.. मग भले कितीही वामन परतून येवोत!

-डॉ. मुकुंद कुळे

मिथकांचा वापर करून बहुजनांचा बुद्धिभ्रम करायचा आणि आपल्याला हवं ते साध्य करून घ्यायचं हा आतापर्यंत अभिजनांनी वापरलेला सोपा पैंतरा आहे. किंबहुना याच्या आधारेच आजवर त्या-त्या काळातील अभिजन समाजाने बहुजन समाजावर सांस्कृतिक वर्चस्व गाजवलं आणि विविध कर्मकांडांचा धाक दाखवत त्याला आपल्या कह्यात ठेवलं. गेल्या काही वर्षांत तर या प्रकारांत वाढ झालेली दिसते. कुठल्याही सण-उत्सवाचं हिंदुत्वीकरण करण्याची मोहीम जोरात रावबली जात आहे. गोविंदा असो किंवा गणेशोत्सव-नवरात्र-दिवाळी प्रत्येक सण-उत्सवातील लोकपारंपरिक वेगळेपण संपवून त्यांचं धर्माच्या नावाखाली सपाटीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अगदी अलीकडेच पार पडलेला केरळमधील ओणम उत्सवही गेली काही वर्षं याच सावटाखाली साजरा होत आहे.

केरळच्या स्थानिक संस्कृतीनुसार त्यांच्या चिंगम महिन्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) येणारा ओणम हा सण समृद्धीचा-संपन्नतेचा सण म्हणून ओळखला जातो. कारण या दिवसांत शेतात पेरलेलं धनधान्य कापणीला आलेलं असतं. एकप्रकारे हा थेट कृषिसंस्कृतीशी नातं सांगणारा सण आहे. त्यामुळेच तब्बल दहा दिवस साजऱ्या होणाऱ्या या सणाच्या दिवसांत मल्याळी बांधव अधिकाधिक निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. या दहा दिवसांत नवनवे कपडे घालून एकमेकांना आवर्जून भेटवस्तू तर दिल्या जातातच. पण त्याचबरोबर घराचं अंगण सारवून तिथे दहा दिवस फुलांची रांगोळी काढली जाते. ही रांगोळी रोज नवीन न काढता, पहिल्या दिवशी काढलेली रांगोळीच रोज थोडी थोडी वाढवली जाते. त्यासाठी मुद्दाम रोज सकाळी जंगलात जाऊन विविध तऱ्हेची-रंगांची फुलं आणली जातात. रोज वाढवली जाणारी ‘पुक्कलम’ नावाची ही फुलांची रांगोळी म्हणजे वाढत्या समृद्धीचं प्रतीक. याशिवाय रोज रात्री रंगणारी नाचगाणी आणि नौकास्पर्धांसारखे खेळ मानवाचं निसर्गाशी असलेलं सान्निध्यच सूचित करतात.

मात्र ओणम केवळ कृषिसंस्कृतीच्या आठवणी जागवणारा सण नाही. तो एक सांस्कृतिक संघर्ष अधोरेखित करणारा सणही आहे. किंबहुना कृषिसंस्कृतीतील महान राजा बळी याच्या स्मृतिप्रीत्यर्थच ओणम साजरा केला जातो. दैत्यराज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाच्या राजवटीत केरळमधली जनता सुखी आणि समाधानी होती. बळीराजाच्या न्याय्य राजवटीमुळे प्रत्येकाच्या घरात सुख आणि समाधान होतं. परिणामी बळीराजाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली होती. मात्र हीच लोकप्रियता देवांना मानवली नाही आणि त्यांनी विष्णुचा अवतार मानल्या गेलेल्या वामनाची निर्मिती करून बळीराजाला पाताळात धाडलं (की कपटाने मारलं?). मात्र मारलेलं असो की वामनाने तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात धाडलेलं असो, बळीराजा संपला मात्र नाही. तो आपल्या जनतेला भेटण्यासाठी पुन्हा पुन्हा येत राहिला. त्यांचं कुशलमंगल विचारत राहिला. केरळमध्ये साजरा होणारा ओणम म्हणजे हेच तर आहे. बळीराजा आपल्या जनतेला भेटायला पाताळातून यायला निघतो, तो ओणमचा अथम म्हणजे पहिला दिवस मानला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा, म्हणजे दहावा दिवस थिरुओणम म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपल्या जनतेला भेटून बळीराजा पुन्हा पाताळात जायला निघतो. हा दिवस केरळमधील जनतेसाठी एकप्रकारे दुःखाचाच असतो, कारण त्यांचा आवडता प्रजादक्ष राजा पुन्हा पाताळात जायला निघालेला असतो. मग पुढच्या वर्षी लवकर ये भेटायला, असं त्याच्याकडून आश्वासन घेऊन, त्याला वाजतगाजत निरोप दिला जातो…

…हे वर्षानुवर्षं सुरू आहे. शतकं उलटली, सहस्रकं मागे सरली, तरी केरळशी असलेलं बळीराजाचं नातं संपलं नाही. उलट दरवर्षी ते वाढतच आहे आणि तेच गेल्या काही वर्षांत पुन्हा अभिजनांच्या डोळ्यांत खुपू लागलं आहे. कारण बळीराजा शेवटी असूर होता. मग त्याची लोकप्रियता कशी सहन होणार? त्यामुळेच पुन्हा एकदा बळीराजाला पाताळात धाडण्यासाठी सनातनी तयार झालेत आणि त्यासाठीच त्यांनी पुन्हा एकदा वामनाचीच मदत घेतली जात आहे. ओणम हा राक्षसांचा राजा महाबलीच्या आगमनाप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा सण नाही, तर तो वामनाच्या जन्मानिमित्त साजरा केला जाणार सण-उत्सव असल्याचं ते आता सांगू लागले आहेत. खरं तर पुराणकाळातला बळीराजा फारच सुस्वभावी, सोशिक आणि नम्र होता. राक्षसांचे गुरू असलेल्या शुक्राचार्यांनी आधीच देवांच्या कारस्थानाची माहिती दिलेली असतानाही आणि वामनाला तू कुठलंही वचन देऊ नकोस असं सांगितलं असतानाही, त्याने याचकाचा मान राखला. परिणामी वामनाने आपलं तिसरं पाऊल अखेर बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं आणि बळीराजा पाताळात गेला. तेव्हा आपल्या सुस्वभावामुळे बळीराजा पाताळात गेला खरा, परंतु त्या बळीराजाला आपल्या बहुजनसंस्कृतीत जपून ठेवणारी आजची केरळ किंवा उर्वरित भारतातली जनता सनातन्यांच्या नव्या खेळीला आता फसणारी नाही. पुन्हा एकदा उच्चवर्णीयांचं श्रेष्ठत्व ठसविण्याचाच हा डाव असल्याचं केरळमधील सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे. तसंच हा सण हायजॅक करण्याचा परंपरावाद्यांचा अजेंडा असल्याची टीकाही अऩेक जाणकारांनी केलेली आहे.

जाणकारांच्या या टीकेत असत्य किंवा गैर असं काहीच नाही. कारण दैवतांपासून ते रीती-रिवाजांपर्यंत बहुजन समाजात जे-जे लोकप्रिय झालं, ते-ते अभिजन वर्गाने आधी आपलसं केलं आणि मग बहुजनवर्गाचा त्यावरचा ठसा पुसून टाकला. विठोबा-खंडोबा ही याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. गुराखी आणि धनगर समाजाच्या या लोकदेवता आता उभ्या महाराष्ट्राच्या उपास्यदेवता झाल्या आहेत, पण आपल्या मूळ समाजापासून मात्र दूर गेल्या आहेत. याचप्रकारे बळीराजाचं अस्तित्व पुसण्यासाठी आता ओणम हायजॅक करण्याचा परंपरावाद्यांचा डाव आहे. परंतु केवळ केरळच नाही, तर सगळ्यांनीच बळीराजाच्या रक्षणासाठी आता पुढे येण्याची गरज आहे. कारण बळीराजा केवळ केरळचा नाही. भारतातल्या कृषिपंरपरेशी निगडित असलेल्या प्रत्येकाशी बळीराजाचं नातं जोडलं गेलंय. शेवटी बळीराजा हा कृषिसंस्कृतीचा कर्ताधर्ता होता. बळीचं राज्य हे शेतकरीराजाचं राज्य होतं. केवळ त्यामुळेच आजही भारतीय परंपरेत बळीराजा टिकून आहे. केवळ महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तरी, दिवाळीत साजरी होणारी बलिप्रतिपदा (पाडवा) ही अनेक समाजात बळीराजाचे उपकार स्मरण्यासाठीच साजरी केली जाते.

मुंबईतील एक आद्य समाज असलेल्या पाठारे प्रभू समाजातही बळी प्रतिपदेला बळीराजाच्या मूर्तीची पूजा केली जाते. विशेष म्हणजे इतर कोणत्याही समाजात न आढळणारी बळीराजाची मूर्ती पाठारे प्रभू समाजात मात्र बव्हंशी कुटुंबात आढळते.

कोकणातला अलिबाग-मुरुड परिसरातील आगरी समाज तर दिवाळीत शेणाच्या गोळ्याची बळीराजा म्हणून पूजा करतो. विशेषत: पाडव्याचा दिवस बळीराजाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला तांदळाचं पीठ व रांगोळीचं मिश्रण करून त्यापासून अंगणात कणे म्हणजे रांगोळी काढण्याची प्राचीन पद्धत आहे. चौकोनी आकाराच्या या कण्यात चार दिशांना चार, तर एक मध्यभागी असे शेणाचे पाच गोळे ठेवतात. शेणाच्या प्रत्येक गोळ्यावर गोंड्याचं फुल ठेवून त्याला बळीराजाचं प्रतीक मानून त्या गोळ्यांची पूजा केली जाते. पूजाविधी यथासांग पार पडल्यावर हे शेणाचे गोळे घराच्या कौलांवर फेकण्यात येतात. यामुळे बळीराजाची आपल्या घरावर कृपा राहाते, अशी या समाजाची श्रद्धा आहे.

बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा मानला जात असल्यामुळे अनागर संस्कृतीत त्याचं आणि कृषिकर्माचं गुणगान करणारी अनेक गाणी गायली जातात. मराठवाडा-विदर्भात तर अशी अनेक गाणी गुराख्यांना तोंडपाठ असतात. त्यातलंच आमच्या एका कवी मित्राने (शिवाजी आंबुलगेकर) सांगितलेलं एक गाणं म्हणजे-

‘दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी

गाईचा गोऱ्हा, चौपाय मोरा

चौक कुणाचा, लक्षुमनाचा

लक्षुमनानं काय दिलं, लक्षुमनानं दिला डबा

डब्यात काय सुतोई, त्यानं गाय पुतोई

ज्यान्या गाईचे, व्हंडे व्हंडे गोऱ्हे

त्याला लावले चौर गोंडे

चौर गोंड्यांची सावली, तिफन माझी माऊली

तिफनीला तीन फणं, मोगड्याला दोन फणं

दाबीन बुक्की, फोडीन नारळ

आलं आलं मर्दाचं घोडं

उघडा उघडा बळीराजाचं कवाडं

इडापिडा जाऊ दे नि बळीचं राज्य येऊ दे...’

म्हणजे या सर्व घटनांतून बळीराजा समृद्धीचं प्रतीक असल्याचंच सूचित होतं. फक्त तो असूर असल्यामुळे त्याला आजवर अभिजनांनी नाकारलं. परंतु यापुढे त्यांना ते जमणार नाही. कारण बहुजनांना आता मिथकं आणि प्रतिमा-प्रतीकांची भीती उरलेली नाही. मग भले कितीही वामन परतून येवोत!

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous article‘अनटोल्ड’ मनोहर म्हैसाळकर…
Next articleकशाला हवी असते ती सरोगसी?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.