अफवा पसरवणारे नवं गुलाम

– मुक्ता चैतन्य

मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याच्या बातम्या व्हॉट्स अँप वरुन पुन्हा एकदा व्हायरल झाल्या आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण जागरूक असलंच पाहिजे आणि मुलांनाही जागरूक केलंच पाहिजे पण सोशल मीडियावर अफवा पसरते कशी हेही समजून घेणं गरजेचं आहे कारण आपणही अनेकदा अशा अफवा पसरवण्यात आपल्याही नकळत सहभागी झालेलो असतो.

सोशल मीडिया विशेषतर् व्हॉट्सअॅपचं डिझाइन, त्याचं खासगी-वैयक्तिक स्वरूप, ते चालवण्यासाठी लागणारे स्मार्टफोन आणि इंटरनेट डाटा स्वस्त असणं यामुळे अफवांचं पीक सहज उगवतंय. मानवी मनाला गॉसिप्स आवडतात, त्यात काहीतरी जबरदस्त, चटपटीत मसाला असेल तर फारच रंजक. फारसा विचार न करता अफवांवर विश्वास ठेवणारी मानसिकता, जे काही छापून येतं, हातातल्या अगर भिंतीवरल्या स्क्रीनवर दिसतं ते खरं असतं हे मानण्याची वृत्ती आणि प्रश्न न विचारण्याचा संस्कार या सगळ्यामुळे समाज म्हणून आपण ‘फॉरवर्ड-फॉरवर्ड’चा नवानवा खेळ चवीचवीने रंगवतो आहोत आणि त्यापोटी जन्मणार्या अफवांचे बळी ठरतो आहोत.एखादी ‘बातमी’ मलाच कशी पहिल्यांदा समजली, सगळ्यांना जागं करण्यासाठी मीच कसा पहिल्यांदा तो मेसेज पाठवला, मला कसं इतरांपेक्षा जास्त माहीत आहे अशा निरनिराळ्या मानसिक गरजांच्या पूर्तीसाठीदेखील फॉरवर्ड मेसेजेसचा खेळ जोरात खेळला जातो. आपल्यापर्यंत येऊन पोहचलेल्या मेसेजमधील तथ्य शोधण्याचा प्रयत्न कुणीही करत नाही. हा मेसेज खरा आहे का? ही माहिती योग्य/उचित/वास्तव आहे का? हा मेसेज पुढे पाठवला तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील? – हे तीन अगदी मूलभूत प्रश्नही स्वतःला कुणीही विचारत नाही. जे मुद्दामून किंवा पैसे घेऊन हा खेळ खेळतात त्यांच्याविषयी आणि त्यांच्या हेतूंविषयी बोलण्यात काही अर्थच नाही.

यावर स्वनियंत्रण आणि माध्यम शिक्षण हेच प्रभावशाली आणि शाश्वत मार्ग आहेत. पण माध्यम शिक्षणाची गरज आपल्याला अजूनही भासत नाही. घरोघरी टीव्ही आल्यानंतरही माध्यम शिक्षणाची गरज आपल्याला वाटली नाही. तशीच ती सोशल मीडिया आल्यावरही वाटली नाही. मुळात अनेकदा माणसे माध्यम शिक्षित असणं हे सत्तेत असलेल्यांच्या फायद्याचे नसते, त्यामुळे आजवर कधीही माध्यम शिक्षणाचा गांभीर्याने विचार केला गेला नाही. त्यामुळे सरसकट अर्थाने बोलायचं तर आपला देश तसा ‘माध्यम-अशिक्षित’ आहे.

सोशल मीडियाचा ‘स्टट्रेजी’ म्हणून वापर करणारे उच्चशिक्षित तज्ज्ञ असोत, धार्मिक/जातीय तेढ वाढवून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ‘पोस्ट’चं तेल ओतणारे ‘कार्यकर्ते’ असोत की तात्कालिक खळबळ माजवून आपण नामानिराळे होण्याची चश्की असलेले समाजकंटक, यातल्या प्रत्येकालाच हे ठाऊक असतं की ‘माध्यम-अशिक्षित’ लोक किंचितही विचार न करता, कसलीही शहानिशा न करता, खरे खोटेपणा न तपासता मेसेजेस फॉरवर्ड करतात. या माध्यम असाक्षरतेमुळे एरवीची शिकलेली, सुसंस्कृत माणसंही ‘माध्यम-गुलाम’ म्हणून वापरली जातात.

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ ऑलपोर्ट आणि पोस्टमन यांनी १९४७मध्ये संशोधनांती तपशिलाने अफवांमागची मानसिकता मंडळी होती. हाच‘द बेसिक लॉ ऑफ रूमर्स’. त्यानुसार कशाची अफवा तयार होईल हे तो विषय त्या समुदायासाठी किती महत्त्वाचा आहे यावर अवलंबून असतं. आपल्याकडेही अशाच विषयांबद्दलच्या अफवा पसरतात, जे विषय सामाजिक स्तरावर असुरक्षितता निर्माण करणारे आहेत, मनात भीतीची भावना जागृत करणारे आहेत. अशाच विषयांची माहिती चटकन मोठय़ा प्रमाणावर प्रसारित होते आणि त्यातून अफवेचा अक्राळ-विक्राळ राक्षस उभा राहतो. ज्या त्या समाज गटांना संबंधित विषयाचं गांभीर्य किती वाटतं आहे, त्यानुसार अफवा किती गंभीर स्वरूप घेते हे अवलंबून असतं. आपल्याकडे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरणार्या अफवांमुळे सामुदायिक तणाव आणि हिंसेचं प्रमाण झपाटय़ाने वाढतं आहे, म्हणूनच सजग होण्याची गरज आहे. गॉसिप करणं आणि अफवा पसरवणं हा जरी मानवी स्वभाव असला तरी त्या गॉसिप आणि अफवांच्या आधारे प्रत्यक्षात हिंसा, दंगे, दंगली होतात तेव्हा आपल्यापर्यंत पोहचणार्या माहितीकडे जागतेपणे पाहावं लागेल आणि माध्यम शिक्षित व्हावंच लागेल.

(लेखिका समाज माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)

[email protected]

Previous articleलावणीला पुन्हा बदनाम करू नका!
Next articleबारामती जिंकणे किती अवघड आहे ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.