अनमोल कोहिनूरची रंजक कहाणी

दीडशे वर्षे भारतावर राज्य करणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून गेल्या आठवड्यात भारताच्या दौर्‍यावर होते. कधी काळी ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता आणि भारतासह जवळपास ७२ देश ज्यांचे अंकित होते अशा ब्रिटनला आता भारतासोबत व्यापार वाढवायचा आहे. अनेक वर्षे जगाच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती ठेवलेल्या ब्रिटनची आर्थिक स्थिती अलीकडच्या काही वर्षांत चांगलीच खालावली आहे. त्यामुळे भारतासारख्या व्यापार आणि तंत्रज्ञानात आगेकूच करणार्‍या देशासोबत संबंध उत्तम ठेवणे, ही आता त्यांची प्राथमिकता झाली आहे. त्याच हेतूने कॅमेरून भारतात आले होते. भूतकाळातील सारी माजोरी बाजूला ठेवून ब्रिटनने या दौर्‍यात भारतीयांची मने जिंकण्याचा प्रय▪केला.

 पंजाबातील जालियनवाला बागेला भेट दिल्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड हे ब्रिटनच्या इतिहासातील अतिशय लज्जास्पद व शरमेने मान खाली घालावी, असे प्रकरण होते, असे त्यांनी तेथील शेरापुस्तिकेत नमूद करून ठेवले. (१९१९ ला हे हत्याकांड झाल्यानंतर या बागेला भेट देणारे ते पहिले ब्रिटिश पंतप्रधान होते.) एकंदरीतच या दौर्‍यात डेव्हिड कॅमेरून यांची भूमिका अतिशय नम्र अशी होती. द इकॉनॉमिस्ट या जगप्रसिद्ध साप्ताहिकाने ताज्या अंकात कॅमेरून यांच्या दौर्‍याचा वृत्तान्त प्रकाशित करताना कॅमेरून हे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहनसिंग यांना कुर्निसात करत आहे, असे छायाचित्र प्रसिद्ध करून गेल्या ६६ वर्षांत काळ कसा बदलला आहे, हे अधोरेखित केले आहे. या दौर्‍यात डेव्हिड कॅमेरूननी भारतीयांना खूश करण्याचा प्रय▪केला असला तरी एका विषयात मात्र ते ठाम होते. जगप्रसिद्ध असा कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास त्यांनी नकार दिला. या मागणीत काही तथ्य नाही. अशा पद्धतीने विचार करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

हिर्‍यांचा मुकुटमणी मानला जाणारा कोहिनूर ब्रिटनने भारताला परत करावा, ही मागणी काही पहिल्यांदाच झाली नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात १९९७ मध्ये इंग्लंडची राणी एलिझाबेथ भारताच्या दौर्‍यावर आल्या असतानाही भारताने ही मागणी जोरदार रेटून धरली होती. अधूनमधून ब्रिटनकडे याची मागणी केली जातेच. विशेष म्हणजे या वेळी पाकिस्ताननेही भारताच्या सुरात सूर मिसळला आहे. डेव्हिड कॅमेरून मायदेशी परतल्यानंतर पाकिस्तानचे आघाडीचे दैनिक डॉननेसुद्धा ब्रिटनने हा हिरा परत केला पाहिजे, असे म्हटले आहे. असं काय आहे या हिर्‍यात? जगातील अनेक देश आणि तेथील राज्यकर्त्यांना मोहित करणार्‍या या हिर्‍याची कहाणी आणि त्याचा प्रवास दोन्ही रंजक आहेत. १८५0 मध्ये पंजाबचे तत्कालीन संस्थानिक राजे दुलिपसिंहाकडून हा हिरा ब्रिटनच्या ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतली. तेव्हापासून तो ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. ब्रिटनच्या राजघराण्यातील राज्याभिषेक समारंभ वा इतर महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान हा हिरा राणीच्या मुकुटात असतो. एरवी ब्रिटनच्या राजधानीतील ‘टॉवर ऑफ लंडन’ या राजघराण्याच्या संग्रहालयात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत त्याला पाहता येतं. हा हिरा जवळपास पाच हजार वर्षे जुना आहे, असं मानलं जातं. मात्र याबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील कोलूर खाणीतून हा हिरा मिळाला असल्याचे सांगण्यात येते. त्या वेळी आंध्रावर काकतीया राजघराण्याचे राज्य होते. या हिर्‍याचा पहिला लिखित उल्लेख मुगल शासक बाबरच्या बाबरनामा या आत्मचरित्रात आढळतो. तो लिहितो- ‘१२९४ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने ग्वाल्हेरच्या कच्छवा राजाकडून हा हिरा प्राप्त केला. खिलजीनंतर महम्मद तुघलक, इब्राहिम लोधी या राज्यकर्त्यांकडे तो गेला. १५२६ मध्ये तो माझ्याकडे आला.’त्याच्या काळात या हिर्‍याचे नाव बाबरचा हिरा असे पडले होते.

बाबरानंतर तो हुमायून व नंतर अकबराकडे आला. अकबराला या हिर्‍याचं फारसं आकर्षण न वाटल्याने बहुतांश वेळ कोहिनूर तिजोरीतच पडून होता. अकबराचा नातू शहाजहानाच्या काळात मात्र कोहिनूरची ख्याती पसरायला लागली. शहाजहानने तो आपल्या प्रसिद्ध अशा बदकाच्या आकाराच्या सिंहासनावर लावला. त्यानंतर औरंगजेबाचे राज्य आले. त्याने आपल्या बापाला तुरुंगात घातले. मात्र बापाचे हिर्‍याबद्दलचे ममत्व जाणून आग्य्राच्या लाल किल्ल्यात त्याने तो हिरा त्याला जवळ बाळगू दिला. शहाजहानच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा हिरा लाहोरला बादशाही मशिदीमध्ये हलविला. १७३९ मध्ये इराणच्या नादीरशहाने भारतावर आक्रमण केले. त्या स्वारीत त्याने मुघलांचा सारा खजिना ताब्यात घेतला. यामध्ये कोहिनूर हिर्‍यासोबत शहाजहानचे प्रसिद्ध सिंहासनही होते. कोहिनूर, सिंहासन आणि सार्‍या बहुमोल वस्तू घेऊन तो इराणमध्ये गेला. या हिर्‍याला कोहिनूर हे नाव नादीरशहानेच दिले. त्याअगोदर तो वेगवेगळ्या नावाने ओळखला जात असे. कोह-इ-नूर चा उर्दूतील अर्थ प्रकाशाचा पर्वत असा होतो. त्या कालावधीत या हिर्‍याला दर्या-ए-नूर (प्रकाशाचा समुद्र) असेही संबोधले जात असे. १७४७ पर्यंत कोहिनूर नादीरशहाच्या ताब्यात होता. पुढे त्याच्या हत्येनंतर कोहिनूरची मालकी त्याचा सेनापती अहमद शहा दुर्राणीकडे आली. अहमदशहाने आपल्या मुकुटात कोहिनूरला स्थान दिले होते. पुढे शुजा शहा दुर्राणीकडे कोहिनूर आला. काही कालावधीनंतर पंजाबचे राजे रणजित सिंह यांच्यासोबतच्या लढाईत दुर्राणीला शरण यावे लागले. रणजित सिंहानी कोहिनूर तातडीने स्वत:च्या ताब्यात घेतला. १८३९ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर पुढची दहा वर्षे कोहिनूर त्यांच्या घराण्यातच होता. मात्र १८४९ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांनी लाहोर ताब्यात घेतले. त्या वेळी गादीवर असलेल्या दुलिपसिंहांना त्यांनी जबरदस्तीने एक करार करायला लावला. लॉर्ड डलहौसीचा यात मोठा वाटा होता. त्या करारनाम्यात शुजा शाहकडून रणजितसिंहांनी ताब्यात घेतलेला कोहिनूर दुलिपसिंह ब्रिटनच्या राणीला अर्पण करीत आहे, असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर एका खास जहाजाने कोहिनूरला लंडनला रवाना करण्यात आले. तेथे ३ जुलै १८५0 ला ईस्ट इंडिया कंपनीला २५0 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून तो हिरा राणीला नजराणा म्हणून भेट देण्यात आला. तेव्हापासून तो ब्रिटनच्या राजघराण्याच्या खजिन्यात आहे. राणी अलेक्झांड्राने पहिल्यांदा आपल्या मुकुटात कोहिनूरचा वापर केला होता.

कोहिनूरबाबत खूप कथा-दंतकथा तयार झाल्या आहेत. कोहिनूर हा पुरुष शासकाने आपल्या जवळ बाळगला वा मुकुटात परिधान केला, तर त्याची अवनतीच होते वा त्याला सत्ता गमवावी लागते, अशी समजूत आहे. त्यासाठी भूतकाळात कोहिनूर ज्यांच्याजवळ होता त्या हिंदू, राजपूत, मुगल, इराणी, अफगाण व शीख राज्यकर्त्यांचे उदाहरणं दिली जातात. या समजुतीचा ब्रिटनच्या राज्यकर्त्यांवरही पगडा आहे. राणी अलेक्झांड्रानंतर गादीवर आलेल्या सातवा व आठवा एडवर्ड आणि पाचवा व सहाव्या जॉर्ज या राजांनी चुकूनही कोहिनूर आपल्या मुकुटात ठेवला नाही. सध्याची राणी एलिझाबेथ मात्र राजघराण्याच्या पारंपरिक कार्यक्रमात हा हिरा मुकुटात मिरविते. कोहिनूरचं वजन १0५.६ कॅरेट (२१.६ ग्रॅम) आहे. कोहिनूर ब्रिटनला पाठविण्यापूर्वी तो चांगलाच वजनदार म्हणजे १८६ कॅरेटचा होता. तेथे राणीला भेट देण्यापूर्वी प्रिन्स अल्बर्टच्या देखरेखीखाली त्याला आणखी पैलू पाडण्यात आले. त्या कामासाठी तेव्हा आठ हजार पौंड खर्च करण्यात आले. कोहिनूर आजपर्यंत कधीही विकला गेला नाही. मात्र त्याची आजची किंमत २0 बिलियन डॉलर्स (जवळपास एक लाख कोटी रुपये) आहे. असा हा कोहिनूरचा महिमा. कधी लंडनला गेलात, तर भारताची ही अनमोल ठेव पाहायला अजिबात विसरू नका.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Previous articleचटका लावणार्‍या अजरामर प्रेमकथा
Next articleमी हिजडा…मी लक्ष्मी!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.