाही , यांची खंत त्यांना मृत्यूआधी जाणवली असेल का…

दुसरा प्रसंग ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा मी संपादक झाल्याचा आहे . कौतिकराव तेव्हा महामंडळाचे अध्यक्ष होते आणि महामंडळानं विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत सॅन होजेला ( सॅन जोस ) आयोजित करण्याचं ठरवलं . मनोहर म्हैसाळकर आणि  विदर्भ साहित्य संघाचा विश्व मराठी साहित्य संमेलन संकल्पनेलाच विरोध होता . ‘लोकसत्ता’नं विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या बाजूनं भूमिका घेतली . कौतिकरावांची आणि माझी फार घसट नव्हती पण , त्यांचा रोखठोक स्वभाव आणि कुणी अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची शैली मला जाम आवडायची . आमच्या या पाठिंब्यानंतर  तर कौतिकराव आणि माझ्यात संवाद नियमित संवाद सुरु झाला . त्या सर्व बातम्या संदीप देशपांडे हा माझा सहकारी  देत असे . म्हैसाळकर आणि कौतिकराव या दोघांशीही थेट संपर्क असल्यानं भरपूर चमचमीत बातम्या मिळाल्या आणि संदीपनं त्या लिहिल्याही भन्नाट .

पुढे एक दिवस कौतिकरावांचा फोन आला . त्यांनी  सॅन होजेच्या संमेलनात वक्ता म्हणून या,  असं आमंत्रण  दिलं . मी ते तत्काळ स्वीकारलं तर कौतिकराव म्हणाले , ‘तुमचे मित्र ( पक्षी : मनोहर म्हैसाळकर ) नाराज होतील त्यांचं काय ?’ मी त्यांना म्हटलं , ‘म्हैसाळकर कोणताही गैरसमज करुन घेणार नाहीत. ‘ आणि आमच्या वैयक्तिक संबंधाबाबत घडलंही तसंच.

एकदा तर विदर्भ साहित्य संघाच्या व्यासपीठावरुनच ‘वय झालंय की आता ,  अध्यक्षपदाचा राजीनामा द्या हो म्हैसाळकर .’ असं थेट सुचवलं  त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना अर्थात म्हैसाळकरांनी ‘ मी म्हातारा न इतुका’ असं म्हणत ती सूचना अर्थातच नाकारली .

एकूण काय तर आमच्यातलं नातं टॉम अँड  जेरीसारखं होतं .

■■

प्राचार्य राम शेवाळकर आणि सुरेश द्वादशीवार यांच्या अध्यक्षपदाच्या काळात विदर्भ साहित्य संघाच्या कार्याचा मोठा विस्तार झाला . शिवाय संस्था आर्थिकदृष्ट्या खूपच संपन्न झाली . आज महाराष्ट्रात कोणत्याही साहित्य संस्थेपेक्षा विदर्भ साहित्य संघ आर्थिकदृष्ट्या मोठा सक्षम आहे . जगाच्या क्रिकेटमध्ये बीसीसीआयचं जे स्थान तेच महाराष्ट्राच्या साहित्य संस्थांमध्ये विदर्भ साहित्य संघाचं आहे . अर्थात शेवाळकर आणि त्यातही  विशेषत: द्वादशीवार हे विस्तार कर्तृत्व गाजवू शकले कारण त्यांच्याजवळ मनोहर म्हैसाळकर नावाची बलाढ्य शक्ती होती . सूक्ष्म आखणी आणि काटेकोर अंमलबजावणी विलक्षण संयमानं करणं हे मनोहर म्हैसाळकर यांच्या रक्तातचं होतं . हे सगळं प्रसिद्धीचा सोस न बाळगता निरलस वृत्तीनं ते करु शकत असतं . इतकी निरपेक्ष वृत्ती असणारी माणसं समाजात फारसचं विरळा आढळतात .

मनोहर म्हैसाळकर यांच्या सहवासात आल्यामुळे मराठी साहित्य संस्था , त्यांचे संमेलनं , संमेलनाध्यक्षांची निवड या प्रत्यक्ष राजकारणालाही लाजवणाऱ्या प्रांतात मनसोक्त मुसाफिरी मला करता आली . मराठी साहित्य संस्थांच्या राजकारणात एके काळी मुंबईच्या अच्युत तारी यांचं जे वलय होतं त्यापेक्षा जास्त वलय आणि प्रभाव मनोहर  म्हैसाळकरांनी निर्माण करण्यात निर्विवाद यश प्राप्त केलं . ते आणि कौतिकराव ठाले पाटील ठरवतील तोच अध्यक्ष होईल अशी परंपरा निर्माण झाली . म्हैसाळकरांच्या तालमीत तयार झाल्यामुळे कविश्रेष्ठ नारायण सुर्वे , ह. मो. मराठे , अरुण साधू यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मला सक्रिय सहभागी होता आलं . नारायण सुर्वेंनी अध्यक्षपदाची निवडणूक दोन वेळा लढवली . एकवेळा ते पराभूत झाले कारण म्हैसाळकर आणि त्यांचा गट सुर्वे यांच्या पाठीशी नव्हता . दुसऱ्यांदा मात्र सुर्वे मोठ्या फरकानं विजयी झाले .

मनोहर म्हैसाळकर तसे कुठल्या एका राजकीय विचाराशी बांधिल नव्हते     पण , सूक्ष्म का असे ना त्यांचा कल भाजपच्या बाजूनं होता असं मला वाटतं  . वि . सा . संघाचा कारभार हाकतांना मात्र  त्यांनी कायमचं सेक्युलर भूमिका घेतली . साहित्य संस्थेवरचं अभिजनांचं ( केवळ ब्राह्मणचं नाही तर सर्व जात आणि धर्मीय ) वर्चस्व त्यांनी हळूहळू झुगारुन टाकलं . विविध जातिधर्माच्या लोकांना साहित्यातील , नवनवीन प्रयोग आणि प्रवाहांना म्हैसाळकरांनी कायमच उत्तेजन , प्रतिनिधित्व आणि व्यासपीठही मिळवून दिलं .

■■

मनोहर म्हैसाळकर यांच्या मृत्यूची बातमी कळवणारा फोन कौतिकराव ठाले पाटील यांना केला . कौतिकराव खूप हळहळले. ते तळातून हलले आहेत असं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं होतं .

कौतिकरावांनी सांगितलं , गेल्याच आठवड्यात मनोहररावांचा फोन आला होता आणि वर्धेच्या साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी सुरेश द्वादशीवार यांच्या नावाला पाठिंबा देण्याचा आग्रह त्यांनी धरला . मी तो मान्यही केला . ते बोलणं शेवटचं ठरेल असं कधी वाटलंच नव्हतं .

मरणाच्या दारातही हा माणूस संस्थात्मक कामाचाच विचार करत होता . म्हणूनच म्हटलं अशी माणसं खरंच दुर्मीळ असतात…

( छायाचित्र – विवेक रानडे )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleकरा गर्जना, बाळासाहेबांची शिवसेना
Next article.. मग भले कितीही वामन परतून येवोत!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here