अमरावतीत आनंदराव अडसुळांची मदार भाजप व कॉंग्रेसवर !

-अविनाश दुधे
अमरावतीत २०१४ चा रिप्ले आहे. तेव्हासारखीच थेट लढत . शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा  . शिवसेना अडसूळ यांना  तिसऱ्यांदा तिकीट देईल, याबाबत कोणाच्याच मनात शंका नव्हती . काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारीबाबत मात्र शेवटपर्यंत सस्पेन्स कायम होता . दिनेश बूबपासून मुकुल वासनिकपर्यंत काही नावांची चर्चा झाली . मात्र तिकीट खेचून आणलं ते रवी राणा यांनीच . राणांच्या जुगाडू पॉलिटिक्सची ज्यांना कल्पना आहे, त्यांना यात काहीही नवल वाटलं नाही . चार दिवसांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांवर नवनीत राणांच्या उमेदवारीची बातमी फिरायला लागली आणि दुसऱ्या दिवशी हे जोडपं शरद पवार यांचे आशिर्वाद घ्यायला गेले तेव्हाच काय ते  स्पष्ट झालं होतं.
   रवी राणा पडद्यामागे काय काय करतात देव जाणे , मात्र आतापर्यंतच्या दहा वर्षाच्या राजकारणात त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्यांना हव्या तशा घडवून आणल्या आहेत . म्हणायला ते अपक्ष आहेत पण साऱ्या पक्षात त्यांचे लागेबांधे आहेत . त्यामुळे आपल्या राजकीय विरोधकांना ते नेहमीच चकित करतात . संजय खोडके व आनंदराव अडसूळ या दिग्गज राजकारण्यांना गेल्या काही वर्षात त्यांनी ज्या पद्धतीने जेरीस आणले त्याची एक स्वतंत्र कहाणी होऊ शकते. खोडके हे राष्ट्रवादीतील ताकतवर प्रस्थ असताना २०१४ मध्ये त्यांनी पत्नी नवनीत राणांसाठी राष्ट्रवादीचे तिकीट खेचून आणले होते. त्या घडामोडीमुळे वैतागून खोडकेंनी पक्ष सोडला .मधल्या काळात व्हाया काँग्रेस खोडके स्वगृही परतले पण राष्ट्रवादीने आणि छोट्या -मोठ्या दोन्ही पवारांनी राणांना दाखविलेला हिरवा कंदील ते थांबवू शकले नाही.
  अशीच काहीशी स्थिती अडसूळ यांची आहे. २०१४ च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी निकराची लढत दिल्यानंतर अडसूळ यांनी नवनीत यांच्या जात प्रमाणपत्राचा विषय हाती घेतला . त्यासाठी दोन स्वतंत्र माणसे नेमली . त्यांनी पंजाबपर्यत जावून नवनीत यांच्या दोन -चार पिढ्यांची कुंडली जमा केली . कागदपत्रांचे गठ्ठे , पुरावे जमा केले . यासाठी लाखो रुपये खर्च केले . जात पडताळणी समिती , नंतर न्यायालयातही ते दीर्घ लढाई लढलेत.  मात्र अजूनही केस सुरूच आहे .  राणांच्या जुगाडूपणासमोर त्यांना काही केल्या यश मिळत नाहीय. राणा ज्या पद्धतीने राजकारण करतात त्याचा अनेकांना संताप आहे , चीडही आहे. पण राणांचा फंडा क्लिअर आहे . राजकारण सत्तेसाठी करायचे असते आणि सत्ता मिळविण्यासाठी सारेच मार्ग वापरायचे असतात. त्यांच्या डोक्यात याविषयात अजिबात गोंधळ नाही .
   रवी राणांची ही कार्यपद्धती त्यांची ताकत आहे. मात्र याचमुळे प्रत्येक राजकीय पक्षात त्यांना पसंत न करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.   काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने ही जागा त्यांना सोडली खरी पण या दोन पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी राणा यांना मनापासून मदत करतील काय , यावरच नवनीत राणा यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे . कॉंग्रेसच्या राष्ट्रीय सचिव आमदार यशोमती ठाकूर , आमदार वीरेंद्र जगताप , राष्ट्रवादीचे संजय खोडके हे राणांच्या उमेदवारीबद्दल आपली नाराजी लपवत नाही . यशोमती ठाकूर तर राणा यांचा फोन घ्यायलाही तयार नाहीत . उद्या जर नवनीत निवडून आल्या तर हे जोडपं आपल्याला चांगलचं डोईजड जाईल याची काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना भीती आहे
    नेमकी हीच गोष्ट अडसूळ यांच्यासाठी अनुकूल आहे . त्यामुळे त्यांची स्वतःच्या पक्षापेक्षा काँग्रेस , राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षावर अधिक मदार  आहे . भारतीय जनता पक्षाला मोदींना पुन्हा पंतप्रधान करावयाचे असल्याने भाजपमधील एखाददुसरा अपवाद वगळता सारे नेते , कार्यकर्ते अडसूळ यांना मदत करण्याच्या मूडमध्ये आहे .  काँग्रेस , राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी मागील निवडणुकीत पडद्यामागून अडसूळ यांना उघड मदत केली होती . याहीवेळी त्याची पुनरावृत्ती होईल यात शंका नाही . अडसूळ हे तसे अजातशत्रू असल्याने त्यांच्या स्वतःच्या पक्षातील काही जुने पदाधिकारी व  शिवसैनिक सोडले तर त्यांना तसा फारसा कोणाचा विरोध नाही . स्थानिक राजकारण करताना शत्रू वाढवायचे नाहीत, हे पथ्य त्यांनी गेल्या १० वर्षात कटाक्षाने पाळलं. त्याचा त्यांना फायदा होतोय .गेल्या दोन टर्ममध्ये अडसूळ यांनी एक खासदार आपल्या मर्यादेत जेवढं काही करू शकतो तेवढं केलं. खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असल्याचा त्यांना फायदा झाला होता . त्यांच्यामुळे अमरावतीच्या वाट्याला मॉडेल रेल्वे स्टेशन , रेल्वे कोच दुरुस्ती कारखाना , नवीन रेल्वेगाड्या आदी  जे काही आलं होतं, त्यात माझाही हातभार होता हे अडसूळ यांना २०१४ मध्ये सांगता आलं . यावेळी तशी स्थिती नाही.  दुसऱ्या टर्ममध्ये काही किरकोळ गोष्टी वगळता अमरावतीच्या वाट्याला   फार काही आलं नाही . मात्र  कुठल्याही खासदाराला तशा मर्यादाच असतात . त्या अडसूळ यांनाही होत्या . त्या  मर्यादेत आनंदरावांनी वेगवेगळ्या मंत्रालयाला खूप सारी पत्र पाठवून मतदारसंघातील प्रलंबित विषयाचा पाठपुरावा चांगला केला .
   गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे अडसूळ यांना सहज विजय मिळाला होता. मात्र तरीही नवनीत राणा यांनी ३ लाख २९हजार मते घेतली होती .ही तशी अडसूळ यांचेसाठी धोक्याची घंटी होती.अडसूळ यांना त्याची कल्पना आली. म्हणूनच गेली पाच वर्ष जात प्रमाणपत्र वैधतेची लढाई ते निकराने लढले. मात्र नवनीत राणा यांना रिंगणात येण्यापासून ते रोखू शकले नाहीत . यावेळी मोदी लाट विरली आहे. दलित व मुस्लीम या दोन मोठ्या समाज घटकात सरकारबद्दल मोठी नाराजी आहे.  अशा स्थितीत वंचित बहुजन आघाडीकडून होणारं मतविभाजन टाळता आलं आणि गेल्यावेळी मिळालेली मत नवनीत राणा कायम ठेवू शकल्या तर अमरावतीची लढत कमालीची रंगतदार होईल.
(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक आहेत)
Previous articleवाढदिवस
Next articleदारिद्र्याच्या शोधयात्रेत चालताना ………..
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.